Thursday, September 8, 2016

सातारा हिल मॅरेथॉनसाठी प्रशासनाने सज्ज रहावे - अश्विन मुद्‌गल


          सातारा, दि.8 (जिमाका) :  18 सप्टेंबर रोजी सकाळी 6 ते 10 या कालावधीत सातारा हिल मॅरेथॉन 2016  होणार आहे.  या स्पर्धेसाठी देश विदेशातील सुमारे 5 हजारहून अधिक स्पर्धक सहभागी होणार आहेत. या स्पर्धकांना अडथळा विरहित मार्ग मिळावायासाठी संबंधित विभागांनी जबाबदारीने कार्यवाही पूर्ण करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अश्विन मुद्‌गल यांनी आज दिले.
                सातारा हिल मॅरेथॉन 2016 बाबत आज जिल्हाधिकारी श्री. मुद्‌गल यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.  या बैठकीला पोलीस अधीक्षक संदीप पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव देशमुख  जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास पाटील, मुख्याधिकारी शंकर गोरे, वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सुरेश घाडगे, आगार व्यवस्थापक नीलम गिरी, जिल्हा शल्यिचिकत्सक डॉ. श्रीकांत भोई, सातारा हिल मॅरेथॉन असोसिएशनचे अध्यक्ष विठ्ठल जाधव, उपाध्यक्ष कमलेश पिसाळ, डॉ. चंद्रशेखर घोरपडे, डॉ. संदीप काटेआदींसह सदस्य उपस्थित होते.
                असोसिएशनचे श्री. जाधव आणि श्री. पिसाळ यांनी मॅरेथॉन विषयी माहिती दिली. यानंतर जिल्हाधिकारी श्री. मुद्‌गल यांनी संबंधित विभागांचा आढावा घेतला.  ते म्हणाले, स्पर्धा मार्गावरील सर्व खड्डे भरुन घ्यावेत.  त्याचबरोबर स्वच्छता ठेवावी. जंतुनाशक औषधांची फवारणी करावी. मार्गावरील सर्व पथ दिव्यांची दुरुस्ती करुन घ्यावी.  सार्वजनिक बांधकाम विभागाने स्पर्धा मार्गावरील रस्ता दुरुस्त करावा.  पोलीसांनी स्पर्धा मार्गावर चोख बंदोबस्त ठेवावा. त्याचबरोबर स्पर्धा मार्गावरील येणारी वाहतूक बंद ठेवावी.  स्पर्धेच्या उद्घाटन व बक्षीस वितरणावेळी आवश्यक ती कार्यवाही चोखपणे करावी. 
                18 सप्टेंबर रोजी रविवार असल्याने या दिवशी विकेंड साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक कास पठारावर पर्यटनासाठी येत असतात.  यासाठी वन विभागाने कास पठारावर येणाऱ्या पर्यटकांचे ज्यांचे आदीच बुकींग झाले आहे. त्यांना रविवारी सकाळी 10 नंतर येण्याबाबत सूचना द्यावी.  तसेच पर्यटकांच्या माहितीसाठी वन विभागाच्या संकेतस्थळावर याविषयी माहिती प्रदर्शित करावी, अशी सूचनाही श्री. मुद्‌गल यांनी देऊन, राज्य परिवहन महामंडळाने बामणोली, केळवली, परळी आदी ठिकाणी मुक्कामी असलेल्या गाड्या वेळापत्रकानुसार न सोडता सदर दिवशी स्पर्धा संपल्यानंतर सोडाव्यात. तसेच रुग्णांना अत्यावश्यक वैद्यकीय सेवा उपलब्ध करण्याच्या दृष्टीकोनातून मॅरेथॉन असोसिएशन तर्फे रुग्णवाहिकेची सुविधा करावी. प्रशासनाच्यावतीने रुग्णवाहिका ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर स्वयंसेवक जागोजागी ठेवून तशा सूचना त्यांना देण्यात याव्यात.
                या मॅरेथॉनसाठी  परदेशातूनही  स्पर्धक येणार आहेत.  ही मेरेथॉन यशस्वी करण्याच्या दृष्टीने संबंधित सर्व विभागांनी एकमेकांशी समन्वय ठेवून कार्यवाही करावी, असेही श्री. मुद्‌गल शेवटी म्हणाले.
00000


No comments:

Post a Comment