Friday, January 10, 2020

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा 116 वा पदवीदान समारंभ संपन्न विद्यार्थ्यांनी समाजासह देशाच्या उभारणीत योगदान द्यावे - राज्यपाल भगत सिंह कोश्यारी



         पुणे दि. 8 (विमाका): विद्यार्थ्यांनी सुरुवातीपासूनच निश्चित ध्येय डोळ्यासमोर ठेवून उद्दिष्ट  प्राप्तीसाठी पूर्ण क्षमतेने प्रयत्न करावेत. स्व:तावर विश्वास ठेवून आपल्या बौद्धिक संपदेचा वापर  समाजाच्या आणि देशाच्या  उभारणीसाठी करण्याचे आवाहन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज केले.
             येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा एकशे सोळावा पदवीदान समारंभ विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी फरिदाबाद (हरियाणा) येथील ट्रान्सलेशनल आरोग्य विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेच्या कार्यकारी संचालक प्रा. डॉ. गगनदीप कंग, विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. नितीन करमळकर,  प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी,  कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, परीक्षा विभागाचे संचालक अरविंद शाळीग्राम, विज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ. मनोहर चासकर उपस्थित होते.
                राज्यपाल भगत सिंह कोश्यारी म्हणाले, आपल्या देशात मुबलक मनुष्यबळ आहे.उच्च क्षमतेची बौध्दिक संपदा आहे.त्याचा वापर देशाच्या उभारणीसाठी करण्याची आवश्यकता आहे. विद्यार्थ्यांनी वाईट विचार व वाईट कृती यांपासून दूर राहावे. चांगल्या लोकांची संगत करावी. चांगल्या संगतीमुळे योग्य मार्ग निश्चितच मिळतो. आज या ठिकाणाहून विविध क्षेत्रातील पदवी प्राप्त  विद्यार्थी नव्या दिशेने निघाले आहेत. या नव्या दिशेने जाताना आत्मविश्वासाने मार्गक्रमण करावे, अपयशाला कधीही घाबरु नका असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
              सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची कामगिरी नेत्रदिपक असल्याचे सांगत श्री. कोश्यारी म्हणाले, विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यापीठाने चांगली प्रगती केली आहे. विद्यार्थी हेच विद्यापीठाच्या प्रगतीचा पाया आहेत. त्यांच्या कामगिरीवरच विद्यापीठाचे मानक ठरत असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या विद्यापीठाचे नाव उंचाविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.
             डॉ. गगनदीप कंग म्हणाल्या, सावित्रीबाई फुले यांच्या नावाचा पुणे विद्यापीठाला मोठा वारसा आहे. विद्यार्थ्यांमध्ये नव्या संकल्पना, ज्ञान आणि कौशल्यांचा विकास करणे हाच शिक्षणाचा मुख्य उद्देश आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्यात समाजभान जागृत करणे आवश्यक आहे. पदवी प्राप्त करून नव्या जगात प्रवेश करताना शूर, जबाबदार आणि स्वयंपूर्ण बनण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
          यावेळी विद्यापीठातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना राज्यपालांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी राज्यपालांच्या हस्ते 'सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ वार्ता' अंकांचे प्रकाशन करण्यात आले.
            कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ. नितीन करमळकर यांनी विद्यापीठाच्या विविध योजनांसह प्रगतीचा आढावा घेतला. या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, शिक्षण तज्ज्ञ, पालक, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

****






No comments:

Post a Comment