Sunday, June 23, 2019

मुख्‍यमंत्री फडणवीस यांच्‍या हस्‍ते नाना वाड्याचे पुनरुज्जीवन व "स्वराज्य" क्रांतिकारक संग्रहालयाचे उद्घाटन



       पुणे दि.२३-  पुण्यनगरीचा ऐतिहासिक वारसा जतन करण्याचे काम "स्वराज्य" या क्रांतिकारकांच्या संग्रहालयात झाल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. पुणे महानगरपालिकेतर्फे आयोजित पेशवे कालीन नाना वाड्याचे पुनरुज्जीवन व "स्वराज्य" क्रांतिकारक संग्रहालयाचे उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते.
            यावेळी पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, खासदार गिरीश बापट, खासदार संजय काकडे, माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार विजय काळे, जगदीश मुळीक, महापौर मुक्ता टिळक, महापालिका आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी नवल किशोर राम आदींची प्रमुख उपस्थिती होती.
 मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, नाना वाड्याचे पुनरुज्जीवन करून महापौर आणि नगरसेवक यांनी अभिनंदनीय कार्य केले आहे. पुण्यामध्ये ऐतिहासिक वास्तूंची कमी नाही. आपल्या देशाला 5000 वर्षांची संस्कृती आहे.
आपण आपल्या देशाचा इतिहास जतन केला पाहिजे. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले किल्ले आहेत, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या वाणीतून त्या किल्ल्यांची माहिती ऐकण्याची पर्वणी असते. राज्यातील ऐतिहासिक किल्ल्यांचे जतन करण्याचे काम राज्य शासनाने दोन वर्षापासून हाती घेतले आहे.रायगड किल्ल्याचे संपूर्णपणे संवर्धन केले जात आहे, तेथे झालेल्‍या उत्खननात अडीचशे पेक्षा अधिक साईट सापडल्या आहेत. त्यातून महाराजांचे देदीप्यमान चित्र समाजापुढे उभे राहणार आहे. आपल्या देशाचा सांस्कृतिक वारसा समाजापुढे आला नाही तर समाज ऊर्जावान होऊ शकत नाही, नाना वाड्याचे पुनरुज्जीवन हा या शृंखलेतील एक भाग आहे.
            नाना वाड्यातील संग्रहालय इतिहासाचं चालते बोलते पुस्तक असून या ठिकाणी देदीप्यमान इतिहास मांडण्याचा प्रयत्न झाला आहे. पुणे महापालिकेच्यावतीने अशा पद्धतीने होणाऱ्या कामास राज्य सरकार पूर्ण मदत करेल, असेही मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमात स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबियांचा सत्कार मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. या बद्दलही मुख्‍यमंत्र्यांनी महापालिकेचे कौतुक केले.
            पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनीही थोडक्‍यात आपल्‍या भावना व्‍यक्‍त केल्‍या.  मी विद्यार्थी आहे,
असे नम्रपणे नमूद करुन देशाच्‍या स्‍वातंत्र्यासाठी हाल-अपेष्‍टा सहन करणा-या एका तरी क्रांतीकारकाचे
चरित्र पूर्णपणे वाचावे, असे आवाहन केले. मुक्‍या मनाने किती उधळावे शब्‍दांचे बुडबुडे, तुझे पोवाडे गातील पुढचे तोफांचे चौघडे या काव्‍यातून समर्पकपणे आपल्‍या भावना मांडल्या.

       खासदार गिरीश बापट यांनी हा एक ऐतिहासिक कार्यक्रम असल्‍याचे सांगितले. पुणे शहराला सांस्‍कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, औद्योगिक वारसा असल्‍याचा उल्‍लेख करुन स्‍मार्ट सिटीच्‍या माध्‍यमातून पुणे शहराला आदर्श शहर बनविण्‍यात येत असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. नाना वाड्यातील संग्रहालयामुळे आजच्‍या पिढीला प्रेरणा मिळेल, असा विश्‍वास व्‍यक्‍त करुन आपला इतिहास न विसरण्‍याचे नागरिकांना आवाहन केले.
महापौर मुक्‍ता टिळक यांनी आपल्‍या प्रास्‍ताविकात या संग्रहालयाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून नानावाडा ही वर्ग एक दर्जाची ऐतिहासिक वास्तू असल्‍याचे सांगितले. सन 1740 ते 1750 या कालावधीत पेशव्यांचे मंत्री असलेल्या नाना फडणवीसांनी हा वाडा बांधून घेतला. या वाड्याचे क्षेत्रफळ सुमारे दोन हजार चौ.मी. आहे. या वाड्यामध्ये ब्रिटीशकालीन दगडी इमारत आणि एल आकारातील मूळ पेशवाई वास्तू यांचा समावेश आहे.
            सागवानी लाकडात बनवलेल्या तुळ्या, दगडी खांब, दुर्मिळ मेघडंबरी, नाजूक कलाकुसर असलेले फॉलसिलींग,  दिवाणखाना, दुर्मिळ भीत्तीचित्रे ही या वाड्याची वैशिष्ट्ये आहेत. ही सर्व वैशिष्‍ट्य जतन करण्‍यात आल्‍याचे त्‍यांनी सांगितले. या वाड्यात स्वातंत्र्य लढ्यात सहभागी असणा-या क्रांतीकारकांची माहिती असणारे संग्रहालय उभारण्यात आले आहे. त्याच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. त्यामध्ये तळमजल्यावर असलेल्या अकरा खोल्यात स्वागत कक्ष, उमाजी नाईक, वासूदेव बळवंत फडके, लहुजी वस्ताद या क्रांतिकारकांचे तसेच 1857 चे युध्‍द, आदिवासींचा उठाव, नेमस्तांची चळवळ,  बाळ गंगाधर टिळक,  चापेकर बंधू,  जोतिबा-सावित्रीबाई फुले, शाहू महाराज या समाजसुधारकांचे जीवन चरित्र यामध्ये दर्शविण्यात आले आहे.
            उद्घाटनापूर्वी  मुख्‍यमंत्री श्री. फडणवीस यांनी या संग्रहालयाला भेट देऊन पहाणी केली.
कार्यक्रमास स्‍थायी समिती अध्‍यक्ष सुनिल कांबळे, नगरसेवक श्रीनाथ भिमाले, हेमंत रासने, राजेश येनपुरे, गायत्री खडके, तसेच नागरिक मोठ्या संख्‍येने उपस्थित होते. 
००००










पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या स्मृतिचित्रे स्मरणिकेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांना लवकरच सन्मान योजनेचा ला -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


           पुणे दि. 23: पत्रकारांच्या कल्याणासाठी राज्य सरकार नेहमीच सकारात्मक असून ज्येष्ठ पत्रकारांच्या सन्मान योजनेसाठी 25 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली असून पुढच्या महिन्यापर्यंत पहिल्या टप्प्यात अर्ज केलेल्या पत्रकारांना याचा लाभ मिळेल ,अशी ग्वाही देतानाच  म्हाडाच्या विशेष योजनेच्या माध्यमातून पुण्यातील पत्रकारांसाठी घरे उपलब्ध करून देणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. तसेच पुणे प्रेस क्लबसाठीही जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
            येथील पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात पुणे पत्रकार संघाच्या सन 1940 ते 2019 या आठ दशकांचा चित्रमय प्रवास असणाऱ्या स्मृतिचित्रे या स्मरणिकेचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महापौर मुक्ता टिळकखासदार गिरीश बापटआमदार जगदीश मुळीकमेधा कुलकर्णी,जिल्हाधिकारी नवल किशोर रामपत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र पाटीलसरचिटणीस  पांडुरंग सांडभोर उपस्थित होते. 
             मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेआपल्या देशात अनेक संस्था निर्माण झाल्यात्या मोठ्या झाल्या .मात्र त्याच्या इतिहासाचे जतन करण्याचे काम आपल्याकडे फारसे झाले नाही. परदेशात मात्र संस्थांच्या इतिहासाचे योग्य प्रकारे जतन करण्यात येते. संघर्षाच्या काळात तसेच पुढील पिढीसाठी हा ऐतिहासिक दस्ताऐवज उपयुक्त ठरतो. पुणे श्रमिक पत्रकार संघाला स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर असा ऐतिहासिक वारसा आहे. हा सर्व इतिहास संग्रहीत करून तो चित्ररूपाने प्रदर्शीत करण्याचा पत्रकार संघाचा हा उपक्रम अभिनव आहे.
               पत्रकारिता व्यवसायासमोर आज अनेक अडचणी  आहेतत्यातच नवमाध्यमांच्या उदयाने हे क्षेत्र अधिकच आव्हानात्मक बनले आहे. अशा परिस्थितीत पत्रकारांच्या कल्याणासाठी त्यांचा समावेश शासनाच्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये करण्यात आला आहे. याचा लाभ राज्यातील पत्रकारांना होणार असल्याचे सांगत पत्रकारितेला अधिक प्रगल्भ करण्यासाठी पत्रकार संघाने पुढाकार घेवून विशेष अभ्यासदौरे आणि अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी केले. 
               खासदार गिरीश बापट म्हणालेपुणे श्रमिक पत्रकार संघाचा पुण्याच्या सांस्कृतिक जीवनात मोठा वाटा आहे. पत्रकार हा लोकशाहीचा आधार आहे. समाजाच्या दुख:ला न्याय मिळवून देण्याचे काम पत्रकार करत असतात. पुणे श्रमिक पत्रकार संघाचा इतिहास आदर्शवत असून पुणे प्रेस क्लबच्या उभारणीत शहरातील सर्व लोकप्रतिनिधी सक्रीय सहभाग नोंदवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आषाढी वारी 2019 मार्गदर्शिकेचे प्रकाशन
             पंढरपूरच्या आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना आणि नागरिकांना वारीच्या संदर्भात अद्ययावत माहिती मिळावीमहत्वाचे फोन नंबर उपलब्ध व्हावेतयासाठी जिल्हा  प्रशासनाने तयार केलेल्या आषाढी वारी 2019 या मार्गदर्शक पुस्तिकेचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.   
            कार्यक्रमाचे स्वागत पांडुरंग सांडभोर यांनी केले. प्रस्तावना राजेंद्र पाटील यांनी केली. सुत्रसंचालन प्रशांत आहेर यांनी केले. तर आभार चंद्रकांत हंचाटे यांनी मानले. या कार्यक्रमाला पुणे शहर आणि परिसरातील ज्येष्ठ पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.  
*****












“स्वच्छ वारी-स्वस्थ वारी-निर्मल वारी- हरित वारी” अभियान











































स्वच्छ वारी-स्वस्थ वारी-निर्मल वारी- हरित वारी अभियान
मुख्यमंत्र्यांनी दिली विद्यार्थ्यांना महासंकल्पाची शपथ:कडू लिंब रोप वाटपाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी नोंद
           पुणे दि. 23 :  निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी स्वच्छ वारी-स्वस्थ वारी-निर्मल वारी- हरित वारी हे अभियान महत्वपूर्ण असून  राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या गिनीज बुक ऑफ वर्ड्ा रेकॉर्डमुळे देशाचे नाव जगाच्या नकाशावर गेल्याचे सांगत यामध्ये सहभागी झालेले सर्वजण इतिहास बनले असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज काढले.
                महाराष्ट्र शासनाचा राष्ट्रीय सेवा योजना कक्ष आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने येथील पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात स्वच्छ वारी-स्वस्थ वारी-निर्मल वारी-हरित वारी अभियानाच्या महासंकल्पाचे उदघाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, महापौर मुक्ता टिळक, खासदार संजय काकडे, आमदार दिलीप कांबळे, महेश लांडगे, माधुरी मिसाळ, मेधा कुलकर्णी, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे अध्यक्ष राजेश पांडे, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार उपस्थित होते.  
               मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, पंढरपूरची वारी हा जगाच्या इतिहासात अभूतपूर्व उत्सव आहे. या वारीला सातशे वर्षाची परंपरा आहे. कोणत्याही निमंत्रणाशिवाय लाखो वारकरी मोठ्या भक्ती-भावाने या वारीत दरवर्षी सहभागी होतात. त्यांना कोणत्याही गोष्टीची आस नसते, त्यांना केवळ पांडुरंगाच्या भेटीची ओढ असते. त्यामुळे कोणत्याही गोष्टीची तमा न बाळगता ते या वारीत सहभागी होतात. वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांची सेवा करून ही वारी हरीत आणि निर्मल करण्यात राष्ट्रीय सेवा योजनेचे हे अभियान निश्चितच महत्वाची भूमीका पार पाडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  

                   
   एकाच वेळी मोठ्या संख्येने कडू लिंबाची रोपे लावण्याचा आणि त्याचे संवर्धन करण्याचा रेकॉर्ड गिनिज बुकमध्ये नोंद होत असल्याबद्दल सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी बाज की असली उडान अभी बाकी है... तुम्हारे इरादोंका इम्तिहान अभी बाकी है... अभी तो नापी है मुठ्ठीभर जमीन तुमने... अभी पुरा आस्मान बाकी है... अशा शब्दात एनएसएस च्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. ज्या प्रमाणे क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर स्वत:चे रेकॉर्ड स्वत:च मोडत होता, त्याच प्रमाणे आजचा तुमचा रेकॉर्ड तुम्हीच मोडा ,असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना यावेळी केले.
               पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, या अभियानाच्या माध्यमातून स्वच्छ वारी-निर्मल वारी यशस्वी होणार आहे. आपल्या देशातील अनेक विषयांची नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे. आजचा कडुनिंबाच्या रोपांचे वाटप करण्याचा हा रेकॉर्ड खूप महत्वाचा आहे. पंढरपूर वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना शासनाच्यावतीने 5 लाख रेनकोटचे वाटप करण्यात येणार असून वारकऱ्यांना सर्व सोयी-सुविधा पुरविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
             यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अभियानात सहभागी असणाऱ्या विद्यार्थ्यांना महासंकल्प अभियानाची शपथ दिली. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी समन्वयाची भूमीका पार पाडणाऱ्या मिलींद वार्लेकर यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
              कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेश पांडे यांनी केले. सूत्रसंचालन प्राचार्य संजय चाकणे यांनी केले. तर आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई यांनी मानले.  
ठळक वैशिष्ट्ये
 विद्यापीठांशी संलग्न असलेल्या महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांमार्फत पालखी मार्गावर नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणार.
पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या 20 हजार विद्यार्थ्यांना कडुनिंब रोपांचे वाटप.
अभियानात वारीमार्गावर करण्यात येणार स्वच्छता.
वारकऱ्यांना ५० लाख पानाच्या पत्रावळयांचे होणार वाटप.
७०० टन ओला कचरा व  निर्माल्याचे होणार संकलन.
३०० टन सेंद्रीय खतनिर्मिती होणार.
३५ लाख लिटर पाण्याची होणार बचत.
१ लाख वारकऱ्यांच्या आरोग्याची तपासणी व सेवासुश्रषा.
३५ हजार वरकाऱ्यांना फिजिओथेरपी सेवा.
१ लाख चष्म्यांचे होणार वाटप.
पथनाटयाद्वारे २ लाख वारकरी व गावकऱ्यांचे करण्यात येणार प्रबोधन.
कडुनिंबाच्या २० हजार रोपांची वारीमार्गावर लागवड करुन संगोपन करण्यात येणार.
आपत्ती व्यवस्थापनाबाबत जनजागृती करण्यात येणार.
ooooo