Monday, October 4, 2021

देशाचे भूषण असलेल्या रयत शिक्षण संस्थेचा इतर संस्थांनी आदर्श घ्यावा - उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत

 देशाचे भूषण असलेल्या रयत शिक्षण संस्थेचा  इतर संस्थांनी आदर्श घ्यावा

- उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत
  सातारा दि.4 (जिमाका) : रयत शिक्षण संस्थेत सर्वसामान्यांची मुले शिकत आहेत. या शिक्षण संस्थेत काळाच्या गरजेनुसार कौशल्यपूर्ण शिक्षण देण्यासोबतच शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मुलांना रोजगारही उपलब्ध करुन दिला जात आहे. ही संस्था देशाचे भूषण असून या संस्थेचा आदर्श देशातील इतर संस्थांनी घ्यावा, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केले.

 यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्युट ऑफ यासन्स येथे रयत शिक्षण संस्थेचा 102 वा वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.  कार्यक्रमास आमदार बाळाराम पाटील, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील, सचिव डॉ. विठ्ठल शिवणकर, रामशेठ ठाकूर आदी उपस्थित होते.

           यावेळी बोलताना श्री. सामंत म्हणाले, पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांचे शिक्षण क्षेत्रातील काम अमुल्य असे आहे. या संस्थेत साडेचार लाखहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.  संस्थेचे काम आदर्शवत असून संस्थेसाठी शासनाकडून सर्व सहकार्य करण्यात येईल
.
         देशातील विद्यार्थी बाहेरील देशातील विद्यापीठ पाहण्यासाठी, तेथे शिक्षण घेण्यासाठी जातात. भविष्यात रयत शिक्षण संस्था पाहण्यासाठी बाहेरील विद्यार्थी इथे येतील,  तसेच मुंबई, पुणे येथील विद्यार्थी रयत शिक्षण संस्थेत शिक्षणासाठी येतील असा विश्वासही श्री. सामंत यांनी व्यक्त केला.
        यावेळी डॉ. पाटील म्हणाले, रयत शिक्षण संस्थेचा वर्धापनदिन समाजाने दिलेल्या योगदानाचे कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जात आहे. रयत शिक्षण संस्थेच्या जडण-घडणीत प्रबोधनकार ठाकरे यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. संस्थेकडून काळाच्या गरजेनुसार मुलांना शिक्षण देत असल्याचे त्यांनी सांगितले.

   
श्री. सामंत यांच्या हस्ते रयत विज्ञान पत्रिकेचे प्रकाशन व ई-रयत ॲपचा शुभारंभ करण्यात आला.
00000


वाई सुधारित पाणी पुरवठा योजनेसाठी ३५ कोटी-उपमुख्यमंत्री अजित पवार वाई नगर परिषदेच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन

 सातारा दि.4 (जिमाका) :वाई शहरासाठी सुधारित पाणी पुरवठा योजनेसाठी प्रस्ताव सादर करावा, त्यासाठी ३५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात येईल,असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  केले.

वाई येथे आयोजित विविध विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर, सहकार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, जि. प.अध्यक्ष उदय कबुले, आमदार शशिकांत शिंदे, दीपक चव्हाण, मकरंद पाटील,  नगराध्यक्ष अनिल सावंत, जि.प. उपाध्यक्ष प्रदीप विधाते आदी उपस्थित होते.

श्री.पवार म्हणाले, वाई शहराचा विस्तार लक्षात घेता आवश्यक सुविधांची निर्मिती करण्यासाठी शासनाकडून सहकार्य करण्यात येईल. वाई, महाबळेश्वर, खंडाळा, लोणंद, पाचगणीतील विविध सुविधासाठी १० कोटी रुपये देण्यात येतील. वाई शहरातील भूमिगत गटार योजनेबाबत लवकरच बैठक घेण्यात येईल. कृष्णा घाट विकास आणि नदी सुधार योजनेचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात येईल. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या समवेत होणाऱ्या बैठकीत सुरुर-पोलादपूर राज्य महामार्गाचा राष्ट्रीय महामार्ग म्हणून समावे करण्याबाबत विनंती करण्यात येईल.

ते म्हणाले, शहरांचा विकास करताना ती स्वछ आणि नीटनेटकी असायला हवी. शहरातील सांडपाणी व्यवस्थापन चांगल्यारितीने होणे गरजेचे आहे. यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी आग्रही भूमिका घ्यावी. नव्याने उभारण्यात येणाऱ्या शाळेच्या इमारतीमधून दर्जेदार शिक्षण देण्यात यावे. पुलाचे काम देखणे आणि दर्जेदार  व्हावे. भविष्यातील वाहतुकीची गरज लक्षात घेऊन डिसेंबर पर्यंत चार पदरी पुलाचा प्रस्ताव सादर करावा, येत्या अंदाजपत्रकात त्यासाठी मान्यता देण्यात येईल, असे श्री.पवार म्हणाले.

नगर परिषदेचे व्यापारी संकुल शहराच्या वैभवात भर घालणारे आणि नागरिकांना सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध जर  देणारे ठरावे असेही त्यांनी सांगितले.

कोविड योद्ध्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करताना उपमुख्यमंत्री म्हणाले, मानव जातीवर कोविडचे संकट आले असताना नागरिकांचा जीव वाचविण्याला या योद्ध्यांनी प्राधान्य दिले. त्यांनी खऱ्या अर्थाने मानवसेवेचे कार्य केले. आमदार मकरंद पाटील यांच्यासारख्यांचा सन्मान केल्याने  काम करणाऱ्याला प्रेरणा मिळते, असे त्यांनी सांगितले. वाई परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नागरिकांचे पुनर्वसन करण्यास कुठलीही कमतरता भासू देणार नाही असेही श्री.पवार म्हणाले.

श्री.रामराजे नाईक निंबाळकर यांनी आमदार मकरंद पाटील यांनी कोरोना काळात सेवा भावनेने कार्य केले असे सांगितले. कृष्णा नदीवरील पुलामुळे वाईसाठी चांगली सुविधा होईल. पर्यावरण रक्षणासाठी वृक्षारोपणावर भर देणे अवश्यक आहे, असेही ते म्हणाले.

        पालकमंत्री पाटील म्हणाले, बाहेरील जिल्ह्यातील नागरिक वाई येथे येतात. ही सांस्कृतिक नगरी असल्याने पुलाचे बांधकाम करताना त्याचे जुने सौंदर्य कायम ठेवण्यात येत आहे. मुलांसाठी शाळेच्या चांगल्या इमारती उभ्या राहणार आहेत. कोविड काळात आरोग्य सुविधांना प्राधान्य देण्यात आल्याने विकासासाठी निधीची कमतरता भासत होती. मात्र आता जिल्हा नियोजन समिती आणि शासनाच्या माध्यमातून विकासाला वेग देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार मकरंद पाटील यांच्या कार्याचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला.

0000





उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोविड आढावा बैठक संपन्न, महिलांसाठी चांगल्या आरोग्य सुविधा निर्माण करण्याचे निर्देश

 सातारा दि.४ (जिमाका) : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  शासकीय विश्रामगृह येथे आयोजित बैठकीत जिल्ह्यातील कोविड परिस्थिती, विकासकामे आणि अतिवृष्टीबाबत आढावा घेतला.

                यावेळी आमदार मकरंद पाटील, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे आदी उपस्थित होते.

                जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या कोविड प्रतिबंधक उपाययोजनांची माहिती घेऊन श्री. पवार म्हणाले, कोविडसाठी निर्माण करण्यात आलेल्या आरोग्य सुविधा पुढील काळासाठी उपयुक्त ठरणार आहेत. ऑक्सिजन प्रकल्पासारख्या सुविधांच्या देखभालीकडे विशेष लक्ष द्यावे. त्यासाठी कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात यावे.  आरोग्य विभागासाठी अधिकचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालयामुळे चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत. महिलांसाठी स्वतंत्र आणि चांगल्या दर्जाच्या सुविधा निर्माण कराव्यात.

                राज्यात काही ठिकाणी डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढतो आहे.  जिल्ह्यात प्रादुर्भाव वाढू नये यासाठी शहरी व ग्रामीण भागात फवारणीची मोहिम हाती घ्यावी. राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेल्या १०० बेड्सच्या रुग्णालयासाठी जागा उपलब्ध करून द्यावी.  कोविड चाचण्या कमी होणार नाहीत याची दक्षता घ्यावी, असे त्यांनी सांगितले.

                जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सदरणीकरणाद्वारे जिल्ह्यातील कोविड परिस्थितीची माहिती दिली.  जिल्ह्यातील पॉझिटिव्हीटी दर कमी होत असून तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता आवश्यक पूर्वतयारी करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

 

*जिल्ह्यातील अतिवृष्टीबाबत आढावा*

                उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी जिल्ह्यात जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीत झालेले नुकसान आणि देण्यात आलेल्या मदतीची माहिती घेतली. पीक नुकसानीबाबत शेतकऱ्यांना लवकर मदत मिळावी यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. पुरात बेपत्ता झालेल्या ३ व्यक्तींच्या कुटुंबियांना शासनाची मदत मिळावी यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, आपणही त्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करू असे त्यांनी संगितले. शेतजमिनीचे नुकसान होणाऱ्या भागात पुराच्या पाण्यामुळे यापुढे अधिक नुकसान होऊ नये म्हणून मनरेगाच्या माध्यमातून कामे घेण्याबाबत अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात येईल. पुरापासून रक्षण करण्यासाठी गावाचे पुनर्वसन करावयाचे असल्यास त्यासाठी जागा निश्चित करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

                श्री.पवार यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या रस्त्यांच्या नुकसानाची आणि प्रकल्पातील पाणीसाठ्याची माहिती घेतली.

                बैठकीस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी राधाकिशन पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गुरुदत्त काळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सं.गो.मुंगीलवार, कार्यकारी अभियंता शंकर दराडे,  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी  देविदास ताम्हाणे उपस्थित होते.

                                                                                                                00000