Wednesday, September 14, 2016

शासकीय आयटीआयमध्ये गतवर्षीपेक्षा 6 टक्के अधिक प्रवेश --- प्रधान सचिव दीपक कपूर

 




पुणे. दि. 14 (विमाका): राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) चालू शैक्षणिक वर्षात 86 हजार 264 उमेदवारांनी प्रवेश घेतेले असून हे प्रमाण गतवर्षीपेक्षा 5.81 टक्के इतके अधिक आहे. प्रशिक्षणाचा अल्प कालावधी, कमी प्रशिक्षण शुल्क आणि रोजगाराची हमी ही या व्यवसाय प्रशिक्षणाची वैशिष्ट्ये असल्यामुळे उदंड प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती कौशल्य विकास व उद्योजगता विभागाचे प्रधान सचिव दीपक कपूर यांनी दिली.
राज्यात उद्योग क्षेत्रातील मनुष्यबळाची मागणी पुर्ण करण्यासाठी प्रत्येक तालुक्यात किमान एक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) सुरु करण्यात आली आहे. त्यानुसार 359 तालुक्यात 417 शासकीय आयटीआय कार्यरत आहेत. त्यांची प्रवेश क्षमता 93 हजार 633 आहे. राज्यात 454 खासगी आयटीआय कार्यरत असून त्यांची प्रवेश क्षमता 39 हजार 760 आहे. या एकूण 1 लाख 33 हजार 393 जागांसाठी ऑगस्ट 2016 प्रवेशसत्रामध्ये 3 लाख 23 हजार 626 उमेदवारांनी अर्ज केले. गेल्या वर्षाच्या तुलनेत 14 टक्के अधिक अर्ज प्राप्त झाले. शासकीय आयटीआय मध्ये 86 हजार 264 प्रवेश निश्चित झाले आहेत. तर खासगी आयटीआय मध्ये 30 हजार 784 प्रवेश निश्चित झाले असून मागील वर्षाच्या तुलनेत हे प्रमाण 14.35 टक्के अधिक आहे. 
औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये एक वर्ष ते दोन वर्ष कालावधीचे विविध 79 प्रकारचे व्यवसायांचे प्रशिक्षण अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. उद्योगधंद्यातील तज्ज्ञांनी हे व्यवसाय अभ्यासक्रम तयार करतांना कारखान्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या कौशल्यांचा  विचार केला आहे. इयत्ता 10 वी उत्तीर्ण / अनुत्तीर्ण उमेदवारांच्या कलेप्रमाणे निवडीसाठी अधिक पर्याय उपलब्ध आहेत. अवजड यंत्र सामुग्रीवर आधारित अभियांत्रिकी स्वरुपाच्या अभ्याक्रमासाठी यावर्षीदेखील अधिकपंसती आहे. पारंपरिक अभ्यासक्रमांना बगल देत महिला उमेदवार देखील अभियांत्रिकी स्वरुपाच्या अभ्यासक्रमांना पसंती देत आहेत.
राज्यात सद्याच्या घडीला 10 हजार 810 औद्योगिक आस्थापनांमध्ये 94 हजार 890 जागा शिकाऊ उमेदवारांसाठी (ॲप्रेंटिशिप) उपलब्ध आहे. यावरुन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांपेक्षा नोकरीच्या अधिक संधी उपलब्ध असल्याचे सकारात्मक चित्र दिसून येत आहे. आयटीआय मधील प्रशिक्षण पुर्ण केल्यानंतर मोठ्या प्रमाणात उमेदवार स्वयंरोजगाराकडे देखील वळत आहेत.
आयटीआयचे प्रशिक्षण पूर्ण केल्यावर उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना पदविका अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्गात थेट प्रवेश दिला जातो. आयटीआयमधील काही विशिष्ट अभ्यासक्रमांना इयत्ता 12 वीची समकक्षता देखील बहाल करण्यात येणार आहे. रोजगार व स्वयंरोजगारावर आधारीत कौशल्य विकास व उद्योजकता विभागांतर्गत विविध प्रशिक्षणाबाबत www.mssds.in या संकेतस्थळावर सविस्तर माहिती मिळेल, अशी माहिती व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण  विभागाचे सहसंचालक सी.. निनाळे यांनी  दिली आहे.

0000

No comments:

Post a Comment