Thursday, July 11, 2019

आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल-रुक्मिणीची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा ‘बा विठ्ठला… चांगला पाऊस पडूदे…’ ‘दुष्काळाचं सावट दूर करून महाराष्ट्राला सुजलाम् सुफलाम कर’ मुख्यमंत्र्यांचे विठ्ठलाच्या चरणी साकडे


आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल-रुक्मिणीची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा
बा विठ्ठलाचांगला पाऊस पडूदे…’
दुष्काळाचं सावट दूर करून महाराष्ट्राला सुजलाम् सुफलाम कर
मुख्यमंत्र्यांचे विठ्ठलाच्या चरणी साकडे

             पंढरपूर दि. 12 :-  छत्रपती  शिवाजी महाराजांच्या वाटेवर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या विचारावरच राज्य शासनाचे काम सुरू आहे. राज्यातील जनतेच्या मनामनांतील आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही काम करत असून राज्यात चांगला पाऊस पडू देदुष्काळाचं सावट दूर  करून  महाराष्ट्राला सुजलाम् सुफलाम करण्याचे साकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विठ्ठलाच्या चरणी घातले. 
                  आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा मानाचे वारकरी विठ्ठल चव्हाण आणि प्रयागबाई चव्हाण (मु.पो. सांगवी सुनेगांव तांडा, ता. अहमदनगर, जि. लातुर) या दाम्पत्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केली. महापूजेनंतर विठ्ठल मंदिर समितीच्यावतीने मानाच्या वारकऱ्यांचा सत्कार मंदिराच्या सभामंडपात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे, सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, गृह राज्यमंत्री दीपक केसरकर, विठ्ठल मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, खासदार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर आदी उपस्थित होते. 
            मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पंढरपूरच्या वारीला शेकडो वर्षाची परंपरा आहे. महाराष्ट्रात परकीय आक्रमणांच्या काळात धर्म आणि संस्कृती जिवंत ठेवण्याचे काम वारी आणि वारकऱ्यांनी केले. गेल्या अनेक वर्षांपासून शिस्तबध्द पद्धतीने दिंड्या निघतात. त्यामुळे सकारात्मक वातावरण तयार होते. या सकारात्मक शक्तीचा वापर महाराष्ट्राला हरित, समृध्द आणि वनाच्छादित करण्यासाठी करण्यात येणार आहे. 
सामाजिक संस्थांच्या मदतीने शेकडो वर्षाची परंपरा असणारी ही वारी निर्मल आणि स्वच्छ करण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी वारकऱ्यांनी यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी केले. 
             जनभावना आणि जनभावनेचा आदर करण्याची शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राला दिली. याच प्रेरणेतून मराठा आणि धनगर समाजाला न्याय देण्याचे काम केले असल्याचे त्यांनी सांगितले.  
गेल्या दोन वर्षात मंदिर समितीच्यावतीने सुरू असलेल्या कामांची प्रशंसा करून चंद्रभागा नदीच्या शुध्दीकरणासाठी शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या नमामि चंद्रभागा अभियानाला यशस्वी करण्यासाठी सर्व वारकऱ्यांनी त्यात सक्रीय सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. 
             

  मराठा समाजाला आरक्षण दिल्याबद्दल शेतकरी आणि वारकरी संप्रदायाच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा यावेळी  सत्कार करण्यात आला. तसेच मंदिरातील कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतल्याबद्दल कर्मचाऱ्यांच्यावतीने मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला. 
             यावेळी एसटी महामंडळाच्यावतीने मानाच्या वारकऱ्यांना एक वर्षाच्या मोफत पासचे वितरण मुख्यमंत्री     श्री. फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच मंदिर संस्थांच्या उपक्रमांचा आणि वाटचालीचा आढावा घेणाऱ्या माईल स्टोन सह रिंगण आणि वेदसोहळा या पुस्तकांचे प्रकाशन मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. 
            यावेळी मंदिर समितीच्यावतीने प्रतिवर्षी देण्यात येणारा स्वच्छ दिंडीचा पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यातील मारुतीबुवा कराडकर दिंडीला एक लाख रुपये व मानचिन्ह, दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील सदगुरु म्हातारबाबा पाथरुडकर दिंडीला पंच्याहत्तर हजार रुपये रोख व मानचिन्ह तर तृतीय क्रमांकाचा पुरस्कार एकनाथ महाराज पालखी सोहळ्यातील गुरुदत्त प्रासादिक दिंडीला पंन्नास हजार रुपये व मानचिन्ह अशा स्वरुपात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.  
            कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ. अतुल भोसले यांनी मंदिर समितीच्या कामांचा आढावा दिला. आभार सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी मानले.   
*****








सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या सदनिका बांधकामाचे भूमीपूजन प्रत्येक जिल्हयातील पत्रकारांसाठी म्हाडाच्या माध्यमातून घरे देणार -- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस




सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या सदनिका बांधकामाचे भूमीपूजन
प्रत्येक जिल्हयातील पत्रकारांसाठी
म्हाडाच्या माध्यमातून घरे देणार
                                                                    
                                                                                            -- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सोलापूर, दि.11पत्रकारांच्या कल्याणासाठी राज्य शासन सकारात्मक असून राज्यातील प्रत्येक जिल्हयातील पत्रकारांसाठी  म्हाडाच्या विशेष योजनेच्या माध्यमातून  घरे उपलब्ध करुन देणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. 
                सोलापूर येथील श्रमिक पत्रकारांसाठी पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ, पुणे व प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत शहरात 238 सदनिका बांधकामाचे भूमीपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते  झाले.  तसेच  यावेळी श्री. फडणवीस यांच्या हस्ते कोनशीलेचे अनावरण व  वृक्षारोपण करण्यात आले.  यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.   कार्यक्रमास गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, सहकार मंत्री सुभाष देशमुख, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय देशमुख, महापौर शोभा बनशेट्टी, आमदार भारत भालके, आमदार सिद्धराम म्हेत्रे, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, सोलापूर श्रमिक पत्रकार गृहनिर्माण संस्थेचे मुख्य प्रवर्तक प्रशांत माने, सरचिटणीस समाधान वाघमोडे, सचिव एजाजहुसेन मुजावर, ज्येष्ठ पत्रकार यदू जोशी,  महानगरपालिका आयुक्त दिपक तावरे, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, म्हाडाचे मुख्य अधिकारी अशोक पाटील उपस्थ‍ित होते.

                मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, पत्रकारांच्या कल्याणासाठी पत्रकार सन्मान योजना लवकरच कार्यान्वित करण्यात येणार असून राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांना या योजनेच्या माध्यमातून निश्चितच दिलासा मिळेल.  राज्य शासनाच्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेत पत्रकारांचा समावेश करण्यात आला आहे.  या योजनेचा लाभ राज्यातील पत्रकारांना होणार असल्याचे सांगतानाच 1100 आजारांवर या योजनेच्या माध्यमातून उपचार मिळणार  आहेत. 

                सोलापूर श्रमिक पत्रकार संघाला गौरवपुर्ण इतिहास आहे.  पत्रकार संघाने समाजजागृतीचे मोठे कार्य केले आहे.  सोलापूर पत्रकार संघाच्या रुपाने महाराष्ट्रात गृहनिर्माणाची ही पहिली योजना आज कार्यान्वित झाली.  त्यामुळे पुढच्या योजना नक्कीच सुकर होतील.  सोलापूरच्या धर्तीवर राज्यातील सर्व जिल्हयात पत्रकारांना घरे उपलब्ध करुन देण्यासाठी योजना करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
                प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून राज्यात लाखो गरीब कुटुंबांना  घरे मिळाली आहेत.   2022 पर्यंत प्रत्येक गरीबाला घर मिळवून देण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न राज्यात लवकरच साकार होईल.  प्रत्येकाला घर मिळवून देणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य ठरेल, असा विश्वास  श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला.
                बाजारभावाच्या तुलनेत म्हाडाच्या घरांच्या किंमती  कमी होणे आवश्यक आहे. तसेच या घरांसोबतच पत्रकारांसाठीच्या गृहनिर्माण प्रकल्पांतर्गत सदनिकांच्या किंमतीही  कमी करण्याबाबतचा निर्णयही लवकरच घेण्यात  येईल.
 गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या पत्रकारांसाठी गृहनिर्माण प्रकल्प उभा राहत आहे, ही आनंदाची बाब आहे.  या गृहनिर्माण प्रकल्पाच्या माध्यमातून पत्रकारांचे हक्कांच्या घराचे स्वप्न निश्चितच पुर्ण होईल, असे त्यांनी सांगितले.
 ज्येष्ठ पत्रकार श्री. जोशी म्हणाले, सोलापूर गृहनिर्माण प्रकल्पाच्या रुपाने 238 पत्रकारांसाठी मोठी वसाहत उभी राहते आहे.  सोलापूर पत्रकार संघाची गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण केली आहे.   पत्रकार सन्मान योजनेसाठीही निधीची तरतूद केल्याने ही योजनादेखील मार्गी लागल्याचे त्यांनी सांगितले. 
               
स्वागत एजाजहुसेन मुजावर यांनी तर  प्रस्ताविक विक्रम खेलबुडे यांनी केले.  सूत्रसंचालन दत्ता थोरे यांनी केले.  आभार प्रशांत माने यांनी मानले.   कार्यक्रमाला लोकप्रतिनिधी, सोलापूर शहर आणि परिसरातील पत्रकार, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थ‍ित होते.
               
****

पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या नावे विद्यापीठाने अध्यासन सुरु केल्यास आवश्यक निधी उपलब्ध करुन देऊ - मुख्यमंत्री फडणवीस



सोलापूर, दि.11 - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने अध्यासन सुरु करण्याच्या मागणीला राज्य शासन निश्चित परवानगी देईल आणि त्यासाठीचा निधीही उपलब्ध करुन देण्यात येईल. त्याचबरोबर विद्यापीठाच्या विस्तारीकरणासाठी आवश्यक आराखड्याला टप्प्याटप्याने आवश्यक निधीही दिला जाईल, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मात्र, प्रत्येक विद्यापीठांनी विस्तारीकरणाबरोबरच गुणवत्ता विकासाकडेही लक्ष देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

            पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या नूतन प्रशासकीय इमारत आणि परीक्षा भवन इमारतीचा पायाभरणी समारंभ आज (गुरुवारी) मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. राज्याचे सहकार, मदत व पुनर्वसनमंत्री सुभाष देशमुख, सार्वजनिक आरोग्य, परिवहन व राज्य उत्पादन शुल्क राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री पालकमंत्री विजयकुमार देशमुख, महापौर शोभा बनशेट्टी, कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.
            यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, विद्यापीठाच्या भव्य व सुसज्ज इमारतीचे भूमीपूजन करताना आपल्याला आनंद होत आहे. कारण केवळ एका जिल्हापुरते मर्यादित असले तरी या विद्यापीठाने विद्यार्थ्यांना आवश्यक अभ्यासक्रम सुरु केले आहेत. या विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे नाव दिले आहे.  त्यांचे कार्य देशभरात आणि विविध क्षेत्रात होते. कुशल प्रशासक म्हणून त्यांची ओळख होती. त्यामुळे विद्यापीठाने अध्यासन सुरु करावे, त्यास आवश्यक तो निधी निश्चितपणे देऊ.
            विद्यापीठाने विस्तारीकरणासाठी आखलेल्या आराखड्यास टप्प्याटप्प्याने निश्चितपणे अर्थसंकल्पातून निधी दिला जाईल, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, सध्या सेवा क्षेत्रात रोजगाराच्या संधी वाढत आहेत. हे क्षेत्र विस्तारत असताना त्यांना लागणारे कुशल मनुष्यबळ विद्यापीठाने तयार केले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी फाईव्ह ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्थेची कल्पना मांडली आहे. येत्या पाच वर्षात त्या दिशेने काम होऊन अधिकाधिक गुंतवणूक देशात होईल, असा विश्वास आहे. शहराबरोबरच ग्रामीण भागात पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे काम आता सुरु आहे. विद्यापीठांनी हा बदल ओळखून त्यासाठीचे आवश्यक अभ्यासक्रम समाविष्ट केले पाहिजेत.
मुलभूत संशोधन क्षेत्रात अधिक काम करण्याची गरज असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, आपल्या देशातील ज्ञान कधी सुविधांमध्ये अडकले नाही. नालंदा व तक्षशिला सारखी विद्यापीठे त्याकाळी आपल्या देशात होती. शल्यचिकित्सा, खगोलशास्त्र अशा विषयांचा अभ्यास त्याकाळी केला गेल्याचे दिसते. विद्यापीठांनी आता डॉक्टरेट मिळवणाऱ्या संशोधन प्रकल्पांचा खरोखरच किती फायदा विद्यार्थ्यांना होतो, हे तपासले पाहिजे, असे त्यांनी नमूद केले. त्यामुळेच आता विदयापीठाची जबाबदारी वाढली असल्याचे श्री. फडणवीस यांनी सांगितले.
कुलगुरु  डॉ. फडणवीस यांनी प्रास्ताविकात, विद्यापीठामार्फत सुरु असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. विद्यापीठाने 14 वर्षे पूर्ण करुन  15 व्या वर्षात पदार्पण केले आहे. विद्यापीठ स्थापन झाल्यानंतर विद्यापीठात येणारे श्री. फडणवीस हे पहिले मुख्यमंत्री असल्याचा आवर्जून उल्लेख त्यांनी केला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला तसेच दीपप्रज्वलन केले. तत्पूर्वी विद्यापीठाच्या विस्तीर्ण ४८२ एकर परिसरात नवीन प्रशासकीय इमारत आणि परीक्षा भवन इमारतीचा पायाभरणी समारंभ श्री. फडणवीस यांच्या हस्ते झाला.  कार्यक्रमाचे आभारकुलसचिव डॉ. विकास घुटे यांनी मानले. 
****











Wednesday, July 10, 2019












पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनाच प्राधान्य देण्याचे शासनाचे धोरण
-कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे

पुणे दि. 10 : नैसर्गिक आपत्तीच्यावेळी पीक विमा संरक्षण शेतकऱ्यांसाठी आवश्यक असून ते मिळणे त्यांचा हक्कच आहे. विमा हा शेतकऱ्यांसाठीच असून या योजनेत त्यांनाच प्राधान्य देण्याचे शासनाचे धोरण असल्याचे सांगत या योजनेच्या प्रचार प्रसिध्दीसाठी जिल्हानिहाय कार्यशाळांच्या आयोजनाचा विचार असून आत्महत्याग्रस्त आणि दुष्काळग्रस्त जिल्ह्यांपासून याची सुरूवात करण्यात येणार असल्याची माहिती  कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी आज दिली.
येथील वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंध संस्थानच्या ‘शिवनेरी’ सभागृहात कृषी आयुक्तालय आणि प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (रामेती)यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्रधानमंत्री पीक विमा योजना राज्यस्तरीय कार्यशाळेचे उद्घाटन कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, महाराष्ट्र राज्य पुनर्वसन प्राधिकरणाचे उपाध्यक्ष माधव भंडारी, वसंतराव नाईक स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी, डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनचे अध्यक्ष प्रकाश पोहरे, प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ. आशिष भुतानी, सचिव (कृषी व जलसंधारण) एकनाथ डवले, कृषी आयुक्त सुहास दिवसे, राज्य बँकर्स श्री. थोरात उपस्थित होते.
डॉ. अनिल बोंडे म्हणाले, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे सरकारचे उद्दीष्ट आहे, त्यासाठी पीक विमा हे चांगले शस्त्र आहे. नैसर्गिक आपत्तीच्यावेळी या पीक विम्याचे संरक्षण उपयुक्त असून राज्यातील 91 लाख शेतकऱ्यांनी विम्याचे संरक्षण घेतले आहे. राज्यात यावर्षी 151 तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला असून अशा कठीण परिस्थितीत पीक विमा उपयुक्त ठरणार आहे. या नैसर्गिक आपत्तीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळावी यासाठी राज्य शासन विशेष प्रयत्न करणार आहे.
पीक विमा योजना अत्यंत उपयुक्त आहे, मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी विमा कंपन्यांचे प्रतिनिधी उपलब्ध नसल्याने अनेक वेळा गोंधळाची स्थिती निर्माण होते. यासाठी विमा कंपन्यांनी त्यांचे कार्यक्षेत्र असणाऱ्या प्रत्येक जिल्ह्यात त्यांचा प्रतिनिधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. प्रत्येक विमा कंपन्यांनी जिल्ह्याच्या कृषी विभागाच्या कार्यालयात त्यांचा  प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या विम्यासंबंधींच्या अडचणी सोडविण्यासाठी कायमस्वरूपी उपलब्ध करून देण्यासंबंधी शासन कडक धोरण अवलंबणार आहे. विमा कंपन्यांवर शासनाचे नियंत्रण असेल तरच शेतकऱ्यांना न्याय मिळेल.
राज्यातील राष्ट्रीयकृत बँकांसह इतर बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करत असल्याच्या तसेच शेतकऱ्यांशी योग्य प्रकारे वर्तन करत नसल्याच्या तक्रारीबाबत आपण आज सहकार आयुक्तांशी चर्चा केली आहे. अशा बँकांवर आणि तेथील अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करून पात्र शेतकऱ्यांना तातडीने पीक कर्ज उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांना दिल्या असल्याचे डॉ. बोंडे यांनी यावेळी सांगितले.
राज्य मंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, पीक विमा योजना अत्यंत चांगली असून त्याची अंमलबजावणी करताना आलेल्या अडचणी सोडवत त्यात अनेक सकारात्मक बदल करण्याची प्रक्रीया सुरू आहे. विम्याच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना साडे पंधरा हजार कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. आशिष भुतानी म्हणाले, प्रतिवर्षी केंद्र सरकार पंधरा हजार कोटी या योजनेवर खर्च करत असून महाराष्ट्र शासन सर्वात जास्त खर्च करत आहे. एकूण विम्याच्या हप्त्याच्या 0.5 टक्के रक्कम या योजनेच्या प्रचार आणि प्रसिध्दीवर खर्च करण्याचे बंधन विमा कंपन्यांना घालण्यात आले आहे. देशात साडे चौदा कोटी शेतकरी असून तंत्रज्ञानाच्या अभावामुळे त्यांना नुकसान भरपाई देताना अने‍क अडचणी येत आहेत. सन 2023 पर्यंत ही योजना यशस्वी करण्यासाठी आवश्यक प्रभावी तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक शेतकऱ्याचा डाटा बेस तयार करण्याचे काम सुरू असून याच माहितीच्या आधारे यापुढे शेतकऱ्यांना सर्व लाभ देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी माधव भंडारी, प्रकाश पोहोरे, किशोर तिवारी यांची भाषणे झाली. यावेळी राज्यातील विविध भागातून आलेल्या शेतकरी, कृषीतज्ज्ञ, सहकार तज्ज्ञ यांनी आपल्या सूचना कार्यशाळेत मांडल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एकनाथ डवले यांनी केले. तर आभार सुहास दिवसे यांनी मानले.
******