Thursday, January 16, 2020

शेतकऱ्यांना ताकद देवून महाराष्ट्र सुजलाम-सुफलाम करणार - मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

                                कृषिक 2020" प्रदर्शनाचे शानदार उद्घाटन

 पुणे दि. 16: शेतकऱ्यांचे शेतीविषयीचे पारंपारिक ज्ञान अचंबित करणारे आहे. त्यांच्या ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी प्रयत्न केला जाईल.  राज्यातील शेतकऱ्यांना ताकद देऊन महाराष्ट्राला सुजलाम-सुफलाम करणार असल्याचा निर्धार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्यक्त केला. 
         शारदानगर (माळेगाव) येथील कृषी विज्ञान केंद्राच्यावतीने आयोजित "कृषिक 2020" प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालेत्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी केंद्रीय कृषी मंत्री खासदार शरद पवारउपमुख्यमंत्री अजित पवारकृषिमंत्री दादाजी भुसेपशु संवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री सुनील केदारकृषी राज्यमंत्री विश्वजीत कदमखासदार सुप्रिया सुळेआमदार रोहित पवारधीरज देशमुखइस्राईलचे आंतरराष्ट्रीय धोरणकर्ते सल्लागार दूत डॅन अलुफसिने अभिनेते अमीर खानजिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरेपंचायत समितीच्या सभापती नीता बारवकरबारामतीच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरेॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पवारडॉ सुहास जोशी उपस्थित होते. 

            मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलताना पुढे म्हणालेकृषिक प्रदर्शन हे प्रात्यक्षिकासह असणारे सर्वोत्तम प्रदर्शन आहे. बारामती कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून अभिमान वाटावे असे काम झाले आहे. माळरानावर नंदनवन फुलले आहे. जग झपाट्याने बदलत असून विविध क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित होत आहे. आपला देश हा शेती प्रधान असून शेती हाच आपला मुख्य कणा आहे. देशाची लोकसंख्या झपाट्याने वाढत असल्याने अनेक नैसर्गिक संसाधनांवर ताण आला आहे. सर्वजण पोटात अन्न जावे म्हणूनच काम करत असतात. या सर्वांना जगविण्याचे काम शेतकरी करतो. 

             मानव कोणतीही गोष्ट तयार करु शकतोमात्र पाणी निर्माण करू शकत नाही असे सांगत मुख्यमंत्री श्रीठाकरे म्हणाले,भविष्याचा विचार करून  आपल्याला पाण्याचे योग्य नियोजन करावे लागेल. हे नियोजन झाल्यास शेती समृद्ध होईल. आता माती विना शेती आणि हवे वरील शेतीचे यशस्वी प्रयोग झाले आहेत. त्याच प्रमाणे व्हर्टिकल शेतीचेही प्रयोग सुरु आहेत. महाराष्ट्राच्या भूमीत अनेक चमत्कार होत असतातशेतीच्या नवनवीन प्रयोगांचेही चमत्कार याच भूमीत होतील. महाराष्ट्राचा शेतकरी देशातील शेतकऱ्यांना नक्की  दिशा दाखवेलअसा विश्वास व्यक्त करत शेतीसाठी आवश्यक असणारी प्रत्येक गोष्ट शासन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

           यावेळी  खासदार शरद पवार म्हणाले, "कृषिक"च्या माध्यमातून दरवर्षी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येतात. जगाची शेती बदलत आहे. त्यामुळे उत्पादकता वाढत आहे. या क्षेत्रात सातत्याने सुधारणाबदल आणि  संशोधन करणे आवश्यक आहे. देशात उपयुक्त संशोधनाला चालना देण्याची आवश्यकता आहे.
शेतकऱ्यांना ठिबक सिंचनासाठी प्रोत्साहीत करण्याची भूमीका राज्य शासन नक्की घेईलअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
           

  कृषी प्रदर्शनाचे औपचारिक उद्घाटन केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रदर्शनाची पाहणी केली. तेथील विविध शास्त्रज्ञ,तंत्रज्ञ आणि प्रगतशील शेतकरी यांच्याशी संवाद साधला.
         ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या वाटचाली विषयीची चित्रफीत यावेळी दाखविण्यात आली. सुहास जोशी आणि डॉ. मई नाऊ यांनी "दुष्काळ निवारण कृती आराखडा" या विषयावरील शास्त्रीय संकल्पनेचे सादरीकरण केले. यावेळी डॅन अलुफ यांचे भाषण झाले. सिनेअभिनेते आमीर खान यांच्याशी यावेळी संवाद साधण्यात आला. प्रास्ताविकात राजेंद्र पवार यांनी ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या वाटचालीची माहिती दिली.
            या कार्यक्रमाला देशभरातील कृषी क्षेत्रातील शास्त्रज्ञतंत्रज्ञविविध विद्यापीठांचे कुलगुरूविद्यार्थी प्रगतशील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 



Friday, January 10, 2020


रस्त्यांच्या कामासाठी आवश्यक
भूसंपादनाच्या कामांना प्राधान्य द्या
           -आशिष शर्मा
पुणे दि. 9: पुणे विभागातील राष्ट्रीय राजमार्गासह महामार्गाच्या कामांना गती येण्यासाठी जमिनीच्या भूसंपादनाची कामे प्राध्यान्याने करावीत, यासाठी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (एनएचएआय) आणि महसूल विभागाच्या भूसंपादन शाखेने समन्वयाने काम करण्याच्या सूचना भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे वित्तीय संचालक आशिष शर्मा यांनी केल्या.
येथील विभागीय आयुक्त कार्यालयात राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन बैठक भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे संचालक (वित्तीय) आशिष शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी विभागीय आयुक्त डॉ दीपक म्हैसेकर, पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम, सातारा जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, उपायुक्त जयंत पिंपळगावकर, "एनएचएआय"चे राजीव सिंह यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.  
श्री आशिष शर्मा म्हणाले, पुणे विभागातील राष्ट्रीय राजमार्गांची कामे सुरु आहेत. मात्र काही ठिकाणी कामे रखडली आहेत. ज्या ठिकाणी कामे रखडली आहेत, त्या ठिकाणी भूसंपादनाचे विषय प्रलंबित असतील तर ते तातडीने सोडविण्याची आवश्यकता आहे. ज्या ठिकाणी भूसंपादनाची कायदेशीर प्रक्रीया पूर्ण झाली आहे, मात्र त्या ठिकाणी काही अडथळे येत असतील तर त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्तात काम सुरू करावे. अशा कोणत्या आणि किती ठिकाणी पोलीस बंदोबस्ताची आवश्यकता आहे, त्याचा आकृतीबंद तयार करून तो एनएचएआयने महसूल विभागाला सादर करावा. राष्ट्रीय राजमार्गाची प्रस्तावीत कामे पूर्ण करण्यासाठी नेमकी किती जमिन आवश्यक आहे, त्याची यादी करण्याची सूचना त्यांनी केली.
तसेच पुणे-सातारा महामार्गाचे कामही रखडलेले असून या मार्गावरील खेड-शिवापूर टोल नाक्यावर आणि परिसरात वाहनकोंडीचा सामना प्रवशांना वारंवार करावा लागतो. या टोलनाक्यावर वाहनांच्या टोल आकारणीचे योग्य नियोजन नसल्यामुळेच या समस्या उद्भवत असाव्यात, या प्रकणी एनएचएआयच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याच्या सूचना श्री शर्मा यांनी केल्या. या रस्त्याच्या कामाला गती देण्यासह वाहनधारकांच्यात फास्ट टॅग विषयी जनजागृती करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
चांदणी चौकाच्या कामाला प्राधान्य- विभागीय आयुक्त
चांदणी चौक उड्डाणपूलासाठी आवश्यक असलेल्या 37 मिळकतीचे 2.94 हेक्टर  क्षेत्राच्या भूसंपादनाचे प्रस्ताव जिल्हाधिकारी यांनी पुणे महानगरपालिकेकडे पाठविले आहेत. त्यासाठी आवश्यक असणारी 30 टक्के रक्कम पुणे महानगरपालिकेने जमा केल्यानंतर या कामाला प्राधान्य देत भूमी अभिलेखच्या जिल्हा अधिक्षकांनी कालमर्यादेत करून देण्याच्या सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिल्या. या कामासाठी एनडीएची काही जागा संपादीत करणे आवश्यक आहे, त्यासाठी त्यांच्याकडून भरपाई म्हणून 16 कोटींसह त्यांच्या कमानीच्या पुनर्रबांधणीची त्यांची मागणी आहे. या बाबतही संरक्षण विभागाशी वरिष्ठ स्तरावर चर्चा सुरू असून याबाबतही तातडीने तोडगा काढण्यात येत असल्याचे डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले. 
या बैठकीत खेड-सिन्नर, संत तुकाराम पालखीमार्ग, संत ज्ञानेश्वर पालखी मार्ग, पुणे विभागातील सांगली व सोलापूर जिल्ह्यातून जाणारा रत्नागिरी-नागपूर महामार्ग या रस्त्यांच्या कामाचा व त्यासाठी आवश्यक भूसंपादनाच्या कामाचा आढावा घेण्यात आला.
या बैठकीला सातारा, सांगली, सोलापूर, पुणे जिल्ह्यातील भूसंपादन अधिकारी तसेच एनएचएआयचे अधिकारी उपस्थित होते.
*****




गावनिहाय शेतकऱ्यांच्या भूसंपादनाचे प्रस्ताव सादर करा डॉ.दीपक म्हैसेकर



पुणे दि. 9: पुणे विभागात रेल्वेच्या कामासाठी आवश्यक असणाऱ्या भूसंपादन प्रक्रीयेला गती द्यावी, त्यासाठी गावनिहाय शेतकऱ्यांच्या भूसंपादनाचे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज केल्या.
            येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात पुणे विभागातील रेल्वेमार्ग भूसंपादनाबाबत आढावा बैठक विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम, साताऱ्याच्या जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, उपायुक्त जयंत पिंपळगावकर, रेल्वेच्या पुणे विभागाचे उपमुख्‍य अभियंता सचिन पाटील, मिरज विभागाचे कार्यकारी अभियंता सागर चौधरी, अभियंता विकास कुमार, सोलापूरचे भूसंपादन अधिकारी हेमंत निकम, फलटणचे प्रांताधिकारी शिवाजी जगताप, कराडचे प्रांताधिकारी उत्तम डिगले, कोरेगावच्या प्रांताधिकारी किर्ती नलावडे, पंढपूरचे रविंद्र  पिसे, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) सुरेखा माने, रेल्वेचे कायदे सल्लागार ॲड. जितेंद्र पाटील उपस्थित होते.
            डॉ. दीपक म्हैसेकर म्हणाले, पुणे विभागातील रेल्वेमार्गाच्या कामाचा आढावा रेल्वे मंत्र्यांनी घेतला असून ही कामे तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. रेल्वेमार्गासाठी आवश्यक असणाऱ्या भूसंपादनाच्या कामाला गती देण्याची आवश्यकता आहे. रेल्वेमार्गासाठी नेमक्या किती जमिनीची आवश्यकता आहे, त्यासाठी किती शेतकऱ्यांच्या जमिनी जातात, याचा आराखडा तयार करावा. तसेच ज्या ठिकाणी रेल्वेमार्गावर अंडर पास अथवा जोड रस्त्यांची आवश्यकता आहे, त्याची ही माहिती तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. या कामाला प्राधान्य देण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
            यावेळी बारामती-फलटण-लोणंद ब्रॉड गेज नवीन लाईन, पुणे-मिरज ब्रॉड गेज दुहेरी रेल्वे लाईन, कराड रेल्वे लाईनच्या मार्गासाठीच्या भूसंपादनाचा आढावा घेण्यात आला.
*****




सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा 116 वा पदवीदान समारंभ संपन्न विद्यार्थ्यांनी समाजासह देशाच्या उभारणीत योगदान द्यावे - राज्यपाल भगत सिंह कोश्यारी



         पुणे दि. 8 (विमाका): विद्यार्थ्यांनी सुरुवातीपासूनच निश्चित ध्येय डोळ्यासमोर ठेवून उद्दिष्ट  प्राप्तीसाठी पूर्ण क्षमतेने प्रयत्न करावेत. स्व:तावर विश्वास ठेवून आपल्या बौद्धिक संपदेचा वापर  समाजाच्या आणि देशाच्या  उभारणीसाठी करण्याचे आवाहन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज केले.
             येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा एकशे सोळावा पदवीदान समारंभ विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी फरिदाबाद (हरियाणा) येथील ट्रान्सलेशनल आरोग्य विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेच्या कार्यकारी संचालक प्रा. डॉ. गगनदीप कंग, विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. नितीन करमळकर,  प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी,  कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, परीक्षा विभागाचे संचालक अरविंद शाळीग्राम, विज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ. मनोहर चासकर उपस्थित होते.
                राज्यपाल भगत सिंह कोश्यारी म्हणाले, आपल्या देशात मुबलक मनुष्यबळ आहे.उच्च क्षमतेची बौध्दिक संपदा आहे.त्याचा वापर देशाच्या उभारणीसाठी करण्याची आवश्यकता आहे. विद्यार्थ्यांनी वाईट विचार व वाईट कृती यांपासून दूर राहावे. चांगल्या लोकांची संगत करावी. चांगल्या संगतीमुळे योग्य मार्ग निश्चितच मिळतो. आज या ठिकाणाहून विविध क्षेत्रातील पदवी प्राप्त  विद्यार्थी नव्या दिशेने निघाले आहेत. या नव्या दिशेने जाताना आत्मविश्वासाने मार्गक्रमण करावे, अपयशाला कधीही घाबरु नका असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
              सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची कामगिरी नेत्रदिपक असल्याचे सांगत श्री. कोश्यारी म्हणाले, विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यापीठाने चांगली प्रगती केली आहे. विद्यार्थी हेच विद्यापीठाच्या प्रगतीचा पाया आहेत. त्यांच्या कामगिरीवरच विद्यापीठाचे मानक ठरत असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या विद्यापीठाचे नाव उंचाविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.
             डॉ. गगनदीप कंग म्हणाल्या, सावित्रीबाई फुले यांच्या नावाचा पुणे विद्यापीठाला मोठा वारसा आहे. विद्यार्थ्यांमध्ये नव्या संकल्पना, ज्ञान आणि कौशल्यांचा विकास करणे हाच शिक्षणाचा मुख्य उद्देश आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्यात समाजभान जागृत करणे आवश्यक आहे. पदवी प्राप्त करून नव्या जगात प्रवेश करताना शूर, जबाबदार आणि स्वयंपूर्ण बनण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
          यावेळी विद्यापीठातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना राज्यपालांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी राज्यपालांच्या हस्ते 'सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ वार्ता' अंकांचे प्रकाशन करण्यात आले.
            कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ. नितीन करमळकर यांनी विद्यापीठाच्या विविध योजनांसह प्रगतीचा आढावा घेतला. या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, शिक्षण तज्ज्ञ, पालक, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

****






माळशेजघाट येथे 10 जानेवारीपासून "माळशेज पतंग महोत्सव" पर्यटकांनी सहभागी होण्याचे आवाहन




पुणे, दि. 6 (विमाका) : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्यावतीने (एमटीडीसी) माळशेजघाट (जि. पुणे) येथील पर्यटक निवास येथे माळशेज पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 10, 11 12 जानेवारी 2020 रोजी होणाऱ्या या महोत्सवात पर्यटकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे यांनी केले आहे.
येणाऱ्या संक्रात सणाचे औचित्य साधून या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 10 ते 12 जानेवारी दरम्यान सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत विविध कार्यक्रम आयोजित होतील. महोत्सवामध्ये सहभागी होण्याकरिता प्रति व्यक्ती 50 रूपये प्रवेश शुल्क आहे. महोत्सवाच्या ठिकाणी पतंग, मांजा व इतर साहित्य खरेदीसाठी स्टॉल असेल. महोत्सव पर्यावरणपूरक असून परिसरामधील पशु, पक्षी यांना कोणतीही हानी अथवा इजा होणार नाही याची संपूर्ण खबरदारी व दक्षता घेण्यात येणार आहे. प्रतिबंध करण्यात आलेल्या कोणत्याही प्रकारच्या मांज्याचा महोत्सवामध्ये वापर करण्यात येणार नाही. हा महोत्सव प्रथमच आयोजित होत असून महोत्सवामध्ये बिन मांज्याचे पतंग, ड्रोन पतंगबाजी ही प्रमुख वैशिष्ट्ये असणार आहेत.
एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे म्हणाले की, राज्यातील एमटीडीसीच्या रिसॉर्टस् तथा पर्यटक निवासांचा आता कायापालट होत असून पर्यटकांना त्याकडे आकर्षित करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहीमेअंतर्गत माळशेजघाट येथे आतापर्यंत द्राक्षे महोत्सव, आंबा महोत्सव यांचे आयोजन करुन पर्यटकांना आकर्षित करण्यात आले आहे. आता पतंग महोत्सवाच्या माध्यमातून या पर्यटनस्थळाकडे पर्यटकांना पुन्हा आकर्षित करुन तेथील पर्यटनाला चालना देण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.    
महोत्सवामध्ये पर्यटकांना महिला बचतगटांच्या माध्यमातून बनविण्यात येणाऱ्या विविध स्थानिक खाद्य पदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे. ग्रामीण कलाकारांच्या कलाकृतींचे स्टॉलही उभारण्यात येणार आहेत. त्याचबरोबर सेंद्रीय खताद्वारे उत्पादीत शेतमालाची विक्री करण्यात येणार आहे. आदीवासी नृत्य, महिला लेझीम पथक, गोफ कला या विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असून पर्यटकांना बैलगाडी सफारीचाही आनंद घेता येणार आहे.
पर्यटकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन पतंग महोत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे, वरिष्ठ व्यवस्थापक क्षिप्रा बोरा, माळशेजघाट पर्यटक निवासचे व्यवस्थापक विष्णू गाडेकर यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी माळशेजघाट पर्यटक निवासचे व्यवस्थापक विष्णु गाडेकर यांना 9373808151, 7768036332, 9881143180, 7038890500, 9823714878 या क्रमांकावर संपर्क साधावा.

*****





सार्वजनिक बांधकाम कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्यावतीने सभासदांच्या गुणवंत पाल्यांसह अभियंता-कर्मचाऱ्यांचा सत्कार



पुणे, दि.4 (विमाका): सार्वजनिक बांधकाम कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्यावतीने संस्थेच्या सभासदांच्या पाल्यांचा तसेच गुणवंत अभियंता व कर्मचाऱ्यांच्या सत्कार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या "भारतरत्न डॉ. सर विश्वेश्वरय्या सभागृहात करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता सदाशिव साळुंखे उपस्थित होते.
या कार्यक्रमा दरम्यान 46 गुणवंत विद्यार्थी व 16 कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यकारी अिभियंता मिलींद बारभाई, जे. आर. विभुते, पतसंस्थेचे अध्यक्ष प्रताप धापटे, अधिक्षक अभियंता प्रशांत औटी, उपमुख्य वास्तुशास्त्रज्ञ चेतन आक्रे, प्रभारी अधिक्षक अभियंता जयकर थोरात, अधिक्षक अभियंता सुरेश नलावडे उपस्थित होते.
यावेळी डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, सरकारी अधिकारी व कर्मचारी यांची मुलं म्हटल्यानंतर अनेकदा समाजाकडून जास्त अपेक्षा केल्या जातात व त्याचे दडपण निर्माण होते, परंतु अपेक्षांच्या ओझ्याखाली दडपून न जाता त्यावर उभे राहत स्वत:ला सिध्द करावे. डॉ. कोल्हे पुढे म्हणाले, लोकप्रतिनिधी या पदाकडे मी पाच वर्षांचा जॉब म्हणून पहातो. विकासकामे करण्यासाठी मला तुमच्यासारख्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाची गरज आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने माझ्यासारख्या नव्याने आलेल्या लोकप्रतिनीधीला दिशा दाखविण्याचे काम केले, त्याबद्दल त्यांचा मी आभारी आहे.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अजीम नवाज राही यांनी केले, तर आभार प्रशांत वाघ यांनी मानले. या कार्यक्रमाला सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी, कर्मचारी व त्यांचे कुटुंबिय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*****

सार्वजनिक बांधकाम कर्मचारी सहकारी पतसंस्थेतर्फे गुणवंत विद्यार्थी व कर्मचाऱ्यांचा सन्मान



पुणे, दि.3 (विमाका) :-  सार्वजनिक बांधकाम कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या वतीने संस्थेच्या सभासदांच्या पाल्यांचा तसेच गुणवंत अभियंता व कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष प्रताप धापटे यांनी पत्राद्वारे दिली आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिरुरचे खासदार व अभिनेते डॉ.अमोल कोल्हे उपस्थित रहाणार आहेत.
पत्रात नमूद केल्याप्रमाणे, हा कार्यक्रम 4 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता कॅम्पमधील भरतरत्न सर विश्वेश्वराय्या सभागृहात होणार असून या कार्यक्रमाला सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता सदाशिव साळुंखे अध्यक्ष म्हणून लाभणार आहेत. इयत्ता पाचवी ते बारावीच्या उत्तीर्ण पाल्यांचा शैक्षणिक गुणवत्तेचा गुणगौरव तसेच सार्वजनिक बांधकाम  विभागामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त गुणवंत अभियंते व कर्मचाऱ्यांचाही सन्मान करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
*****

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम प्रभावीपणे राबवा - डॉ दीपक म्हैसेकर



         पुणे दि. 2 (विमाका): युवा वर्गात उद्योजकतेची प्रेरणा निर्माण होण्यासाठी सहाय्यभूत ठरणारी सर्वसमावेशक स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देणारी महत्वाकांक्षी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज केल्या.
येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात विभागीय आयुक्त कार्यालय आणि महाराष्ट्र उद्योजकता केंद्र (एमसीइडी) शिवाजीनगर, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत विभागीय कार्यशाळेचे उदघाटन विभागीय आयुक्त डॉ दीपक म्हैसेकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पुणे विभागाचे उद्योग सहसंचालक सदाशिव सुरवसे, उपायुक्त (महसूल) प्रताप जाधव, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट तज्ज्ञ विजय जाधव,  उद्योग संचालनालयाचे  अधीक्षकीय उद्योग अधिकारी सुरेश लोंढे, पी. डी. रेंदाळकर, बँक ऑफ महाराष्ट्रचे असिस्टंट जनरल मॅनेजर अभिनव  काळे, एमसीइडीचे विभागीय अधिकारी मदनकुमार शेळके, यु. डी. क्षीरसागर, उपस्थित होते. 
डॉ दीपक म्हैसेकर म्हणाले, मोठया प्रमाणावर रोजगार निर्मिती होण्यासाठी, सुलभ वित्तपुरवठा उपलब्ध करुन स्थानिक तरुणांना स्वयं-रोजगाराकडे आकर्षित करुन सुक्ष्म लघु उपक्रम स्थापित करणे हा मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (सीएमईजीपी) योजनेचा उद्देश आहे. ही योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे.
प्रास्ताविकात सदाशिव सुरवसे म्हणाले, राज्यातील युवक-युवतींना स्वयंपूर्ण आत्मनिर्भर बनविण्यासाठी, त्यांचे स्वयंरोजगार प्रकल्प राज्य शासनाच्या आर्थिक सहाय्यातून सुलभतेने निर्माण होण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना राबविण्यात येत आहे. पुढील पाच वर्षात सुमारे 1 लाख सुक्ष्म लघु उपक्रम स्थापित करून त्या माध्यमातून एकूण 10 लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याचे प्रमुख उद्दीष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी अभिनव काळे, सरेश लोंढे, पी.डी. रेंदाळकर यांनी सादरीकरण केले. या कार्यशाळेस अंमलबजावणी यंत्रणा, बँकेचे अधिकारी संबंधित अधिकारी उपस्थित होते.
*****