Saturday, December 12, 2020

मतवाली मनचली कविताएँ’या कवितासंग्रहाचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हस्ते प्रकाशन






 

मतवाली मनचली कविताएँया कवितासंग्रहाचे

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हस्ते प्रकाशन

            पुणे, दि. 12: ‘मतवाली मनचली कविताएँया कवितासंग्रहाचे प्रकाशन आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे झाले.

          उत्तराखंड येथील देवयानी मुंगली  यांच्या लेखनीतून साकारालेला मतवाली मनचलीकवितासंग्रहातील कविता लहान मुलांना शौर्याचे धडे देतात. कवितासंग्रह वाचनातून पुन्हा एकदा पुस्तकांच्या विश्वात रममाण व्हावे वाटत आहे. देवयानी मुंगली यांच्या कविता मनाला भावणाऱ्या आहेत. लहान मुलांसाठी हा कवितासंग्रह वाचनीय असल्याचे सांगतानाच येणाऱ्या कालावधीत आणखी चांगल्या रचना देवयानी यांच्या लेखनीतून पुढे येतील, असा विश्वास राज्यपाल कोश्यारी यांनी व्यक्त केला.

          प्रास्ताविक प्रणित मुंगली यांनी तर आभार श्रीमती देवयानी मुंगली यांनी मानले. यावेळी संस्कृती परिवारातील सदस्य तसेच नागरिक उपस्थित होते.

00000

 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पेरणे विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम प्रतिकात्मक स्वरुपात शांततेने, संयमाने साजरा करुया-जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख





 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पेरणे विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम प्रतिकात्मक स्वरुपात शांततेने, संयमाने साजरा करुया-जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

            पुणे दि.१२- हवेली तालुक्यातील पेरणे फाटा (कोरेगाव भिमा) येथे १ जानेवारी रोजी विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम साजरा केला जातो. यावर्षी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव विचारात घेऊन हा कार्यक्रम प्रतिकात्मक स्वरूपात

शांततेने, संयमाने साजरा करुया, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले.

कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मौजे पेरणे (कोरेगाव भिमा) येथील विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाची नियोजन आढावा बैठक आज जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मौजे पेरणे (कोरेगाव भिमा) येथील विजयस्तंभाजवळ घेण्यात आली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, विवेक पाटील, उप विभागीय अधिकारी सचिन बारावकर, तहसीलदार सुनील कोळी, लैला शेख तसेच संबंधित  विभागांचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

     डॉ.देशमुख म्हणाले,  आपल्या राज्यासह देश आणि जग कोरोना विरुद्ध लढत आहे. कोरोना विषाणूवर अद्यापपर्यंत लस आलेली नाही. तसेच कोरोना विषाणूची दुसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांनी कार्यक्रमास गर्दी करु नये. अशा परिस्थितीत योग्य पध्दतीने अभिवादन कार्यक्रम साजरा करत असतांना आपल्या सर्वांच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी प्रशासनावर आहे. हा कार्यक्रम शांततेने आणि सुरळीत पार पाडण्यासाठी सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी केले.  बैठकीपूर्वी विजयस्तंभास जिल्हाधिकारी डॉ देशमुख यांनी अभिवादन केले.

जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख म्हणाले, विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम साजरा करीत असतांना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना नागरिकांनी सहकार्य करावे.  कोरोना  संकट लक्षात घेऊन यावर्षी सर्व सण-समारंभ साधेपणाने साजरे करण्यात आले आहेत. पेरणे विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमात गर्दी होऊन कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही, याची दक्षता घेत कार्यक्रम साजरा करुया, असे आवाहनही जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ देशमुख यांनी केले.

00000

कोणत्याही क्षेत्रात समर्पित भावनेने काम केल्यास यश निश्चित मिळते-राज्यपाल भगतसिंह कोश्यारी द लेक्सिकॉन लिडरशीप ॲवार्ड’ कार्यकम

 

कोणत्याही क्षेत्रात समर्पित भावनेने काम केल्यास यश निश्चित मिळते-राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

द लेक्सिकॉन लिडरशीप ॲवार्डकार्यकम

            पुणे, दि. १२: कोणत्याही क्षेत्रात समर्पित भावनेने काम केल्यास यश निश्चित मिळते, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

वाघोली लेक्सीकॉन कॅम्पस येथे राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा  द लेक्सिकॉन लिडरशीप ॲवार्डने सन्मान करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री यांचे सल्लागार डॉ. दिपक म्हैसेकर, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, लेक्सीकॉनचे संस्थापक एस.डी. शर्मा, अध्यक्ष पंकज शर्मा, उपाध्यक्ष नीरज शर्मा, लेक्सीकॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी नासीर शेख उपस्थित होते. यावेळी पिंपरी चिंचवडचे मनपा आयुक्त डॉ. श्रावण हर्डीकर, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, रंजनकुमार शर्मा, मेट्रोचे कार्यकारी संचालक रामनाथ सुब्रमण्यम यांच्यासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

            राज्यपाल कोश्यारी म्हणाले, लेक्सीकॉन संस्थेने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करून आदर्श समोर ठेवला आहे. समाजातील इतरांसमोर या सन्मानार्थींचे कार्य प्रेरणादायी असणार आहे, त्यामुळे असे उपक्रम महत्त्वाचे ठरतात. कोणतेही कार्य करण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन महत्त्वाचा असून कोणत्याही क्षेत्रात समर्पित भावनेने काम केले तर निश्चितपणे यश मिळते. लेक्सीकॉन संस्थेच्या माध्यमातून शर्मा बंधूंनी प्रेरणादायी काम उभे केले आहे. यापुढील काळातही संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य घडेल, असा विश्वास राज्यपाल कोश्यारी यांनी व्यक्त केला.

            प्रास्ताविक उपाध्यक्ष नीरज शर्मा यांनी तर आभार लेक्सीकॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी नासीर शेख यांनी मानले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरिक, विद्यार्थी उपस्थित होते.

00000