Saturday, September 29, 2018

आदर्श निवडणुकांसाठी राजकीय पक्षांचे सहकार्य आवश्यक -राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया



लोकशाही, निवडणूक व सुशासन कार्यशाळा : दुसऱ्या सत्रात तज्ज्ञांचे मार्गदर्शन

पुणे दि. 29 : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका निर्भयपणे तसेच पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी राज्य निवडणूक आयोग प्रयत्न करत आहे. मात्र, आदर्श निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांचे सहकार्य आवश्यक आहे, असे मत राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी आज व्यक्त केले.

राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘लोकशाही, निवडणूक व सुशासन’ या कार्यशाळेतील दुसऱ्या सत्रात ‘राजकीय पक्षांद्वारे सशक्त लोकशाही’ या विषयावरील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानंतर राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया बोलत होते.

यावेळी सांगलीच्या महापौर संगीता खोत, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. भास्करराव आव्हाड, उपायुक्त (सामान्य प्रशासन) संजयसिंह चव्हाण उपस्थित होते.

श्री. सहारिया म्हणाले, राज्य निवडणूक आयोग निवडणुकांदरम्यान पारदर्शकता राखण्यासाठी आचारसंहिता लागू करत असतो. त्याचे पालन सर्वांनी करणे आवश्यक आहे. राजकीय पक्षांनी लोकशाहीमध्ये आपली काय भूमिका आहे, हे समजून घ्यावे. पैशाचा दुरूपयोग, मतदारांना आमिष दाखवण्याचे प्रकार रोखण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे.

या सत्रामध्ये राज्य निवडणूक आयोगाचे उपायुक्त राजाराम झेंडे, पुणे पुनर्वसन विभागाचे उपायुक्त दीपक नलावडे, सांगलीचे अपर जिल्हाधिकारी आण्णासाहेब चव्हाण, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक अजित रेळेकर आणि ज्येष्ठ विधीज्ञ भास्करराव आव्हाड यांनी सर्वांना मार्गदर्शन केले.

कार्यशाळेस पुणे विभागातील प्रमुख अधिकारी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, विद्यार्थी तसेच सामान्य नागरिक उपस्थित होते.

***** 






जेष्ठ नागरिक दिनानिमित्त उद्या स्नेह मेळाव्याचे आयेाजन


सोलापूर, दि.29 :- राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत 1 ऑक्टोबर जागतिक  जेष्ठ नागरिक दिन म्हणून साजरा करण्यात येतेा. या दिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ नागरिकांचा स्नेह मेळावा व चित्र प्रदर्शन, आरोग्य विषयक व्याख्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सभागृह, सात रस्ता सोलापूर येथे 1 ऑक्टोबर 2018 रोजी आयोजीत करण्यात आला आहे. या स्नेह मेळावा व चित्र प्रदर्शन, आरोग्य विषयक व्याख्यानास जेष्ठ नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सहाय्यक आयूक्त सपना घोळवे यांनी केले आहे.
00000

सैनिकांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य द्या जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांचे आवाहन


सोलापूर दि. 29 :- सैनिक देशसेवेचे कर्तव्य बाजावण्यासाठी आपल्या कुटूंबापासून लांब राहतो, त्यामुळे गावाकडील शासकीय कार्यालयातील त्याची कामे प्रलंबित राहतात. देशसेवा बजावणऱ्या सैनिकांच्या व माजी सैनिकांच्या समस्या, प्रकरणे सोडविण्यास शासकीय विभागानी प्राधान्य द्यावे,असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात शौर्य दिनानिमित कार्यक्रमात जिल्ह्यातील शहीद जवानांचे कुटुंबिय, माजी सैनिक, विधवा पत्नी यांना  गौरविण्यात आले. या कार्यक्रमास पोलीस अधिक्षक मनोज पाटील, पोलीस उपायुक्त शशिकांत महानवर, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, म्हाडाचे अपर जिल्हाधिकारी अशोक पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, कर्नल अनिल भोसले, अशोक कुमार, मेजर निवृत्त      श्री. खांडेकर उपस्थित होते.
            डॉ. भोसले म्हणाले, ‘सेवारत सैनिक व माजी सेनिकांची बहुतांशी जमिनी विषयक प्रकरणे प्रलंबित असतात. नियमानुसार ही प्रकरणे निकाली काढण्यासाठी त्या त्या विभागांनी  प्राधान्य द्यावे’.
            कार्यक्रमास जिल्ह्यातील माजी सैनिक, शहिद जवानांचे कुटंबिय, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

 *******


राज्य निवडणूक आयोगाकडील इव्हिएम मशिन हॅक प्रुफ - राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया


विविध विषयांवर झाली गट चर्चा;मान्यवर, तज्ज्ञांचा समावेश
पुणे दि. 29: इव्हिएम मशिनबाबत वारंवार प्रश्न उपस्थित केले जातात, मात्र राज्य निवडणूक आयोगाकडील सर्व इव्हिएम मशिन हॅक प्रुफ असून त्यात कोणीही, कसलीही ढवळाढवळ करू शकत नाही, असे स्पष्ट मत राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी आज व्यक्त केले.
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘लोकशाही, निवडणूक व सुशासन’ या विषयावरील विभागीय कार्यशाळेत विविध विषयांवरील गट चर्चेनंतर गट प्रमुखांनी सादरीकरण केले. या सादरीकरणानंतर राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया बोलत होते.
यावेळी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर, निवृत्त प्रशासकीय अधिकारी चंद्रकांत दळवी, ज्येष्ठ विधी तज्ज्ञ ॲङ भास्करराव आव्हाड, उपायुक्त (सामान्य प्रशासनसंजयसिंह चव्हाण उपस्थित होते.
श्री. सहारिया म्हणाले, लोकशाहीत मतदाराला फार महत्व आहे. मतदाराला निर्भयपणे मतदान करता यावे, यासाठी राज्य निवडणूक आयोग प्रयत्नशील आहे. सर्व निवडणूकांचे मतदान एकाच दिवशी घेण्याविषयी अनेक सूचना आल्या. तसेच ते सुटी दिवशी घ्यावे की इतर दिवशी घ्यावे, या विषयीही मतांतरे या गट चर्चेदरम्यान पुढे आली. मात्र स्थानिक परिस्थिती लक्षात घेवूनच मतदान कधी घ्यावयाचे याचा निर्णय राज्य निवडणूक आयोग घेत असतो. मतदाना दिवशी सर्वांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी जे कारखाने बंद करता येत नाहीत तसेच अत्यावश्यक सेवेची अस्थापनांमधील कामगारांना मतदानासाठी दोन तासांची सूट देण्यात येते. उर्वरीत सर्व अस्थापनांना सुटी देण्याच्या सूचना आहेत. जर या सूचनेचा भंग करून कोणत्याही मतदाराला मतदानापासून कोणी वंचित ठेवत असेल तर त्याला कडक शिक्षा करण्याची तरतुद आहे.
इव्हिएम मशिनबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जातात. मात्र आपल्याकडील मशीन या हॅक प्रुफ आहेत, त्यात कोणीही, कसलीही ढवळाढवळ करू शकत नाही. इव्हिएम ऐवजी इव्हीपॅट मशिन बसविल्यास मतदानाचा वेळ, मतमोजणीच्या वेळात वाढ होते, तसेच यासाठी अधिक कर्मचारी, अधिक खर्च येत असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. दीपक म्हैसेकर म्हणाले, 1 जानेवारी 2018ची अंतिम मतदार यादी जाहिर करण्यात आली आहे. तसेच सध्या मतदार यादी अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. 1 जानेवारी 2019 रोजी 18 वर्ष पूर्ण होणाऱ्यांची नावे मतदार यादीत नोंदवून घेण्याचे काम सुरू आहे. ही प्रक्रीया 31 आक्टोबर 2018 पर्यंत सुरू राहणार असून मतदार यादी अधिक निर्दोष करण्याच्या सूचना सर्वांना देण्यात आल्या आहेत.
श्री. चंद्रकांत दळवी म्हणाले, लोकसभा व विधानसभेच्या निवडणूका एकत्र घेण्याबाबत मतांतरे असतीलही मात्र वेळेचा आणि मतदारांच्या सोयीचा विचार करुन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्वच निवडणूका एकाच वेळी होणे आवश्यक आहे. सामान्य घटकही निवडणूक प्रक्रीयेत सामावून घेतला जावा, याकडे सर्वांनी लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी गट क्रमांक एकमध्ये राजेंद्र निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली ‘ओनरशीप ऑफ इलेक्शन बाय पब्लिक/सिव्हिल सोसायटी ऑरगनायझेशन’या विषयावर, गट क्रमांक दोन मध्ये कैलास शिंदे यांच्या नेतृत्चाखाली ‘ युज ऑफ सोशल मिडीया, फेक न्यूज ड्युरींग इलेक्शन’ या विषयावर, गट क्रमांक तीन मध्ये डॉ. अभिजीत चौधरी यांच्या नेतृत्वाखाली ‘इनक्ल्युझिवनेस ऑफ मल्टीफेसीटेड सोसायटी ऑफ इंडीया’ या विषयावर तर गट क्रमांक चार मध्ये ॲड भास्कर आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली ‘स्ट्रॅटर्जीस फॉर कॉम्बेटींग मिस युज ऑफ मनी, मसल पॉवर इन इलेक्शन’ या विषयावर गट चर्चा करण्यात आली. या गट चर्चेत समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर, तज्ज्ञांनी भाग घेतला होता.
*****











सैनिकांच्या प्रत्येक समस्या सोडविणे हे कर्तव्य - पालकमंत्री गिरीश बापट


पुणे दि. 29 - देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी सैनिक नेहमीच कर्तव्यदक्ष असतात. अशा सैनिकांच्या कुटूंबास व सैनिकांना कोणतीही अडचण येणार नाही. अडचण आल्यास ती सोडविणे हे पालकमंत्री म्हणून माझे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले. 
शौर्य दिनानिमत्त जिल्हाधिकारी कार्यलयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, कर्नल सदानंद साळुंखे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर मिलिंद तुंगार, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, आदि उपस्थित होते.
पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले, शौर्यदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात देशाची सेवा करणाऱ्या सैनिकांसमोर मनोगत व्यक्त करणे हे माझे भाग्य आहे. एस.टी.पास, पेन्शन, नौकरी इत्यादी सैनिकांच्या समस्या सोडविण्यासाठी  पालकमंत्री म्हणून कटीबद्ध आहे. शब्दांचे सामर्थ्य  हे कर्तृत्वावर अवलंबून असते. सैनिक हा शब्दच देशासाठी लढणाऱ्या जवानांच्या कर्तृत्वाची ओळख करुन देतो.
जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले, पुणे जिल्हयातील सैनिकांना व त्यांच्या कुटुंबीयांना कुठल्याही पध्दतीची अडचण येणार नाही. महाराष्ट्र राज्य शूर-विरांचे राज्य आहे. म्हणूनच या राज्यातील बहुसंख्य सैनिक देशसेवेसाठी सैन्यात आहेत. यावरुनच खरे देशप्रेम दिसून येते. जिल्हाधिकारी म्हणून प्रत्येक समस्या सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमात वीर माता व वीर पत्नींचा पालकमंत्री महोदयांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमासाठी सैनिक वसतीगृह, न्यू एंजल हायस्कूलचे  विद्यार्थी, विद्यार्थिनी, माजी सैनिक व त्यांचे कुटुंबिय उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
0000








कालवा बाधितांना मदत करणार - पालकमंत्री बापट


पुणे, दिनांक 29- पुणे महानगरपालिका हद्दीतील पर्वती भागातून वाहणारा मुठा उजवा कालवा फुटून नुकसान झालेल्‍या घरांच्‍या पंचनामे जिल्‍हा प्रशासनाकडून पूर्ण झाले असून त्‍यांना खास बाब म्‍हणून मदत देण्‍याबाबतचा 3 कोटी रुपयांचा प्रस्‍ताव तात्‍काळ पाठविण्‍याच्‍या सूचना जिल्‍ह्याचे पालकमंत्री श्री. गिरीश बापट यांनी आज दिल्‍या.
जिल्‍हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम, निवासी उपजिल्‍हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब गलांडे, तहसिलदार गीता दळवी, हेमंत निकम आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. बापट म्‍हणाले, कालवा फुटण्‍याची दुर्घटना ही नैसर्गिक आपत्‍ती म्‍हणून गृहीत धरण्‍याबाबत विनंती करण्‍यात यावी. शासनाच्‍या मदत व पुनर्वसन विभागाच्‍या निर्णयानुसार कालवाबाधितांना नुकसान भरपाई मिळेलच, पण हानीची तीव्रता पहाता खास बाब म्‍हणून 3 कोटी रुपयांच्‍या मदतीची विनंती करणारा प्रस्‍ताव तात्‍काळ पाठवावा. हा प्रस्‍ताव मंजूर होण्‍यासाठी पाठपुरावा करण्‍यात येईल. कालवाबाधित भागातील घरांचे  पंचनामे पूर्ण झालेल्‍या संपूर्ण कुटुंबाची यादी त्‍या भागातील स्‍वस्‍त धान्‍य दुकानदारांकडे देऊन संबंधित कुटुंबांना धान्‍य वाटप करण्‍यात यावे, यावेळी नियंत्रण व देखभालीसाठी जिल्‍हा प्रशासनाचा प्रतिनिधी असावा, असेही ते म्‍हणाले.
मुठा उजवा कालवा फुटून या भागातील घरांमध्‍ये पाणी जाऊन त्यांच्‍या घरातील चीजवस्‍तूंचे नुकसान झाले आहे. हानीची तीव्रता पहाता शासनाकडून भरीव मदतीची गरज असल्‍यामुळे 3 कोटी रुपयांचा प्रस्‍ताव पाठविण्‍यात यावा, असे  पालकमंत्री श्री. बापट यांनी सांगितले.
प्रारंभी जिल्‍हाधिकारी श्री. नवल किशोर राम यांनी घटनेची पार्श्‍वभूमी सांगितली. जिल्‍हा प्रशासनाकडून बाधितांच्‍या घरांच्‍या पंचनाम्‍याची कार्यवाही करण्‍यात आली असून  740 घरांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. त्‍यामध्‍ये सुमारे  90 घरे पूर्णत: बाधित आहेत. पूर्णत: बाधित व अंशत: बाधित घरांच्‍या मदतीचा तसेच खास बाब म्‍हणून 3 कोटी रुपयांच्‍या मदतीचा प्रस्‍ताव शासनाकडे सादर करण्‍यात येईल, असेही जिल्‍हाधिकारी  श्री. नवल किशोर राम यांनी सांगितले.  
0000


पंचवार्षिक निवडणुका हा भक्कम लोकशाहीचा पाया – राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया


पुणे, दि. २९ – स्थानिक नेतृत्व बळकट करून सत्तेचे समसमान वाटप करण्यासाठी भारतामध्ये त्रिस्तरीय लोकशाही पद्धत स्वीकारण्यात आली आहे. भारतीय लोकशाही भक्कम करण्याचे कार्य निवडणुकांमुळे होते. पंचवार्षिक निवडणुका हाच भक्कम लोकशाहीचा पाया आहे, असे प्रतिपादन राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी आज केले.
राज्य निवडणूक आयोग, विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे तसेच पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका यांच्या वतीने आयोजित लोकशाही, निवडणूक व सुशासन या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी राज्य निवडणूक आयुक्त श्री. सहारिया बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, निवृत्त विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी,  जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पुणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज मांढरे, पुणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर, ॲड. भास्करराव आव्हाड आदी उपस्थित होते.
श्री. सहारिया म्हणाले, १९९२ साली ऐतिहासिक घटनादुरूस्ती करण्यात आली त्यानंतर स्थानिक स्वराज संस्थांना लोकशाहीमध्ये महत्त्व प्राप्त झाले आहे. आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या सर्वच निवडणुका पारदर्शीपणे घेण्याचे प्रयत्न निवडणूक आयोग करत आहे. निवडणूक आयोगासमोर सर्व उमेदवार समान असून सर्वांनी आचारसंहितेचे पालन करणे अनिवार्य आहे. उमेदवारांनी चरित्र पडताळणी, प्रतिज्ञापत्र तसेच निवडणुकांच्या खर्चाचा हिशोब देणे बंधनकारक आहे.
लोकशाहीमध्ये राजकीय पक्ष महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे राजकीय पक्षांनी लोकशाहीतील बंधने पाळणे आवश्यक आहे. राज्य निवडणूक आयोगाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे राजकीय पक्षांनी पालन करावे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार केंद्र व राज्य निवडणूक आयोगांना समान अधिकार देण्यात आले आहेत. आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्या राजकीय पक्षांची नोंदणी रद्द करण्याचीही तरतूद आहे.
घटनादुरूस्तीच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त नोव्हेंबर २०१७ पासून निवडणूक आयोगातर्फे नियमितपणे अशा कार्यशाळा आयोजित करण्यात येतात. आजही अनेक जण निवडणूक प्रक्रियेच्या प्रवाहात नाहीत. या सर्वांची मतदार नोंदणी करून मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी निवडणूक आयोग प्रयत्नशील आहे. यात नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घ्यावा. विद्यापीठांनी विद्यार्थ्यांना प्रवेश देतेवेळी त्यांनी मतदार नोंदणी केल्याची खात्री करून घ्यावी, अशी सूचना श्री. सहारिया यांनी दिली.  
आजच्या कार्यशाळेच्या माध्यमातून निघणाऱ्या निष्कर्षांचा लोकशाहीसाठी प्रभावीपणे वापर करण्यात येईल. कार्यशाळेत होणारे विचारमंथन हे चांगल्या समाजासाठी आणि तात्पर्याने चांगल्या व सशक्त लोकशाहीसाठी उपयोगी ठरेल, असा विश्वास श्री. सहारिया यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागीय आयुक्त श्री. म्हैसेकर यांनी केले. कार्यक्रमास पुणे विभागातील वरीष्ठ अधिकारी, प्राध्यापक, विधीज्ञ, विद्यार्थी तसेच सामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
************







Friday, September 28, 2018

जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात आज शौर्य दिनाचे आयोजन


शुक्रवार, दि. 28 :  माजी सैनिकांचा सन्मान करण्यासाठी शौर्य दिनाचे आयोजन शनिवार, दि. 29 सप्टेंबर 2018 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, बहुउद्देशिय सभागृहात करण्यात आले असल्याचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सोलापूर यांनी कळविले आहे.
 शौर्य दिन कार्यक्रमास शहीद सैनिकांच्या वीरपत्नी, वीरमाता, माजी सैनिक, विद्यार्थी व लोकप्रतिनिधी तसचे शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांना उपस्थ‍ित रहाण्याचे आवाहन प्रसिध्दी पत्रकान्वये करण्यात आले आहे.
000

जिल्हा प्रशासन, परिषदेने एकत्रित आराखडा तयार करा विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांच्या टंचाई बाबत सूचना



            सोलापूर, दि. २८- सोलापूर जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात पाऊस पन्नास टक्के पेक्षा कमी झाल्यामुळे जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद यांनी एकत्र येऊन टंचाई कृती आराखडा तयार करावा, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज दिल्या.
            विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विषयांवर आढावा बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या.
            बहुद्देशीय सभागृहात झालेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ राजेंद्र भारूड, उपायुक्त प्रताप जाधव, दीपक नलवडे, अजित पवार, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
            विभागीय आयुक्त डॉ दीपक म्हैसेकर यांनी सांगितले की, पावसाची परिस्थिती पाहता जिल्ह्यात संभाव्य टंचाईला सामोरे जावे लागेल अशी शक्यता आहे. त्यासाठी नव्या मानकानुसार सर्व माहिती गोळा करून ती माहिती आवश्यक त्या स्वरुपात तयार करायला हवी. माहिती गोळा करण्यासाठी महसूल, कृषी विभाग आणि भूजल सर्वेक्षण यंत्रणेच्या अधिकारी यांनी एकमेकांत समन्वय ठेवावा. प्रस्ताव तयार करताना माहितीची सत्यता तपासून पहा.'
            टंचाई बाबतच्या शासन निर्णयानुसार कार्यवाही करावी. त्यामध्ये दिलेल्या निकषांनुसार आराखडा तयार करताना काळजी घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
            जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी जिल्ह्यातील बार्शी वगळता सर्व तालुक्यांत पन्नास टक्के पेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे टंचाई आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे सांगितले.
            बैठकीस अन्न धान्य वितरण अधिकारी श्रीमंत पाटोळे, जिल्हा पुरवठा अधिकारी रामचंद्र उगिले, उपविभागीय अधिकारी ज्योती पाटील, शमा ढोक, शिवाजी जगताप, सचिन ढोले, प्रमोद गायकवाड, मारुती बोरकर, कृषी उपसंचालक रवींद्र माने , तहसीलदार मधुसूदन बर्गे, अमोल कदम, ऋषीकेश शेळके आदी उपस्थित होते.
प्रधानमंत्री आवास योजनेची
कामे तत्काळ सुरू करा
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुलांची कामे तत्काळ सुरू करा. त्यासाठी आवश्यक असणारी प्रशासकीय कामे पूर्ण करावी. कामे १५ आक्टोबरपर्यंत करावीत.

00000







स्मार्ट सिटीचा निधी शासन निकषानुसार ठेवा विभागीय आयुक्त म्हैसेकर यांच्या सूचना


सोलापूर 28 : - स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनकडील निधी शासन निकषानुसार बॅंकेकडे ठेव स्वरुपात ठेवावा, अशा सुचना पुणे विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी दिल्या.
            स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनकडील बैठक येथील शासकीय विश्रामगृहात झाली.  बैठकीस महापौर शोभा बनशेट्टी, उपमहापौर शशीकला बतुल, जिल्हाधिकारी डॉ. राजेद्र भोसले, पोलिस आयुक्त महादेव तांबडे, महापालिका आयुक्त अविनाश ढाकणे, नगरविकास  विभागचे उपसचिव पी. सी. दशमना, महापालिका सभागृह नेते संजय कोळी, विरोधी पक्ष नेते महेश कोठे,  एम.सी. डी. एल.चे स्वतंत्र संचालक चंद्रशेखर पाटील व नरेंद्र काटीकर, कार्पोरेट सल्लागार आनंद गावडे यांच्यासह संबधीत अधिकारी उपस्थित होते.
            डॉ. म्हैसेकर म्हणाले, स्मार्ट सिटीची कामे करणाऱ्या यंत्रणामध्ये समन्वय ठेवून स्मार्ट सिटीत होणारी कामे दर्जेदार व गुणवत्ता पुर्ण व्हावीत. कामे मुदतीत पुर्ण करण्याकडे कटाक्ष असावा. महत्वाची कामे प्राधान्याने सुरु करावीत, असे त्यांनी सांगितले.
            महापालिका आयुक्त ढाकणे, यांनी सोलापूर शहरात स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनमार्फत सुरु असलेल्या कामांची  माहिती दिली. सुरवातीचा काही काळ नियोजन करण्यात गेला, आता या योजनेतील कामे शहरात गतीने सुरु होतील असे त्यांनी सांगितले. या योजनेसाठी  केंद्र सरकार, राज्य शासनकडून निधी प्राप्त होत आहे. यामध्ये महापालिका आपल्या हिश्याचा निधी कामांच्या गतीनुसार देईल. पुढील काही महिन्यात स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनकडील कामे गतीने करून पहिल्या 20 मध्ये येण्याचा प्रयत्न असल्याचे ही त्यांनी सांगितले.
00000
चंद्रभागेवरील घाट बांधणीची
       विभागीय आयुक्तांकडून पाहाणी
सोलापूर दि. 28 :- तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत पंढरपूर येथे चंद्रभागा नदी काठावर सुरु असलेल्या घाट बांधकामाची पाहणी पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी  आज पहाणी केली.
        यावेळी जिल्हधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, उपविभागीय अधिकारी सचिन ढोले, प्रमोद गायकवाड, शमा ढोक-पवार, तहसीलदार मधुसुदन बर्गे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
     तत्पूर्वी विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जाऊन विठ्ठल रुक्मीणीचे दर्शन घेतले. तदनंतर आयुक्त म्हैसेकर यांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती मार्फत भाविकांसाठी सुरु करण्यात येत असलेल्या उपक्रमाची माहिती घेतली. जिल्हधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांच्या हस्ते पुणे विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांचा सत्कार करण्यात आला.

00000





जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी मुठा कालवा बाधित भागातील नागरिकांशी साधला संवाद



पुणे, दि. २८ – येथील पर्वती परिसरातून वाहणारा मुठा उजवा कालवा फुटून गुरूवारी पर्वती पायथा परिसर, दांडेकर पुल व सिंहगड रोड परिसरात पाणी शिरले होते. या भागाची पाहणी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी आज केली व येथील नागरीकांशी संवाद साधला.

 यावेळी त्यांच्यासमवेत महापौर मुक्ता टिळक, पर्वती मतदारसंघाच्या आमदार माधुरी मिसाळ, उपमहापौर सिद्धार्थ धेंडे, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, पुणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर, सहायक आयुक्त गणेश सोनुने, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता एस. डी. चोपडे, मुख्य अभियंता टी. एन. मुंडे, कार्यकारी संचालक खलील अन्सारी, प्रांताधिकारी भाऊसाहेब गलांडे, तहसीलदार गीता दळवी आदी उपस्थित होते.

जलसंपदामंत्री श्री. महाजन हे कालवा फुटलेल्या ठिकाणी दुपारी दोनच्या सुमारास दाखल झाले. त्यांनी कालवा दुरूस्ती कामाचा आढावा घेतला. कालवा बाधित परिसरात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येत असून  पंचनामे पूर्ण झाल्यानंतर तातडीने शासकीय नियमानुसार नुकसानभरपाई देण्यात येईल, असे आश्वासन श्री. महाजन यांनी यावेळी दिले.

कालवा फुटीला कोण जबाबदार आहे, याची चौकशी करण्यासाठी मुख्य अभियंत्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली असून तिच्या अहवालानंतर आवश्यक ती कारवाई केली जाईल, असेही श्री. महाजन यांनी सांगितले.

मुठा उजवा कालवा फुटल्यामुळे पर्वती भागातील सर्व्हे नंबर, १३२, १३३, १३० व सर्व्हे नंब २१४ या भागातील आंबिल ओढ्याच्या तिरावर वसलेल्या  या जुन्या वस्त्या आहेत. या ठिकाणी एकूण १५०० झोपडपट्ट्या असून त्यापैकी ६०० झोपड्या पाण्याच्या प्रवाहाने बाधित झाल्या आहेत. तर ८० ते ९० झोपड्या पूर्णपणे मोडलेल्या आहेत. तसेच दांडेकर पुल भागातील कासम प्लॉट परिसरातील ६० ते ७० झोपड्यांमध्ये पाणी शिरल्यामुळे नुकसान झाले आहे.

या भागात जाऊन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी नुकसानीचा आढावा घेतला. येथील नागरिकांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी स्थानिक नगरसेवक, विविध शासकीय विभागांतील अधिकारी व कर्मचारी तसेच नागरिक उपस्थित होते.

0000




तरुणांच्या मतदार नोंदणीसाठी पुढाकार घ्यावा विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांचे राजकीय पक्षांना आवाहन



सोलापूर, दि. 28- तरुणांच्या मतदार नोंदणीसाठी सर्व राजकीय पक्षांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज येथे केले.
एक जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार याद्यांच्या पुनरीक्षणाचा कार्यक्रम सुरू आहे. त्याबाबत  आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू सभागृहात आज राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी बैठक झाली. त्यावेळी त्यांनी वरील आवाहन केले.
यावेळी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले, उपायुक्त प्रताप जाधव, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे उपस्थित होते.
विभागीय आयुक्त म्हैसेकर यांनी सांगितले की, 'लोकशाही बळकट होण्यासाठी प्रत्येक नागरिकांने मतदान केले पाहिजे. त्यासाठी मतदार यादीत नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी राजकीय पक्षांनी पुढाकार घ्यावा. तसेच  स्वंयसेवी संघटना, सामाजिक संघटना, सहकारी संस्था यांची मदत घ्यावी.’
डॉ. म्हैसेकर म्हणाले, 'मागील वर्षापेक्षा मतदार संख्या कमी आहे. वास्तविक तरुण मतदारांच्या संख्येत वाढ झाली आहे. पण मतदार यादीत त्यांची नोंदणी झालेली नाही. यासाठी राजकीय पक्षांनी आपले बूथनिहाय एजंटची नियुक्ती करावी. हे एजंट यादीत नाव नोंदणी साठी प्रशासनाला सहकार्य करू शकतो.’
तरुण मतदारांच्या नाव नोंदणीसाठी महाविद्यालयात आणि विद्यापीठात विशेष कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. या कार्यक्रमातही राजकीय पक्षांनी योगदान द्यावे. महिलांची मतदार संख्या वाढण्यासाठीही प्रयत्न करायला हवेत, असेही डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी  दुबार मतदारांची नावे वगळण्यासाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे अर्ज भरून द्यावा, असे सांगितले.
बैठकीस शेतकरी कामगार पक्षाचे विठ्ठल शिंदे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे मनीश गडदे, प्रदीप पाटील, शिवसेनेचे प्रताप चव्हाण,  विजय पुकाळे,  भारतीय जनता पक्षाचे दत्तात्रय गणपा, चंद्रशेखर येरनाळे आदी उपस्थित होते.
तहसिलदार हनुमंत कोळेकर यांनी सादरीकरण केले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, उपजिल्हाधिकारी किशोर पवार, उपविभागीय अधिकारी मारुती बोरकर, ज्योती पाटील, प्रमोद गायकवाड, शिवाजी जगताप आदी उपस्थित होते.
000