Wednesday, November 24, 2021

दुबई वर्ल्ड एक्स्पोमध्ये महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचे सादरीकरण सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांची अबुधाबी फिल्म कमिशनला भेट

 



           मुंबईदि. 24 : दुबई येथे सध्या वर्ल्ड एक्स्पोचे आयोजन करण्यात आले असून त्यात महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव वेगवेगळ्या पद्धतीने सादर करण्यात आले आहे. या दरम्यान राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी अबुधाबीचे फिल्म कमिशनर हन्स फारकीन यांची भेट घेऊन उभय देशादरम्यान चित्रपट निर्मितीत लागणाऱ्या तंत्रज्ञानाचे आदान-प्रदान करण्यासंदर्भाततसेच या क्षेत्रात महाराष्ट्रात गूंतवणूक करण्याबाबत चर्चा केली.

              दुबई सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने १८ ते २३ नोव्हेंबर दरम्यान दुबई वर्ल्ड एक्सपोचे आयोजन करण्यात आले. या ठिकाणी महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक विभागाच्यावतीने महाराष्ट्रात चित्रीकरणासाठी निर्माण करण्यात आलेल्या सुविधांचे सादरीकरण करण्यात आले. चित्रपटविविध प्रकारच्या मालिकावेब सिरीज यांच्या चित्रीकरणासाठी सुलभ पद्धतीने ज्या सुविधा उपलब्ध करण्यात येत आहेत त्यांची माहिती जागतिक पातळीवर पोचवण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे. या अनुषंगानेच आज राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी अबुधाबीचे फिल्म कमिशन येथे भेट दिली.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे आदान-प्रदान व राज्यातील गुंतवणुकीबाबत चर्चा

             अबुदाबीचे फिल्म कमिशनर हन्स फारकीन यांच्याशी महाराष्ट्रातील चित्रपट निर्मिती व्यवसाय संदर्भाने मंत्री श्री.देशमुख यांनी चर्चा केली. मुंबई येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीत नव्याने उपलब्ध केलेल्या सोयीसुविधांची माहिती दिली. अबुधाबी फिल्म कमिशन आणि दादासाहेब फाळके चित्रनगरीत दरम्यान आधुनिक तंत्रज्ञानाचे आदान-प्रदान व्हावेया संदर्भाने महाराष्ट्रात दुबई येथून गुंतवणूक व्हावी या बाबतही चर्चा झाली.

            अबुधाबी सांस्कृतिक आणि पर्यटन विभागाचे अध्यक्ष मोहम्मद-खलिफा-अल-मुबारक  यांचीही अमित देशमुख यांनी शिष्टमंडळासह भेट घेतली. दोन्ही देशांना उपयुक्त ठरेल या पद्धतीने मुंबई येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीत संयुक्त प्रकल्प उभारण्याबाबत यावेळी चर्चा झाली. यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय आणि दादासाहेब फाळके चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक कैलास पगारे यांच्यासह विस्टास मीडिया अबुधाबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी इंत्तीखाब चौगुलेअबुधाबी फिल्म कमिशनचे व्हाईस प्रेसिडेंट संजय रैना हेही सहभागी झाले होते.

            अबुधाबी येथे चित्रीकरण झालेल्या ‘एक था टायगर’‘विक्रम वेध’ या चित्रपटांच्या सेटला मंत्री श्री.देशमुख यांनी शिष्टमंडळासह भेट देऊन पाहणी केली. या ठिकाणी चित्रीकरणाच्या आधुनिक व्यवस्था व कार्यपद्धतीचा अनुभव घेतलाअशा प्रकारच्या अद्ययावत माहितीचे आदान-प्रदान झाले तर भविष्यात दोन्ही देश या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करू शकतील, अशी भावना श्री. देशमुख यांनी यावेळी व्यक्त केली.

००००

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची मुलाखत

  मुंबईदि. 24 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'जय महाराष्ट्रया कार्यक्रमात मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. वरिष्ठ सहाय्यक संचालक देवेंद्र पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे.

         गुरूवार दि. 25 नोव्हेंबर 2021  रोजी सायंकाळी 7.30 वाजता ही मुलाखत महासंचालनालयाच्या पुढील लिंकवर पाहता येईल.

यू ट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR

फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR

ट्विटर - https://twitter.com/MahaDGIPR

         भारतात मतदारांचे प्रकारमतदार होण्यासाठी आवश्यक पात्रतामतदार यादीत नाव नोंदवणेवगळणे व दुरुस्तीफॉर्म नंबर 6 सोबत आवश्यक असणारी कागदपत्रेदावा अर्ज आणि आक्षेपांची पडताळणीमतदारयादीमध्ये नोंदवलेल्या नावामध्ये मुद्रणदोष असल्यास तो दुरुस्त करण्यासाठीची पद्धती आदी विषयांची माहिती श्रीमती चौधरी यांनी 'जय महाराष्ट्रया कार्यक्रमातून दिली आहे.

0000



Monday, October 4, 2021

देशाचे भूषण असलेल्या रयत शिक्षण संस्थेचा इतर संस्थांनी आदर्श घ्यावा - उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत

 देशाचे भूषण असलेल्या रयत शिक्षण संस्थेचा  इतर संस्थांनी आदर्श घ्यावा

- उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत
  सातारा दि.4 (जिमाका) : रयत शिक्षण संस्थेत सर्वसामान्यांची मुले शिकत आहेत. या शिक्षण संस्थेत काळाच्या गरजेनुसार कौशल्यपूर्ण शिक्षण देण्यासोबतच शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मुलांना रोजगारही उपलब्ध करुन दिला जात आहे. ही संस्था देशाचे भूषण असून या संस्थेचा आदर्श देशातील इतर संस्थांनी घ्यावा, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केले.

 यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्युट ऑफ यासन्स येथे रयत शिक्षण संस्थेचा 102 वा वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.  कार्यक्रमास आमदार बाळाराम पाटील, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील, सचिव डॉ. विठ्ठल शिवणकर, रामशेठ ठाकूर आदी उपस्थित होते.

           यावेळी बोलताना श्री. सामंत म्हणाले, पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांचे शिक्षण क्षेत्रातील काम अमुल्य असे आहे. या संस्थेत साडेचार लाखहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.  संस्थेचे काम आदर्शवत असून संस्थेसाठी शासनाकडून सर्व सहकार्य करण्यात येईल
.
         देशातील विद्यार्थी बाहेरील देशातील विद्यापीठ पाहण्यासाठी, तेथे शिक्षण घेण्यासाठी जातात. भविष्यात रयत शिक्षण संस्था पाहण्यासाठी बाहेरील विद्यार्थी इथे येतील,  तसेच मुंबई, पुणे येथील विद्यार्थी रयत शिक्षण संस्थेत शिक्षणासाठी येतील असा विश्वासही श्री. सामंत यांनी व्यक्त केला.
        यावेळी डॉ. पाटील म्हणाले, रयत शिक्षण संस्थेचा वर्धापनदिन समाजाने दिलेल्या योगदानाचे कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जात आहे. रयत शिक्षण संस्थेच्या जडण-घडणीत प्रबोधनकार ठाकरे यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. संस्थेकडून काळाच्या गरजेनुसार मुलांना शिक्षण देत असल्याचे त्यांनी सांगितले.

   
श्री. सामंत यांच्या हस्ते रयत विज्ञान पत्रिकेचे प्रकाशन व ई-रयत ॲपचा शुभारंभ करण्यात आला.
00000


वाई सुधारित पाणी पुरवठा योजनेसाठी ३५ कोटी-उपमुख्यमंत्री अजित पवार वाई नगर परिषदेच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन

 सातारा दि.4 (जिमाका) :वाई शहरासाठी सुधारित पाणी पुरवठा योजनेसाठी प्रस्ताव सादर करावा, त्यासाठी ३५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात येईल,असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  केले.

वाई येथे आयोजित विविध विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर, सहकार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, जि. प.अध्यक्ष उदय कबुले, आमदार शशिकांत शिंदे, दीपक चव्हाण, मकरंद पाटील,  नगराध्यक्ष अनिल सावंत, जि.प. उपाध्यक्ष प्रदीप विधाते आदी उपस्थित होते.

श्री.पवार म्हणाले, वाई शहराचा विस्तार लक्षात घेता आवश्यक सुविधांची निर्मिती करण्यासाठी शासनाकडून सहकार्य करण्यात येईल. वाई, महाबळेश्वर, खंडाळा, लोणंद, पाचगणीतील विविध सुविधासाठी १० कोटी रुपये देण्यात येतील. वाई शहरातील भूमिगत गटार योजनेबाबत लवकरच बैठक घेण्यात येईल. कृष्णा घाट विकास आणि नदी सुधार योजनेचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात येईल. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या समवेत होणाऱ्या बैठकीत सुरुर-पोलादपूर राज्य महामार्गाचा राष्ट्रीय महामार्ग म्हणून समावे करण्याबाबत विनंती करण्यात येईल.

ते म्हणाले, शहरांचा विकास करताना ती स्वछ आणि नीटनेटकी असायला हवी. शहरातील सांडपाणी व्यवस्थापन चांगल्यारितीने होणे गरजेचे आहे. यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी आग्रही भूमिका घ्यावी. नव्याने उभारण्यात येणाऱ्या शाळेच्या इमारतीमधून दर्जेदार शिक्षण देण्यात यावे. पुलाचे काम देखणे आणि दर्जेदार  व्हावे. भविष्यातील वाहतुकीची गरज लक्षात घेऊन डिसेंबर पर्यंत चार पदरी पुलाचा प्रस्ताव सादर करावा, येत्या अंदाजपत्रकात त्यासाठी मान्यता देण्यात येईल, असे श्री.पवार म्हणाले.

नगर परिषदेचे व्यापारी संकुल शहराच्या वैभवात भर घालणारे आणि नागरिकांना सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध जर  देणारे ठरावे असेही त्यांनी सांगितले.

कोविड योद्ध्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करताना उपमुख्यमंत्री म्हणाले, मानव जातीवर कोविडचे संकट आले असताना नागरिकांचा जीव वाचविण्याला या योद्ध्यांनी प्राधान्य दिले. त्यांनी खऱ्या अर्थाने मानवसेवेचे कार्य केले. आमदार मकरंद पाटील यांच्यासारख्यांचा सन्मान केल्याने  काम करणाऱ्याला प्रेरणा मिळते, असे त्यांनी सांगितले. वाई परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नागरिकांचे पुनर्वसन करण्यास कुठलीही कमतरता भासू देणार नाही असेही श्री.पवार म्हणाले.

श्री.रामराजे नाईक निंबाळकर यांनी आमदार मकरंद पाटील यांनी कोरोना काळात सेवा भावनेने कार्य केले असे सांगितले. कृष्णा नदीवरील पुलामुळे वाईसाठी चांगली सुविधा होईल. पर्यावरण रक्षणासाठी वृक्षारोपणावर भर देणे अवश्यक आहे, असेही ते म्हणाले.

        पालकमंत्री पाटील म्हणाले, बाहेरील जिल्ह्यातील नागरिक वाई येथे येतात. ही सांस्कृतिक नगरी असल्याने पुलाचे बांधकाम करताना त्याचे जुने सौंदर्य कायम ठेवण्यात येत आहे. मुलांसाठी शाळेच्या चांगल्या इमारती उभ्या राहणार आहेत. कोविड काळात आरोग्य सुविधांना प्राधान्य देण्यात आल्याने विकासासाठी निधीची कमतरता भासत होती. मात्र आता जिल्हा नियोजन समिती आणि शासनाच्या माध्यमातून विकासाला वेग देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार मकरंद पाटील यांच्या कार्याचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला.

0000





उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोविड आढावा बैठक संपन्न, महिलांसाठी चांगल्या आरोग्य सुविधा निर्माण करण्याचे निर्देश

 सातारा दि.४ (जिमाका) : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  शासकीय विश्रामगृह येथे आयोजित बैठकीत जिल्ह्यातील कोविड परिस्थिती, विकासकामे आणि अतिवृष्टीबाबत आढावा घेतला.

                यावेळी आमदार मकरंद पाटील, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे आदी उपस्थित होते.

                जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या कोविड प्रतिबंधक उपाययोजनांची माहिती घेऊन श्री. पवार म्हणाले, कोविडसाठी निर्माण करण्यात आलेल्या आरोग्य सुविधा पुढील काळासाठी उपयुक्त ठरणार आहेत. ऑक्सिजन प्रकल्पासारख्या सुविधांच्या देखभालीकडे विशेष लक्ष द्यावे. त्यासाठी कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात यावे.  आरोग्य विभागासाठी अधिकचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालयामुळे चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत. महिलांसाठी स्वतंत्र आणि चांगल्या दर्जाच्या सुविधा निर्माण कराव्यात.

                राज्यात काही ठिकाणी डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढतो आहे.  जिल्ह्यात प्रादुर्भाव वाढू नये यासाठी शहरी व ग्रामीण भागात फवारणीची मोहिम हाती घ्यावी. राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेल्या १०० बेड्सच्या रुग्णालयासाठी जागा उपलब्ध करून द्यावी.  कोविड चाचण्या कमी होणार नाहीत याची दक्षता घ्यावी, असे त्यांनी सांगितले.

                जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सदरणीकरणाद्वारे जिल्ह्यातील कोविड परिस्थितीची माहिती दिली.  जिल्ह्यातील पॉझिटिव्हीटी दर कमी होत असून तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता आवश्यक पूर्वतयारी करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

 

*जिल्ह्यातील अतिवृष्टीबाबत आढावा*

                उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी जिल्ह्यात जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीत झालेले नुकसान आणि देण्यात आलेल्या मदतीची माहिती घेतली. पीक नुकसानीबाबत शेतकऱ्यांना लवकर मदत मिळावी यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. पुरात बेपत्ता झालेल्या ३ व्यक्तींच्या कुटुंबियांना शासनाची मदत मिळावी यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, आपणही त्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करू असे त्यांनी संगितले. शेतजमिनीचे नुकसान होणाऱ्या भागात पुराच्या पाण्यामुळे यापुढे अधिक नुकसान होऊ नये म्हणून मनरेगाच्या माध्यमातून कामे घेण्याबाबत अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात येईल. पुरापासून रक्षण करण्यासाठी गावाचे पुनर्वसन करावयाचे असल्यास त्यासाठी जागा निश्चित करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

                श्री.पवार यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या रस्त्यांच्या नुकसानाची आणि प्रकल्पातील पाणीसाठ्याची माहिती घेतली.

                बैठकीस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी राधाकिशन पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गुरुदत्त काळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सं.गो.मुंगीलवार, कार्यकारी अभियंता शंकर दराडे,  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी  देविदास ताम्हाणे उपस्थित होते.

                                                                                                                00000



Friday, February 19, 2021

आर.आर. आबांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून विविध नावीन्यपूर्ण योजना राबवून गावांचा विकास साधा -उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन

 

स्मार्ट ग्राम व आर.आर.(आबा) पाटील सुंदर गाव योजना पुरस्कारांचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण

 

आर.आर. आबांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून

विविध नावीन्यपूर्ण योजना राबवून गावांचा विकास साधा

                        -उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन

 







     जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्याच्या व ग्रामपंचायत सदस्यांनी गावांच्या

विकासाचा ध्यास घेऊन काम करावे

          पुणे जिल्हा परिषदेला राज्यात अग्रेसर बनवण्यासाठी अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत

शासनाच्या निधीतून दर्जेदार कामे करुन गावे स्वच्छ व सुंदर बनवा

 

          पुणे,दि.19:  आर.आर.आबांनी गावांसाठी केलेल्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून गावांमध्ये विविध नावीन्यपूर्ण योजना राबवून गावांना स्वच्छ व सुंदर बनवा आणि गावांचा विकास साधा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

 

            पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित 'स्मार्ट ग्राम व आर.आर.(आबा) पाटील सुंदर गाव योजना' पुरस्कारांचे आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते अल्पबचत भवन येथे वितरण करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, उपाध्यक्ष रणजित शिवतरे, सभापती सर्वश्री प्रमोद काकडे, बाबुराव वायकर, सारिका पानसरे, पूजा पारगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर आदी उपस्थित होते.

            उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, आर.आर.आबांनी गावांच्या विकासासाठी अनेक नावीन्यपूर्ण योजना राबविल्या. आपल्या स्वतःच्या गावासह राज्यभरातील गावे स्वच्छ व सुंदर करण्यासाठी काम केले. डान्सबार बंदी घालून तरुणांना वाईट प्रवृत्तीकडे जाण्यापासून रोखले. तर गुटखाबंदी करून त्यांना व्यसनापासून दूर करण्याचे काम केलं. तसेच पारदर्शी पोलीस भरती प्रक्रिया राबवली. गावांच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील असणाऱ्या आर.आर.आबांना 'आधुनिक युगातील गाडगेबाबा' असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, असे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वर्गीय आर.आर. पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला.

            उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, दळणवळण, रस्ते, पिण्याचे पाणी, शेतीच्या विकासासाठी राज्य शासन मोठ्या प्रमाणावर निधीची तरतूद करत आहे. प्राप्त निधी योग्य प्रकारे खर्च होणेही तितकेच गरजेचे आहे. मिळणाऱ्या निधीतून गावांचा व जिल्ह्याचा विकास साधण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत. कामांचा दर्जा चांगलाच असला पाहिजे, असे सांगून कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.

            ग्रामीण भागातील समस्या सोडवण्यासाठी, येथील विकासकामे मार्गी लावण्यासाठी सरपंच सभांचे आयोजन राज्य शासनाच्या वतीने केले जात आहे. यामुळे गावगाड्याचे प्रश्न सोडविण्यात येतील. तसेच गावांचे प्रश्न लवकरात लवकर सुटतील, यात तिळमात्र शंका नाही, असा विश्वास व्यक्त केला. शाळा, अंगणवाड्या चांगल्या बनवा, स्मशानभूमीची कामे करा, सौरऊर्जेचा वापर करा, विविध कल्याणकारी योजना राबवा, नागरिकांसाठी प्रामाणिकपणे काम करून मिळालेल्या संधीचं सोनं करा, साधू-संतांच्या विचारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाईट सवयींपासून दूर रहा, गावांची प्रगती साधा, गावे स्वच्छ सुंदर बनवा आणि मिळालेल्या संधीचं सोनं करा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती पदाधिकारी व ग्रामपंचायत सदस्यांना केले.

            कोरोना प्रतिबंधासाठी सर्वांनी स्वयंशिस्त पाळून शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करुन शासनाला सहकार्य करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी केले. तथापि, नागरिकांनी खबरदारी घेऊन नियमांचे पालन केले नाही तर जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागतील, असेही त्यांनी सूचित केले.

            प्रास्ताविक जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी केले. आभार उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांनी मानले. सूत्रसंचालन आशिष जराड यांनी केले.

0000000

Thursday, February 18, 2021

संपूर्ण जगात छत्रपती शिवाजी महाराजांचे तेज पसरवणार--मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 











संपूर्ण जगात छत्रपती शिवाजी महाराजांचे तेज पसरवणार--मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 

          पुणे, दि.19- आपल्या प्रत्येकाच्या हृदयात छत्रपती शिवरायांचे अढळ स्थान आहे. प्रत्येक चांगल्या कामात शिवरायांचे स्मरण नकळत होत राहते.  सध्या वातावरण चांगले आहे पण तोंडावर मास्क आहे.

          छत्रपती दैवत का आहे, तर लढण्यासाठी तलवार पकडण्याची जिगर त्यांच्यात होती.

कोरोनाशी लढतांना ही प्रेरणा व जिद्द आम्हाला मिळते आहे. आपल्या सगळ्यांना जोडणारे शिवराय आहेत, असे गौरवोद्गार काढून मुख्य मंत्री उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण जगात शिवरायांचे तेज पसरवणार असल्याचे सांगितले.

           किल्ले शिवनेरीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्य मंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव  उत्साहात साजरा झाला, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

    कार्यक्रमास पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, खा. छत्रपती संभाजीराजे, खा. डॉ.अमोल कोल्हे, आ. अतुल बेनके, आ. विनायक मेटे, जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विजय घोगरे उपस्थित होते.

           मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, शिवनेरीवर येण्याचे हे दुसरे वर्ष आहे, हा बहुमान शिवरायांच्या आशीर्वाद आणि आपल्या सर्वांच्या प्रेमाने लाभला आहे.मनात, ह्रदयात  शिवरायांचे  स्थान आहे.  प्रत्येक चांगल्या कामात शिवरायांचे स्मरण नकळत होत राहते.  सध्या वातावरण चांगले आहे पण तोंडावर मास्क आहे. कोरोनाशी आपली लढाई सुरू आहे.

छत्रपतींनी ज्या काही लढाया केल्या त्यात त्यांनी शत्रूला पराभूत केले. त्यांच्या ढाल तलवारी आज नसल्या तरी कोरोना या शत्रूशी लढाई करताना मास्क ही आपली ढाल आहे, हे विसरू नका, असा सल्ला त्यांनी दिला.

छत्रपती दैवत का आहे, तर लढण्यासाठी तलवार पकडण्याची जिगर त्यांच्यात होती असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले,  कोरोनाशी लढतांना ही प्रेरणा व जिद्द आम्हाला मिळते आहे. आपल्या सगळ्यांना जोडणारे शिवराय आहेत. संपूर्ण जगात शिवरायांचे तेज पसरवणार, असे सांगून त्यांनी पुरस्कार प्राप्त शिवभक्तांचे अभिनंदन  केले.

   उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले,  छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, महाराष्ट्राच्या भूमीत जन्म घेतलेल्या प्रत्येकाच्या आशा-आकांक्षांच्या स्वप्नपूर्तीची जयंती आहे. छत्रपती शिवरायांसोबत स्वराज्यासाठी लढलेल्या मावळ्यांच्या शौर्याची, त्यागाची जयंती आहे.  छत्रपती शिवाजी महाराजांसारखे युगपुरुष, महाराष्ट्राच्या भूमीत जन्माला आले आणि त्यांना आदर्श मानणारे कोट्यवधी युवक, आजही गावागावात महाराष्ट्राची अस्मिता जागृत ठेवत आहेत, हे या भूमीचं, आपल्या सर्वांचं भाग्य आहे.  कोरोना नियमांचं पालन करुन शिवजयंतीचा आनंदोत्सव राज्याच्या घराघरात, मनामनात साजरा होऊदे, असे  आवाहन त्यांनी केले.

शिवनेरी परिसरातील विकास कामांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेला निधी संपूर्ण शिवनेरीचे पावित्र्य, महत्त्व लक्षात घेता विकास कामे दर्जेदार करावीत, तसेच कामे वेळेत सुरू करून वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

    राज्य तसेच शिवनेरीच्या सर्वांगीण विकासासाठी कुठेही कमी पडणार नाही असे सांगून उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेता योग्य अंतर, मास्कचा वापर, गर्दी टाळा तसेच शासनाच्या दक्षता नियमांचे पालन करा, असे आवाहनही त्यांनी केले.

          खासदार छत्रपती संभाजीराजे  म्हणाले, शासनाने किल्ला संवर्धन व जतनाबाबत मोहीम हाती घ्यावी तसेच समुद्रातील किल्ले बाबत वाहतूक व्यवस्था करून पर्यटनाला गती द्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

           प्रारंभी शिवजन्मस्थानी पारंपरिक वेशातील महिलांनी शिवरायांची महती सांगणारा पाळणा गायिला. त्यानंतर पोलीस पथकाने बंदुकीच्या तीन फैरी झाडून छत्रपती शिवरायांना मानवंदना दिली. यावेळी आदिवासी पारंपरिक नृत्य सादरीकरण झाले.

त्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे, उपमुख्य मंत्री पवार यांनी बालशिवाजी व जिजाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला.

          यावेळी 'शिवयोग' या टपालाचे विशेष आवरण (कव्हर) तसेच वन विभागाच्या माध्यमातून 391 वृक्षांच्या रोपणांतर्गत वृक्षारोपण करण्यात आले.

कार्यक्रमास विभागीय आयुक्त सौरभ राव,  जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, प्रांताधिकारी सारंग कोडोलकर यांच्यासह शिवभक्त उपस्थित होते.

 


 

फ्रेरिया इंडिका डालझेल उर्फ शिवसुमन -

या वनस्पतीची सर्वप्रथम शास्त्रीय नोंद ही डालझेल नावाच्या शास्त्रज्ञाने शिवनेरी गडावरून केली, जी छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी आहे. ही वनस्पती अतिधोकाग्रस्त असून फक्त महाराष्ट्र राज्यातच आढळून येते. सह्याद्री पर्वतरांगांमध्ये विशेषत: अहमदनगर (रंधा धबधबा), पुणे (जुन्नर: शिवनेरी गड, पुरंदर वज्रगड, मुळशी : डोंगरवाडी, पिंपरीचे तळे) रायगड (शिवथरघळ), सातारा (महाबळेश्वरः केट्स पॉईंट, सज्जनगड), नाशिक (त्र्यंबकेश्वर, अंजनेरी) अशा निवडक ठिकाणी तीव्र डोंगर उतार व कड्यावर आढळून येते. स्थानिक भाषेत या वनस्पतीला 'शिंदळ माकुडी' म्हणून संबोधतात. पुणे जिल्ह्याचे निसर्ग प्रतिकात्मक मानचिन्ह फूल म्हणूनही ही वनस्पती ज्ञात आहे. सदर विशेष वनस्पतीच्या अधिवासाचे रक्षण व संवर्धन होणे ही खरी काळाची गरज आहे.

           

00000

Tuesday, January 26, 2021

प्रबोधनकारां’चा पुरोगामित्वाचा विचार आजही महाराष्ट्राला आवश्यक -उपमुख्यमंत्री अजित पवार प्रबोधन शताब्दी सोहळयाचा समारोप

 

प्रबोधनकारांचा पुरोगामित्वाचा विचार आजही महाराष्ट्राला आवश्यक

-उपमुख्यमंत्री अजित पवार

प्रबोधन शताब्दी सोहळयाचा समारोप

 

          पुणे दि. 26 ‘प्रबोधनकारांचा पुरोगामित्वाचा विचार आजही महाराष्ट्राला आवश्यक आहे. त्यांनी दिलेल्या स्वाभिमानावरच महाराष्ट्राची वाटचाल सुरु आहे. प्रबोधनपाक्षिकाच्या माध्यमातून वैचारिक आणि सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी नव्या पिढीला प्रेरणा देण्याचे कार्य केले असल्याचे मत उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.

          बालगंधर्व रंगमंदीर येथे प्रबोधन शताब्दी सोहळयाचा समारोप उपमुख्यमंत्री पवार यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी विधान परिषदेच्या सभापती निलम गो-हे, खा. गिरीष बापट, आ. संजय शिंदे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे, संवाद संस्थेचे सुनिल महाजन,हरिष केंची, किरण साळी, सचिन विटकर उपस्थित होते.

           संवाद-पुणेसंस्थेने आयोजित केलेल्या, प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांच्या संपादकात्वाखालील प्रबोधनपाक्षिकाचा शतकोत्सव सोहळयासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पुरोगामी महाराष्ट्राची जडणघडण करण्यात सिंहाचा वाटा असणाऱ्या प्रबोधनपाक्षिकाच्या शताब्दी वर्षानिमित्ताने  प्रबोधनच्या शतकमहोत्सवी वाटचाल, त्यांची पत्रकारिता अभिनंदनीय आहे. प्रबोधनकार प्रभावी वक्ते, व्यंगचित्रकार, छायाचित्रकार, साहित्यिक, तैलचित्रकार बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. स्वातंत्र्यपूर्व काळात समाजाचे वैचारिक प्रबोधन करण्यासाठी त्यांनी प्रबोधनपाक्षिक सुरू केले. नियतकालिक सुरु करुन चालवणे मोठे कठीण असणाऱ्या काळात त्यांनी ते धाडस केले आणि यशस्वी करुन दाखविले. प्रबोधनपाक्षिकाने महाराष्ट्राला वैचारिक समृद्धी दिली, नव्या विचाराची पिढी घडविण्यात सिंहाचा वाटा उचलला. प्रबोधनपाक्षिकाच्या माध्यमातून वैचारिक आणि सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी नव्या पिढीला प्रेरणा देण्याचे कार्य केल्याचेही उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.

          विधान परिषदेच्या उपसभापती निलम गो-हे म्हणाल्या, पुणे शहरात प्रबोधनाचा विचार मांडण्याचे कार्य प्रबोधनकार ठाकरे यांनी केले आहे. प्रबोधनच्या शतकोत्सव कार्यक्रमामध्ये सर्वच विषयांचा आंतर्भाव करण्यात आला आहे. संवादच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे आयोजन करून साहित्य आणि संस्कृती संवर्धनाचे कार्य होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

          खा. गिरीष बापट म्हणाले, प्रबोधनकार ठाकरे यांनी समाजामध्ये बदल करण्यासाठी अनेक उपक्रमात सहभाग घेतला असून समाजामध्ये विचारांची क्रांती केल्याचे सांगितले.

          माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व काळात समाजाचे वैचारिक प्रबोधन करण्यासाठी प्रबोधनकार ठाकरे यांनी प्रबोधनपाक्षिक सुरू केले. नियतकालिक सुरु करुन चालवणे मोठे कठीण असणाऱ्या काळात त्यांनी ते धाडस केले आणि यशस्वी करुन दाखविले. प्रबोधनकरांचे विचार पुरोगामी होते, प्रबोधनकारांच्या विचारांची आजही गरज असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी नागरिक उपस्थित होते.

कविसंमेलनाला उस्फूर्त प्रतिसाद

संवाद संस्थेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात आयोजित करण्यात आलेल्या कविसंमेलनाला उस्फूर्त  प्रतिसाद मिळाला. सामाजिक,प्रबोधनपर तसेच विविध विषयावरील कवितांना रसिकांनी उस्फूर्त दाद दिली. ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे, डॉ. दिलीप पांढरपट्टे, भरत दौंडकर, अरूण पवार, तुकाराम धांडे, बंडा जोशी यांनी संमेलनात सहभाग घेतला.

 

00000







पोलीस मनोरंजन केंद्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण

 

पोलीस मनोरंजन केंद्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण

 

          पुणे दि. 26: शिवाजीनगर  येथील पोलीस मनोरंजन केंद्राचे व पोलीस विभागासाठीच्या नऊ वाहनांचे लोकार्पण आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त अनुक्रमे डॉ. जालिदंर सुपेकर, डॉ.संजय शिंदे, अशोक मोराळे, पोलीस उप आयुक्त अनुक्रमे बच्चन सिंग, प्रियंका नारनवरे, भाग्यश्री नवटके, स्वप्ना गोरे, पोर्णिमा गायकवाड, सहा पोलीस आयुक्त सतिश गोवेकर, आबा चेमटे आदी उपस्थित होते. तसेच सायबेज कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष अमित गुजवानी, व्यवस्थापक प्रिया पारनेकर उपस्थित होते.

            पुणे शहर पोलीस दलाचे सक्षमीकरण व आधुनिकीकरण करण्याच्या दृष्टीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा नियोजन समितीकडून एक कोटी रुपयांचा निधी तसेच महिंद्रा कंपनीची नवीन नऊ स्कॉर्पिओ वाहने प्राप्त करुन दिली. ही वाहने एस्कॉर्ट व पायलट डयुटी करीता वापरण्यात येणार आहेत.

 

            पुणे पोलीस आयुक्तालयातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना व त्यांच्या कुटुंबातील सदस्य, पाल्य यांना त्यांच्या कला, गुणांना वाव देता यावा, कुटुंबातील सांस्कृतिक कार्यक्रम, लग्न समारंभ, वाढदिवस इत्यादी कार्यक्रमाकरीता पोलीस दलाची पोलीस मनोरंजन केंद्र ही इमारत 15 ऑगस्ट 1959 रोजी पुर्णत्वाला आली. त्यांनतर सन 2005 मध्ये इमारतीचे पहिल्या मजल्यावर वरिष्ठ अधिकारी यांच्याकरीता  एकुण 6 विश्रांतीकक्ष तयार करण्यात आले.

            सन 2020 रोजी तत्कालीन पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम व सध्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पोलीस मनोरंजन केंद्राच्या इमारतीचे आधुनिक पध्दतीने नुतनीकरण व विस्तारीकरण करुन घेणे तसेच या वास्तुच्या बाजुला एक प्रशस्त हॉल तयार करण्याची संकल्पना मांडून ती पुर्णत्वास नेली. यासाठी विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक रमेश साहेबराव साठे यांनी विशेष प्रयत्न केले. सायबेज कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अरुण नथानी व संचालक रितु नथानी यांनी सामाजिक बांधीलकीतून स्वेच्छेने  पोलीस मनोरंजन केंद्र इमारतीचे वातानुकुलित यंत्रणेसह सर्व सोयी -सुविधांयुक्त नुतनीकरणासह विस्तारीकरण करण्यासाठी विशेष सहाय्य केले.

 

00000