Tuesday, July 9, 2019


                  




राज्यातील ऊसतोड कामगारांसाठी तात्काळ फिरत्या स्वच्छतागृहासह
आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात
-विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या सूचना
              पुणे, दि.९: राज्यातील ऊसतोड कामगारांसाठी तात्काळ फिरते स्वच्छतागृह व आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज दिल्या.
येथील विधानभवनाच्या सभागृहात गर्भाशय काढण्याच्या शस्त्रक्रियेसंबंधी राज्यस्तरीय समितीची आढावा बैठक
डॉ. निलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यावेळी त्या बोलत होत्या. बैठकीसाठी सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, कामगार आयुक्त राजीव जाधव, साखर आयुक्त शेखर गायकवाड, आरोग्य सेवा विभागाच्या संचालक डॉ.अर्चना पाटील, पुणे व बीड चे जिल्हा शल्यचिकित्सक अनुक्रमे डॉ. अशोक नांदापूरकर, डॉ.अशोक थोरात, डॉ.अनिरुध्द देशपांडे, डॉ.मधुसूदन कर्नाटकी उपस्थित होते.
डॉ. निलम गोऱ्हे म्हणाल्या, राज्यातील ऊसतोड कामगारांचे प्रश्न आणि त्यांना भेडसावणाऱ्या समस्या लवकरात लवकर सोडवणे गरजेचे आहे. कामगार विभागाने कारखान्याच्या ठिकाणी असणाऱ्या स्वच्छतागृहांची माहिती  घेण्याबरोबरच ज्या ठिकाणी स्वछतागृहे नाहीत अशा ठिकाणी फिरते स्वच्छतागृह तातडीने उपलब्ध करून द्यावे. ऊसतोड कामगारांच्या आरोग्य विषयक तक्रारींचे निराकरण करण्यासाठी हंगाम सुरू होण्यापूर्वी नियमितपणे आरोग्य विभाग, कामगार विभाग व साखर आयुक्तालयाच्या पुढाकारातून ऊसतोड कामगारांची आरोग्य तपासणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
            ऊसतोड कामगारांना कोयता पध्दतीने वेतन न देता समान पद्धतीने वेतन देण्यात यावे. कामगारांना आरोग्य विषयक सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी कारखान्याच्या परिसरात फिरते हॉस्पिटल उपलब्ध करून देण्यात यावे, अशाही सूचना ही डॉ.गोऱ्हे यांनी दिल्या.
उसतोड कामगार महिलांमध्ये गर्भाशय काढून टाकण्याचे प्रमाण वाढत असल्याबाबत चिंता व्यक्त करून महिला कामगारांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी त्यांचे समुपदेशन करणे आवश्यक असून त्यांना योग्य त्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना डॉ. गोऱ्हे यांनी दिल्या. ऊसतोड महिला कामगारांच्या विविध समस्या जाऊन घेऊन त्या सोडविण्यासाठी सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे. हे काम व्यवस्थित पार पाडण्यासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी व या सर्वेक्षणाचा अहवाल येत्या 30 जुलै पर्यंत सदर करावा, अशा सूचना डॉ.गोऱ्हे यांनी यावेळी केल्या.
             प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी ऊसतोड कामगारांना आवश्यक असणाऱ्या आरोग्याच्या सुविधा देण्यासाठी तसेच फिरते रुग्णालय उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे स्पष्ट केले.
                कामगार आयुक्त राजीव जाधव म्हणाले, ऊसतोड कामगारांसाठी आरोग्यविषयक योजना राबविण्यासाठी कामगार विभाग निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करेल. 
                   शेखर गायकवाड यांनी याबाबत सर्व साखर कारखान्यांना सूचना देण्यात येतील, असे सांगितले.

******
                        



No comments:

Post a Comment