Friday, September 29, 2017

मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण मोहिमेचा लाभ घ्यावा -मोनिका सिंह


        पुणे, दि. 29 : निवडणूक आयोगातर्फे 1 जानेवारी 2017 या अर्हता दिनांकावर आधारित  मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण  कार्यक्रम 3 ऑक्टोबर 2017 ते 3 नोव्हेंबर 2017 या कालावधीत  राबविण्यात येणार आहे. या मोहिमेचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन उप जिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह यांनी केले.
        छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमा निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या सभे दरम्यान त्या बोलत होत्या. मोनिका सिंह म्हणाल्या, दिनांक 3 ऑक्टोबर 2017 (मंगळवार) रोजी प्रारुप मतदार याद्यांची प्रसिध्दी करण्यात येईल.  3 ऑक्टोबर 2017 (मंगळवार)  ते 3 नोव्हेंबर 2017 (शुक्रवार) या कालावधीत दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहेत. 7 ऑक्टोबर 2017 (शनिवार) व  13  ऑक्टोबर 2017 (शुक्रवार) या कालावधीत मतदार यादीमधील संबंधित भागाचे (सेक्शनचे) ग्रामसभा तसेच स्थानिक संस्था येथे वाचन व आरडब्ल्यूए सोबत बैठक इत्यादी नावांची खातरजमा करण्यात येईल. 8 ऑक्टोबर 2017 (रविवार) व 22 ऑक्टोबर (रविवार) विशेष मोहिमेचे 5 डिसेंबर 2017 (मंगळवार) पर्यंत दावे व हरकती निकालात काढणे. 20 डिसेंबर 2017 (बुधवार) पर्यंत डाटाबेसचे अद्ययावतीकरण तर 5 जानेवारी 2018 (शुक्रवार) रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे.
            या मोहिमेदरम्यान मतदारांना मतदार यादीत नाव आहे का याची खात्री करता येणार आहे. 1 जानेवारी 2018 रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण करणाऱ्यांना, तसेच ज्यांची नावे मतदार यादीत नाहीत त्यांना नाव नोंदविण्याची संधी या मोहिमेद्वारे मिळणार आहे. तसेच पत्त्यातील दुरुस्ती, दुबार, मृत किंवा स्थलांतरित मतदारांची नावे या मोहिमेत वगळता येणार आहे. महाविद्यालयातील ज्या विद्यार्थ्यांचे वय 18 वर्षे पूर्ण असेल, अशा विद्यार्थ्यांना अर्ज नमुना 6 त्यांच्या महाविद्यालयात भरुन सादर करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे, असेही श्रीमती सिंह यांनी सांगितले.
             मतदार नोंदणीसाठी सर्व मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, महानगरपालिका क्षेत्रातील सर्व क्षेत्रिय कार्यालये, सर्व गटविकास अधिकारी, सर्व नगरपालिका कार्यालये तसेच जिल्हाधिकारी कार्यालय (निवडणूक शाखा), पुणे येथे संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
00000000


जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर झाला चकाचक


सोलापूर दि. 29– जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर आज एकदम चकाचक झाला. स्वच्छता हीच सेवा या अभियानात आज जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्यासह महसूल, जिल्हा परिषद, सहकार, वस्त्रोद्योग, कृषी, पोलीस आणि जिल्हा माहिती कार्यालय अशा सर्वच विभागातील अधिकारी – कर्मचारी सहभागी झाले होते.
सकाळी साडेआठच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात स्वच्छता मोहिमेस प्रारंभ झाला. यावेळी महापालिका आयुक्त अविनाश ढाकणे, निवासी उपजिल्हाधिकारी अजित रेळेकर, उपजिल्हाधिकारी श्रीमंत पाटोळे, तहसिलदार उज्वला सोरटे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. सर्व अधिकारी – कर्मचारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, मध्यवर्ती इमारत, जिल्हा कोषागार कार्यालय, उत्तर सोलापूर तहसिल कार्यालय परिसर स्वच्छ केला.
                                                                        0000




Thursday, September 28, 2017

मुद्रा योजनेचा लाभ घेऊन उद्योजक, व्यावसायिक बना भावसारयांचेआवाहन : मुद्रालाभार्थ्यांना कर्ज मंजूरी पत्र वितरण


सोलापूर दि. 28 :-  प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा लाभ घ्या आणि उद्योजक, व्यावसायिक व्हा, असे आवाहन बँक ऑफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक शशिकांत भावसार यांनी येथे केले.
         प्रधानमंत्री मुद्रा योजना आणि स्टँण्ड अप इंडिया योजनांचा प्रचार आणि      लाभार्थ्यांना कर्ज मंजूरी पत्र वाटप असा कार्यक्रम बँक ऑफ इंडियातर्फे आयोजित करण्यात आला होता. येथील निर्मलकुमार फडकुले सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात श्री. भावसार बोलत होते. यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक बी.टी. यशवंते, बँक ऑफ इंडियाचे विभागीय उपव्यवस्थापक सोमशेखर, अग्रणी बँक व्यवस्थापक सुरेश श्रीराम, जिल्हा माहिती अधिकारी रवींद्र राऊत उपस्थित होते.
       श्री. भावसार म्हणाले, देशातील उद्योगाला चालना मिळावी, जास्तीत जास्त उद्योजक घडावेत यासाठी ही योजना सुरु करण्यात आली. या योजनेचा लाभ घेऊन अनेक उद्योजक घडले. यामुळे बेरोजगारी कमी होईल. त्यामूळे उद्योग करण्यास उत्सुक असणा-या तरुणतरुणींनी या योजनेचा लाभ घ्यावा.
       श्री. यशवंते म्हणाले, मुद्रा योजनेतून अनेक उद्योजक घडत आहेत. राज्य शासनाच्या अनेक योजना बँकामार्फत राबवल्या जातात. बँकाकडे प्रकरण सादर करताना उत्तमरित्या प्रकल्प अहवाल सादर करावा. जो उद्योग करायचा त्याचा व्यवस्थित अभ्यास करावा. उद्येाग सुरु करण्यापूर्वी आवश्यक ते प्रशिक्षण घ्यावे.
      यावेळी सुमारे अठरा लाभार्थ्यांना मुद्रा आणि स्टँड अप इंडिया योजनेतून मंजूर झालेल्या कर्जाचे मंजूरी पत्राचे वाटप करण्यात आले. आरसेटीचे व्यवस्थापक अशोक कणगी यांनी आरसेटी मार्फत चालवल्या जाणा-या प्रशिक्षण शिबीराबाबत माहिती दिली.
                                                                        0000

वाहतुक व्यवस्थेत बदल


 पुणे दि, 28 पुणे शहरातील वाहतूक सुरळीत व सुरक्षितपणे चालण्यासाठी येरवडा वाहतूक विभाग अंतर्गत, सोमनाथनगर रोडवर सोमनाथनगर चौक ते ट्रॉयन प्रॉपर्टीज सीमा भिंतीपर्यंत रोडच्या पश्चिम बाजूस सुमारे 250 मीटर अंतरापर्यंत नो-पार्किंग करण्यात आली आहे. इव्हॉन आयटी पार्क रोडवर इव्हॉन आयटी पार्क मुख्य प्रवेशद्वार ते इव्हॉन आय टी पार्क साऊथ ईस्ट गेट या सुमारे 250 मीटर अंतराच्या रोडच्या दोन्ही बाजूस नो-पार्किंग करण्यात आली आहे. इव्हॉन आय टी पार्क साऊथ ईस्ट गेट ते फाऊंटन रोड या सुमारे 100 मीटर अंतराच्या रोडच्या दोन्ही बाजूस नो-पार्किंग करण्यात आली आहे. पुणे-नगर रोडवर वडगावशेरी चौक ते दीप अपार्टमेंट बिल्डींगदरम्यान सुमारे 300 मीटर नो-पार्किंग करण्यात आली आहे. जेएनयूआरएम रोडवर जेलरोड ते जात पडताळणी कार्यालयापर्यंतच्या रोडच्या दोन्ही बाजूला नो-पार्किंग करण्यात आली आहे.

पार्किंग र्निबंधाबाबत सूचना मागविल्या



पुणेदि28 पुणे शहरातील वाहतूक सुरळीत व सुरक्षितपणे चालण्यासाठी येरवडा वाहतूक विभाग पुणे अंतर्गत पोस्ट ऑफिस चौक जंक्शन ते कॉमर्स झोन चौक जंक्शन या सुमारे 800 मीटर लांबीच्या रोडच्या दोन्ही बाजुस व कॉमर्स झोन चौक जंक्शन ते मेंटल हॉस्पीटल कॉर्नर जंक्शन या सुमारे 800 मीटर लांबीच्या रोडच्या दोन्ही बाजुस नो-पार्किंग करण्यात येत आहे.  या वाहतूकीच्या बदला बाबत नागरिकांनी आपल्या सूचना 7 ऑक्टोबर 2017 पर्यंत पोलीस उप-आयुक्तवाहतूक नियंत्रण शाखासाधु वासवानी रोडपुणे - 1 येथे लेखी स्वरूपात कळवाव्यात.
कोथरुड वाहतूक विभाग पुणे अंतर्गत कर्वे रोडवरील हॉटेल कोकण एक्सप्रेस चौक ते जितेंद्र अभिषेकी उद्यान टी जंक्शन पर्यंतच्या रोडवर सुरवातीस 20 मीटर रस्त्याचे दुतर्फा नो-पार्किंग व त्यापुढे दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी पी-1, पी-2 करण्यात येत  आहे. तसेच भागीरथी टॉवर ए बिल्डींगचे कॉर्नरला 15 मीटर रस्त्याचे दुतर्फा नो-पार्किंग व त्यापुढे दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी पी-1, पी-2 करण्यात येत आहे. हडपसर वाहतूक विभाग पुणे अंतर्गत जहागीरनगरकडून मगरपट्टा रोडकडे मुंढवा रेल्वे उड्डाण पुलाकडे  येणारी वाहतूक एकेरी होवून मगरपट्टा रोडकडून जहागीर, बी.जे.शिर्के कंपनीकडे जाणाऱ्या वाहतुकीस जहागीरनगर कॉर्नर पर्यंत बंद करण्यात येत आहे. या वाहतूकीच्या बदला बाबत नागरिकांनी आपल्या सूचना 11 ऑक्टोबर 2017 पर्यंत पोलीस उप-आयुक्तवाहतूक नियंत्रण शाखासाधु वासवानी रोडपुणे - 1 येथे लेखी स्वरूपात कळवाव्यात, असे पुणे शहर वाहतुक विभागाचे पोलीस उपायुक्त अशोक मोराळे  यांनी  प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
000000

महिला व बाल विकास क्षेत्रात कार्य करणाऱ्यांना नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करुन घेण्याचे आवाहन


           पुणे, दि. 28 : केंद्र शासनाने 1 जानेवारी, 2016 पासुन बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आदर्श नियमावली सप्टेंबर 2016 पासून देशभरात लागू केली आहे. या कायद्याच्या कलम 41(1) अंतर्गत बालकांसाठी कार्यरत आणि इच्छुक असणाऱ्या सर्व अनुदानित, विना अनुदानित, शासकीय, अशासकीय, स्वयंसेवी संस्था यांनी शासनाकडून नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करुन घेणे आवश्यक आहे.
     नोंदणी प्रमाणपत्राशिवाय ज्या संस्था बालकांची काळजी व संरक्षणासाठी कार्यरत राहतील, अशा अवैध संस्थांवर या कायद्याच्या कलम 42 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. या कलमाअंतर्गत कमाल 1 वर्षापर्यंत तुरुंगवास व रु 1 लाखापर्यंत दंड अथवा दोन्हीची तरतुद करण्यात आली आहे.
     बालकांच्या काळजी व संरक्षणाकरिता कार्यरत असणाऱ्या सर्व संस्थांनी बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 मधील कलम 41  अनुसार नोंदणी प्रमाणपत्राचे प्रस्ताव आदर्श नियमावलीच्या परिशिष्ठ 27 मध्ये दिलेल्या विहित नमुन्यामध्ये अर्ज भरुन आवश्यक त्या कागदपत्रासह जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, 103, शिवाजीनगर, चुनावाला चेंबर्स, जुना तोफखाना, पुणे-05 या पत्त्यावर 30 सप्टेंबर 2017 पर्यंत सादर करावेत. अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, पुणे यांच्या दुरध्वनी क्र. 020-25536871 संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, पुणे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.
000000

Friday, September 22, 2017

लोकसहभागामुळेच सोलापूर स्मार्ट सिटी होईल सहकारमंत्री देशमुख : स्मार्ट सिटीतील कामांचे भूमिपूजन, लोकार्पण




  सोलापूर दि. 22 :-  सोलापूर शहर स्मार्ट सिटी होण्यासाठी लोकसहभाग अतिशय महत्वाच्या असून लोकांच्या सक्रीय सहभागामुळेच सोलापूर स्मार्ट सिटीला मूर्त स्वरुप येईल, असे प्रतिपादन सहकार, पणन  आणि वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी आज येथे केले.
सोलापूर स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत स्मार्ट रस्ता करण्याचा कामाचे भूमीपूजन आणि स्मार्ट इन्पुर्मेटीव्ह किऑस्क, ओपन जिम, ई टॉयलेट यांचा लोकर्पण सोहळा आज पार पडला. त्यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन  मंत्री देशमुख बोलत होते. श्री शिवाजी छत्रपती रंगभवन येथे झालेल्या या कार्यक्रमास पालकमंत्री विजयकुमार देशमुख, महापौर शोभाताई बनशेट्टी, खासदार ॲड शरद बनसोडे, उपमहापौर शशिकला बत्तुल, पोलीस आयुक्त महादेव तांबडे, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, महापालिका आयुक्त अविनाश ढाकणे उपस्थित होते.
सहकारमंत्री सुभाष देशमुख म्हणाले, सोलापूर एकेकाळी वैभवशाली शहर होते. पण येथील कापड उद्योग बंद पडला आणि सोलापूरच्या वैभवाला काहीसे गालबोट लागले. सोलापूर शहरावर सध्या टीका होते. लोक येथून पुणे, मुंबईला स्थलांतरीत झाले. आता सोलापूर स्मार्ट सिटी करुन हे स्थलांतर आपल्याला थांबवायचं आहे. त्याचबरोबर सोलापुरात लोक येतील, गुंतवणूक येईल यासाठी प्रयत्न करायचा आहे. शहराचा चेहरा मोहरा बदलल्यावर हे सारं साध्य होईल असा मला विश्वास आहे.
सोलापूर शहराला धार्मिक पर्यटन आणि आरोग्य सेवेचे केंद्र बनविण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. माग त्यासाठी सोलापूर - विजापूर, सोलापूर - कोल्हापूर, सोलापूर - गुलबर्गा, सोलापूर - हैदराबाद, सोलापूर - धुळे या महामार्गाचा विकास सुरु आहे. सोलापूरचे इतर शहरांशी दळणवळण सुधारल्यावर आपोआपच विकासाचा वेगही गतिमान होईल, असे श्री. देशमुख म्हणाले.
पालकमंत्री विजयकुमार देशमुख म्हणाले, स्मार्ट सिटी अंतर्गतची कामे सुरू करण्यास काहीसा विलंब झाला. पण ही कामे वेळेअगोदर पुर्ण होतील. या कामासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. स्मार्ट सिटी अंतर्गत कामे होतील पण ती टिकविण्याची जबाबदारी सोलापूरकर नागरिकांची आहे. नागरिकांच्या सहभागामुळे स्मार्ट सिटी कायम स्वच्छ आणि स्मार्ट राहण्यास मदत होणार आहे, असे पालकमंत्री देशमुख म्हणाले.
यावेळी महापौर शोभाताई बनशेट्टी, खासदार ॲड. शरद बनसोडे, पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांचीही भाषणे झाली.
पालकमंत्री देशमुख यांनी रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने ई - भूमीपूजन आणि ई - लोकार्पण केले. यावेळी महानगरपालिकेच्या विविध समित्यांचे सभापती, नगरसेवक आणि सोलापूरचे नागरिक उपस्थित होते.
प्रास्ताविक आयुक्त अविनाश ढाकणे यांनी केले तर आभार संचालक रामचंद्र पाटील मानले.
******


मुलींनी स्मार्ट होण्यासाठी समाजातील सर्व लोकांनी स्मार्ट होण्याची आवशकता - पालकमंत्री गिरीश बापट


‘स्मार्ट गर्ल  व तंबाखू मुक्त शाळा अभियानाचे’ उद्घाटन संपन्न
           पुणे, दि. 22: मुलींना स्मार्ट करण्यासाठी समाजातील सर्व लोकांनी स्मार्ट होण्याची आवश्यकता असून या मुळे समाजाचा विकास होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन अन्न व नागरि पुरवठा मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले.
         अल्पबचत भवन येथे पुणे जिल्हा परिषद, भारतीय जैन संघटना व सलाम मुंबई फाऊंडेशनच्यावतीने घेण्यात येणाऱ्या ‘स्मार्ट गर्ल टू बी हॅपी, टू बी स्ट्रॉग’ या दोन दिवसीय कार्यशाळेचे व तंबाखू मुक्त शाळा अभियानाची घोषणा व उद्घाटन समारंभादरम्यान ते बोलत होते. यावेळी खा. सुप्रिया सुळे, खा. अनिल शिरोळे, जलसंपदा राज्य मंत्री विजय शिवतारे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई, भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतीलाल मुथा व सलाम मुंबई फाऊंडेशनच्या राजेश्री कदम उपस्थित होत्या.
         पालकमंत्री श्री बापट म्हणाले, शिक्षण घेणाऱ्या मुलांवर चांगले संस्कार करणे अत्यंत आवशक आहे. चांगले संस्कार हे मुलांमध्ये चांगला स्वभाव व वागणूक रुजवतात. यामुळे राज्य व देशाच्या बळकटिकरणात भर पडते. मुलींना स्मार्ट बनविण्यासाठी सर्व प्रथम समाजातील सर्व लोकांना स्मार्ट बनणे आवशक आहे म्हणून पहिली सुरुवात स्वत:ह पासून करा. कुटुंब व्यवस्था कोलमडू देवू नका, ती टिकवा. विज्ञानाच्या चांगल्या गोष्टींचा उपयोग करा व दुरुपयोग टाळा. स्मार्ट गर्ल टू बी हॅपी, टू बी स्ट्रॉग या अभियानाद्वारे इयत्ता 8 वी, 9वी, 10वी, 11वी व 12वी तील मुलींना सामाजिक आव्हानांना तोंड देण्यास तयार करण्यात येणार आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळातील विद्यार्थिनींना सक्षम करण्यात मदत होणार आहे. तसेच श्री बापट यांनी तंबाखू मुक्त शाळा अभियाना बाबतीत सर्वांना व्यसन टाळण्याचे आवाहन केले. 
          यावेळी  खा. सुप्रिया सुळे, खा. अनिल शिरोळे, राज्य मंत्री विजय शिवतारे व पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, यांची भाषणे झाली. कार्यक्रमा दरम्यान उपस्थितांना स्मार्ट गर्ल टू बी हॅपी, टू बी स्ट्रॉग व तंबाखू मुक्त शाळा अभियानाची माहिती चित्रफिती द्वारे देण्यात आली.
         कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य, अधिकारी व कर्मचारी. भारतीय जैन संघटनेचे पदाधिकारी तसेच सलाम मुंबई फाऊंडेशनचे सदस्य जिल्ह्यातील  शिक्षक व प्राध्यापक मोठ्या संख्येणे उपस्थित होते.
000000





Tuesday, September 19, 2017

सरस्वती मंदिर संस्था येथे शनिवारी रोजगार मेळाव्याचे आयोजन


पुणे, दि. 19: जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र पुणे व सरस्वती मंदिर संस्थेचे सरस्वती मंदिर स्किल डेव्हलपमेंट सेंटर, शुक्रवार पेठ पुणे यांच्या संयुक्त विद्यामाने शनिवार दि. 23 सप्टेंबर 2017 रोजी सरस्वती मंदिर संस्था, शुक्रवार पेठ, बाजीराव रोड, नातुबाग, पुणे-2 येथे सकाळी 10 वाजता रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
             मेळाव्यासाठी पुणे शहर, हडपसर, एम.आय.डी.सी औद्योगिक परिसरातील एकूण 26 उद्योजक सहभागी होणार असून एकूण 2664 रिक्तपदे उपलब्ध आहेत. जिल्ह्यातील  10 वी/12वी/आय.टी.आय/तांत्रीक पदवीधारक, पदवीधर तसेच उच्च पदवीधर उमेदवारांनी या खाजगी क्षेत्रातील उपलब्ध असणाऱ्या जागेसाठी प्रत्यक्ष मुलाखतीस उपस्थित राहून या सुवर्णसंधिचा लाभ घ्यावा. सहभाग घेणाऱ्या सर्व उमेदवारांनी www.mahaswayam.in या संकेत स्थळावर उद्योजकांची मागणी पाहून अपली संमती नोंदवावी, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, पुणे सहायक संचालक अ.ऊ.पवार व सरस्वती मंदिर संस्थेचे चेअरमन विनायक आंबेकर यांनी प्रसिध्दी  पत्रकाद्वारे केले आहे.
000000

युवकांनो प्रश्न विचारायला शिका ; तुम्ही तुमचे विश्व उभे कराल - जिल्हाधिकारी श्वेता सिंघल


          सातारादि. 19  (जिमाका) : सातारा जिल्ह्यातील युवकांनो तुमच्यातील उर्जा वापरुन स्वतः व्यावसायिक बना, शासनाची मुद्रा आणि स्टार्टअप इंडिया या योजना तुमच्या पाठीशी आहेत. शुन्यातून विश्व उभी करण्याची ताकद तुमच्यात आहे, फक्त मनात येणारे प्रश्न विचारायला शिका, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी केले.
          यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स महाविद्यालयाच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आज जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जिल्हा माहिती कार्यालय व मुद्रा समिती आणि चेतन कॉम्प्युटर ॲकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने उद्योजकता कार्यशाळेचे आयोजन आज करण्यात आले होते.  यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून जिल्हाधिकारी श्रीमती सिंघल बोलत होत्या. याप्रसंगी  मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, जिल्हा नियोजन अधिकारी बी.जे. जगदाळे, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक एन.एल. थाडे, अग्रणी बँक व्यवस्थापक महादेव शिरोळकर, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक संचालक सचिन जाधव, चेतन कॉम्प्युटर ॲकॅडमीचे संजय परदेशी आदी यावेळी उपस्थित होते.
                आज बेरोजगार तरुणांसमोर शासकीय नोकरी, डॉक्टर, इंजिनियर अथवा पिढीने चालत आलेल्या पारंपारीक व्यवसाय करण्याचा पर्याय उपलब्ध असतो, असे सांगून जिल्हाधिकारी श्रीमती सिंघल पुढे म्हणाल्या, आज उद्योग व्यवसायासाठी पोषक वातावरण आहे.  उद्योगांच्या उभारणीसाठी प्रशिक्षण देणाऱ्या शासकीय व इतर संस्थाही भरपूर आहेत. तरुण-तरुणींनी नोकरीच्या मागे न लागता   मेक इन इंडिया, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, मुद्रा बँक योजनांच्या माध्यमातून  प्रशिक्षण तसेच सुविधांची  माहिती घेवून स्वत:चे उद्योग-व्यवसाय उभारावेत. उद्योग-व्यवसाय उभारणीसाठी अगदी छोट्या-छोट्या गोष्टींचे नियोजन करणे महत्वाचे आहे. आजची कार्यशाळा उद्योग व्यवसाय कसा सुरु करावा, भांडवल कसे उभे करावे, सुरु करण्यात उद्योग-व्यवसायाचा प्रोजेक्ट रिपोर्ट कसा तयार करावा, त्याची तयारी कशी करावी, सरकारी व इतर वित्त पुरवठा बँकांकडून कसा कर्ज पुरवठा मिळवावा यासाठी ही कार्यशाळा आयोजित केली आहे.
                मुलींचे उद्योग-व्यवसायातील प्रमाण फार कमी आहे. मुलींनी आपल्या व्यवसायाची सुरुवात अगरबत्ती, शिवणकाम, ब्युटीपार्लर इत्यादींसाख्या छोट्या व्यवसायापासून सुरुवात करावी. महिला ही प्रथम गृहीणी असते. तिच्याकडे असलेल्या कौशल्याचा विचार करुन उद्योग सुरु करण्याविषयी परिपूर्ण माहिती दिल्यास त्याही छोट्या-मोठ्या उद्योजक होवू शकतात.  मार्क झुकेरबर्ग यांची सुरुवात  लहान होती. पण आज त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून व्यवसायाचे मोठे जाळे तयार केले आहे. भारतात देखील नारायण मुर्ती, नंदन नीलकेणी यासारखी मार्गदर्शक उदाहरणे आहेत. उद्योग सुरु करताना अथवा वाढविताना फेसबुक, युट्युब सारख्या सोशल मीडियाचा वापर करावा. आपण कोण बनणार असा प्रश्न तुम्ही स्वत:ला विचाराल तरच तुम्हाला तुमचे उत्तर मिळेल.
पंतप्रधान मुद्रा बँक योजनेविषयी माहिती देताना श्रीमती सिंघल पुढे म्हणाल्या,  राष्ट्रीय बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, बिगर बँक वित्तीय संस्था तसेच  जिल्हा सहकारी बँकांमार्फत, शिशु गट 10 हजार ते 50 हजार, किशोर गट 50 हजार ते 5 लाख आणि तरुण गट 5 लाख ते 10 लाख अशा तीन गटात मुद्रा बँक योजनेंतर्गत कुठल्याही प्रकारची तारण किंवा जामिनदाराशिवाय कर्ज पुरवठा वितरीत केला जातो.  यासाठी आपल्या उद्योग-व्यवसायाच्या तंतोतंत नियोजनाचा प्राजेक्ट रिपोर्ट बँकेला सादर करावा लागतो. होतकरु, बेरोजगार  तरुणांनी त्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
                यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. शिंदे म्हणाले, आपला देश तरुणांचा देश आहे.   25 ते 54 वयोगटातील नागरिकांचे सर्वात जास्त प्रमाण 40 टक्के आहे.   आपल्या देशासमोर सर्वात मोठे आव्हान आहे ते या वयोगटाला नोकऱ्या उपलब्ध करुन देण्याचे. बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने प्रमोद महाजन कौशल्य विकास कार्यक्रम राबविण्यास सुरु केली आहे. या योजनेचा हेतू ओळखून तरुणांनी आपले कौशल्य विकसित करुन आपला उद्योग उभा करावे. आयडीबीआय ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेकडून 3 हजार तरुणांना विविध रोजगार निर्मितीविषयक प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये 713 तरुणांना रोजगार मिळाला असून 82 तरुणांनी स्वत:चा व्यवसाय सुरु केला आहे.
                50 टक्के नागरिक हे शेतीवर अवलंबून आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनीही आता अन्न प्रक्रीयेसारख्या उद्योगांकडे वळले पाहिजे. यातून मोठा रोजगार निर्माण होऊ शकतो. विविध आस्थापनांमध्ये 1 कोटी 20 लाख नोकऱ्या उपलब्ध आहेत. परंतु या आस्थापनांना त्यांना पात्र असलेले उमेदवार मिळत नाहीत.  रोजगार उपलब्ध असूनही आपल्या कौशल्य विकासाशिवाय ते मिळणार नाही याची प्रत्येकाने जाणीव ठेवावी. शासन कौशल्य विकासाच्या अनेक योजना राबवित आहे. या योजनांचा लाभ घ्यावा. कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राने उद्योजक आणि विद्यार्थी यांना एकत्र आणून उद्योगांसाठी आवश्यक कौशल्याचा अभ्यास करुन त्या प्रकारचे तरुणांना प्रशिक्षण द्यावे, असे आवाहनही मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. शिंदे यांनी  शेवटी केले.
                जिल्हा नियोजन अधिकारी श्री. जगदाळे म्हणाले, मुद्रा बँक योजना म्हणजे काय याची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी म्हणून विविध प्रसिद्धी विषयक उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये कलापथक, एलईडी व्हॅन व आकशवाणी, वेबसाईटवरुन प्रसिद्धी व प्रचार करण्यात आला. याचा फायदा जिल्ह्यातील 22 हजार लाभार्थ्यांनी घेवून मुद्रा योजनेंतर्गत 316 कोटींचे कर्ज वितरण करण्यात आले आहे. मुद्रा  योजनेतून कर्ज घेऊन उद्योग सुरु केलेल्या  लाभार्थ्यांवर एक पुस्तक तयार करण्याचा मानसही त्यांनी शेवटी व्यक्त केला.
                यावेळी जिल्हा माहिती अधिकारी श्री. पाटील मनोगत व्यक्त करताना म्हणाले, आपल्या देशाला कौशल्य विकासाचा मोठा इतिहास आहे. जागतिक कौशल्य दिनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कौशल्य विकास विभागाची स्थापना केली. यामधून 2022 पर्यंत 40 कोटी नागरिकांना कौशल्यभिमुख रोजगार देण्याचा उद्देश आहे. याच धर्तीवर राज्य शासनानेही रोजगार व स्वयंरोजगार कार्यालयाचे रुपांतर आता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागात करुन राज्यातील बेरोजगार तरुणांना उद्योग-व्यवसायाचे प्रशिक्षण देण्याचे कार्यक्रम राबवित आहे.
                प्रास्ताविकात कौशल्य विकास, रोजगार व उद्योजगता विभागाचे सहायक संचालक सचिन जाधव यांनी कार्यशाळेचा उद्देश विशेद केला.
                या कार्यक्रमास विविध विभागांचे अधिकारी, नागरिक, विद्यार्थी, विद्यार्थींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0000