Saturday, April 11, 2020

'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'साठी टोरेंट समुहातर्फे 5 कोटींचा निधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आवाहनास प्रतिसाद

उपमुख्यमंत्री कार्यालय,
मंत्रालय, मुंबई.
दि. 11 एप्रिल 2020.

'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'साठी टोरेंट समुहातर्फे 5 कोटींचा निधी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आवाहनास प्रतिसाद

           मुंबई दि.11: ‘कोरोना’ विषाणूच्या प्रसारामुळे बाधित झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी तसेच इतर उपाययोजना करण्यासाठी 'टोरेंट' समुहाच्यातर्फे 5 कोटी रुपयांचा निधी ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19’साठी दिला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत हा निधी दिल्याची माहिती 'टोरेंट' समुहाचे संचालक जिनाल मेहता यांनी दिली.  
            संपुर्ण जगावर आलेले कोरोना विषाणूचे संकट देशासह महाराष्ट्रावरही आले आहे. या संकटाचा मुकाबला करण्यासाठी राज्य शासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. मात्र या संकटाची व्याप्ती मोठी असल्याने या संकटाचा मुकाबला करण्यासाठी राज्य सरकारसोबत अनेक स्वयंसेवी संस्था, उद्योजक, धार्मिक संस्था, वित्तीय संस्था स्वयंप्रेरणेने पुढे येत आहेत. याचसाठी राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोविड-19’ हे स्वतंत्र बँक खाते उघडले आहे. या मदत कक्षाकडे मदतीचा ओघ सुरु आहे. 
        उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समाजातील विविध क्षेत्रातील संस्थांना आणि व्यक्तींना यासाठी योगदान देण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत 'टोरेंट' समुहाच्या 'टोरेंट पॉवर लिमिटेड'कडून 3 कोटी तर 'टोरेंट फार्मसिटीकल्स'कडून 2 कोटी रुपये 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोविड-19'साठी देण्यात आले आहेत. 
          'टोरेंट' समुहाच्या या दातृत्वाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र शासनाच्यावतीने 'टोरेंट' समुहाचे कौतुक करुन आभार मानले आहेत. 
***

No comments:

Post a Comment