Tuesday, January 26, 2021

प्रबोधनकारां’चा पुरोगामित्वाचा विचार आजही महाराष्ट्राला आवश्यक -उपमुख्यमंत्री अजित पवार प्रबोधन शताब्दी सोहळयाचा समारोप

 

प्रबोधनकारांचा पुरोगामित्वाचा विचार आजही महाराष्ट्राला आवश्यक

-उपमुख्यमंत्री अजित पवार

प्रबोधन शताब्दी सोहळयाचा समारोप

 

          पुणे दि. 26 ‘प्रबोधनकारांचा पुरोगामित्वाचा विचार आजही महाराष्ट्राला आवश्यक आहे. त्यांनी दिलेल्या स्वाभिमानावरच महाराष्ट्राची वाटचाल सुरु आहे. प्रबोधनपाक्षिकाच्या माध्यमातून वैचारिक आणि सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी नव्या पिढीला प्रेरणा देण्याचे कार्य केले असल्याचे मत उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.

          बालगंधर्व रंगमंदीर येथे प्रबोधन शताब्दी सोहळयाचा समारोप उपमुख्यमंत्री पवार यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी विधान परिषदेच्या सभापती निलम गो-हे, खा. गिरीष बापट, आ. संजय शिंदे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे, संवाद संस्थेचे सुनिल महाजन,हरिष केंची, किरण साळी, सचिन विटकर उपस्थित होते.

           संवाद-पुणेसंस्थेने आयोजित केलेल्या, प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांच्या संपादकात्वाखालील प्रबोधनपाक्षिकाचा शतकोत्सव सोहळयासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पुरोगामी महाराष्ट्राची जडणघडण करण्यात सिंहाचा वाटा असणाऱ्या प्रबोधनपाक्षिकाच्या शताब्दी वर्षानिमित्ताने  प्रबोधनच्या शतकमहोत्सवी वाटचाल, त्यांची पत्रकारिता अभिनंदनीय आहे. प्रबोधनकार प्रभावी वक्ते, व्यंगचित्रकार, छायाचित्रकार, साहित्यिक, तैलचित्रकार बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. स्वातंत्र्यपूर्व काळात समाजाचे वैचारिक प्रबोधन करण्यासाठी त्यांनी प्रबोधनपाक्षिक सुरू केले. नियतकालिक सुरु करुन चालवणे मोठे कठीण असणाऱ्या काळात त्यांनी ते धाडस केले आणि यशस्वी करुन दाखविले. प्रबोधनपाक्षिकाने महाराष्ट्राला वैचारिक समृद्धी दिली, नव्या विचाराची पिढी घडविण्यात सिंहाचा वाटा उचलला. प्रबोधनपाक्षिकाच्या माध्यमातून वैचारिक आणि सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी नव्या पिढीला प्रेरणा देण्याचे कार्य केल्याचेही उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.

          विधान परिषदेच्या उपसभापती निलम गो-हे म्हणाल्या, पुणे शहरात प्रबोधनाचा विचार मांडण्याचे कार्य प्रबोधनकार ठाकरे यांनी केले आहे. प्रबोधनच्या शतकोत्सव कार्यक्रमामध्ये सर्वच विषयांचा आंतर्भाव करण्यात आला आहे. संवादच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे आयोजन करून साहित्य आणि संस्कृती संवर्धनाचे कार्य होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

          खा. गिरीष बापट म्हणाले, प्रबोधनकार ठाकरे यांनी समाजामध्ये बदल करण्यासाठी अनेक उपक्रमात सहभाग घेतला असून समाजामध्ये विचारांची क्रांती केल्याचे सांगितले.

          माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व काळात समाजाचे वैचारिक प्रबोधन करण्यासाठी प्रबोधनकार ठाकरे यांनी प्रबोधनपाक्षिक सुरू केले. नियतकालिक सुरु करुन चालवणे मोठे कठीण असणाऱ्या काळात त्यांनी ते धाडस केले आणि यशस्वी करुन दाखविले. प्रबोधनकरांचे विचार पुरोगामी होते, प्रबोधनकारांच्या विचारांची आजही गरज असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी नागरिक उपस्थित होते.

कविसंमेलनाला उस्फूर्त प्रतिसाद

संवाद संस्थेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात आयोजित करण्यात आलेल्या कविसंमेलनाला उस्फूर्त  प्रतिसाद मिळाला. सामाजिक,प्रबोधनपर तसेच विविध विषयावरील कवितांना रसिकांनी उस्फूर्त दाद दिली. ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे, डॉ. दिलीप पांढरपट्टे, भरत दौंडकर, अरूण पवार, तुकाराम धांडे, बंडा जोशी यांनी संमेलनात सहभाग घेतला.

 

00000







पोलीस मनोरंजन केंद्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण

 

पोलीस मनोरंजन केंद्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण

 

          पुणे दि. 26: शिवाजीनगर  येथील पोलीस मनोरंजन केंद्राचे व पोलीस विभागासाठीच्या नऊ वाहनांचे लोकार्पण आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त अनुक्रमे डॉ. जालिदंर सुपेकर, डॉ.संजय शिंदे, अशोक मोराळे, पोलीस उप आयुक्त अनुक्रमे बच्चन सिंग, प्रियंका नारनवरे, भाग्यश्री नवटके, स्वप्ना गोरे, पोर्णिमा गायकवाड, सहा पोलीस आयुक्त सतिश गोवेकर, आबा चेमटे आदी उपस्थित होते. तसेच सायबेज कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष अमित गुजवानी, व्यवस्थापक प्रिया पारनेकर उपस्थित होते.

            पुणे शहर पोलीस दलाचे सक्षमीकरण व आधुनिकीकरण करण्याच्या दृष्टीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा नियोजन समितीकडून एक कोटी रुपयांचा निधी तसेच महिंद्रा कंपनीची नवीन नऊ स्कॉर्पिओ वाहने प्राप्त करुन दिली. ही वाहने एस्कॉर्ट व पायलट डयुटी करीता वापरण्यात येणार आहेत.

 

            पुणे पोलीस आयुक्तालयातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना व त्यांच्या कुटुंबातील सदस्य, पाल्य यांना त्यांच्या कला, गुणांना वाव देता यावा, कुटुंबातील सांस्कृतिक कार्यक्रम, लग्न समारंभ, वाढदिवस इत्यादी कार्यक्रमाकरीता पोलीस दलाची पोलीस मनोरंजन केंद्र ही इमारत 15 ऑगस्ट 1959 रोजी पुर्णत्वाला आली. त्यांनतर सन 2005 मध्ये इमारतीचे पहिल्या मजल्यावर वरिष्ठ अधिकारी यांच्याकरीता  एकुण 6 विश्रांतीकक्ष तयार करण्यात आले.

            सन 2020 रोजी तत्कालीन पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम व सध्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पोलीस मनोरंजन केंद्राच्या इमारतीचे आधुनिक पध्दतीने नुतनीकरण व विस्तारीकरण करुन घेणे तसेच या वास्तुच्या बाजुला एक प्रशस्त हॉल तयार करण्याची संकल्पना मांडून ती पुर्णत्वास नेली. यासाठी विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक रमेश साहेबराव साठे यांनी विशेष प्रयत्न केले. सायबेज कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अरुण नथानी व संचालक रितु नथानी यांनी सामाजिक बांधीलकीतून स्वेच्छेने  पोलीस मनोरंजन केंद्र इमारतीचे वातानुकुलित यंत्रणेसह सर्व सोयी -सुविधांयुक्त नुतनीकरणासह विस्तारीकरण करण्यासाठी विशेष सहाय्य केले.

 

00000



मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ‘कारागृह पर्यटन’ उपक्रमाचे उद्घाटन कारागृह हे जबाबदार नागरिक घडवणारे संस्‍कार केंद्र व्‍हावे-मुख्‍यमंत्री

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते कारागृह पर्यटनउपक्रमाचे उद्घाटन

कारागृह हे जबाबदार नागरिक घडवणारे संस्‍कार केंद्र व्‍हावे-मुख्‍यमंत्री

 

            पुणे, दिनांक 26- तुरुंगात असणारे हे कैदी एक मोठे मनुष्यबळ आहे. काहींच्या आयुष्याची गाडी भरकटते आणि ते येथे येतात. यातील काहींची गाडी रुळावर कशी आणता येईल यासाठी तसेच दिशा भरकटलेली माणसे, योग्य मार्गावर आणण्‍यासाठी प्रयत्‍न करण्‍याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. येरवडा कारागृह हे जबाबदार नागरिक घडवणारे संस्‍कार केंद्र व्‍हावे, अशी अपेक्षाही त्‍यांनी व्‍यक्‍त केली.

            राज्यात 'कारागृह पर्यटन' ही अभिनव संकल्पना राबविण्यात येत आहे. या पर्यटनाचा शुभारंभ आज प्रजासत्‍ताक दिनाच्‍या शुभमुहूर्तावर पुण्यातील १५० वर्षे जुन्या येरवडा कारागृहातून करण्यात आला. त्‍यावेळी    दृकश्राव्‍यप्रणालीद्वारे ते बोलत होते. पुण्‍यातून उपमुख्‍यमंत्री तथा पुणे जिल्‍ह्याचे पालकमंत्री, आमदार सुनील टिंगरे, पोलीस आयुक्‍त अमिताभ गुप्‍ता, जिल्‍हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, अपर पोलीस महासंचालक सुनिल रामानंद, कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई उपस्थित होते. गोंदिया येथून गृहमंत्री अनिल देशमुख हे दृकदृश्‍य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

            मुख्‍यमंत्री श्री. ठाकरे म्‍हणाले, आपल्याकडे पूर्वी जेल भरो आंदोलन असायचे. लोक आंदोलनाला तयारीने यायचे. पोलीस त्यांना अटक करायचे. मग नंतर सोडून द्यायचे. पण आता जेल यात्रा  हा नवीन प्रकार येईल. त्याला मी जेल फिरोअसे म्हणेन. आता हा नवीन प्रकार आहे, लोक महाबळेश्वरला, लोणावळ्याला जाऊन आलो, असे सांगतानाच जेलमध्ये जाऊन आलो, असे सांगतील. पण जेलमध्ये जाऊन येतो, म्हणजे गुन्हा करण्याची गरज नाही. आपण जेलयात्राहा पर्यटनाचा एक नवीन मार्ग दाखवला आहे.

            यावेळी मुख्यमंत्र्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या येरवडा तुरुंगातील दिवसांबाबतच्या आठवणींना उजाळा दिला. या दिवसांबाबत त्यांनी लिहिलेल्या गजाआडचे दिवसया पुस्तकातील उताराही त्यांनी उद्धृत केला. मुख्‍यमंत्री म्‍हणाले, येरवड्यामध्ये शिवसेनाप्रमुखांना भेटण्यासाठी येत होतो. त्‍याकाळी ते पत्र पाठवत असत, पण शिवसेनाप्रमुखांनी पत्रात आम्‍हाला कधी निराश करणारी भाषा वापरली नाही. निराश होऊ दिले नाही. गजाआडचे दिवस..या पुस्‍तकात प्रत्येक दिवसात काय काय झाले याची तपशीलवार माहिती शिवसेनाप्रमुखांनी दिली आहे. क्रांतीकारक चाफेकर बंधू यांचा तुरुंगवास, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अंदमानातील काळ्या पाण्याची शिक्षा आणि त्यांना भोगाव्‍या लागलेल्या यातनांचाही मुख्यमंत्र्यांनी उल्लेख केला. या वीर क्रांतीकारकांच्या त्यागामुळेच आपल्याला स्वातंत्र्य आणि प्रजासत्ताक राष्ट्राचे ध्येय प्राप्त करता आल्याचेही त्यांनी गौरवाने नमूद केले.

            मुख्‍यमंत्री म्‍हणाले, या कोठड्या ज्याला आपण तुरुंग म्हणतो, त्या भिंतींमागे क्रांतीच्‍या ठिणग्या टाकणाऱ्या व्यक्तिमत्त्वांना ठेवण्यात येत असे. खरे तर ही व्यक्तिमत्त्व धगधगती अग्नीकुंड होती. त्यांना अशारितीने अंधार कोठडीत टाकून, त्यांचे तेज विझून जाईल, असे इंग्रजांना वाटत असेल. पण तसे झाले नाही, त्यांचे हे तेज आणखी उजळले ते उजळलेच. त्यातून स्वातंत्र्याचा प्रकाश उजाडला. त्या सगळ्यांनी त्या काळात काय काय कष्ट केले आहे, हे आपल्या लक्षात येईल. किंबहूना हे स्वातंत्र्य आपल्याला आंदण म्हणून मिळालेले नाही. त्यांनी हाल-अपेष्टा भोगल्या म्हणून हे स्वातंत्र्य मिळाले, याची जाणीव जागृत रहावी यासाठी या कोठड्या पाहव्या लागतील, असेही ते म्‍हणाले. स्वातंत्र्यासाठी, आपल्यासाठी त्यांनी काय काय केले. काय भोगले याबाबत या कोठड्यांच्या भिंती बोलू लागतील. इतके सारे त्या भिंतींनी अनुभवले आहे. त्यादृष्टीने हा प्रयोग अभिनव असाच आहे.  मुख्‍यमंत्री श्री. ठाकरे यांनी या अनोख्या प्रयोगाबद्दल गृहमंत्री, गृह विभाग, पोलिस बांधव, माता-भगिनींचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्‍या.

            उपमुख्‍यमंत्री तथा पुणे जिल्‍ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनीही  कारागृह पर्यटनया अभिनव  उपक्रमाचे कौतुक केले. येरवडा कारागृहात कैद्यांची मानसिकता बदलण्‍यासाठी विविध उपक्रमांद्वारे प्रयत्‍न केले जातात याबद्दल गौरवोद्गार काढून त्‍यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या कारागृहातून मीनाताई ठाकरे यांना लिहीलेल्‍या पत्राचे वाचन केले. ते म्‍हणाले, भारताच्या स्वातंत्र्य इतिहासात कारागृहांचे विशेष महत्त्व आहे. या कारागृहात स्वातंत्र्य संग्रामातील थोर नेते महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, पंडित जवाहरलाल नेहरू, सरोजिनी नायडू यांच्यासह इतर नेते बंदिस्त होते. या कारागृहांचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता 'कारागृह पर्यटन' ही वेगळी संकल्‍पना आहे.

            गृहमंत्री अनिल देशमुख म्‍हणाले, येरवडा तुरुंगात अनेक थोर स्वातंत्र्य सैनिक बंदी होते. महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील महत्त्वाचा 'पुणे करार' येरवडा तुरुंगातील आंब्याच्या झाडाखाली झाला होता. याशिवाय स्वातंत्र्य संग्रामातील चाफेकर बंधू हे देशासाठी याच ठिकाणी शहीद झाले. जनतेला हा इतिहास समजावा, या उद्देशाने पहिल्या टप्प्यात येरवडा तुरुंगातून कारागृह पर्यटन सुरू करण्यात आले आहे.  दुसऱ्या टप्प्यात नाशिक, ठाणे, रत्नागिरी या इतर ऐतिहासिक महत्त्व असलेल्या कारागृहात देखील ही संकल्पना राबविली जाईल. या कारागृह पर्यटनातून शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी, इतिहास अभ्यासक आणि नागरिकांना आपल्या इतिहासातील क्षणांची अनुभूती मिळेल, असा विश्‍वास व्‍यक्‍त केला.

            यावेळी कारागृहाच्या माहितीबाबत चित्रफीत दाखवण्यात आली. गांधी यार्ड, टिळक यार्ड, फाशी यार्ड आदी ठिकाणांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाहणी केली.

अपर पोलीस महासंचालक सुनिल रामानंद यांनी प्रास्ताविकातून कारागृहात राबविण्यात येणा-या विविध उपक्रमांची माहिती दिली. कारागृह अधीक्षक यु.टी.पवार यांनी आभार मानले. कार्यक्रमास अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण, तहसीलदार तृप्ती पाटील तसेच कारागृहाचे अधिकारी - कर्मचारी उपस्थित होते.

00000













प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्या हस्ते शनिवारवाडा येथे ध्वजारोहण

 

प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी डॉ. देशमुख

 यांच्या हस्ते शनिवारवाडा येथे ध्वजारोहण

 

          पुणे, दि.26: भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त पुण्यात शनिवारवाडा येथे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी राष्ट्रध्वजास मानवंदना दिली. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख तसेच विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी व उपस्थित मान्यवरांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

          दरम्यान जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्या हस्ते जिल्हाधिकारी निवासस्थान येथे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी यांच्या सुविद्य पत्नी विजया देशमुख, उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

00000








Monday, January 25, 2021

 

प्रजासत्ताक दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण

 

पुणे, दि.26 : भारतीय प्रजासत्ताकाच्या 71 व्या वर्धापन दिनानिमित्त उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुण्यात पोलीस संचलन मैदानात शासकीय ध्वजारोहण झाले.

 यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, नोंदणी महानिरीक्षक एस चोक्कलिंगम, सहकार आयुक्त अनिल कवडे, साखर आयुक्त शेखर गायकवाड, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग, मुख्यमंत्री महोदयांचे आरोग्य विभागाचे सल्लागार डॉ. दीपक म्हैसकर, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पीएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, पीएमपीएमएल चे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप, पुणे महानगर पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

            यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रध्वजास मानवंदना दिली. यावेळी पोलीस पथकाने ध्वजास सलामी दिली. यावेळी वीरमाता व वीरपत्नींना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच उल्लेखनीय काम करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना स










न्मानित करण्यात आले.

 

दरम्यान राज्य शासनाच्या वतीने पोलीस विभागाला देण्यात येणारी वाहने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पोलीस विभागाला सुपूर्द करण्यात आली.

 

प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध पुरस्कार मिळालेल्या सन्मानार्थींचे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी अभिनंदन केले. तसेच ध्वजारोहण कार्यक्रमाला उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, वीर माता, वीर पत्नी, ज्येष्ठ नागरिक, वरिष्ठ अधिकारी, पत्रकार, कर्मचारी, विद्यार्थ्यांना उपमुख्यमंत्र्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

00000