Monday, September 18, 2017

पायाभूत चाचण्यामुळे शिक्षणाची गुणवत्ता उंचावण्यास मदत शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचे प्रतिपादन



सोलापूर दि. 18 :- शालेय शिक्षणाचा दर्जा सुधारावा यासाठीच राज्य शासनाने पायाभूत चाचण्या सुरु केल्या. या चाचण्यामुळे शालेय शिक्षणाची गुणवत्ता उंचावण्यासाठी मदत झाली आहे, असे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज येथे विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले.
येथील ज्ञान प्रबोधनी हायस्कूलमध्ये आज श्री. तावडे यांनी शालेय विद्यार्थ्यांसोबत जलप्रतिज्ञा घेतली. त्यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना श्री. तावडे बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते सुधाकरपंत परिचारक, हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार, शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार, माध्यमिक शिक्षक संचालक गंगाधर म्हमाणे, माजी कुलगुरु इरेश स्वामी आदी उपस्थित होते.
मंत्री तावडे म्हणाले की, ‘शाळेत विविध परीक्षा आणि चाचण्या घेतल्या जातात. पण शिक्षणाची गुणवत्ता उंचावण्यासाठी आवश्यकता वाटल्यामुळेच पायाभूत चाचण्या सुरु करण्यात आल्या. या चाचण्यांमुळेच अनेक शाळांतील गुणवत्ता सुधारली आहे. त्याचबरोबर एका शाळेतील विद्यार्थी एका ठराविक क्षेत्रात कमकुवत असतील तर त्या शाळेत त्या क्षेत्रांचे मार्गदर्शन देता येणे शक्य होते. यामुळे त्या शाळेच्या गुणवत्तेचा दर्जा उंचावण्यास मदत झाली आहे’.
यावेळी विद्यार्थ्यांनी मंत्री तावडे यांना विविध प्रश्न विचारले. यावेळी मंत्री तावडे यांनी विद्यार्थ्यांबरोबर जलप्रतिज्ञा घेतली. शाळेच्या स्थानिक अध्यक्ष स्वरलता भिशीकर यांनी प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन केले.
                                                                       *****            



No comments:

Post a Comment