Wednesday, October 5, 2016

मुद्रा बँक योजनेतून उद्योगवाढीस चालना


         देशामध्ये होतकरु, बुद्धीमान आणि जीवनामध्ये यशस्वी उद्योजक होण्याचे स्वप्न बाळगणारे लाखो तरुण आहे, परंतु त्यांना कौटुंबीक पार्श्वभूमी नसल्यामुळे एखादा लहान उद्योग/ व्यवसाय नव्याने उभारण्यासाठी अनंत अडचणी येतात. मुख्य अडचण ही भांडवलाची असते. अशा तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात व त्यातून उद्योजक निर्माण व्हावेत या उदात्त हेतूने मा. पंतप्रधानांच्या संकल्पनेतून केंद्र शासनाने मुद्रा बँक योजना सुरु केली आहे.

                शिशु गट 10 हजार ते 50  हजार, किशोर गट 50 हजार ते 5 लाख आणि तरुण गट 5 लाख ते 10 लाख अशा तीन गटात या योजनेंतर्गत कर्ज मिळण्यासाठी वर्गीकरण करण्यात आले आहे. या योजनेनुसार कुठल्याही प्रकारची तारण किंवा जामिनदाराशिवाय होतकरु, बेरोजगार यांना कर्ज पुरवठा करुन त्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी केंद्र शासनाच्या मुद्रा योजनाअंतर्गत अर्थ सहाय्य देण्यात येते.

 शिशु प्रकरणासाठी लागणारी कागदपत्रे :  

1.ओळखीचा पुरावा- स्वस्वाक्षरी करुन साक्षांकित केलेले मतदान ओळखपत्र / पॅन कार्ड/आधार कार्ड/पास पोर्ट/ ड्रायव्हिंग लायसेन्स. 2. पत्याचा पुरावा-मालक/भागीदार/संचालक यांचे सध्याचे टेलीफोन बिल/लाइट बिल/ मलमत्ता कर भरल्याची पावती (दोन महिन्यापेक्षा जुनी नसावी)/स्थनिक स्वराज्य संस्थेकडून निर्गमित प्रमाणपत्र. 3. अर्जदाराचे दोन फोटो (सहा महिन्यापेक्षा जूने नसावे).4.  एससी/एसटी/ओबीसी/अल्पसंख्यांक असल्याचा पुरावा (लागू  असल्यास ). 5. उपलब्ध असल्यास व्यवसाय, उद्योगाच्या पत्याचा पुरावा, जरूरी लायसेन्स/नोंदणी प्रमाणपत्र/ मालकी संबंधीचे दस्तावेज, व्यवसाय फर्मचे ओळखीपत्र पत्याचा पुरावा.           6. अर्जदार हा कोणत्याही बँकेचा किंवा आर्थिक संस्थेचा कर्जदार नसावा. 7. उपलब्ध असल्यास बँकेच्या मागील सहा महिन्याचे खात्याचे स्टेटमेंट. 8. विकत घ्यावयाच्या मशीनरीचे/वस्तुचे इ. कोटेशन/बांधकामाचे खर्चाचे अंदाजपत्रक.

किशोर व तरुण प्रकरणासाठी लागणारी कागदपत्रे वरील आठ कागदपत्रांसह  1. चालू उद्योग असल्यास  मागील आयकर व विक्रीकर विवरणासह मागील २ वर्षाचे आर्थिक ताळेबंद ( कर्जरक्कम रु. २ लाख किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास). 2. नव उद्योग/चालू उद्योग असल्यास भाग भांडवल हवे असल्यास पुढील एक वर्षाचा संकल्पित ताळेबंद आणि मुदत कर्ज हवे असल्यास कर्ज फेडी पर्यंतच्या आर्थक वर्षाचा संकल्पित ताळेबंद (कर्जरक्कम रु. २ लाख किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास ). 3. चालू उद्योग असल्यास चालू वर्षाचे विक्री उद्दिष्ट व झालेली विक्री यांचे विवरण. 4.मालक/भागीदार/संचालक यांच्या मालमत्ता व देणी यांचे विवरण. 5 प्रकल्प अहवाल तांत्रिक व आर्थिक बाबींच्या विवरणासह.

जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली मुद्रा बँक योजना समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे. या योजनेतून नवीन उद्योजकांना निश्चितपणे चालना मिळणार आहे.

                          
                         प्रशांत सातपुते
                                                                                                                                          जिल्हा माहिती अधिकारी  , सातारा

 

00000


 

No comments:

Post a Comment