सोलापूर दि. 11 – गावात तंटे, तेढ वाढल्यास आपला ग्रामस्थांचा वेळ, श्रम व पैसा अनावश्यकरीत्या खर्च होतो. तसेच कोर्टाचे हेलपाटे वाढतात हे सर्व टाळण्यासाठी ग्रामस्थांनी एकत्र येऊन आपले गाव तंटामुक्त करण्याला प्राधान्य द्यावे असे प्रतिपादन महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीमेचे समन्वयक सहायक फौजदार विठ्ठल माने यांनी केले.
द. सोलापूर तालुक्यातील मौजे आचेगांव येथे युवा मध्यवर्ती गणेश मंडळाच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या शासनाच्या ‘संवादपर्व’ कार्यक्रमात महात्मा गांधी तंटामुक्त गांव या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच श्रीमती किरणताई गोतसुर्वे होत्या.
श्री माने पुढे म्हणाले की, गावातील तंटे गावातच मिटावेत यासाठी शासनाने ही मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेंमध्ये सोलापूर जिल्ह्याने उल्लेखनीय यश मिळविले असून आत्तापर्यंत जिल्ह्यातील 1023 ग्रामपंचायतीपैकी 566 ग्रामपंचायती तंटामुक्त झाल्या असुन आजअखेर 41 हजार 927 इतके खटले निकाली काढण्यात आले असल्याचे सांगितले.
यावेळी श्री. माने यांच्यासह पोलीस हवालदार सुरेश कांबळे, रमेश ठोंबरे, सुरेश जाधव, रविकिरण माने, राजशेखर निंबाळे यांनी बालविवाह, सावकारी कायदा, शिक्षण, दारुबंदी, वृक्ष लागवड, स्वच्छता, व्यसनमुक्ती आदी विषयावर उपस्थित ग्रामस्थांचे प्रबोधन केले. हे संवादपर्व अभियान जिल्हा पोलीस अधिक्षक वीरेश प्रभु यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे.
याप्रसंगी वळसंग पोलीस स्टेशनचे पी.एस.आय प्रशांत कांबळे, तंटामुक्त समितीच्या अध्यक्षा सावित्रीबाई खताळ, प्रकाश बहिरजे, नित्यानंद खोबण, रवी विधाते, कुलदिप पाटील, दयांनद धुते, सिध्दाराम सुतार, शावरसिध्द कलशेट्टी, मल्लि जवळगे यांच्यासह ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
000
No comments:
Post a Comment