Monday, September 12, 2016

बकरी ईद सण उत्साहात साजरा करण्यासाठी कायद्याचे बंधन पाळावे -जिल्हाधिकारी अश्विन मुद्‌गल


सातारा, दि. 12 (जिमाका) : ज्या मुस्लीम बांधवांना तात्पूरते कत्तलखाने सुरु करावयाचे आहेत त्यांनी शहरी भागासाठी संबंधित नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी व ग्रामीण भागासाठी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद, सातारा यांचेकडून रितसर परवानगी (परवाना) प्राप्त करणे कायद्याने बंधनकारक आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुद्‌गल यांनी दिली.
तात्पूरत्या कत्तलखान्यास परवानगी दिल्यास संबंधित मान्यता देणाऱ्या प्राधिकरणाने पोलीस विभाग व पशुसंवर्धन विभागास मान्यता पत्राची प्रत पाठवावी जेणेकरुन त्या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांच्या नेमणूका वेळीच करणे शक्य होईल. दिनांक 4 मार्च 2015 पासून राज्यात महाराष्ट्र प्राणी रक्षण (सुधारणा) कायदा, 1995 लागू करण्यात आलेला आहे. सुधारीत कायद्याप्रमाणे गायी, वळू व बैल यांची कत्तल करण्यास मनाई आहे तसेच या गोवंशीय प्राण्यांची कत्तलीसाठी वाहतूक, निर्यात, खरेदी, विक्री तसेच गोवंशाचे मांस ताब्यात ठेवण्यास बंदी आहे.
बकरी ईद सणामुळे जनावरांचे बाजारात मोठयाप्रमाणात जनावरांची खरेदी विक्री होते. ही जनावरांची  वाहतूक होत असताना वाहन चालक, जनावरांचे मालकाकडे जनावरांचे स्वास्थ प्रमाणपत्र असने आवश्यक आहे. तसेच ज्या वाहनातून जनावरांची वाहतूक केली जाते त्यांनी रितसर परवाना घेणे बंधनकारक आहे. जनावरांची वाहतूक करताना वाहतूकीचे नियम पाळून कायद्याचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.
 जिल्हयात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्व समाजसेवी संस्थांनी प्रशासनास सहकार्य करावे. यासाठी जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष (कन्ट्रोल रुम) स्थापन करण्यात आला असून जर कोणाला काही माहिती दयावयाची असल्यास पोलीस विभाग - 02162-233833,231181,हेल्पलाईन- 9011881888,पशुसंवर्धन विभाग-02162-221907, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सातारा-02162-230330 या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही जिल्हाधिकारी अश्विन मुद्‌गल यांनी कळविले आहे.

00000

No comments:

Post a Comment