सोलापूर दि. 14: - डेंग्यू संदर्भात जिल्ह्यात काही ठिकाणी संशयित रुग्ण आढळलेत, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डासांची उत्पत्ती वेगाने होते. या उत्पत्तीला अटकाव करण्यासाठी नागरिकांनी स्वच्छतेला तसेच कोरडा दिवस पाळण्याला प्राधान्य द्यावे असे प्रतिपादन आरोग्य राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय देशमुख यांनी केले.
व्ही.एम. वैद्यकीय महाविद्यालयाच्या सभागृहात साथींच्या आजारासंदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर मनपा आयुक्त विजय काळम – पाटील, पुणे परिमंडळाचे आरोग्य उपसंचालक डॉ. हणमंतराव चव्हाण, जि.प. आरोग्य सभापती मकरंद निंबाळकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मल्लिकार्जुन पट्टणशेट्टी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव आदी उपस्थित होते.
साथीचे आजार आटोक्यात आणण्यासाठी आवश्यक त्याठिकाणी खाजगी हॉस्पिटल त्याचबरोबर स्वयंसेवी संस्थेची मदत घ्यावी. फॉगींग करण्यात यावे, संशयित रुग्ण आढळल्यास त्यावर वेळेवर उपचार करण्यात यावेत असे सांगून श्री. देशमुख पुढे म्हणाले की, डेंग्यूबाबत रुग्णांची फसवणुक करणा-या डॉक्टरांवर आरोग्य विभागाने कडक कारवाई करावी असे निर्देशही दिले.
मनपा आयुक्त विजय काळम -पाटील म्हणाले की, 10 लाख लोकसंख्येच्या या शहरात 103 संशयित रुग्ण आढळले असून, डेंग्यू नियंत्रणासाठी मनपातर्फे 229 कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या साथीबाबत नागरिकांनीही दक्षता घ्यावी. रुग्णांनी ताप आल्यानंतर तो डेंग्यूचाच आहे अशी मानसिकता करुन घेऊ नये त्याचबरोबर घाबरुन जाऊ नये असे आवाहन केले. तर आरोग्य उपसंचालक डॉ. हणमंतराव चव्हाण म्हणाले, वैद्यकीय अधिकारी- कर्मचा-यांनी आपापसात समन्वय ठेऊन डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनीया यासारख्या साथीच्या आजारात कार्यरत रहावे. साथीच्या आजारासंदर्भात निदान व उपचारासाठी आरोग्य विभागातर्फे कोणतीही अडचण येणार नसल्याचे स्पष्ट केले.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांनी जिल्ह्यात आजअखेर डेंग्यूसंदर्भात सुमारे 606 संशयित रुग्णांपैकी 170 रुग्ण पॉझिटीव्ह आढळल्याचे सांगून, डेंग्यूसंदर्भात जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग सतर्क असून डेंग्यूच्या जागृतीसंदर्भात ग्रामीण भागात करण्यात येणा-या प्रयत्नांची माहिती प्रास्ताविकात सांगितली.
यावेळी जि.प. सदस्य बाळासाहेब देशमुख, नगरसेवक सुरेश पाटील, मनपा विरोधी पक्षनेते नरेंद्र काळे, जिल्हा हिवताप अधिकारी शुभांगी अधटराव यांच्यासह तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment