Saturday, October 1, 2016

कर्करोगाबाबत जनजागृती करा --- पालकमंत्री विजय देशमुख


                सोलापूर दि. 01 : सर्वसामान्य तसेच तळागाळातील वाड्या- वस्त्यापर्यंत कर्करोग जनजागृती व्हावी व या अभियानाद्वारे दिल्या जाणा-या मोफत सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जागतिक स्तर कर्करोग जनजागृती, निदान व उपचार अभियानाच्या उद्घानप्रसंगी राज्याचे  सार्वजनिक आरोग्य, परिवहन, कामगार व राज्य उत्पादन शुल्क राज्यमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री  विजय देशमुख यांनी यावेळी केले.
या अभियानाचे दीपप्रज्वलन करुन उद्घाटन  पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले. यावेळी आय ब्रेन मशिनद्वारे करण्यात येणा-या कर्करोगाच्या उपचाराच्या नवीन यंत्रसामुग्रीचे उद्घाटनही झाले.
डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्कीय महाविद्यालय व श्री. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, सोलापूरचे अधिष्ठाता डॉ. राजाराम पोवार, या कार्यक्रमाचे विशेष पाहुणे व इंडियन कॅन्सर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. देखणे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मल्लिकार्जुन पट्टणशेट्टी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ शितलकुमार जाधव आदी उपस्थित होते.
पालकमंत्री देशमुख म्हणाले, पंतप्रधान नरेंदी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 1 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर 2016 या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या जागतिक स्तर कर्करोग जनजागृती, निदान व उपचार अभियानामध्ये सर्वसामान्य व तळागाळातील, वाड्या वस्त्यातील लोकांनी या अभियानाद्वारे मिळणा-या मोफत सेवेचा लाभ घेऊन कर्करोगास न भीता उपचार करुन घ्यावेत तसेच याची जनजागृती व्हावी यासाठी प्रयत्न करावेत. आय ब्रेन मशिनद्वारे कर्करोगाच्या निदानाची सकाळी 10 ते दुपारी 1 पर्यंत तपासणी करण्यात येणार असून याचाही लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
            यावेळी अधिष्ठाता डॉ. राजाराम पोवार यांनी अभियानाची रुपरेषा मांडली, तर डॉ. डी.बी. कुर्डुकर यांनी प्रास्ताविक केले. सुत्रसंचालन श्रीमती वृषाली बावगे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. गजानन जत्ती यांनी केले.
                                                               

No comments:

Post a Comment