सातारा दि. 5 (जि.मा.का) : जिल्ह्यातील
प्राथमिक आरोग्य केंद्रे शासनाच्या
कायाकल्प योजनेत सहभागी होणार आहेत. तसेच काही प्राथमिक आरोग्य केंद्रे एनएबीएच
नामांकित होणार आहेत. सर्व योजनांचा एकत्रित भाग म्हणून सातारा जिल्ह्यामध्ये
स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र योजना राबविण्यात येणार आहे. विविध नामांकन व
दर्शक उदिष्टपुर्तीनुसार प्राथमिक आरोग्य केंद्र गुणांकन केले जाणार असून सर्वाधिक
गुण मिळणारे प्राथमिक आरोग्य केंद्र स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणून
गरैवण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप
माने यांनी दिली आहे.
आरोग्य संस्थांना गुणात्मक
सेवा देण्यासाठी, सक्षम करण्यासाठी व सनियंत्रण करणे हा स्मार्ट प्राथमिक आरोग्य
केंद्र योजनेचा महत्वाचा भाग आहे. जिल्ह्यातील आरोग्य केंद्रे स्मार्ट झाल्यास या
योजनेमुळे रुग्णांना मिळणाऱ्या सेवांचा दर्जा उंचावणार आहे.
योजनेचे उद्दिष्ट पुढीलप्रमाणे
: रुग्णांना गुणवत्तापूर्ण सेवा देणे. प्राथमिक आरोग्य केंद्रांचे गुणवत्तापूर्व
सेवा देण्याकामी सक्षमिकरण सनियंत्रण करणे. 100 टक्के संस्थात्मक प्रसूती करणे,
शासकीय संस्थेतील प्रसुतीचे प्रमाण वाढविणे. 100 टक्के लसीकरण करणे. बालमृत्यू आणि
माता मृत्यू कमी करणे. सार्वजनिक स्वच्छता, पोषण आहार, पाणी पुरवठा यासारख्या
मुलभूत सेवांसोबत सार्वजनिक आरोग्य सेवा सर्वांना सुलभतेने उपलब्ध करुन देणे.
स्थानिक साथरोग नियंत्रणाबरोबरच इतर संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांचा प्रतिबंध
आणि नियंत्रण करणे. सर्व लोकांना प्राथमिक आरोग्य सेवा मिळण्याबाबत उपाययोजना
आखणे.
कायाकल्प अभियानांतर्गत परिसर
स्वच्छता यावर भर दिला जाणार आहे. कॅन्सर साक्षर सातारा अभियानाद्वारे प्राथमिक
आरोग्य केंद्रस्तरावर गर्भाक्षय, मुख, स्तन कर्करोगाचे निदान शिबीर घेण्यात येवून
रुग्णंना मोफत निदान व उपचार सुविधा पुरविण्यात येणार आहे. मानसिक आजार व अपंग
निदान शिबीरामार्फत मोफत निदान हे तज्ञाकडून करण्यात येवून अपंगांना साहित्य
पुरविण्यात येणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, बसस्थानक, ग्रामपंचायत, पंचायत
समिती येथे हिरकणी कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. ध्वनवंतरी गार्डन ही योजना सर्व
प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये राबविण्यात येणार असून त्यामध्ये आयुर्वेदीक वन
औषधीची लागवड व संवर्धन रुग्ण कल्याणासाठी करण्यात येणार आहे. सर्व प्राथमिक
आरोग्य केंद्रांमध्ये कुपोषण, रक्तक्षय कमी करणे तसेच किशोरवयीन आरोग्य व आरोग्याबाबतचे
गैरसमज त्यासंबंधित आजार यांवर चर्चा व मार्गदर्शन करण्यासाठी 10 ते 19 वयोगटातील
शालेय व शाळाबाह्य मुलांमुलींचे किशोरवयीन मैत्री क्लिनिक सुरु करण्यात येणार आहे.
स्मार्ट प्राथमिक आरोग्य
केंद्र अभियान जिल्ह्यात राबविण्यात येणार असून सर्वोत्कृष्ट प्राथमिक आरोग्य
केंद्र स्मार्ट प्राथमिक आरोग्य म्हणून
जिल्हास्तरावर रोख बक्षीस, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात येईल.
तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांचाही
वैयक्तीकरित्या गौरव केला जाणार आहे, असेही डॉ. माने यांनी कळविले आहे.
00000
No comments:
Post a Comment