Monday, May 25, 2015

जलयुक्त शिवार अभियानांच्या कामात सातत्य ठेवावे
                                                  -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 
पंढरपूर,दि.25 (उ.मा.का.):-  जलयुक्त शिवार अभियानामध्ये सध्या होत असलेल्या कामांवरच न थांबता ही कामे आगामी दोन-चार वर्षे सातत्याने केल्यास आपण कायम पाणीयुक्त व दुष्काळमुक्त होऊ, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांनी आज व्यक्त केला.
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यलमर मंगेवाडी (ता.सांगोला) येथील सिमेंट नाला बंधारा, ओढा रुंदीकरण व खोलीकरण, पाझर तलाव दुरुस्तीच्या कामांना भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर ग्रामस्थांशी संवाद साधताना ते बोलत होते. पालकमंत्री विजयकुमार देशमुख, उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जिल्हा परिषद अध्यक्षा जयमाला गायकवाड, आमदार दीपक साळुंखे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रविणसिंह परदेशी, ‍जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे, मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे, पोलीस अधीक्षक विरेश प्रभू, प्रांताधिकारी श्रावण क्षीरसागर,
लोकसहभागातुन प्रत्येक गावाला जलस्वयंपूर्ण करणे या आपल्या शासनाच्या उद्दीष्टाप्रमाणे विविध ‍ठिकाणी लोकांनी  कशी कामे केली ते पाहण्यासाठी आपण आलो असल्याचे सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, अतिशय चांगल्या प्रकारचे काम आपण करुन दाखवले. यामुळे नक्कीच या भागात परिवर्तन होणार असून त्यासाठी आपण अभिनंदनास पात्र आहात. कोणतीही योजना केवळ सरकारच्या भरवशावर नाही, तर समाजाच्या, जनतेच्या भरवशावर यशस्वी होऊ शकते, असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस पुढे म्हणाले की, जलयुक्त शिवार  अभियानामध्ये ज्या ठिकाणी लोकसहभाग, ज्या क्षणी लोकांना असं वाटेल की आमच्या जीवनात परिवर्तन घडवायचे आहे. गावात पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब आमच्या मालकीचा आहे. त्यावेळी लोकसहभागातून घेतलेल्या कामामुळे निश्चीतच परिवर्तन होईल, जलयुक्त शिवार अभियानामध्ये राज्य शासन, लोकप्रतिनिधी आपल्या पाठीशी निश्चीतपणे उभे राहतील. निरा कालव्याचे पाणी मंगेवाडी पाझर तलावामध्ये सोडण्याची ग्रामस्थांनी केलेली मागणी तपासून याबाबत आवश्यक  ती कार्यवाही त्वरीत करण्याचे निर्देश सबंधीतांना तात्काळ देण्यात येतील, असेही ते म्हणाले.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. मुंढे यांनी मुख्यमंत्र्यांना जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सुरु असलेल्या कामांची माहिती ‍दिली. ग्रामस्थांनी लोकसहभागातुन पाझर तलावातील गाळ मोठ्या प्रमाणात भरुन नेल्यामुळे तलावाची पाणी साठवण क्षमता 0.10 द.ल.घ.मी. वरुन 4.8 द.ल.घ.मी. इतकी मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याचे ते म्हणाले.
तहसिलदार श्रीकांत पाटील, गटविकास अधिकारी राहुल गावडे, तालुका कृषी अधिकारी अशोक मोरे आदींसह पदाधिकारी, शासकीय अधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

                                                0000