Wednesday, September 14, 2016

मतदार याद्यांचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर



पुणे. दि. 14 (विमाका):  भारतीय निवडणूक आयोगाने दिनांक 1 जानेवारी 2017 च्या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम दिनांक 16 सप्टेंबर 2016 ते 5 जानेवारी 2017 या कालावधीत राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिली आहे.
पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत प्रारुप मतदार याद्यांची प्रसिद्धी दिनांक 16 सप्टेंबर 2016 रोजी केली जाणार आहे. दिनांक 16 सप्टेंबर ते 14 ऑक्टोबर या कालावधीमध्ये दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहेत. मतदार यादीमधील संबंधित भागाचे ग्रामसभा, स्थानिक संस्था येथे वाचन आरडब्ल्यू ए सोबत बैठक आणि नावांची खातरजमा दिनांक 16 ते 30 सप्टेंबर  2016 या कालावधीत केली जाईल. विशेष मोहिमा दिनांक 18 सप्टेंबर 2016 (रविवार) व 9 ऑक्टोबर 2016 (रविवार) रोजी असतील. दावे व हरकती दिनांक 16 नोव्हेंबर 2016 पर्यंत निकालात काढण्यात येतील. डेटाबेस अद्यावतीकरण 15 डिसेंबर 2016 पर्यंत करण्यात येईल. अंतिम मतदार यादीची प्रसिद्धी दिनांक 5 जानेवारी 2017 रोजी करण्यात येणार आहे.
 या पुनरिक्षण कार्यक्रमात 1 जानेवारी 2017 रोजी १८ वर्ष पूर्ण झालेल्या तसेच मतदार यादीत नाव नसलेल्या मतदारांना आपले नाव मतदार यादीत नोंदविता येणार आहे. पत्त्यातील दुरुस्ती करण्याची; तसेच दुबार, मृत किंवा स्थलांतरीत मतदारांची नावे वगळण्याची सुविधा देण्यात येणार आली आहे.  दिनांक 18 सप्टेंबर 2016 आणि 9 ऑक्टोबर 2016 या दोन्ही रविवारी सुट्टीच्या दिवशी विशेष मोहिम सर्व मतदान केंद्रावर राबविण्यात येणार असून यावेळी दावे व हरकती स्वीकारण्याचे काम केले जाईल. महाविद्यालयातील 18 वर्षे वय पुर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी नमुना 6 भरुन घेण्याची सुविधा प्रत्येक महाविद्यालयात उपलब्ध करण्यात आली आहे.
मतदार नोंदणीसाठी सर्व मतदार नोंदणी अधिकारी कार्यालये, सहायक मतदार नोंदणी अधिकारी कार्यालये, महापालिका क्षेत्रातील सर्व क्षेत्रीय कार्यालये, सर्व गटविकास अधिकारी कार्यालये, सर्व नगरपालिका कार्यालये अथवा जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. राव यांनी  केले आहे.
0000



No comments:

Post a Comment