Friday, August 5, 2016

अनुसूचित जाती शेतकऱ्यांसाठी शेतीसाठी अर्थसहाय्य योजनेचा लाभ घ्यावा


                सातारा दि. 5 (जि.मा.का) : अनुसूचित जाती, नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी शेतीसाठी अर्थसहाय्य देण्याची योजना सन 2016-17 या वित्तीय वर्षामध्ये राबविण्यात येणार आहे. या योजनेचा जास्ती जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी यांनी केले आहे.
                योजनेच्या अटी शर्ती : लाभार्थी शेतकऱ्याजवळ त्याचे स्वत:चे नावे 6 हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी शेतजमिन असावी. लाभार्थी हा अनुसूचित जाती  किंवा नवबौद्ध असावा. संबधित लाभार्थीचे सर्व मार्गाने मिळणारे वार्षिक उत्पन्न 50 हजारच्या आत असावे. शेतकरी स्वत: शेती विकासाची कामे हाती घेण्यास उत्सूक असावा. वैयक्तीक लाभार्थी निवडताना दारिद्रय रेषेखालील व महिला शेतकऱ्यास प्राधान्य राहिल. एकाच व्यक्तीला एकापेक्षा जास्त वेळा लाभ देय नाही.
                निवडीसाठी सादर करावयाची कागदपत्रे : लाभार्थी शेतकऱ्याचे नावे असलेला 8/अ व 7/12 उतारे. लाभार्थी शेतकऱ्याचा प्रांत अधिकारी, तहसीलदार यांचे सहीचा जातीचा दाखला. तहसीलदार यांच्या सहीचा लाभार्थीचे 50 हजार च्या आतील अत्पन्नाचा दाखला. लाभार्थी दारिद्रय रेषेखालील असल्यास ग्रामसेवक, तलाठी, गट विकास अधिकारी यांचा दाखला. लाभार्थी योजनेचा लाभ घेण्यास इच्छूक असल्याचा लेखी अर्ज.
                योजनेंतर्गत मंजूर अनुदानच्याबाबी : जमिन सुधारणा, निविष्ठा, अवजारे, इनवेल, बोअर, पंपसंच, पाईपलाईन, जुनी विहिर दुरुस्ती, नवीन विहिर, बैलजोडी, रेडेजोडी, बैलगाडी, शेततळे, तुषार व ठिबक सिंचन संच, ताडपत्री, तसेच परसबाग इत्यादी बाबींसाठी अनुदान देय आहे.  या बाबींपैकी  जे लाभार्थी नवीन विहिर या घटकाचा लाभ घेणार आहेत अशा लाभार्थींना जास्तीत जास्त 1 लाख कमाल मर्यादेपर्यंत तर नवीन विहिर या घटकाचा लाभ घेणार नाहीत अशा लाभार्थींना रुपये 50 हजार कमाल मर्यादेर्यंत वरील पैकी केवळ एका घटकांसाठी अनुदान देय आहे. जे लाभार्थी नवीन विहिर या घटकाचा लाभ घेणार आहेत त्यांना इतर बाबींचा देय राहणार नाही. योजनेंतर्गत निवड झाल्यापासून दोन आर्थिक वर्षापर्यंत लाभ देय राहील.
                विशेष घटक योजनेंतर्गत मंजूर बाबी व कमाल अनुदान मर्यादा पुढीलप्रमाणे. जमिन सुधारणा (1 हेक्टर मर्यादेत) मृद संधारण निकषानुसार 40 हजार रुपये, प्रात्यक्षिकासाठी निविष्ठा वाटप (1 हेक्टर मर्यादेत) 5 हजार रुपये मर्यादेत. पीक सरंक्षण व शेतीची सुधारीत अवजारे 10 हजारच्या मर्यादेत. बैलजोडी, रेडेजोडी (स्थानिक बाजार भावानुसार) 30 हजार रुपये मर्यादेत. बैलगाडी 15 हजार रुपयांच्या मर्यादेत. जुनी विहिर दुरुस्ती 30 हजाराच्या मर्यादेत. इनवेल बोअरिंग 20 हजारच्या मर्यादेत नाबार्डच्या निकषानुसार. पाईप लाईन 20 हजारच्या मर्यादेत 300 मिटर पर्यंत नाबार्डच्या निकषानुसार.  पंपसंच 20 हजार रुपयांच्या मर्यादेत. नवीन विहिर 1 लाख रुपयांच्या मार्यादेत. शेततळे 35 हजार मृ.सं. निकषानुसार. परसबाग फलोत्पादन विभागाच्या निकषानुसार 200 रुपये प्रती लाभार्थी. तुषार व ठिबक सिंचन संच 25 हजार प्रती हेक्टरी. ताडपत्री 10 हजारच्या मर्यादेत.
                तरी इच्छुक लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी अथवा कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असेही अवाहन जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकाऱ्यांनी केले आहे.
00000

No comments:

Post a Comment