Thursday, August 4, 2016

गतिमान व लोकाभिमूख प्रशासनासाठी महाराजस्व अभियानाचे आयोजन

1 ऑगस्ट,2016 पासून अंमलबजावणीस सुरुवात

            पुणे, दि. 04 – सर्वसामान्य नागरिक, शेतकरी व शेतमजूर यांचा त्यांच्या दैनंदिन कामकाज व विविध प्रश्नांच्या संदर्भात महसूल विभागांतर्गत क्षेत्रीय कार्यालयाशी नेहमी संबध येतो. सर्वसामान्य जनतेचे व शेतकऱ्यांचे दैनंदिन प्रश्न त्वरित निकाली काढण्यासाठी यापूर्वी शासनातर्फे विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. महसूल प्रशासन अधीक लोकाभिमूख, कार्यक्षम, गतीमान व पारदर्शक करण्याच्यादृष्टीने राज्यात 1 ऑगस्ट पासून महाराजस्व अभियान राबविण्यास सुरुवात झाली आहे. हे अभियान यापूर्वीच्या अभियानाशी तुलना केल्यास विस्तारित स्वरुपात वर्षभर राबविण्यात येणार आहे. या महाराजस्व अभियानात लोकाभिमूख घटकांचा समावेश करण्यात आला आहे. हे लोकाभिमूख घटक जिल्हाधिकारी यांच्या नेत्वृत्वाखाली महसूल यंत्रणेमार्फत गावपातळीपर्यत राबविण्यात येणार आहेत.
            या महाराजस्व अभियानामध्ये प्रत्येक गावांत शिवारफेरी कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. गट व गावनिहाय जमीन व जमीन वापर पध्दती तसेच पाणीपुरवठयाची साधने,जलसिंचनाच्या नोंदी, पिकांच्या नोंदी अचूक व परिपूर्ण करण्यात येणार आहेत. या माध्यमातून गांव नमुने 1 ते 21 अद्ययावत करण्यात येणार आहे. अभियान अंमलबजावणी एक भाग म्हणून जमिनींच्या अनधिकृतपणे अकृषिक वापर करणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे.
            शासकीय जमिनीवर बऱ्याच ठिकाणी अतिक्रमण केलेले असते. इनाम व वतन जमीनी ज्या शर्तींवर दिलेल्या असतात त्यांचा भंग केलेला असतो. काही प्रकरणांत कब्जेपट्टयाने जमिनी दिलेल्या असतात. यामध्ये काही वेळा गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी शासनाकडे प्रापत होतात. या अभियानामध्ये अशा प्रकरणामधे तातडीने कारवाई करण्यात येणार आहे. तसेच वर्ग-2 भोगवटादारांची यादी अद्ययावत करुन त्याची डेटा बँक तयार करण्यात येणार आहे. गांव नकाशाप्रमाणे बंद झालेले वहीवाटीची रस्ते, गाडी रस्ते,पाणंद,शेतरस्ते व शिवाररस्ते अभियानाम विशेष प्रयत्नाने मोकळे करण्यात येणार आहे. महसूल विभागामध्ये विविध अर्ध-न्यायिक स्वरुपाचे प्रकरणे चालविण्यात येतात. अशा अर्ध-न्यायिक स्वरुपाच्या प्रकरणांचा आढावा घेऊन त्याचे पुनर्विलोकन करणे, पुनरिक्षण करण्यावर अभियानात भर देण्यात येणार आहे. एक महिन्याच्यावर प्रलंबित असलेले फेरफार प्रकरणे निकाली काढणे, भूसंपादन केल्याप्रकरणी कमी जास्त पत्रके करुन दप्तर अद्ययावत करणे, शासनाने कुळ कायद्यामध्ये अलीकडेच केलेल्या बदलांची अंमलबजावणी करणे, उद्योग व्यवसाय सुगमता साध्य करणे, विशेष शिबीरे घेऊन विविध दाखले देणे, विस्तारीत समाधान योजना राबविणे अशाप्रकारची जनतेशी निगडीत असलेली कामे प्राधान्याने या अभियानामध्ये करण्यात येणार आहे.
            दैनंदिन कामकाज पार पाडण्यासाठी महसूल विभागामध्ये मोठया प्रमाणावर अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. गांव पातळीवर महसूल यंत्रणा कार्यरत असल्यामुळे कर्मचाऱ्यांचे सेवाविषयक अनेक प्रश्न निर्माण होत असतात. या अडचणी सोडविण्यासाठी महाराजस्व अभियानामध्ये प्रशासकीय घटकांचा समावेश करण्यात आला आहे.
            सर्व संवर्गाची ज्येष्ठता सूची अद्ययावत करणे, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे गोपनिय अहवाल लिहीणे, आवश्यक असेल तेथे कर्मचाऱ्यांसाठी विभागीय परिक्षा आयोजित करणे, कर्मचाऱ्यांचे पदोन्नतीचे प्रस्ताव तयार करणे, सर्वांसाठी सेवांतर्गत प्रशिक्षणाचे आयोजन करणे, प्रलंबित विभागीय चौकशी प्रकरणांचा निपटारा करणे, सेवापुस्तके अद्ययावत करणे, लेखा परिक्षणातील आक्षेपांचे निराकरण करणे, लोकसेवा समितीचे अहवाल, नागरी अहवाल व महसूली जमा अहवालावरील प्रलंबीत आक्षेपांचा निपटारा करणे, विविध कामांच्या पूर्ततेसंदर्भात उपयोगिता प्रमाणपत्र महालेखापालांना सादर करणे, सहा बंडल पध्दतीने अभिलेखे ठेवणे, अभिलेख कक्ष अद्ययावत करणे, जडसंग्रह वस्तू नोंदवहीचे अद्ययावतीकरण महाराजस्व अभियानामध्ये करण्यात येणार आहे. या अभियानात अधिकारी व कर्मचाऱ्यांना पूर्ण केलेल्या कामांचा दर तीन महिन्याला शासनस्तरावर आढावा घेण्यात येणार आहे. कालबध्द मोहिम आखून महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी हे अभियान यशस्वीपणे राबविण्यासाठी सज्ज झाले आहेत.

                                                              जयंत कर्पे
                                                              माहिती सहायक
                                                              जिल्हा माहिती कार्यालय,पुणे


No comments:

Post a Comment