Wednesday, August 31, 2016

जिल्हा दक्षता समितीची बैठक संपन्न


          पुणे,दि. 31: जिल्हास्तरीय सार्वजनिक वितरण व्यवस्था व दक्षता समितीची बैठक जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती ज्योती कदम यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा पुरवठा कार्यालयात संपन्न झाली.
        सदर बैठकीत अशासकीय सदस्यांनी सार्वजनिक वितरण व्यवस्थेबाबतच्या जनतेच्या तक्रारी मांडल्या. तसेच बचतगटाना स्वस्तधान्य दुकाने देण्यात आली आहेत, ती दुकाने इतर व्यक्ती चालवितात अशी  तक्रार बैठकीत मांडण्यात आली. दुकानाच्या नावासह तक्रार केल्यास त्याची निश्चित दखल घेऊन तथ्य आढळल्यास आवश्यक कारवाई करण्यात येईल असे सांगितले. त्याप्रमाणे पुरवठा विभागाच्या वतीने वर्षात करण्यात आलेल्या  कार्यवाहीची  माहिती  दिली.
           तसेच शासन निर्णयानुसार  तूरडाळ स्वस्त धान्य दुकानात व विविध मॉलमध्ये करण्यात आलेल्या विक्रीबाबतची माहिती बैठकीत देण्यात आली. बैठकीस उपस्थित सदस्यांनी धान्याच्या गोडावूनला भेट देण्याबाबत मागणी केली. त्यानुसार इच्छूक सदस्यांनी भेट देवून पाहणी करण्याबाबत  सांगण्यात आले.
            या बैठकीस अशासकीय सदस्य श्रीमती विजया शिंदे, श्रीमती ज्योती गायकवाड, चेतन अगरवाल, श्रीमती  पल्लवी सुरसे, निलेश जठार, अमृत शेवकरी, निहाल घोडके आदि उपस्थित होते.
0000000

गणेश मंडळांनी पंचसूत्रीच्या आधारे समाजप्रबोधनाचे काम करावे - जिल्हाधिकारी सौरभ राव यांचे आवाहन




बारामती (उ.मा.का.) दि.31 : शासनाच्यावतीने यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी स्वदेशी, साक्षरता, बेटी बचाव-बेटी पढाओ, व्यसनमुक्ती आणि जलसंधारण या पंचसूत्रीवर आधारीत गणेशोत्सव सजावट स्पर्धेचे आयोजन केले आहे. या उपक्रमात भाग घेवून प्रत्येक मंडळांनी  उत्सवाबरोबरच समाजप्रबोधनाचे काम करण्याचे आवाहन  जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी केले. तसेच उत्सवाच्या काळात प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची कमतरता भासू देणार नसल्याचे  सांगत त्यांनी नागरीकांना यावेळी अश्वस्त केले.
            येथील वसंतराव पवार नाट्यगृहात पोलीस प्रशासनाच्यावतीने सार्वजनिक गणेशोत्सव व बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर आयोजित शांतता समितीच्या सभेत जिल्हाधिकारी श्री. राव बोलत होते. यावेळी पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक डॉ. जय जाधव, अप्पर पोलीस अधिक्षक तानाजी चिखले, प्रांताधिकारी संतोष जाधव, उप विभागीय पोलीस अधिकारी बापू बांगर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल वळीव, तहसिलदार हनुमंत पाटील, गटविकास अधिकारी प्रमोद काळे, पोलीस निरीक्षक विजय जाधव, पोलीस निरीक्षक चंद्रकांत कांबळे, मुख्याधिकारी नीलेश देशमुख, बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता मिलींद बारभाई उपस्थित होते.
जिल्हाधिकारी सौरभ राव म्हणाले, सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरूवात करणाऱ्या लोकमान्य टिळकांच्यास्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे आणि ते मी मिळवणारच या सिंहगर्जनेचे हे शताब्दीवर्ष आहे. त्यामुळे यावर्षीच्या गणेशोत्सवाला विशेष महत्व आहे. त्यामुळे शासनाने स्वराज्य ते सुराज्य या संकल्पनेवर आधारीत गणेशोत्सव साजरा करण्याचे ठरविले आहे. त्यानुसार या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तालुका स्तरापासून ते विभागीय स्तरापर्यंत या स्पर्धा होणार आहेत. यास्पर्धेत मंडळांनी मोठ्या संख्येने भाग घ्यावा. तसेच गणेशोत्सव काळात पाण्यासह ध्वनीचे प्रदुषण होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी. उत्सव काळात धार्मिक तेढ निर्माण होणार नाही याचीही सर्वानी काळजी घेण्याचे आवाहन श्री. राव यांनी यावेळी केले.
डॉ. जय जाधव म्हणाले, सामाजिक जाणीवेचे भान ठेवण्याबरोबरच सुरक्षिततेचे भान ठेवून सर्वांनी उत्सव साजरा करावा. ध्वनी प्रदुषणाबाबत उच्च न्यायालयाने कडक निर्देश दिले आहेत. न्यायालयाने घालून दिलेल्या निर्देशानुसारच ध्वनीक्षेपकाचा वापर करावा. गणेशोत्सव आणि बकरी ईद हे सण एकत्रच आल्यामुळे सामाजिक सलोखा राखण्याचे आपल्या सर्वाचे कर्तव्य आहे. उत्सव शांततेत साजरा करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
प्रास्ताविक करताना श्री. बांगर म्हणाले, बारामती शहरात शांततेत आणि कायद्याच्या सर्व मर्यादा पाळून यावर्षी दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला आहे. त्याच प्रमाणे गणेशोत्सव साजरा करावा. पूर्वीपासूनच्या बारामती शांतता पॅटर्न पुढे सुरू ठेवण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी पुणे ग्रामीण विभागातील चोरीला गेलेला मुद्देमाल फिर्यादींना मान्यवरांच्या हस्ते वितरीत करण्यात आला. यावेळी माजी उपनगराध्यक्ष सुभाष ढोले, दिलीप ढवाण-पाटील, मच्छिंद्र टिंगरे, डाळजच्या पोलीस पाटील, साधू बल्लाळ, माधव जोशी, अनिता गायकवाड, मोहन मोकाशी यांच्यासह तालुक्यातील मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मनोगते व्यक्त केली.
यावेळी बारामती शहर व परिसरातील प्रमुख मंडळाचे पदाधिकारी, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, प्रतिष्ठीत नागरीक, पत्रकार, ‍विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. आभार महावितरणचे बारामती विभागाचे कार्यकारी अभियंता मधुकर घुमे यांनी मानले. 
*********

निर्भया पथकास सर्व सुविधा पुरविणार - पालकमंत्री विजय देशमुख





पोलीस स्टेशन महिलांना माहेर घर वाटावे....... विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील

पंढरपूर दि. 31 :- सोलापूर ग्रामीण पोलीस दलामार्फत स्थापन करण्यात आलेल्या निर्भया पथकासआवश्यक असणारी वाहने उपलबध करुन देण्यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच या पथकास आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यास प्राधान्य देण्यात येईल असे प्रतिपादन पालकमंत्री विजय देशमुख यांनी  निर्भया पथक उद्घाटन समारंभाप्रसंगी आज पंढरपूर येथे बोलताना केले.
            सोलापूर ग्रामीण पोलीस दलामार्फत स्थापन करण्यात आलेल्या निर्भया पथक उद्घघाटन समाभरंभास पालकमंत्री श्री. देशमुख यांच्यासह कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, पोलीस अधीक्षक एस. विरेश प्रभू, आमदार भारत भालके, आमदार दत्तात्रय सावंत, अतीरिक्त पोलीस अधीक्षक मनिषा दुबुले, माजी आमदार सुधाकर परिचारक, पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी, मान्यवर पदाधिकारी यांच्यासह बहुसंख्य संख्येने विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होत्या.
            पालकमंत्री विजय देशमुख म्हणाले, महिलांच्या सरंक्षणाबरोबरच महिलांबाबत समाजात असणारी मानसिकता बदलण्याची गरज आहे. सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या निर्भया पथकाची सुरुवात पंढरपूर येथून होत आहे याचा आनंद आहे.  पण  संतांच्या विचारांची देणगी लाभलेल्या महाराष्ट्रात महिलांचे संरक्षण करण्यासाठी अशी पथके निर्माण करावी लागतात ही दुर्देवाची बाब असल्याची खंतही त्यांनी यावेळी बोलातांना व्यक्त केली. 
            निर्भयापथकाद्वारे महिलांचे संरक्षण करण्याचे काम पोलीस दलामार्फत तत्परतेने होणारच आहे. समाजात महिलांना सन्मान आणि प्रतिष्ठा मिळण्यासाठी तसेच महिलांच्या संरक्षणाबरोचब त्यांच्यावर अन्याय व अत्याचार होणार नाही यासाठी शिवरायांचे मावळे होऊन समाजातील प्रत्येकाने पुढे येणे गरजेचे असलल्याची अपेक्षाही  पालकमंत्री विजय देशमुख यांनी  यावेळी व्यक्त केली.
            महिलांमध्ये पोलीस स्टेशनबाबत असणारी निरर्थक भिती दूर करण्याचा प्रयत्न पोलीस दलामार्फत करण्यात येईल तसेच  पोलीस स्टेशन महिलांना आपले माहेर घर वाटावे एवढा विश्वास त्यांच्यात निर्माण करण्याचा प्रयत्न पोलीस दलाकडून केला जाईल असे  विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी यावेळी बोलतांना सांगितले.  सोलापूर ग्रामीण पोलीस दलामार्फत स्थापित करण्यात आलेल्या निर्भया पथकाद्वारे महिलांच्या सरंक्षणाबरोबरच त्यांना कायद्याची माहिती व जाणीव-जागृती करुन देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. महिलांच्या संरक्षणाबत समाजाची मानसिकता बदलण्याची खरी गरज असल्याचे सांगून श्री. नांगरे-पाटील म्हणाले, समाजात स्त्रियांचा सन्मान वाढावा, मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी ग्रामसभेद्वारे जनजागृती करण्यावर भर दिला जाईल.
            महिला व मुलींच्या संरक्षणासाठी निर्भया पथकाबरोबरच साध्या वेशातील पोलीस आवश्यक त्या ठिकाणी कार्यरत राहणार असल्याचे सांगून श्री. नांगरे-पाटील म्हणाले, या पथकाकडे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींची यादीही राहणार आहे. यामुळे एखादा गुन्हा घडल्यास त्याची  तत्परतेने उकल करण्यास याची  मदत होणार आहे. महिलांचा मानसिक, शारीरिक, बौध्दीक विकास होण्यासाठी महिलांनी शिक्षण घेणे महत्वाचे असल्याचे सांगून श्री. नांगरे-पाटील म्हणाले, शिक्षण हे वाघिणीचे दूध असून याच्या बळावरच आपण मोठे होऊन समाजात आपली वेगळी प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न करावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. तसेच  गणेशोत्सव काळात गणेश मंडळानी डॉल्बीचा वापर न करता पारंपारिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करावा असे आहवानही त्यांनी केले.
            यावेळी आमदार भारत भालके, आमदार दत्तात्रय सावंत, माजी आमदार सुधारकपंत परिचारक, पोलीस अधीक्षक एस. विरेश प्रभू यांनही मनोगत व्यक्त केले. प्रारंभी अतीरिक्त पोलीस अधीक्षक मनिषा दुबुले यांनी स्वागत केले व प्रास्ताविकास निर्भया पथकाबाबतची सविस्तर माहिती दिली. पोलीस उपअधिक्षक दिलीप चौगुलै यांनी आभार मानले.
000000

आय.टी.आय उमेदवारांचा १९ सप्टेंबरला भरती मेळावा

पुणे, दि.31. (विमाका): शिकाऊ उमेदवारी योजनेअंतर्गत आय.टी.आय उत्तीर्ण उमेदवारांसाठी दिनांक २ सप्टेंबर २०१६ रोजी होणारा भरती मेळावा पुढे ढकलण्यात आला असून, दिनांक १९ सप्टेंबर २०१६ रोजी सकाळी १०.०० वा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औंध, पुणे, येथे होणार आहे. असे अंशकालीन प्राचार्य, मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औंध, पुणे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
00000

Tuesday, August 30, 2016

अवयवदान महाअभियानाचा आयुक्तांच्या हस्ते शुभारंभ





               सोलापूर दि.30 :-अवयवदान हे मोठे सामाजिक काम असून प्रत्येक गरजू रुग्णांना अवयव मिळाला पाहिजे. अवयवदात्याची गरज असलेले मोठ्या प्रमाणात रुग्ण असून प्रत्येकाने अवयवदान करावे,असे आवाहन मनपा आयुक्त विजय काळम-पाटील यांनी करुन स्वत:सपत्नीक अवयवदानाचा संकल्प केला.
              आज सिव्हिल येथे आयोजित महाअवयवदान अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला महापौर प्रा. सुशिला आबुटे , सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन.एन. मालदार , जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी  पोपट बनसोडे , व्ही.एम. मेडीकल वैद्यकीय अधिष्ठता डॉ. राजाराम पोवार , डॉ. माधवी रायते, जि.प. आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव , जिल्हा शल्यचिकीत्स्क डॉ. मल्लिकार्जून पट्टणशेट्टी उपस्थित होते.
             श्री. पाटील म्हणाले की  किडनी , त्वचा , डोळे , यकृत , फुफूस या सारखे अवयव आपण दान करू शकतो.आपण सर्वांनी आजच्या दिवशी अवयवदानाचा संकल्प करून अर्ज भरावा असे आवाहन करून स्वत्:चा व पत्नीचा अवयवदान संदर्भातील अर्ज भरून दिला. तर कुलगुरू डॉ . मालदार म्हणाले की अवयवदानाचे महत्व घराघरात पोहचले पाहिजे . आज  देशात अवयवदानाच्या प्रतिक्षेत हजारो रूग्ण आहेत त्यांना जर अवयव मिळाले तर त्यांचे आयुष्य सुंदर होईल. अवयवदान करून आपण अनेकांना जीवनदान देऊ शकतो.
             वैद्यकीय अधिष्ठता श्री. पोवार यांनी प्रास्ताविकातून या अवयवदान मोहिमेची संकल्पना विषद केली तसेच हे अभियान दि. 30 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या कालावधीत राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. या महाअवयदान अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीला महापौर श्रीमती आबुटे यांनी झेंडा दाखवून शुभारंभ केला या रॅलीत अवयवदानाचे महत्व सांगणारे शेकडो फलक घेवून वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी , डॉक्टर्स , विविध स्वयंसेवी संस्था त्याचबरोबर मनपा व जिल्हा परिषदेचे आरोग्य विभाग , नागरिक हजारोंच्या  संख्येने सामील झाले होते.
 ही रॅली सिव्हील हॉस्पिटल येथून निघून नॉर्थकोट प्रशालेच्या मैदानावर त्याचा समारोप झाला यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त महेश जोशी , सामाजिक कार्यकर्त्या सीमा कीनीकर , मनपा आरोग्य अधिकारी जयंती आडके , चंदूभाई देढीया, सर्जरी विभागाच्या प्रमुख श्रीमती डॉ. वरूडकर यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते.
                                                            00000000  

जास्तीत जास्त नागरिकांनी अवयवदान करावे - रवी साळुंखे


सातारा, दि. 30 (जिमाका) : जास्तीत जास्त नागरिकांनी अवयवदानासाठी पुढे येवून आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रवी साळुंखे यांनी केले.
 जिल्हा शासकीय रुग्णालय यांच्यावतीने महा अवयवदान  रॅलीचा शुभारंभ आज सकाळी करण्यात आला यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी पी.बी.पाटील, जिल्हाआरोग्य अधिकारी डॉ.दिलीप माने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.श्रीकांत भोई, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.उज्वला माने, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.सुरेश पाटील, डॉ.विजया जगताप आदी उपस्थित होते.
 उपाध्यक्ष श्री.साळुंखे पुढे म्हणाले, अवयवदान ही काळाची गरज असून आज देशात अवयव गरजू रुग्णांची प्रतीक्षा यादी ही मोठया प्रमाणात वाढत आहे. या रॅलीच्या माध्यमातून अवयवदानाबाबत जागृती होण्यास निश्चित  मदत होईल. अवयव दान केल्याने रुग्णाचा जीव वाचू शकतो. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी अवयवदानासाठी पुढे यावे.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.भोई पुढे म्हणाले, अवयवदान हे इतरांच्या आयुष्यातील एक आशेचा किरण ठरु शकतो. मृत्यू पश्चात एक देह सात जणांच्या आयुष्याचा दर्जा सुधारु शकतो. अवयवदानाविषयी फारशी जागृती नसल्याने कित्येक रुग्ण वर्षानुवर्षे प्रतीक्षेत आहेत. ही प्रतीक्षा यादी कमी करण्यासाठी नागरिकांनी पुढे येवून अवयवदान करावे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्यंकटेश गौर यांनी केले.
मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या रॅलीस सुरुवात करण्यात आली. या रॅलीमध्ये रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी आरबीएसके कार्यक्रमांतर्गत कार्यरत वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी, जिल्हा एड्स नियंत्रण विभागाचे प्रमुख हेमंत भोसले आर्यंगल महाविद्यालय, सावकार होमिओपॅथिक महाविद्यालय, यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सोशल वर्क, शासकीय नर्सिग कॉलेजचे अध्यापक व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
पोलिस करमणुक केंद्र येथे या रॅलीची सांगता झाली.
00000


महाअवयवदान अभियान रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे, ३०- अवयव निकामी झालेल्या रुग्णांची सद्यस्थिती लक्षात घेता अशा रुग्णांना नवजीवन मिळावे, या उद्देशाने समाजात अवयव दानाबाबत व्यापक जनजागृती होण्याकरिता आयोजित केलेल्या महाअवयवदान अभियानाचा आज अवयवदान रॅलीने शुभारंभ झाला.
            वैद्यकीय शिक्षण औषधीद्रव्य विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग आणि विभागीय प्रत्यरोपण समिती यांच्या वतीने राज्यभर दि. ३० ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत एकाच वेळी राज्यभरात हे महा अवयवदान अभियान राबविण्यात येत आहे. याची सुरुवात आज सकाळी वाजता बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय येथून रॅलीने करण्यात आली. महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांच्या हस्ते झेंडा दाखवून रॅलीचा प्रांरभ झाला. यावेळी उप अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे,              डॉ.अरुण मोकळे, डॉ. सोमनाथ यलगर, डॉ. योगेश गवळी, डॉ.हरिष ताठिया, डॉ. विकास क्षीरसागर यांची उपस्थिती होती.
            अवयवदानाबाबत जनजागृती करणारे फलक हातात घेवून घोषणा देत सहभागी विद्यार्थी-विद्यार्थींनींचा सहभाग उत्स्फूर्त होता. रॅलीची बी.जे.महाविद्यालय येथून निघून पुढे मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, जनरल पोस्टऑफीस, दोराबजी  या मार्गाने जावून बी.जे. महाविद्यालय मैदानावर सांगता झाली. त्यापूर्वी सकाळी वाजता शहरातूनही रॅलीचे विविध ठिकाणाहून आयोजन करण्यात आले होते. संचेती हॉस्पिटल, वाडिया कॉलेज, आझम कॅम्पस, शनिवार वाडा, पुलगेट बसस्थानक, सेव्हन लव चौक  अशा विविध ठिकाणाहून रॅली निघून तिची  बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या मैदानावर सांगता झाली.
            रॅलीमध्ये  बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ, विद्यार्थी तसेच इंडियन मेडिकल असोसिएशन, नॅशलन मेडिकल ऑर्ग नायझेशन, रुबी हॉल हॉस्पिटल, दिनानाथ मंगेशकर रुग्णालय, झेड टी सी सी अशी विविध रुगणालये, स्वयंसेवी संस्था, रेाटरी क्लब, लायन्स कल्ब, गणेश मंडळे, तसेच विविध वैद्यकीय अभियांत्रिकी तसेच महाविद्यालयातील विद्यार्थीविद्यार्थींनी अध्यापक वर्ग सहभागी झाले होते.

००००

अवयवदान महाअभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही अवयवदानाचा संकल्प


मुंबईदि. 30 : अवयवदान हे मोठे सामाजिक काम असून प्रत्येक गरजू रुग्णांना अवयव मिळाला पाहिजेअवयवदात्याची गरज असलेले मोठ्या प्रमाणात रुग्ण असून प्रत्येकाने अवयवदान करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करुन स्वत:ही अवयवदानाचा संकल्प केला.
          आज नरिमन पाँईटमरीन ड्राईव्ह येथे आयोजित महाअवयवदान अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होतेया कार्यक्रमाला वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन,आरोग्य मंत्री डॉदीपक सावंतपशुसंवर्धन मंत्री महादेव जानकरवैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रविंद्र चव्हाणवस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर उपस्थित होते.
          मुख्यमंत्री श्रीफडणवीस म्हणाले कीडोळेकिडनीयकृतफुप्फुसत्वचा हे अवयव आपण दान करु शकतोआपण आपल्या मृत्यूनंतर नेत्रदान करुन अंध व्यक्तीच्या जीवनात नवा प्रकाश देऊ शकतोया अवयवदानाचे महत्त्व घराघरांत पोहोचले पाहिजेआज येथे उपस्थित सर्व मंत्रीडॉक्टर्स यांनी आणि मी स्वत:अवयवदानाचा संकल्प केला आहेआपणही सर्वांनी आजच्या दिवशी अवयवदानाचा संकल्प करुन अर्ज भरावा.
          श्रीमहाजन यांनी प्रास्ताविकातून या अवयवदान मोहिमेची संकल्पना सांगितली.ते म्हणाले कीभारतामध्ये अवयवदानाच्या प्रतिक्षेत हजारो रुग्ण आहेतत्यांना जर अवयव मिळाले तर त्यांचे आयुष्य सुंदर होणार आहेअवयवदान करुन आपण अनेकांना जीवनदान देऊ शकतोया अवयवदानाचे महत्त्व सर्वांना कळावेस्वत:हून अवयवदान करण्यासाठी पुढे यावे म्हणून हे अभियान राज्यभर राबविले जात आहे.आपण सर्वांनी अवयवदानाचे महत्त्व समजून हा संदेश समाजातील सर्व स्तरापर्यंत पोहोचवावा.
          डॉ.सावंत यावेळी म्हणाले कीसमाजाची गरज ओळखून राज्य शासनामार्फत हे महाअवयवदान अभियान 29 ऑगस्ट ते सप्टेंबरपर्यंत राबविले जाणार आहे.किडनीबाबत काही गैरप्रकार घडत असून हे टाळण्यासाठी एका सॉफ्टवेअरची निर्मिती करीत आहोतब्रेनडेड व्यक्तीचे अवयव गरजू रुग्णांना त्वरीत मिळावेतयातील कालावधी कमी व्हावा म्हणून आरोग्य विभाग प्रयत्नशील आहेसर्वांनी अवयवदानाचा फॉर्म भरुन संकल्प करावा.
          या महाअवयवदान अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी महारॅलीचे आयोजन करण्यात आले होतेया रॅलीला मुख्यमंत्री श्रीफडणवीस यांनी झेंडा दाखवून शुभारंभ केलाया रॅलीत अवयवदानाचे महत्त्व सांगणारे शेकडो फलक हातात घेऊन विद्यार्थीडॉक्टर्स,नागरिक हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होतेही रॅली एअर इंडिया इमारतीपासून निघून जीएमसी जिमखाना पर्यंत पोहोचलीसर जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉतात्यारावलहाने यांच्या मार्गदर्शनानंतर रॅलीचा समारोप झाला.
          प्रारंभी डॉक्टर्सशासकीय अधिकारीमंत्री महोदय त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांच्या पत्नी श्रीमती अमृता फडणवीस यांनी ही अवयवदानाचा संकल्प करुन फॉर्म भरला.यावेळी मुख्य सचिव श्रीस्वाधीन क्षत्रियअपर मुख्य सचिव श्रीमती मेधा गाडगीळ,विविध वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिष्ठाताडॉक्टर्सविद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होतेशेवटी अवयवदान महाअभियान समितीचे अध्यक्ष डॉतात्याराव लहाने यांनी आभार व्यक्त केले.
0000