Monday, July 1, 2019














माडिया शिकू या पाठ्यपुस्तक व अभ्यासपुस्तकाचे प्रकाशन
आदिवासींच्या प्रत्येक बोलीभाषेसाठी माडिया शिकू या सारखी पाठ्यपुस्तके तयार व्हावीत
                                                                                                   -डॉ. प्रकाश आमटे
                   
पुणे दि. 1: देशाच्या लोकसंख्येत दहा टक्के असणारा आदिवासी समाज एकेकाळी जंगलाचा राजा होता. या समाजाला त्यांच्या हक्कांची जाणीव व्हावी यासाठी शिक्षणाची गरज आहे. मात्र भाषा हीच शिक्षण घेताना त्यांच्या समोरची मुख्य अडचण आहे. माडिया शिकू या या पुस्तकांच्या माध्यमातून ही अडचण दूर होण्यास मदत होईल असा विश्वास व्यक्त करत अशी पुस्तके आदिवासींच्या प्रत्येक बोलीभाषेत तयार करण्याची आवश्यकता असल्याचे मत डॉ. प्रकाश आमटे यांनी आज व्यक्त केले. 
                        येथील पंडीत जवाहरलाल नेहरू सभागृहात आदिवासी विकास विभागाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या माडिया शिकू या या पाठ्यपुस्तक व अभ्यासपुस्ताकाचे प्रकाशन डॉ. प्रकाश व डॉ. मंदाकिनी आमटे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी डॉ. प्रकाश आमटे बोलत होते. यावेळी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त डॉ. किरण कुलकर्णी, संस्थेच्या सहसंचालक नंदिनी आवडे, जर्मन भाषातज्ज्ञ तथा माडी भाषेच्या अभ्यासक डॉ. मंजिरी परांजपे, संस्थेच्या उपसंचालिका माधुरी यादवाडकर, माडिया समाजाची विद्यार्थीनी मनिषा मदजी उपस्थित होते.
                                   डॉ. प्रकाश आमटे म्हणाले, आदिवासी समाज आणि त्यांची संस्कृती ही मुळातच समृध्द आहे. मात्र त्यांच्यात असणाऱ्या शिक्षणाच्या आभावामुळे त्यांना नागर संस्कृती सोबत जुळवून घेताना अडचणी निर्माण होत आहेत. त्यांना त्यांच्या हक्कांची जाणीव व्हावी, यासाठी त्यांना शिक्षणाची आवश्यकता आहे. शिक्षणाच्या माध्यमातून त्यांच्या जीवनात अमुलाग्र बदल घडत असून अंध्दश्रध्देच्या जोखडातून हा समाज आता मुक्त होत आहे. या समाजातील अनेक तरुण शिक्षण घेवून विकासाच्या मुख्य प्रवाहात आले आहेत.
                                    डॉ. किरण कुलकर्णी म्हणाले, सध्याचा मुख्य प्रवाहातील समाज अनेक प्रश्नांनी गोंधळला आहे. या समाजाच्या प्रश्नांची उत्तरे आदिवासी समाजाच्या संस्कृतीत दडलेली आहेत. आदिवासी समाजाच्या संस्कृतीचे संवर्धन करण्याबरोबरच त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था अनेक उपक्रमांच्या माध्यमातून करत आहे. बोलीभाषा या संस्कृतीच्या वाहक असून त्यांच्या संवर्धनाचे काम होणे आवश्यक आहे. या क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक घटकाच्या पाठीशी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था उभी राहणार असल्याची ग्वाही डॉ. कुलकर्णी यांनी दिली.
                      यावेळी कोड ऑफ एथिक्सआणि प्रमुख 11 आदिवासी भाषांच्या क्रमिक पुस्तकांसाठी वापरण्याच्या कार्यपुस्तिकेचे प्रकाशन तसेच इयत्ता पाहिलीसाठी मराठी अभ्यासक्रमावर आधारित बोलीभाषेतील दृक्श्राव्य पेनड्राईव्हचे लोकार्पण करण्यात आले.
यावेळी पुस्तकाच्या लेखिका डॉ. मंजिरी परांजपे, मनिषा मदजी यांनी आपली मनोगते व्यक्त केली. पुस्तकाच्या निर्मितीमध्ये योगदान देणाऱ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आला.
                  आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेची ओळख करून देत संस्थेच्या कार्याबाबतची माहिती संस्थेच्या सहसंचालक नंदिनी आवडे यांनी प्रास्ताविकात दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर गाडगीळ यांनी केले तर आभार विनीत पवार यांनी मानले. या कार्यक्रमाला अभ्यासक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.                                                                                          


***

No comments:

Post a Comment