Monday, October 3, 2016

सोलापूरात मोठा औद्योगिक प्रकल्प आणू उद्योगमंत्री सुभाष देसाई : कै.जयकुमार पाटील उद्योग भवनचे उद्घाटन



सोलापूर दि. 3 : - सोलापूरच्या औद्योगिक विकासासाठी आवश्यक असणारी सर्व मदत केली जाईल. त्याच बरोबर येथे मोठा औद्योगिक प्रकल्प येण्यासाठी विशेष प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे दिली.
                         सोलापूर इंडस्ट्रीजच्या असोसिएशनच्या कै. जयकुमार पाटील उद्योग भवनचे आज उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर  सहकार मंत्री सुभाष देखमुख, खासदार शरद बनसोडे, आमदार प्रणितीताई शिंदे, असोसिएशनचे अध्यक्ष शरदकृष्ण ठाकरे,  उपाध्यक्ष किसन दाडगे, गणेश सुत्रावे आदि उपस्थित होते. चिंचोली एमआयडीसी येथे हा कार्यक्रम झाला.
                        उद्योगमंत्री सुभाष देसाई म्हणाले, "सोलापूरमध्ये मोठी क्षमता आहे. उद्योगाचा विस्तार आणि विकासाची क्षमता आहे. पण या क्षमतेचा अद्याप वापर झालेला नाही. यासाठी सोलापूरात मोठा प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्न केला जाईल. एक मोठा प्रकल्प आल्यास त्याअनुषंगाने छोटे प्रकल्प, उद्योजक तयार होतात. त्याचा येथील औद्योगिक वसाहत विकसित होण्यास लाभ होईल आणि रोजगार निर्मिती होण्यास हातभार लागेल".
                   उद्योगमंत्री देसाई म्हणाले, " लघुउद्योगाचा विकास होणे आणि ते टिकून राहण्यासाठी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने गाळे बांधून ते लघु उद्योजकांना वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे लघु- उद्योजकांना व्यवसाय  करण्यासाठी राज्य शासन धोरणात्मक निर्णय घेतला गेला आहे. त्याची प्रभावी अंमलबजावणी करुन सोलापूरची विमानसेवा सुरळीत करण्यासाठी विशेष लक्ष घालण्यात येईल. "
                   सहकारमंत्री सुभाष देखमुख म्हणाले, "मेक इन इंडिया, मेक इन महाराष्ट्र, याप्रमाणे मेक इन सोलापूर अभियान राबवण्याची आवश्यकता आहे."त्याचबरोबर सोलापूरची विमानसेवा सुरळीत करावी आणि मंद्रूप येथे एमआरडीसी विकसित करावी, अशी मागणीही श्री.देशमुख यांनी केली. यावेळी खासदार शरद बनसोडे, आमदार प्रणितीताई शिंदे यांचीही भाषणे झाली.
                  असोसिएशनचे अध्यक्ष शरदकृष्ण ठाकरे यांनी प्रास्ताविक तर उपाध्यक्ष  किसन दाडगे यांनी आभार मानले.
                 यावेळी लक्ष्मी ग्रुपचे अण्णासाहेब पाटील, प्रिसिजन ग्रुपचे यतिन शहा, बालाजी अलाईन्सचे राजेश्वर रेड्डी आदी उद्योगपतींचा सत्कार करण्यात आला.
0 0 0 0 0

No comments:

Post a Comment