Wednesday, October 5, 2016

सोलापूर जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांतील रिक्त पदे तातडीने भरावीत - आरोग्य राज्यमंत्री विजय देशमुख यांचे निर्देश


 मुंबई, दि. 10 : सोलापूर जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमधील कर्मचारी, अधिकाऱ्यांची रिक्त पदे तातडीने भरण्यात यावीत, जिल्ह्यातील ट्रॉमा केअर सेंटर, नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रे यांच्या बांधकामांना गती देण्यात यावी यासह जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेत व्यापक सुधारणा करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय देशमुख यांनी आज आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
सोलापूर जिल्ह्यातील विविध शासकीय रुग्णालयातील आरोग्य सुविधांबाबत आज मंत्रालयात राज्यमंत्री श्री. देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आरोग्य विभागाचे सहसचिव  वि. र. दहिफळे, आरोग्य संचालक डॉ. मोहन जाधव, पुणे विभागाचे आरोग्य उपसंचालक डॉ. एच. एच. चव्हाण, सोलापूरचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एम. आर. पट्टनशेट्टी आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
राज्यमंत्री श्री. देशमुख म्हणाले की, जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे आदी ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांसह विविध श्रेणीतील आरोग्य कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. त्याचा आरोग्य सेवेवर मोठा परिणाम होत आहे. कर्मचारी आणि डॉक्टरांअभावी रुग्णांना वेळेत उपचार मिळत नसल्याने त्यांची मोठी गैरसोय होत आहे. हे टाळण्यासाठी जिल्ह्यातील विविध शासकीय रुग्णालयांतील कर्मचारी, वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करण्यात यावी, असे निर्देश त्यांनी दिले.
सोलापूर येथे १०० खाटांचे जिल्हा रुग्णालय आणि १०० खाटांचे महिला व नवजात शिशु रुग्णालय उभारण्यास मंजुरी मिळाली आहे. यासाठी जागाही उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या ठिकाणी तातडीने योग्य नियोजन करुन दर्जेदार बांधकाम करण्यात यावे व लवकरात लवकर ही रुग्णालये कार्यान्वित करावीत, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
अक्कलकोट येथे ट्रॉमा केअर सेंटर उभारण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय सांगोला व कुर्डूवाडी येथेही ट्रॉमा केअर सेंटर उभारणे प्रस्तावित आहे. या कामाला गती देण्यात यावी. शेटफळ (ता. मोहोळ), माळशिरस (ता. माळशिरस) व करकंब (ता. पंढरपूर) येथे ग्रामीण रुग्णालयांच्या नव्या इमारतींचे बांधकाम पूर्ण झाले आहे. ही रुग्णालये विविध सोयी-सुविधा, उपकरणांनी सज्ज करण्यात यावीत, असे आदेशही त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. 

No comments:

Post a Comment