Tuesday, August 2, 2016

तंबाखूजन्य पदार्थ खाणे टाळा - डॉ. विकास कोठावडे


          सातारा, दि. 2 (जिमाका) : जगामध्ये कर्करोगाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत, ही चिंतेची बाब असून तंबाखूजन्य पदार्थ सेवन करणे सर्वांनी टाळावे, असे आवाहन कर्करोग तज्ञ डॉ. विकास कोठावडे यांनी आज केले.
येथील क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात मौखिक, डोके, मान व चेहरा यांचा कर्करोग सप्ताह निमित्त आयोजित कार्यक्रमात डॉ. कोठावडे बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने करण्यात आली. याप्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीकांत भोई, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. उज्वला माने,  दंत शल्यचिकित्सक डॉ. विजया जगताप, डॉ. सुरेश पाटील, डॉ. संजोग कदम, डॉ. सुधीर बक्षी आदी यावेळी उपस्थित होते.
                27 जुलै  हा जागतिक मौखिक, डोके मान व चेहरा यांचा कर्करोग दिन म्हणून 1 ऑगस्ट पासून  कर्करोग जनजागृती सप्ताह  मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत असल्याचे सांगून डॉ. कोठावडे पुढे म्हणाले, कर्करोगाच्या लक्षणांची माहिती होणे आता आवश्यक झाले आहे. तंबाखूजन्य पदार्थ खाणाऱ्या प्रत्येक माणसाला कर्करोग होवू शकतो. भारतामध्ये तंबाखूजन्य पदार्थ खाणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने तोंडाचे कर्करोग असणारे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहे.  पहिल्या पायरीत कर्करोगाचे निदान झाल्यास कर्करोग पूर्णपणे बरा होवू शकतो, असेही त्यांनी शेवटी सांगितले.
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने म्हणाले, भारतामध्ये कर्करोग रुग्णांच्या मृत्युच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे. याचे कारण म्हणजे निदान हे पहिल्या व दुसऱ्या पायरीत न होता थेट तिसऱ्या व चौथ्या पायरीत होते. तोपर्यंत आजारांचे स्वरुप गंभीर झाले असल्यामुळे रुग्णास परिणामी मृत्युस सोमोरे जावे लागते.  जास्तीत जास्त लोकांना कर्करोग स्वत: कसा ओळखावा व लवकर तज्ञांकडून निदान करावे या विषयी साक्षर करणे हेच या अभियानाचे मुळ उद्दिष्ट आहे.   कर्करोगाविषयी जनजागृती करणे महत्वाचे आहे, असेही त्यांनी शेवटी सांगितले.
यावेळी दंत शल्यचिकित्सक डॉ. विजया जगताप यांनी तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणार नाही याबाबत उपस्थित असणाऱ्यांना शपथ दिली. या कार्यक्रमास वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर्स, परिचारीका, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0000

No comments:

Post a Comment