सातारा, दि. 16
(जिमाका) :
जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदा व नगर पंचायती या 2 ऑक्टोबर
2017 अखेर हागणदारी मुक्त करण्याचे उद्दीष्ट पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी केले आहे.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात स्वच्छ महाराष्ट्र
अभियानांतर्गत बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी
स्वच्छ भारत मिशनच्या राज्य अभियानाचे संचालक उदय टेकाळे, नगरपरिषद प्रशासनाचे
जिल्हा प्रशासन अधिकारी किरणराज यादव, सर्व नगरपालिका व नगरपंचायतींचे
मुख्याधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, 2 ऑक्टोबर 2017 अखेर संपूर्ण जिल्हा हागणदारी
मुक्त करावयाचे उद्दीष्ट असून आज अखेर कोरेगाव, लोणंद, पाटण, मेढा, खंडाळा, वडूज व
दहिवडी शहरात सार्वजनिक शौचालयाचा वापर करणारी 3485 कुटूंबे असून उघड्यावर शौचास
जाणाऱ्या कुटूंबांची संख्या 1051 आहे. सर्व नगरपंचायती 2 ऑक्टोबर 2017 अखेर हागणदारी
मुक्त कराव्यात. 9 नगरपालिकांपैकी 6
नगरपालिका या हागणदारी मुक्त झाल्या असून म्हसवड, फलटण व कराड नगरपालिकांनी 31
डिसेंबर 2016 अखेर हागणदारी मुक्त होण्यासाठी प्रयत्न करावेत. यासाठी निधीची
कमतरता पडू दिली जाणार नाही. शासन वैयक्तिक शौचालय बांधण्यास 12 हजार अनुदान
उपलब्ध करुन देते. याचबरोबर नगरपालिकांच्या स्वनिधीतूनही 5000 हजार अनुदान उपलब्ध
करुन दिले जाणार असून 14 व्या वित्त आयोगातून निधी उपलब्ध झाल्यास आणखी 5000
अनुदान वैयक्तिक शौचालय बांधण्यास उपलब्ध होणार आहे. मोठ्या बाजाराच्या ठिकाणी सार्वजनिक शौचालय
बांधण्यासाठी आराखडा तयार करावा. तसेच 2011 च्या जनगणनेवर आधारित आजअखेर उघड्यावर
शौचास जाणाऱ्या कुटूंबांचे सर्वेक्षण करावे.
नवनिर्मित नगरपंचायतींनी डपिंग ग्राऊंडऐवजी घनकचरा निर्मुलन
व्यवस्थापनासाठी जागेचा शोध घेऊन आराखडा सादर करावा, असेही ते शेवटी म्हणाले.
000
No comments:
Post a Comment