Friday, February 19, 2021

आर.आर. आबांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून विविध नावीन्यपूर्ण योजना राबवून गावांचा विकास साधा -उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन

 

स्मार्ट ग्राम व आर.आर.(आबा) पाटील सुंदर गाव योजना पुरस्कारांचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण

 

आर.आर. आबांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून

विविध नावीन्यपूर्ण योजना राबवून गावांचा विकास साधा

                        -उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन

 







     जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्याच्या व ग्रामपंचायत सदस्यांनी गावांच्या

विकासाचा ध्यास घेऊन काम करावे

          पुणे जिल्हा परिषदेला राज्यात अग्रेसर बनवण्यासाठी अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत

शासनाच्या निधीतून दर्जेदार कामे करुन गावे स्वच्छ व सुंदर बनवा

 

          पुणे,दि.19:  आर.आर.आबांनी गावांसाठी केलेल्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून गावांमध्ये विविध नावीन्यपूर्ण योजना राबवून गावांना स्वच्छ व सुंदर बनवा आणि गावांचा विकास साधा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

 

            पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित 'स्मार्ट ग्राम व आर.आर.(आबा) पाटील सुंदर गाव योजना' पुरस्कारांचे आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते अल्पबचत भवन येथे वितरण करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, उपाध्यक्ष रणजित शिवतरे, सभापती सर्वश्री प्रमोद काकडे, बाबुराव वायकर, सारिका पानसरे, पूजा पारगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर आदी उपस्थित होते.

            उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, आर.आर.आबांनी गावांच्या विकासासाठी अनेक नावीन्यपूर्ण योजना राबविल्या. आपल्या स्वतःच्या गावासह राज्यभरातील गावे स्वच्छ व सुंदर करण्यासाठी काम केले. डान्सबार बंदी घालून तरुणांना वाईट प्रवृत्तीकडे जाण्यापासून रोखले. तर गुटखाबंदी करून त्यांना व्यसनापासून दूर करण्याचे काम केलं. तसेच पारदर्शी पोलीस भरती प्रक्रिया राबवली. गावांच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील असणाऱ्या आर.आर.आबांना 'आधुनिक युगातील गाडगेबाबा' असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, असे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वर्गीय आर.आर. पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला.

            उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, दळणवळण, रस्ते, पिण्याचे पाणी, शेतीच्या विकासासाठी राज्य शासन मोठ्या प्रमाणावर निधीची तरतूद करत आहे. प्राप्त निधी योग्य प्रकारे खर्च होणेही तितकेच गरजेचे आहे. मिळणाऱ्या निधीतून गावांचा व जिल्ह्याचा विकास साधण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत. कामांचा दर्जा चांगलाच असला पाहिजे, असे सांगून कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.

            ग्रामीण भागातील समस्या सोडवण्यासाठी, येथील विकासकामे मार्गी लावण्यासाठी सरपंच सभांचे आयोजन राज्य शासनाच्या वतीने केले जात आहे. यामुळे गावगाड्याचे प्रश्न सोडविण्यात येतील. तसेच गावांचे प्रश्न लवकरात लवकर सुटतील, यात तिळमात्र शंका नाही, असा विश्वास व्यक्त केला. शाळा, अंगणवाड्या चांगल्या बनवा, स्मशानभूमीची कामे करा, सौरऊर्जेचा वापर करा, विविध कल्याणकारी योजना राबवा, नागरिकांसाठी प्रामाणिकपणे काम करून मिळालेल्या संधीचं सोनं करा, साधू-संतांच्या विचारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाईट सवयींपासून दूर रहा, गावांची प्रगती साधा, गावे स्वच्छ सुंदर बनवा आणि मिळालेल्या संधीचं सोनं करा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती पदाधिकारी व ग्रामपंचायत सदस्यांना केले.

            कोरोना प्रतिबंधासाठी सर्वांनी स्वयंशिस्त पाळून शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करुन शासनाला सहकार्य करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी केले. तथापि, नागरिकांनी खबरदारी घेऊन नियमांचे पालन केले नाही तर जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागतील, असेही त्यांनी सूचित केले.

            प्रास्ताविक जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी केले. आभार उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांनी मानले. सूत्रसंचालन आशिष जराड यांनी केले.

0000000

No comments:

Post a Comment