Thursday, March 19, 2020

कोरोना प्रतिबंधासाठी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी घेतला विविध विभागांचा आढावा*



*केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांची कडक अंमलबजावणी करावी
*साथरोग प्रतिबंधक कायदा प्रभावीपणे राबवा
*आपापल्या जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडाव्यात
*कॉरंटाईन च्या सूचनांची अंमलबजावणी करा
*सर्वेक्षणाचे काम योग्य प्रकारे करा,
डॉ. दीपक म्हैसेकर यांचे शासकीय यंत्रणांना निर्देश

पुणे,दि.१८: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारच्या सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिले. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांच्या प्रमुखांसोबत डॉ. म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली, त्यावेळी त्यांनी विविध सूचना केल्या. बैठकीला जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलीस उपायुक्त मितेश घट्टे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय देशमुख तसेच विविध विभाग प्रमुख उपस्थित होते.

  डॉ.दीपक म्हैसेकर म्हणाले, कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या संकटाला धैर्याने सामोरे जाण्यासाठी स्वतःची व कुटुंबियांची काळजी घेऊन आपापल्या जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडाव्यात. तसेच सर्व प्रशासकीय यंत्रणांनी सजग राहून काम करावे.
 
         डॉ. म्हैसेकर म्हणाले, महसूल प्रशासन,आरोग्य विभाग, पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांनी समन्वय साधून काम करावे. कॉरंटाईन केलेल्या व्यक्तींना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन दिल्याची खात्री करा.  कॉरंटाईन होणाऱ्या व्यक्तींच्या संख्येत वाढ होत गेल्यास, त्यानुसार वसतिगृहे, आवश्यक तेवढे हॉटेल्स तयार ठेवावीत. वृद्धाश्रम व ज्येष्ठ नागरिकांची संख्या अधिक असणाऱ्या सोसायटींमध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे.गर्दी टाळण्यासाठीच्या सर्व उपाययोजना राबवा. मुख्यमंत्री महोदय यांच्या सूचनांनुसार ५०टक्के कर्मचारी उपस्थित राहतील, याची दक्षता घ्यावी. परंतु प्रतिबंधात्मक कामे प्रभावीपणे करण्यासाठी आवश्यक त्याठिकाणी मनुष्यबळ उपलब्ध करुन दिले जाईल. नागरिकांनी काय करावे अथवा काय करु नये, याबाबत प्रशासनाच्या वतीने सर्वांना अवगत करण्यात येत असून जनजागृती साठी फेसबुक, ट्विटर यासारख्या समाजमाध्यमांवर भर द्यावा. परिस्थितीजन्य निर्णय घेण्याचे सर्व अधिकार जिल्हाधिकारी यांना देण्यात आले असून त्यांच्या आदेशानुसार कार्यवाही करुन प्रशासनाला वेळोवेळी अवगत करावे. कोणत्याही कामात हलगर्जीपणा करु नका, अशा सूचना त्यांनी दिल्या.

संशयितांची माहिती घेवून त्याबाबतचे निर्णय गतीने घ्यावेत. या काळात वैद्यकीय विभागाला सहकार्य करा. वैद्यकीय साधनसामग्री, अन्नधान्य पुरेसे शिल्लक असल्याची खात्री करा.   लग्नसमारंभ व इतर समारंभ अत्यंत कमी व्यक्तींमध्ये संपन्न होतील, यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी. रहिवासी सोसायट्यांमध्ये, सर्वसामान्य नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात यावी, अशा सूचना त्यांनी केल्या. 

              जिल्हाधिकारी नवल किशोर राम  म्हणाले, कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी सर्व यंत्रणांनी मिशनमोडमध्ये काम करणे गरजेचे आहे. कामांमध्ये सुसूत्रता येण्यासाठी विविध पथके स्थापन करण्यात आली असून त्यानुसार दिलेल्या जबाबदाऱ्या वेळेत पार पाडाव्यात. 
      बैठकीत उपायुक्त उपायुक्त संजयसिंह चव्हाण, प्रताप जाधव, नयना बोंदार्डे, जयंत पिंपळकर, राजाराम झेंडे, साधना सावरकर, एमआयडीसी चे प्रादेशिक अधिकारी अविनाश हदगल व संजीव देशमुख, प्रांताधिकारी, उपजिल्हाधिकारी व विभाग प्रमुखांनी सोपविण्यात आलेल्या कामांच्या सद्यस्थितीची माहिती दिली. 
00000

जीवनावश्यक वस्तूंचा सुरळीत पुरवठा व्हावा -विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर


जीवनावश्यक वस्तूंचा सुरळीत पुरवठा व्हावा
                          -विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर

पुणे दि.१९:  दूध, धान्य, भाजीपाला अशा जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा  कोणत्याही परिस्थितीत सुरळीत ठेवण्याबाबतच्या सूचना विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी दिल्या.
विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित अन्न, नागरी पुरवठा विभाग, पणन विभाग, दुग्ध विभागाच्या प्रशासकीय अधिका-यांची बैठक विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या.
ते म्हणाले, सध्याच्या परिस्थितीत कोरेाना विषाणूचा उद्रेक झाल्यामूळे जीवनावश्यक वस्तुंचा तुटवडा व जीवनावश्यक  वस्तूजादा दराने विक्री होण्याची शक्यता नाकरता येत नाही. ही गोष्ट लक्षात घेवून जनतेचे दैनंदिन जनजीवन सुरळीत सुरु राहण्यासाठी जीवनावश्यक वस्तूसुरळीत व रास्त भावात उपलब्ध होणे गरजेचे आहे. पणन विभागाने जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत राहण्यासाठी नियंत्रण ठेवावे. दूध, धान्य, भाजीपाला, तुरडाळ, कांदा, बटाटा, लसूण आदी जीवनावश्यक वस्तू सुरळीतपणे नागरिकांना उपलब्ध व्हाव्यात, असे सांगून डॉ. म्हैसेकर म्हणाले जीवनावश्यक वस्तुंबरोबरच अन्न व प्रशासन विभागाने बाजारात श्वसनासंबंधी आजारांवरील औषधांचा तुटवडा भासणार नाही याकडे विशेष लक्ष द्यावे.
बैठकीस पणन विभागाचे संचालक सुनील पवार, सहसंचालक विनायक कोकरे, अन्न विभागाचे सहआयुक्त एस.एस देशमुख, औषध प्रशासनाचे सहआयुक्त एस.बी. पाटील, सहायक पुरवठा अधिकारी सुनंदा भोसले- पाटील उपस्थित होते.
****




Wednesday, March 18, 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डॉक्टरांनी समाजाप्रति कर्तव्य पार पाडावे

सर्व वैद्यकीय महाविद्यालयांच्या अधिष्ठातांसोबत विभागीय आयुक्तांनी केली चर्चा
गर्दी टाळण्यासाठी व्यापक जनजागृती - *माहिती, शिक्षण व संवादावर भर

पुणे,दि.१८: 'कोरोना'च्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त डॉ..दीपक म्हैसेकर यांनी आज  सर्व वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांबरोबर बैठक घेतली.
   बैठकीला पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, ससून शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले, सार्वजनिक आरोग्य विभागाचे माजी महासंचालक डॉ..सुभाष साळुंखे, आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजय देशमुख, उपायुक्त प्रताप जाधव, संजयसिंह चव्हाण तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी व विविध शासकीय व खाजगी रुग्णालयांचे प्रमुख उपस्थित होते.
   डॉ.म्हैसेकर म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये तसेच रुग्णसंख्येत भर पडू नये, यासाठी काही दिवस शहरातील गर्दीचे प्रमाण कमी करणे अत्यंत गरजेचे आहे. याबाबत जनजागृती घडवण्यासाठी माहिती, शिक्षण व संवाद यावर भर देण्यात येत आहे. जागतिक आरोग्य संघटना व केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. शासकीय व खासगी रुग्णालयांच्या कार्यपद्धतीमध्ये समन्वय आणि सुसूत्रता असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर शस्त्रक्रिया कमी कराव्यात, जेणेकरून
कोरोना बाधित रुग्णांसाठी व्हेंटिलेटर, बधिरीकरण तज्ञ व अन्य आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देता येतील.
   डॉ. अजय चंदनवाले म्हणाले,  खासगी रुग्णालयांनी अतिदक्षता विभागात कामाचे ज्ञान घेतलेल्या प्रशिक्षित परीचारकांच्या नावांची यादी प्रशासनाला सादर करावी. तसेच सध्याच्या परिस्थितीत केवळ अत्यावश्यक शस्त्रक्रियाच रुग्णालयात कराव्यात व खाटा उपलब्ध ठेवाव्यात, या कामी इंडियन मेडिकल असोसिएशनने  समन्वयाची भूमिका पार पाडावी.
   सार्वजनिक आरोग्य विभागाचे माजी महासंचालक सुभाष साळुंखे म्हणाले, सध्याची परिस्थिती नियंत्रणात असली तरी सूक्ष्म नियोजन करुन त्यानुसार कार्यवाही करणे जरुरीचे आहे.
नवले हॉस्पिटल चे डॉ. डी. बी. कदम म्हणाले, रुग्णांची काळजीपूर्वक तपासणी केली जात असून संशयित रुग्णांना नायडू रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात येत आहे. सध्याच्या परिस्थितीत अतिरिक्त व्हेंटिलेटर, अतिदक्षता विभाग, पुरेशा खाटा राखीव ठेवणे जरुरीचे आहे. त्याचबरोबर कार्यवाही आराखडा तयार ठेवायला हवा, असेही ते म्हणाले.
   भारती हॉस्पिटलचे अधिष्ठाता  डॉ.संजय ललवाणी म्हणाले, रुग्णालयात आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत असून अंतर्गत विविध विभागांच्या प्रमुखांसोबत बैठक घेऊन सूचना देण्यात आल्या आहेत.
     यावेळी आयएमए चे डॉ.संजय पाटील, ए एफ एम सी चे आर एम गुप्ता, डॉ. डी वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालय तसेच विविध रुग्णालयांच्या प्रमुखांनी उपाययोजनांबद्दल माहिती दिली.
----------------

Tuesday, March 17, 2020

कोरोना आपत्तीचा एकजुटीने सामना करूया - विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर



                          विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी घेतला  
                पिंपरी-चिंचवड मनपा प्रशासनाचा कोरोना प्रतिबंधाबाबतचा आढावा
पुणे दि.17: कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि पूर्वकाळजी व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासंदर्भात प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेकडून सुक्ष्म नियोजन केले जात असून नागरिकांनी घाबरुन जावू नयेमात्रपूर्वकाळजी घ्यावी. प्रशासनाने वेळोवेळी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन सहकार्य करावे आणि या आपत्तीचा एकजुटीने सामना करूया,असे  आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले.
         कोरोनाबाबत पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाकडून सुरू असलेल्या उपाययोजनांचा विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी आज आढावा घेतला. यावेळी  पिंपरी चिंचवडचे आयुक्त. श्रावण हर्डीकरआरोग्य उपसंचालक डॉ. संजय देशमुखजिल्हा शल्यचिकीत्सक अशोक नांदापूरकर आदी यावेळी उपस्थित होते.
                       विभागीय  आयुक्त डॉ. म्हैसेकर म्हणाले,  ज्या नागरिकांना होम क्वॉरंटाईन सांगितले आहेत्यांनी स्वत:हूनच घरी राहून स्वत:बरोबरच इतरांचीही काळजी घ्यावी.  तसेच त्यांच्या डाव्या हातावर शिक्का मारावाजेणेकरुन समाजात या व्यक्ती वावरताना आढळल्यास त्यांची  ओळख पटेल. बाधित प्रवाशी आढळल्यास त्यांच्या प्रवासाची माहितीत्यांच्या संपर्कात आलेल्यांची माहिती विचारपूस करणा-या पथकाने तातडीने घ्यावी. तसेच परदेशातून प्रवास करुन आलेले व ज्यांना बाधा झालीअशा प्रवाशाच्या संपर्कात आलेल्या निकटवर्तीयांची तपासणी केली जाईल. उद्यापासून विमानाने आलेल्या सर्व प्रवाशांना 24 तास देखरेखीखाली ठेवले जाणार असून त्यासाठी परिपूर्ण व्यवस्था काळजीपूर्वक करण्याच्या सूचनाही विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी दिल्या.
                शहरातील बसस्थानकरेल्वेस्थानक तसेच सार्वजनिक ठिकाणे येथे गर्दी नियंत्रण करताना महानगरपालिकेच्या वतीने व्यापक प्रमाणावर जनजागृती करावी असे सांगून डॉ. म्हैसेकर म्हणाले,  स्थानिक पातळीवर महानगरपालिका प्रशासनाने नागरिकांमध्ये कोरोना आजाराविषयी असलेली भीती दूर करण्यासाठी जागृती करावी. कोरोना प्रतिबंधासाठी कार्यरत असलेल्या प्रत्येक अधिकारीकर्मचारीआरोग्य सेवेसाठी कार्यरत अधिकारीकर्मचारी यांना आवश्यक असलेले प्रशिक्षण तातडीने देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.तसेच कोरोना प्रतिबंधाबाबत उपाययोजनासंदर्भात प्रत्येक अधिका-यांने समन्वय ठेवून काम करावेअसे आवाहनही त्यांनी केले. तसेच कोरोना प्रतिबंधासाठी तयार करण्यात आलेल्या प्रत्येक पथकाचे कामकाज व जबाबदा-या याबाबतचाही सविस्तर माहिती घेतली.
           पिंपरी चिंचवडचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने सुरू असलेल्या उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली. यावेळी महानगरपालिकेच्या सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
0000




Monday, March 16, 2020

*सर्वधर्मियांच्या प्रार्थनास्थळांवर भाविकांची गर्दी बंद करा राजकीय स्वरूपाचे कार्यक्रम, मेळावे थांबवा* *मुख्यमंत्र्यांचे राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश*

*कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास सर्वोच्च प्राधान्य*


मुंबई दि. 16 : कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविणे यास सर्वोच्च प्राधान्य असून राज्य शासनाने उचललेल्या पावलांमुळे अद्याप तरी राज्यात परिस्थिती नियंत्रणात आहे मात्र  गर्दी थांबविण्यासाठी काटेकोर प्रयत्न करावेच लागतील. या दृष्टीने सर्व धर्मियांच्या प्रार्थनास्थळांवर नियमित पूजा अर्चा सुरु ठेवून भाविकांची गर्दी मात्र थांबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले. साथरोग प्रतिबंध कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांची असून रोगाचे हे संकट टळल्यानंतर धार्मिक सण, उत्सव पूर्ववत साजरे करता येतील. या क्षणी जनतेचे आरोग्य हे एकमेव प्राधान्य आहे. कोणत्याही पक्ष संघटनांचे राजकीय कार्यक्रम, समारंभ, मेळावे रोगाचा प्रादुर्भाव असल्यामुळे होऊच नयेत असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

आज वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यावेळी उद्योग मंत्री सुभाष देसाई, आरोग्य मंत्री राजेश टोपे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, मुख्य सचिव अजोय मेहता, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदिप व्यास उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, एखादी व्यक्ती कोरोनाग्रस्त असली तरी ती काही गुन्हेगार नाही. तिला योग्य औषधोपचार आणि मानसिक आधारही द्या. राज्यात लागू असलेला साथरोग प्रतिबंध कायदा जनतेच्या हितासाठी असून त्यांच्यात जागृती आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मोहिमा हाती घ्याव्यात. नागरिकांमध्ये भीती आहे. जे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले त्यांच्यासाठी मानसिक आधार देण्याची आवश्यकता असून क्वॉरंटाईन केलेल्या ठिकाणी त्यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. राज्यात जे रुग्ण दाखल आहे त्यातील उपचाराला प्रतिसादही देत आहेत, असेही त्यांनी सांगितले.

नियम सर्वांना सारखे असून धार्मिक सण-उत्सव, समारंभांसोबतच राजकीय कार्यक्रमांनाही परवानगी देऊ नका, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. ज्या नागरिकांना होम क्वॉरंटाईन सांगितले आहे त्यांनी स्वत:हूनच घरी राहून स्वत:बरोबरच इतरांचीही काळजी घ्यावी. ग्रामीण भागातील शाळा बंद करतानाच सार्वजनिक स्वच्छतागृह या ठिकाणी सॅनिटायजर, साबण आणि पाणी उपलब्ध राहील यांची दक्षता घ्यावी, असेही त्यांनी सांगितले. परदेशातील टुर्सना पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. राज्य शासन कोरोनाचा प्रभाव रोखण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करीत आहे. नागरिकांनी सर्तक रहावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

  कोरोनाचा प्रार्दुभाव पसरु नये याकरिता राज्यातील सर्व धार्मिक उत्सव रद्द करावेत. सर्व धर्मिय प्रार्थनास्थळांमध्ये दैनंदिन पूजाअर्चा व धार्मिक विधी शिवाय भाविकांसाठी तेथे प्रवेशास काही दिवस प्रतिबंध करावा. व्यापक जनहित लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी कायद्याचा वापर प्रभावीपणे करावा. राज्यातील ग्रामीण भागातील सर्व शाळा बंद कराव्यात. ग्रामपंचायत व नगरपालिकेच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलण्यात आल्या आहे. कोरोनाच्या आपत्कालीन उपाययोजनांसाठी तातडीचा निधीचा पहिला हप्ता  म्हणून 45 कोटी रुपये विभागीय आयुक्तांना देण्यात येणार असून ज्या प्रवाशांना घरी राहून क्वॉरंटाईन करण्याच्या सूचना दिल्या आहे त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. यासर्व कारवाई करताना त्याला मानवी चेहरा असावा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे केले.

*यावेळी घेण्यात आलेले महत्वपूर्ण निर्णय असे :*

·       राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या.

·       ग्रामीण भागातीलही शाळा बंद ठेवणार.

·       कोरोनाच्या उपाययोजनांसाठी तातडीच्या निधीसाठी कोकण आणि पुणे विभागीय आयुक्तांना प्रत्येकी 15 आणि 10 कोटी तर नागपूर, अमरावती, औरंगाबाद आणि नाशिक विभागीय आयुक्तांना प्रत्येक 5 कोटी रुपये असे 45 कोटींचा पहिला हप्ता देणार.

·       क्वॉरंटाईन सुविधा असलेल्या ठिकाणी दूरचित्रवाणी, कॅरमबोर्ड, जेवण आदी सुविधा द्या.

·       ज्यांना 100 टक्के घरी क्वॉरंटाईनच्या सूचना आहे त्यांच्या डाव्या हातावर शिक्का मारावा जेणेकरुन समाजात या व्यक्ती वावरताना आढळल्यास त्याची ओळख पटेल.

·       केंद्र शासनाने ज्या सात देशांचा प्रवास करुन आलेल्यांना सक्तीचे क्वॉरंटाईन करण्याच्या सूचना केल्या आहे त्यामध्ये राज्य शासनाकडून दुबई, सौदी अरेबिया आणि अमेरिका यांचाही समावेश करण्यात आला.

·       आवश्यकता भासल्यास व्हेंटिलेटर आणि अन्य उपकरणे स्थानिक बाजारातून खर्च करण्याचे जिल्हा प्रशासनाला अधिकार.

·       उद्यापासून मंत्रालयात अभ्यांगतांना प्रवेश न देण्याचा निर्णय.

·       नागरिकांनी शासकीय कार्यालयात गर्दी न करता ई-मेलच्या माध्यमातून तक्रारी, अर्ज पाठवावेत. त्यावर जिल्हा प्रशासनाने सात दिवसात कार्यवाही करावी.

·       होम क्वॉरंटाईन असलेल्या व्यक्तींची विचारपूस करण्यासाठी स्थानिक पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी.

·       धर्मगुरु, लोकप्रतिनिधी यांना विश्वासात घेऊन व्यापक जनहितासाठी कायद्याचा प्रभावी वापर करावा.

औद्योगिक घटकांमध्ये काम करणाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' ची मुभा द्यावी-विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर


पुणे,दि.१६: 'कोरोना' चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उद्योजकांनी औद्योगिक घटकांमध्ये काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना शक्य असल्यास 'वर्क फ्रॉम होम' ची मुभा द्यावी, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ दीपक म्हैसेकर यांनी केले.

     कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या उपाययोजनांबाबत आज डॉ. म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्ह्यातील औद्योगिक संस्थांच्या प्रतिनिधींसोबत कौन्सिल हॉल येथे बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, पुणे उद्योग विभागाचे सहसंचालक सदाशिव सुरवसे, औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी अविनाश हदगल व संजीव देशमुख, आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजय देशमुख आदी उपस्थित होते.
 डॉ. म्हैसेकर म्हणाले, कोरोना साठी ठोस औषध तयार झाले नसून रुग्णाच्या लक्षणांनुसार त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. जगभरातील बहुतांश देश या विषाणूने बाधित झाले आहेत. या विषाणूच्या प्रतिबंधासाठी सर्वांनी दक्षता घ्यावी, असे सांगून डॉ. म्हैसेकर म्हणाले, उद्योग क्षेत्रात कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जागतिक आरोग्य संघटना व केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करावी. कोरोना विषाणूच्या रुग्ण संख्येत वाढ होवू नये, यासाठी औद्योगिक संस्थांनी गर्दी होणारे कार्यक्रम आयोजित करु नयेत.  रुग्णांशी संपर्क येणाऱ्या डॉक्टर व नर्स साठी मास्क वापरणे अत्यावश्यक असून सर्वसामान्य नागरिकांनी खबरदारी म्हणून खोकताना व शिंकताना केवळ रुमालाची घडी नाक व तोंडाजवळ धरावी, असे सांगून डॉ. म्हैसेकर यांनी विलगीकरण, मास्क वापरण्याची व हात धुण्याची शास्त्रोक्त पध्दत, साफसफाई चे महत्त्व, औद्योगिक संस्थांनी करावयाचे प्रयत्न आदी विषयी माहिती दिली.
     यावेळी डॉ. व्यंकटेशम, श्री. सुरवसे व डॉ. देशमुख यांनीही मार्गदर्शन केले.
     बैठकीला जिल्ह्यातील हिंजवडी, चाकण, रांजणगाव, भोसरी, पिंपरी- चिंचवड आदी औद्योगिक वसाहतींमधील उद्योजक, प्रतिनिधी यांनी प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करु, असे आश्वासन देत विविध प्रश्न उपस्थित केले, त्यास डॉ. म्हैसेकर यांनी सविस्तर उत्तरे दिली.
                                                                           00000

Thursday, March 12, 2020

कोरोनाच्या मुकाबल्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज घाबरू नका, सावध रहा, लक्षणे दिसल्यास उपचार घ्या -विभागीय आयुक्त डॉ दिपक म्हैसेकर


          पुणे, दि. 12पुण्यामध्ये आढळून आलेल्या कोरोनाच्या रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी भीती बाळगण्याची आवश्यकता नाही. आरोग्य विभागासह प्रशासनाकडून आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे. कोरोना संदर्भात उपाययोजनाबाबत आवश्यक प्रशिक्षण व  जनजागृतीचे कार्य तातडीने हाती घेण्याच्या सूचना विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी आज येथे दिल्या. घाबरू नका, सावध रहा, लक्षणे दिसल्यास उपचार घ्या, असे आवाहनही त्यांनी नागरिकांना केले.
          कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात हॉटेल व्यावसायिक, पर्यटन कंपन्यांचे प्रमुख व प्रशासकीय विभाग प्रमुखांसोबत झालेल्या बैठकीत विभागीय आयुक्त डॉ म्हैसेकर बोलत होते.  यावेळी पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशमजिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, पुणे महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी चिंचवडचे आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी डॉजयश्री कटारे, बी.जे. मेडीकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय देशमुख, महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे आदी उपस्थित होते.
          यावेळी विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी हॉटेल व्यवसायिक,  पर्यटन कंपन्यांच्या प्रमुखांशी संवाद साधून या व्यावसायिकांकडून येथील परिस्थितीबाबत माहिती  घेतली.
                    विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर म्हणाले, जगातील 118 देशात कोरोना आजार आढळला आहे. त्यामुळे याबाबत प्रशासन म्हणून प्रत्येकाने दक्षता घेणे आवश्यक आहे. तसेच आपल्या कार्यालयातील सहका-या ला कोरोना विषाणूबाबत आवश्यक माहिती देणे महत्त्वाचे असून त्याचा जागृतीसाठी उपयोग होईल. प्रशासकीय यंत्रणेकडूनच याबाबत जनजागृतीचे कार्य व्यापक प्रमाणात हाती घेण्यात यावे तसेच कोरोना उपचारासाठी आवश्यक असणारी कोणतीही बाबउपकरणाची कमतरता भासणार नाही, असेही विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी स्पष्ट केले.
          विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर म्हणाले, कोरोनाबाबत जनजागृती करण्याबाबत हात स्वच्छ धुणेखोकताना- शिंकताना घ्यावयाची काळजीखोकणाऱ्याशिंकणाऱ्या व्यक्तीपासून तीन फूट अंतर ठेवणे अशा महत्त्वाच्या  संदेशाबाबत जनजागृती करण्यासाठी बस स्टँडहोर्डींग्ज्दूरदर्शनरेडिओ अशा विविध माध्यमांचा प्रभावीपणे वापर करावा. केंद्र सरकारने नोव्हेल कोरोना व्हायरस प्रतिबंधाबाबत करावयाच्या उपाययोजना प्रसिद्ध केल्या आहेत. त्यानुसार कार्यवाही करण्यात येत आहे.  ग्रामीण भागातही कोरोना विषाणु आजाराच्या प्रतिबंधासाठी करावयाची कार्यवाहीबाबत माहिती द्यावीअसेही विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यावेळी सांगितले.
          कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होवू नयेयासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या तसेच आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्या आहेत. नागरिकांनी नोव्हेल कोरोना विषाणूविषयी घाबरून न जाता आवश्यक काळजी घ्यावी. या विषाणूचा संसर्ग टाळण्याचे उपाय सहज-सोपे असून नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नयेअसे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले.
                  करोना विषाणूचा प्रसार हा प्रामुख्याने हवेद्वारेशिंकणेखोकणेहस्तांदोलन इत्यादी कारणांमुळे होतो. सदर आजाराने अनुषंगाने नियमितपणे हात साबणाने स्वच्छ धुवावेत. शिंकतांनाखोकतांना नाक व तोंडावर रुमाल धरावा. करोना विषाणूचा प्रसार टाळण्यासाठी नागरीकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावेअसे आवाहन जिल्हाधिकारी राम यांनी केले आहे.
                   हॉटेल व्यवसायिकांनी त्यांच्याकडे येणा-या प्रवाशांच्या प्रवासाचा इतिहास जाणून घेतला तर कोरोना प्रतिबंधाबाबत मदत होणार आहे. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांनी याबाबत प्रशासनास सहकार्य करावे तसेच  सर्व टूर ऑपरेटरनी परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची माहिती द्यावी आणि त्यापैकी एखाद्या प्रवाशास तापखोकला असल्यास त्वरित आरोग्य विभागाशी संपर्क साधावाअशा सूचनाही जिल्हाधिकारी राम यांनी पर्यटन कंपन्यांच्या प्रमुख्यांना दिल्या आहेत.
                यावेळी हॉटेल व्यावसायिक, पर्यटन कंपन्यांचे प्रमुख व विविध विभागाचे प्रशासकीय विभाग प्रमुख उपस्थित होते.

                                                        00000         

Thursday, March 5, 2020

जनसंपर्कासारखे चांगले दुसरे कोणतेही क्षेत्र नाही - उपसंचालक (माहिती) मोहन राठोड


        पुणे दि.5- जनसंपर्कासारखे चांगले दुसरे कोणतेही क्षेत्र नाही. या क्षेत्रातील व्‍यक्‍तींना समाजाला न्‍याय देण्‍याची संधी असतेत्‍यामुळे त्‍यांनी सर्वसामान्‍य लोकांना न्‍याय देण्‍याचे काम करावेअसे आवाहन पुणे विभागाचे उपसंचालक (माहिती) मोहन राठोड यांनी केले.
            यशदा (यशवंतराव चव्‍हाण विकास प्रशासन प्रबोधिनी) येथे जनसंपर्क क्षेत्रातील अधिका-यांच्‍या प्रशिक्षण कार्यक्रमाच्‍या सांगता समारंभात ते बोलत होते. यावेळी सत्र संचालक डॉ. बबन जोगदंडपुण्‍याचे जिल्‍हा माहिती अधिकारी राजेंद्र सरगसोलापूरचे जिल्‍हा माहिती अधिकारी रवींद्र राऊत यांची उपस्थिती होती.
            श्री. राठोड म्‍हणाले,  जनसंपर्क क्षेत्राची ज्‍यांना आवड आहे त्‍यांनीच या क्षेत्रात आले पाहिजेकेवळ नोकरी मिळते म्‍हणून या क्षेत्रात आल्‍यास आपण योग्‍य तो न्‍याय देवू शकत नाही. जनसंपर्क क्षेत्राचे  विविध पैलू उलगडून सांगतांना ते म्‍हणालेप्रसिध्‍दी ही कला आणि शास्‍त्र या दोहोंचा संगम आहे. ही कला दिसू न देण्‍यातच खरी कला आहे. आपण केवळ सेवक म्‍हणून न रहाता सहभागीदाराच्‍या भूमिकेत राहिले पाहिजे. यशस्‍वी जनसंपर्क अधिकारी होण्‍यासाठी आवश्‍यक गुणांचीही त्‍यांनी माहिती दिली. ज्ञान हीच शक्‍ती असल्‍याने जनसंपर्क अधिका-याकडे ज्ञानाचे भांडार असायला हवेमाहिती आणि संदर्भ याबाबत अद्ययावत माहिती असायला हवी. अभिलेख्‍यांचे दस्‍ताऐवजीकरणवेगवेगळया क्षेत्रातील लोकांशी (ओपिनीयन मेकर्स) मैत्रीपत्रकारांशी संवाद साधण्‍याचे कौशल्‍यवाचन-मनन-चिंतन आदी गुण अवगत करता आले पाहिजे.
            बदलत्‍या माध्‍यमांचा संदर्भ देत श्री. राठोड म्‍हणालेमाध्‍यमांचे स्‍वरुप प्रचंड वेगाने बदलत आहे. माणसांना जोडण्‍याचे काम माध्‍यमे करीत आहेत. जनसंपर्क अधिका-यांनीही सोशल मिडीयाचा कार्यक्षमपणे वापर केला पाहिजे. आपल्‍या कार्यातून सर्वसामान्‍य माणसापर्यंत पोहोचून त्‍यांना न्‍याय दिला पाहिजेयाबाबत त्‍यांनी काही अनुभव सांगितले.
            जिल्‍हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांनी यशदाच्‍या माध्‍यमातून चालविल्‍या जाणा-या उपक्रमांचा गौरव केला. जनसंपर्क क्षेत्र हे आव्‍हानात्‍मक तसेच अत्‍यंत महत्‍त्‍वाचे असून दररोज वेगवेगळा अनुभव येत असतो.  या क्षेत्रातील अधिका-यांना नवनवीन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण यशदामार्फत मिळावेअशी अपेक्षा व्‍यक्‍त केली.
            सत्रसंचालक डॉ. बबन जोगदंड यांनी यशदाच्‍या कार्याची माहिती सांगून भविष्‍यातही वेगवेगळया नावीन्‍यपूर्ण प्रशिक्षण सत्रांचे आयोजन करणार असल्‍याचे सांगितले.
            समारोपात मुंबई विद्यापीठाचे उप कुलसचिव विनोद माळाळेउस्‍मानाबादचे जिल्‍हा माहिती अधिकारी मनोज सानपराज्‍य निवडणूक आयोगाचे जनसंपर्क अधिकारी जगदीश मोरेकोल इंडियाचे जनसंपर्क अधिकारी जेट्टी राम दिलीपडॉ. शंकर मुगावेपालघर जिल्‍हा परिषदेच्‍या जनसंपर्क अधिकारी  श्रध्‍दा पाटीलदत्‍तात्रय  कोकरे यांनी मनोगत व्‍यक्‍त केले.
00000

Sunday, March 1, 2020

महाआरोग्य फिल्म फेस्टिवलचे राजदत्त यांच्या हस्ते पुरस्कार वितरण


 पुणेदि.२९- महाआरोग्य फिल्म फेस्टिवलमध्ये 'कब कबजब जबया लघुपटाला प्रथम क्रमांक मिळाला. ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक राजदत यांच्या हस्ते अनुपम बर्वे आणि शिरीष दरक यांनी तो स्वीकारला. स्मृतीचिन्हप्रमाणपत्र व रोख 25 हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने आरोग्य शिक्षण व माहिती व संवाद उपक्रमात प्रथमच लोकसहभागातून महाआरोग्य फिल्म फेस्टिवल सन 2020 चे आयोजन करण्यात आले होते. द्वितीय पुरस्कार 'फुगाव तिसरा पुरस्कार 'मनसखाया लघुपटाला मिळाला. सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप कुमार व्यासआरोग्य सेवा संचालक डॉ. अर्चना पाटीलडॉ. दीपक राऊतचित्रपट दिग्दर्शक सुनील सुकथनकर,जागतिक आरोग्य संघटनेचे विभागीय समन्वय अधिकारी डॉ. राहूल शिंपीउपसंचालक माहिती मोहन राठोडअजय जाधवमिलींद फाटक यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
चित्रपट दिग्दर्शक राजदत्त म्हणालेचलचित्र माध्यमातून आरोग्य विषयक संदेश समाजापर्यंत पोहोचण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पाऊल उचलले ही अभिनंदनीय बाब आहे. या महोत्सवात दाखविण्यात आलेले स्पॉट पाहून नवीन पिढी आरोग्य विषयक संदेश समाज मनापर्यंत पोहचवण्यात उत्सुक आहेयाची जाणीव झाली. उद्याचे सशक्त समाज जीवन या प्रयत्नातून दिसत असल्याचे राजदत्त यांनी सांगितले.
आरोग्य विभागाने राबविलेला महाआरोग्य फिल्म फेस्टिवल हा उपक्रम स्तुत्य असून आज ख-या अर्थाने संत एकनाथांची आठवण होत आहे. त्यांनी शेतकरी  व कष्टक-यांसाठी भारूड म्हटलं. समाजमनाला शिकविण्यासाठी  लोकांना वाट दाखविली.तसाच काहीसा प्रयत्न होत असल्याचे आज दिसत असल्याचे त्यांनी सांगितले.
  सामाजिक आशयावर विविध प्रकारच्या फिल्म तयार करणाऱ्या कलावंताचे अभिनंदन करून राज दत्त पुढे म्हणाले,समाजाची एकंदरीत स्थिती पाहता लोक धावपळीचे जीवन जगत आहे.परंतु ते डाक्टरांकडे दुःख हलके  करीत असतात.म्हणून  शासनाचे कौतुक आहे.यानिमित्ताने त्यांनी समाजासाठी टाकलेले महत्त्वाचे  पाऊल आहे. आज मन संकुचित होत आहे. मात्र नवीन पिढी असे विषय घेऊन समाजापर्यंत जात आहेत ,ही दिलासा देणारी बाब आहे.चित्रपटाच्या माध्यमातून समाजाला दिशा दिण्याचे काम करता येते,म्हणून हा उपक्रम खरोखरच स्तुत्य आहे.
आरोग्य शिक्षण कार्यात चित्रपट माध्यमाचे योगदान महत्त्वपूर्ण मानले जाते. आरोग्यदायी समाजासाठी कला प्रबोधन चित्रपटमाहितीपट व टीवी स्पॉट या माध्यमातून प्रतिबंधात्मक आरोग्यासाठी चित्रपट निर्माते विद्यार्थी व वैद्यकीय क्षेत्रातील घटक यांच्या सहभागाने चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला.  या महोत्सवासाठी  महाराष्ट्रातून चांगला प्रतिसाद मिळाला असल्याचे संचालक अर्चना पाटील यांनी सांगितले. राज्यातील विविध भागातून एकूण 122 स्पर्धकांनी आपले आरोग्य विषयक माहितीपट टीवी स्पॉट  सादर केले. त्यापैकी 48 स्क्रीनिंग साठी निवड करण्यात आले. यातील 16 स्पर्धकांना रोख बक्षिसे स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
प्रधान सचिव डॉ. व्यास म्हणालेया महाआरोग्य चित्रपट महोत्सवामुळे आरोग्य व प्रतिबंधात्मक ज्ञान योजना पोचण्यासाठी मदत होणार असून गावपातळीपर्यंत या चित्रपटाच्या माध्यमातून प्रबोधन करण्यात येणार आहे. 'आपले आरोग्य ही जबाबदारीया विषयावर प्रबोधन करण्यासाठी या माध्यमांचा नक्कीच उपयोग होईलअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रारंभी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपेराष्ट्रीय आरोग्य अभियानाचे  आयुक्त डॉ. अनुप कुमार यादव यांचा शुभेच्छा संदेश दाखविण्यात आला. उप संचालक मुक्ता गाडगीळ,  उपसंचालक डॉ. कैलास बावीस्करजिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर यांच्या सह इतर उपस्थित होते.
0000