Monday, January 16, 2023

'जी-२०'राष्ट्रांच्या अतिथी प्रतिनिधींच्या हस्ते वृक्षारोपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ढोल ताशांच्या गजरात पारंपरिक स्वागत




                  


पुणे दि.१६-  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानामध्ये जी-२० राष्ट्रांच्या परिषदेच्या निमित्ताने पुण्यात आलेल्या विविध देशांच्या प्रतिनिधींच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. 


यावेळी केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या आर्थिक घडामोडी या विभागाचे संयुक्त सचिव सॉलोमन अरोकिराज, विभागीय आयुक्त सौरभ राव, कुलगुरू डॉ. कारभारी काळे, महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, उपायुक्त श्रीमती वर्षा लढ्ढा आदी उपस्थित होते.  


'जी-२०' राष्ट्रांच्या प्रतिनिधींच्या 'इन्फ्रास्ट्रक्चर वर्किंग ग्रुप'ची दोन दिवसीय बैठक पुणे येथे आयोजित करण्यात आली आहे. याचाच एक भाग म्हणून विद्यापीठ परिसरात चर्चासत्राच्या निमित्ताने विविध राष्ट्रांचे प्रतिनिधी आले असता सुरुवातीला त्यांच्या हस्ते, विद्यापीठात वृक्षारोपण करण्यात आले. यामध्ये  कडुनिंब, सोनचाफा, ताम्हण, बकुळ, सप्तपर्णी, मुचकुंद आदी वृक्षांचा समावेश आहे. वृक्षारोपण प्रसंगी काही राष्ट्रांच्या प्रतिनिधींनी वृक्षांची माहिती औत्सुक्याने जाणून घेतली.      

             

अतिथी प्रतिनिधींचे मराठमोळ्या पारंपरिक पद्धतीने स्वागत 


विद्यापीठामध्ये वृक्षारोपणाच्या कार्यक्रमानंतर अतिथी प्रतिनिधींचे चर्चासत्राच्या मुख्य कार्यक्रमासाठी मुख्य इमारत परिसरात आगमन होताच मराठमोळे ढोल- ताशे, तुतारी, लेझीम वाद्याच्या गजरात जोरदार स्वागत करण्यात आले. या सुंदर अशा स्वागताने अतिथी भारावून गेले. त्यांनी उपस्थित सर्व कलाकारांचे अभिनंदन केले व काही कलाकारांशी मनमोकळा संवाद साधला. याप्रसंगी कलाकारांचा उत्साह ओसंडून वाहत होता. काही प्रतिनिधींनी जागीच फेटा बांधून घेतला व अवघ्या काही क्षणात फेटा बांधणाऱ्यांचेही कौतुक केले. काहींनी आपल्या मोबाईलमध्येही महाराष्ट्राची सांस्कृतिक छबी उत्साहाने टिपली.

000

भारतीय उत्पादने आणि परदेशी पाहुण्यांचे मराठमोळे स्वागत



 




पुणे, दि. १६: जी-२० परिषदेच्या निमित्ताने हॉटेल जे. डब्ल्यु. मेरीयट येथे आयोजित बैठकीच्या निमित्ताने उभारण्यात आलेल्या प्रदर्शनातील स्टॉल्सना परदेशी पाहुण्यांनी आवर्जून भेट दिली. या भेटीच्यावेळी आलेल्या प्रतिनिधींनी भारतीय पारंपरिक उत्पादने आणि महाराष्ट्राच्या पर्यंटनस्थळात रुची दाखवली.


महाराष्ट्र पर्यटन महामंडळ, खादी ग्रामोद्योग, तृणधान्य विषयक, बांबू उत्पादने, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, केंद्र शासनाचे आदिवासी सहकारी पणन विकास महासंघ, पुणे महानगर पालिकेच्या मुळा, मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्प आदी प्रदर्शन दालनांना कुतूहलाने परदेशी पाहुण्यांनी भेट दिली. बांबू उत्पादने आणि हस्तकलेच्या वस्तूंमध्ये रुची दाखवून आस्थेने माहिती घेतली. तृणधान्य पासून बनवलेली उत्पादने आरोग्यदायी असून ही उत्पादने आमच्या देशात उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करा असे स्टॉल धारकांना जी-२० सदस्य राष्ट्रांच्या प्रतिनिधींनी सांगितले.

 

'जी - २०' मधील ऑस्ट्रेलियन शिष्टमंडळाच्या प्रतिनिधींनी बाजरी तृणधान्यापासून बनवलेल्या चिप्सची चव घेऊन वाहवा केली. 'नमस्ते महाराष्ट्र' म्हणत यावेळी पाहुण्यांचे पुणेरी आतिथ्य आणि मराठमोळे स्वागत करण्यात आले. 


000

मुलांनी खेळाकडे करियर म्हणून पहावे - उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

 




सातारा दि. १६ - केंद्र व राज्य शासनाने खेळांना महत्त्व दिले असून विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते. त्याचे परिणाम जागतिक स्पर्धांमध्ये दिसत आहेत. जागतिक स्तरावर पदक मिळवणाऱ्या खेळाडूला राज्य शासन नोकरी देत आहे. तरी मुला मुलींनी खेळाकडे खेळ न पाहता करियर म्हणून पहावे, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
   तंत्रशिक्षण पुणे विभागीय क्रीडा स्पर्धांचे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय क्रीडांगण, कराड येथे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांचे उद्घाटन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी तंत्रशिक्षण विभागीय कार्यालयाची सहसंचालक दत्तात्रेय जाधव यांच्यासह शासकीय तंत्र महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
     खेळामुळे मानसिक, बौद्धिक, शारीरिक वाढ होण्यास मदत होते असे सांगून उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. पाटील म्हणाले, कोविड मुळे विस्कळीत झालेले जनजीवन सुरळीत करण्याचे काम सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणुन आज तंत्रशिक्षण विभागाच्या क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. देशातील तंत्रशिक्षण विभाग विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे कौशल्य शिक्षण देत आहे. यातून नवनवीन संशोधक निर्माण होत आहेत. याचा लाभ देशाच्या आर्थिक सुधारणेला होत आहे.
        खेळाडू सतत सराव करीत असतात, त्यामुळे त्यांना १० वी व १२ वी मध्ये ग्रेस गुण दिली जातात. कुस्तीचा सराव करणारे मल्ल व स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या मल्लांच्या मानधनात वाढ करण्यात येणार आहे. तसेच मल्लांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ ही देण्यात येणार आहे.
    तंत्रशिक्षण विभाग चांगले संशोधक निर्माण करत आहे. या विभागातील अडचणी बाबत लवकरच चर्चा करून सोडवल्या जातील. तंत्रशिक्षण विभागाच्या आयोजित करण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धा चांगल्या वातावरणात पार पाडा असेही उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री पाटील यांनी शेवटी सांगितले.
    यावेळी उत्कृष्ठ काम करणाऱ्या प्रचऱ्यांचा सत्कारही करण्यात आला.
०००००

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जी-२० बैठकस्थळी प्रदर्शनाला भेट




पुणे दि.१६: केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी जी-२० बैठकस्थळी प्रदर्शन दालनांना भेट दिली. त्यांनी विविध दालनात प्रदर्शित विषयांची माहिती घेतली.
'जागतिक भरड धान्य वर्ष- २०२३' च्या निमित्ताने अधिक पौष्टिक तत्वे असलेले बाजरी, ज्वारी, नाचणी आदी भरड धान्यांचे महत्व जागतिक स्तरावर वाढेल यासाठी शासन प्रयत्न करत आहे. त्याअनुषंगाने जी-२० बैठक स्थळीदेखील भरड धान्याचे महत्व सांगणारी माहिती प्रदर्शित करण्यात आली आहे. भरड धान्य आणि त्यापासून बनवलेल्या प्रक्रिया पदार्थांची श्री.राणे यांनी विशेष माहिती घेतली.
महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाने राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी आखलेल्या पर्यटन उपक्रम, सहलींचे पॅकेजेस आदीविषयी सादरीकरणदेखील त्यांनी पाहिले.
यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आदी उपस्थित होते.
000

Monday, January 2, 2023

महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा २०२२-२३ उदयोन्मुख खेळाडूंना चांगल्या कामगिरीसाठी प्रेरणा देण्याचा प्रयत्न-विभागीय आयुक्त सौरभ राव

 




पुणे दि.१: राज्यातील प्रतिभासंपन्न खेळाडूंचे क्रीडा कौशल्य पाहून राज्यातील उदयोन्मुख खेळाडूंना अधिक चांगली कामगिरी करण्यासाठी प्रेरणा मिळावी यासाठी श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी-म्हाळुंगे येथे २ ते १२ जानेवारी दरम्यान महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा २०२२-२३ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेचे औपचारिक उदघाटन ५ जानेवारी रोजी होणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
विधानभवन सभागृह पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी क्रीडा आयुक्त सुहास दिवसे, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे सचिव नामदेव शिरगावकर, क्रीडा सहसंचालक चंद्रकांत कांबळे, उपसंचालक संजय सबनीस आदी उपस्थित होते.
श्री. राव म्हणाले, स्पर्धेच्या निमित्ताने राज्यातील खेळाडूंना अधिकाधिक स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल आणि खेळाडूंमधील क्रीडा कौशल्य वाढीस लागण्यास मदत होईल. महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने या क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. स्पर्धेचे आयोजन राज्यातील ८ जिल्ह्यांमध्ये करण्यात येत असून या स्पर्धेमध्ये ३९ क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. राज्यातील १० हजार ४५६ खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक , व्यवस्थापक या स्पर्धेत सहभागी होत आहेत.
स्पर्धेकरीता १८ वर्षांवरील वयोगटातील खेळाडू सहभागी होणार आहेत. प्रत्येक क्रीडा प्रकाराच्या एकविध क्रीडा संघटनेमार्फत त्या-त्या क्रीडा प्रकारातील राज्यातील सर्वोत्कृष्ट आठ संघांची व खेळाडूंची निवड करण्यात आलेली असून हे निवडक आठ जिल्ह्यांचे संघ महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
स्पर्धेचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ५ जानेवारी रोजी शिवछत्रपती क्रीडा संकुल पुणे येथे संपन्न होणार असून या समारंभास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, क्रीडामंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्र ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेकरीता क्रीडा ज्योत तयार करण्यात आली आहे. मुख्य क्रीडा ज्योत ही रायगड येथून प्रज्वलित केली जाईल. राज्याच्या क्रीडा विभागांतर्गत एकूण आठ विभाग आहेत. प्रत्येक विभागीय मुख्यालयाचे ठिकाणापासून क्रीडा ज्योत पुणे येथे आणली जाणार आहे. या सर्व ज्योतींचे एकत्रिकरण करून ही क्रीडा ज्योत मिरवणूकीने पुणे शहरातून शिवछत्रपती क्रीडा संकुलात आणली जाईल व स्पर्धेच्या उद्घाटनाचे वेळी मुख्य कार्यक्रमस्थळी असलेली ज्योत प्रज्वलित केली जाईल. याकरीता आवश्यक ते नियोजन करण्यात आलेले आहे.
सदर स्पर्धेची पूर्वतयारी आता अंतिम टप्प्यात आलेली असून सर्व स्पर्धास्थळे स्पर्धा आयोजनाकरीता सज्ज झालेली आहेत. शासनाचा क्रीडा विभाग आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या नेतृत्वाखाली राज्यातील ३९ क्रीडा प्रकारांच्या क्रीडा संघटना अहोरात्र मेहनत करून ही स्पर्धा यशस्वी करण्याकरीता झटत आहेत. खेळाडूंची निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था, क्रीडांगणे, खेळाडूंची स्पर्धेकरीता वाहतूक, स्वयंसेवक, पदके आदी बाबी सर्वोत्कृष्ट स्वरूपाच्या होतील याकरीता प्रत्येक बाबीकडे जातीने लक्ष पुरविले जाते आहे.
महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदके दिली जाणार आहेत. या स्पर्धेत सर्वाधिक पदकांची कमाई करणाऱ्या जिल्ह्यास सर्वसाधारण विजेतेपदाचा बहुमान व ट्रॉफी दिली जाणार आहे. या स्पर्धा आयोजनास राज्य शासनाने मान्यता प्रदान केली असून १९ कोटी रुपये इतकी तरतूद देखील उपलब्ध करून दिलेली आहे. त्याचप्रमाणे, या स्पर्धेकरीता कोणत्याही परिस्थितीत निधी कमी पडू दिला जाणार नाही याची ग्वाही शासनाने दिलेली असून राज्यातील खेळाडूंना त्यांची सर्वोत्कृष्ट कामगिरी दाखविण्याकरीता आवाहन केले आहे.
या स्पर्धा आयोजनाच्या माध्यमातून राज्यातील खेळाडूंना त्यांचे क्रीडा कौशल्य प्रदर्शित करण्याकरीता हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होईल. स्पर्धेच्या माध्यमातून राज्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंचा डाटाबेस तयार करण्यात येईल व भविष्यात या खेळाडूंच्या कामगिरीचे ट्रॅक रेकॉर्ड ठेवता येईल, असेही श्री. राव यांनी सांगितले.
श्री.दिवसे म्हणाले, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. अशा खेळाडूंच्या गुणवत्तेला स्पर्धेद्वारे चांगली संधी मिळेल. खेळाडूंची माहिती सॉफ्टवेअरद्वारे संकलित करण्यात येणार आहे. भविष्यात क्रीडा विकासाचे उपक्रम राबविताना याचा उपयोग होऊ शकेल.
श्री.शिरगावकर म्हणाले, ही स्पर्धा राज्याच्या क्रीडा क्षेत्रासाठी नवी पहाट ठरणार आहे. स्पर्धेच्या निमित्ताने राज्यात क्रीडा विकासाला पोषक वातावरणाची निर्मिती होईल. महाराष्ट्र ऑलिम्पिक देशातील सर्वात मोठी राज्यस्तरीय स्पर्धा असल्याची माहिती त्यांनी दिली.
यावेळी महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना देण्यात येणाऱ्या पदकांचे अनावरण करण्यात आले.
0000