Wednesday, August 3, 2016

ज्या विहिरीत टँकर ओतला वेळूची ती विहीर जलयुक्तने झाली तुडुंब..!






          टंचाईग्रस्त म्हणून ओळखल्या जाणा-या कोरेगांव तालुक्यातील वेळू गावातील सार्वजनिक विहिरीमध्ये  टँकर ओतून या विहिरीतून गावाला पाणीपुरवठा केला जात असे तीच विहीर आज गावात झालेल्या जयुक्त शिवार अभियान अंतर्गत कामांमुळे तुडुंब भरली आहे. वेळूच्या शिवारात जागोजागी पाणी खेळले आहे. सध्या सुरू असणा-या पाझर तलाव जोड प्रकल्पाने गाव निश्चितच टँकरमुक्त झालेले असेल.
                अवघ्या 1511 लोकसंख्येचे वेळू हे गांव या गावामध्ये महाराष्ट्र शासनाच्या जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत आणि श्रमदानातून मोठया प्रमाणात जलसंधारणाची कामे झाली. पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून या गावात सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धाही घेण्यात आली. 445 कुटुंब संख्या असणा-या या गावात 311 शोषखड्डे तयार करण्यात आले. मनुष्यबळाव्दारे 924.31 घनमिटर सीसीटीचे काम तर 17 हजार 670 घनमिटर डीप सीसीटीचे काम यंत्राच्या माध्यमातून करण्यात आले आहे. 6 गॅबीएन बंधारे, 29 माती नालाबांध, कंपार्टमेंट बंडींग त्याचबरोबर खोलीकरण रुंदीकरण पाणीसाठा गाळ काढणे, विहीर पुनर्भरण आणि शेततळी यांचा या कामामध्ये समावेश आहे.
                गावातील सार्वजनिक विहिरीत टँकर ओतून त्यातून गावाला पाणीपुरवठा केला जात होता. सध्या गावात झालेल्या या कामांमुळे काही दिवसांपूर्वी कोरडया असणा-या या विहिरी तुडुंब भरलेल्या आहेत. गावची टंचाई कायमस्वरुपी मुक्त करण्यासाठी यांत्रिकी विभागामार्फत पाझर तलाव जोड प्रकल्प राबविण्यात येत आहे.
                प्रकाश भोसले (कार्यकारी अधिकारी यंत्रिकी विभाग)- गावामध्ये 4 पाझर तलाव आहेत यामधील बेलेवाडीमध्ये असणारा पाझर तलाव हा वरच्या बाजूला आहे आणि तो नेहमी पूर्ण क्षमतेने भरुन ओसंडून वाहत असतो. उर्वरित तलावांमध्ये मोठया प्रमाणात गाळ आणि गळती होती. सध्या जलरोधी चर काढून या पाझर तलावांमधील गळती रोखण्यात आली आहे. त्याचबरोबर तलावातील गाळही मोठया प्रमाणात काढण्यात आला आहे. या कामांमुळे आणि झालेल्या पावसांमुळे सध्या या तलावांमध्ये समाधानकारक पाण्याची पातळी झाली आहे. बेलेवाडीतून ओसंडून वाहणारे अतिरिक्त पाणी खाली असणा-या पाझर तलावांमध्ये सोडण्यात येणार आहे. त्यासाठी 750 मिटर पाईपव्दारे हे दोन्ही पाझर तलाव जोडण्यात येत आहेत. येत्या काही दिवसांत हा पाझर तलाव जोड प्रकल्प पूर्ण होईल.
                प्रविण भोसले (सरपंच) -  जिल्हाधिकारी अश्विन मुद्‌गल यांच्या मार्गदर्शनाने गावामध्ये मोठया प्रमाणात लोकचळवळ उभी राहिली त्यातून जलसंधारणाची  कामे करण्यात आली. ज्या विहिरी कोरडया होत्या त्या तुडुंब भरल्या आहेत. हे चित्र पाहून मोठे समाधान मिळत आहे. गावामध्ये ठिबक सिंचन मोठया प्रमाणात राबविण्यात येत आहे.
                सुनील साळुंखे (तालुका कृषी अधिकारी)- कृषी विभागामार्फत करण्यात आलेल्या बंधा-यांमुळे चांगला पाणी साठा झालेला आहे. त्यामुळे परिसरातील विहिरी तुडुंब भरलेल्या आहेत. शेतक-यांची वॉटर बँक असणा-या शेततळयांची कामेही या गावात झालेली आहेत.
                वैशाली सुतार (कृषी सहाय्यक)- कृषी विभागामार्फत खूप मोठया प्रमाणात कामं झाल्यामुळे 343 टीसीएम इतका पाणी साठा झाला आहे. यापुढे गावामध्ये टंचाई भासणार नाही.
                संपत दिंडे (शेतकरी)- गावात चांगला पाणी साठा झाला आहे  त्यामुळे मला खूप आनंद झाला आहे. विहिरी तुडुंब भरल्या आहेत. निश्चितपणे शेतीचे उत्पन्न हे दुप्पट तिप्पट येईल.
                पाझर तलाव जोड प्रकल्प हा भविष्यामध्ये वेळूला पूर्णपणे टँकरमुक्त केल्याशिवाय राहणार नाही. त्याचबरोबर लोकचळवळीने वेळूच्या शिवारात आणलेलं पाणी वेळूची नवीन ओळख बनली आहे.
               
- प्रशांत सातपुते
जिल्हा माहिती अधिकारी, सातारा
00000

Tuesday, August 2, 2016

बालकांच्या पुरस्कारासाठी 15 ऑस्टपर्यंत प्रस्ताव सादर करावेत


          सातारा, दि. 2 (जिमाका) : सन 2015-2016 च्या  प्रस्तावासाठी 1 जुलै 2015 ते 30 जून 2016 या कालावधीमध्ये शौर्य दाखविलेल्या बालकांच्या पुरस्कारासाठी प्रस्ताव दिनांक 15 ऑगस्ट 2016 पर्यंत  सादर करावेत, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी एस.व्ही.शिंदे यांनी केले आहे.
                भारतीय बाल कल्याण परिषद नवी दिल्ली यांच्या वतीने 1957 पासून दरवर्षी शौर्य बालक पुरस्कार दिला जातो. वय वर्ष 6 ते 18 वयोगटातील मुला मुलींनी दुस-याचे प्राण वाचविण्यासाठी अथवा अपघात टाळण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालून अथवा  प्रसंगावधान दाखवून अतुलनीय साहस दाखिविल्याबद्दल राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार देण्यात येतो. सन 2015-16 च्या प्रस्तावासाठी  1 जुलै 2015 ते 30 जून 2016 या कालावधीमध्ये शौर्य दाखविलेल्या बालकांच्या पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविण्यात येत असून प्रस्तावासोबत घडलेल्या घटनेचा तपशिल स्वतंत्रपणे  इंग्रजी  किंवा हिंदीत असणे आवश्यक आहे. तपशिल अधिकृत असावा घडलेल्या घटनेमध्ये अर्जदार मुला मुलीने व्यक्ति:शा केलेल्या साहसाचा तपशिल, उल्लेख हिंदी व इंग्रजीत असणे आवश्यक आहे. या संबंधीत स्थानिक वर्तमानपत्रात आलेल्या घटनेचा वृत्तांत, दुरदर्शन किंवा इतरत्र प्रसिध्द झालेल्या बातमीचे फोटो इ. प्रमाणित करुन प्रस्तावासोबत जोडणे आवश्यक आहे. मुलाच्या वयाच्या दाखल्याची साक्षांकित प्रत, जिल्हाधिकारी, सरकारी अधिकारी, पोलीस खात्यातील प्रमुख, जिल्हा, राज्य पातळीवरील, पंचायत, जिल्हा परिषद प्रमुख, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक यापैकी एका व्यक्तीचे शिफारस पत्र जोडणे आवश्यक आहे.
                प्रस्ताव सादर करण्याकरीता व अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय,नविन प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, एस.टी.स्टॅण्ड शेजारी. ता.जि.सातारा दुरध्वनी क्र.02162-237353 यांच्याकडे संपर्क साधून परिपूर्ण प्रस्ताव दिनांक 15 ऑगस्ट 2016 पर्यंत सादर करावेत असेही श्री.शिंदे यांनी कळविले आहे.

0000

कास पुष्प पठाराला भेट देणाऱ्या पर्यटकांकडून शुल्क आकारणी


          सातारा, दि. 2 (जिमाका) :कास पुष्प पठाराचा हंगाम 10 ऑगस्टपासून सुरु होणार असून कास पठावर भेट देणा-या पर्यटकांकडून विविध प्रकारचे शुल्क आकारण्यात येणार आहे, अशी माहिती उपवनसंरक्षक अनिल अंजनकर यांनी दिली आहे.
                नैसर्गिक जागतिक वारसा स्थळ: कास पुष्प पठाराचे शाश्वत संवर्धनासाठी करावयाच्या उपाययोजनेसाठी  नुकतीच  बैठक  आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस पर्यावरण तज्ञ, पर्यावरण संस्था उपस्थित होते. या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार कास पठारावरील भेट देणा-या पर्यटकांकडून खालीलप्रमाणे विविध प्रकारच्या  शुल्क आकारण्यात येणार आहेत.
अ.क्र.
तपशील
प्रस्तावित शुल्क : शनिवार-रविवार व शासकीय सुट्टीदिवशी
प्रस्तावित शुल्क:
इतर दिवशी
1
12 वर्षावरील सर्वांना
रु.100/- प्रति व्यक्ती जास्तीत जास्त 3 तासांसाठी
रु.50/- प्रती व्यक्ती जास्तीत जास्त 3 तासांसाठी
2
ज्येष्ठ नागरिक
प्रवेश शुल्क माफ आहे
प्रवेश शुल्क माफ आहे (वयाचा पुरावा दाखवावा लागेल)
3
पार्किंग चार्जेस
दुचाकी वाहने
चारचाकी वाहने
मिनी बस व मोठी वाहने

रुपये 10 प्रती
रुपये 50 प्रती
रुपये 100 प्रती
वाहन 4 तासांसाठी


रुपये 10 प्रती
रुपये 50 प्रती
रुपये 100 प्रती
वाहन 4 तासांसाठी

4
कॅमेरा शुल्क (एसएलआर)
रुपये 100 प्रती कॅमेरा जास्तीत जास्त 3 तासांसाठी
रुपये 100 प्रती कॅमेरा जास्तीत जास्त 3 तासांसाठी
5
गाईड शुल्क
रुपये 100 प्रती 10 व्यक्तींकरिता 1 तास
रुपये 100 प्रती 10 व्यक्तींकरिता 1 तास



            कास पुष्प पठारावर भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी सकाळी 7 ते सकाळी 10 वाजेपर्यंत 750 पर्यटक, सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत 750 पर्यटक, दुपारी 1 ते दुपारी 4 वाजेपर्यंत 750 पर्यटक आणि दुपारी 4 ते रात्री 7 वाजेपर्यंत 750 पर्यटक असे एकूण 3 हजार पर्यटकांना दर दिवशी प्रवेश देण्यात येणार आहे.
            प्रवेश शुल्क फक्त वन विभागाच्या www.kas.ind.in या संकेतस्थळावर ऑनलाईन स्वीकारले जाईल. कास पठारावर भेट देणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांच्या पार्कींगकरिता घाटई फाट्याच्या अलिकडे व कास पठार संपल्यानंतर तलावाच्या अलिकडे गेल्या वर्षी कास गावाने पार्कींगची सोय उपलब्ध केलेल्या ठिकाणी पार्कींग करावे.
            शासकीय सुट्टी तसेच शनिवार व रविवार या दिवशी मोठ्या संख्येने पर्यटक भेट देत असतात त्यांच्या हालचालींवर योग्य नियंत्रण ठेवण्यासाठी स्थानिक निसर्ग प्रेमी संस्था व स्वयंसेवी संस्था तसेच होमगार्ड व एनसीसी यांची मदत घेण्यात येणार आहे. कास पुष्प पठार परिसरामध्ये पर्यटकांना माहितीकरीता विविध ठिकाणी माहिती फलक, नियमांचे फलक लावण्यात येणार असून पठार परिसरामध्ये पर्यटक अस्तित्वात असलेल्या पायवाटांचाच वापर करा.  कास पुष्प पठारावर रात्रीच्या वेळी वर्दळ राहणार नाही यासाठी घाटईफाटा या ठिकाणी तसेच कास तलाव परिसरामध्ये बॅरिकेट लावण्यात येणार आहे, असेही श्री. अंजनकर यांनी कळविले आहे.

00000

तंबाखूजन्य पदार्थ खाणे टाळा - डॉ. विकास कोठावडे


          सातारा, दि. 2 (जिमाका) : जगामध्ये कर्करोगाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत, ही चिंतेची बाब असून तंबाखूजन्य पदार्थ सेवन करणे सर्वांनी टाळावे, असे आवाहन कर्करोग तज्ञ डॉ. विकास कोठावडे यांनी आज केले.
येथील क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात मौखिक, डोके, मान व चेहरा यांचा कर्करोग सप्ताह निमित्त आयोजित कार्यक्रमात डॉ. कोठावडे बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने करण्यात आली. याप्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीकांत भोई, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. उज्वला माने,  दंत शल्यचिकित्सक डॉ. विजया जगताप, डॉ. सुरेश पाटील, डॉ. संजोग कदम, डॉ. सुधीर बक्षी आदी यावेळी उपस्थित होते.
                27 जुलै  हा जागतिक मौखिक, डोके मान व चेहरा यांचा कर्करोग दिन म्हणून 1 ऑगस्ट पासून  कर्करोग जनजागृती सप्ताह  मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत असल्याचे सांगून डॉ. कोठावडे पुढे म्हणाले, कर्करोगाच्या लक्षणांची माहिती होणे आता आवश्यक झाले आहे. तंबाखूजन्य पदार्थ खाणाऱ्या प्रत्येक माणसाला कर्करोग होवू शकतो. भारतामध्ये तंबाखूजन्य पदार्थ खाणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने तोंडाचे कर्करोग असणारे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहे.  पहिल्या पायरीत कर्करोगाचे निदान झाल्यास कर्करोग पूर्णपणे बरा होवू शकतो, असेही त्यांनी शेवटी सांगितले.
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने म्हणाले, भारतामध्ये कर्करोग रुग्णांच्या मृत्युच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे. याचे कारण म्हणजे निदान हे पहिल्या व दुसऱ्या पायरीत न होता थेट तिसऱ्या व चौथ्या पायरीत होते. तोपर्यंत आजारांचे स्वरुप गंभीर झाले असल्यामुळे रुग्णास परिणामी मृत्युस सोमोरे जावे लागते.  जास्तीत जास्त लोकांना कर्करोग स्वत: कसा ओळखावा व लवकर तज्ञांकडून निदान करावे या विषयी साक्षर करणे हेच या अभियानाचे मुळ उद्दिष्ट आहे.   कर्करोगाविषयी जनजागृती करणे महत्वाचे आहे, असेही त्यांनी शेवटी सांगितले.
यावेळी दंत शल्यचिकित्सक डॉ. विजया जगताप यांनी तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणार नाही याबाबत उपस्थित असणाऱ्यांना शपथ दिली. या कार्यक्रमास वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर्स, परिचारीका, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0000

नारी शक्ती पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन


सोलापूर दि. 2 : - महिलांच्या सक्षमीकरणासाठी मौलिक कार्य करणाऱ्या महिला व संस्थांच्या सन्मानार्थ केंद्र शासनाकडून नारी शक्ती पुरस्कार देण्यात येणार आहेत. संस्थेसाठी  रु. 2 लाख व प्रशस्तीपत्र व वैयक्तिक पुरस्कारासाठी रु. 1 लाख व प्रशस्तीपत्र, असे पुरस्काराचे स्वरुप आहे.    सदर पुरस्कार 8 मार्च 2017  या जागतिक महिला दिनी प्रदान करण्यात येणार आहे.
          पात्र इच्छुक व्यक्ती / संस्थांनी विहीत नमुन्यातील अर्जासह प्रस्ताव 3 प्रतीत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, 165 अे, रेल्वे लाईन्स, सुरवसे टॉवर्स, 4 था मजला, सोलापूर दूरध्वनी क्रमांक 0217-2310671 या कार्यालयात दिनांक 10 ऑगस्ट 2016 पर्यंत सादर करावेत. अधिक माहितीकरीता कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी  धर्मपाल शाहू यांनी केले आहे.
00000

पंधरा दिवसात प्रत्येक शासकीय कार्यालयात धुम्रपान निषिध्द क्षेत्रचे फलक लावा -जिल्हाधिकारी सौरभ राव यांची सुचना


पुणे दि. 2 : धुम्रपान करणाऱ्यांसह त्याच्या आसपासच्या प्रत्येकाला धुम्रपानाचे दुष्परिणाम भोगावे लागतात. सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करण्यास बंदी असून जिल्ह्यातील प्रत्येक कार्यालयात येत्या पंधरा दिवसात 'धुम्रपान निषिध्द क्षेत्र'चे फलक दर्शनी जागेत लावण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिली.
     येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मौखिक आरोग्य सप्ताहानिमित्त 'तंबाखूचे दुष्परिणाम तंबाखू नियंत्रण कायदा' या बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. या बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक संजय देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाचे प्रतिनिधी डॉ. जोशी, उपस्थित होती 
     जिल्हाधिकारी राव म्हणाले, तंबाखूमुळे अनेक मौखिक आजारांना सामोरे जावे लागते. तंबाखू मुक्तीसाठी समाजाच्या सर्व स्तरात प्रबोधन होणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील शाळांमध्ये तसेच महाविद्यालयाच्या 100 मीटर परिसात तंबाखूजन्य पदार्थ विक्रीला बंदी आहे. त्याची कडक अंमलबजावणी सर्वत्र होणे आवश्यक आहे. शाळा, महाविद्यालयांच्या परिसराबरोबच शासकीय कार्यालयेही तंबाखू मुक्त करण्याच्या दृष्टीने तातडीने उपाय योजना करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.
     जिल्हा रुग्णालयाच्या दंत विभाग प्रमुख डॉ. सुहासिनी घाणेकर यांनी तंबाखूचे दुष्परिणाम, मुख कर्करोग, तंबाखू नियंत्रण कायदा उपाय याविषयी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे माहिती दिली
     या बैठकीला पुणे पंचायत समितीचे गट विकास अधिकारी विकास दांगट, शिक्षण विभागाचे एच. आय.आतार, जे.व्ही. चव्हाळे, शिक्षण विस्तार अधिकारी सहदेव आव्हाड, यांची प्रामुख्याने उपस्थिती होती

****

Monday, August 1, 2016

ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंना मुख्यमंत्र्यांकडून शुभेच्छा


 
मुंबई, दि. 1 : ब्राझिलमधील रिओ शहरात होत असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झालेल्या महाराष्ट्रातील खेळाडूंचे  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केले असून या स्पर्धेतील चमकदार कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.      राज्यातील ललिता शिवाजी बाबर आणि कविता रामदास राऊत (ॲथलीट),आयोनिका असिम पॉल (नेमबाजी), देविंदर सुनील वाल्मिकी (हॉकी), दत्तू बबन भोकनळ (नौकानयन) तसेच प्रार्थना गुलाबराव ठोंबरे (टेनिसहे खेळाडू ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
 मुख्यमंत्री आपल्या शुभेच्छापर संदेशात म्हणतात की, ऑलिम्पिकसारख्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील सर्वाधिक प्रतिष्ठेच्या क्रीडा स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड होणे ही बाब निश्चितच अभिमानाची आहेया स्पर्धेत आपण चमकदार कामगिरी करून देशासोबतच राज्याचाही लौकिक वाढवावा.
दरम्याननॅशनल अँटी डोपींग असोसिएशन (नाडा) या संस्थेने कुस्तीपटू नरसिंग यादव याला उत्तेजक द्रव्य सेवनप्रकरणी दोषमुक्त केले आहे. याबाबतही मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले आहे.