Friday, May 18, 2018

पिरंगुटच्या तलाठी कार्यालयाला विभागीय आयुक्तांची भेट ऑनलाईन कामकाजाची केली पाहणी:जून अखेरपर्यंत काम पूर्ण करण्याच्या सूचना



पुणे दि. 18: मुळशी तालुक्यातील पिरंगुटच्या तलाठी कार्यालयाला विभागीय आयुक्त दिपक म्हैसेकर यांनी अचानक भेट देवून तेथील ऑनलाईन कामकाजाची पाहणी केली. डिजीटल 7/12च्या कामकाजाचा आढावा घेवून कामाला गती देण्याच्या सूचना केल्या.
यावेळी उपायुक्त (महसूल) प्रताप जाधव, मावळ-मुळशीचे उपविभागीय अधिकारी सुभाष भागडे, विभागीय आयुक्त कार्यालयातील महसूलचे तहसिलदार दगडू कुंभार, मुळशीचे तहसिलदार प्रमोद घाडगे, नायब तहसिलदार भगवान पाटील, मंडल अधिकारी गणेश कदम, तलाठी हनुमंत चांदेकर उपस्थित होते.
  शासनाच्या लोकाभिमूख प्रशासन कार्यक्रमातील ई चावडी अंतर्गत गाव नमुना नं. 7/12 डिजीटल स्वाक्षरी करून तो ऑनलाईन उपलब्ध करून द्यायचा आहे, या कामकाजाची पाहणी विभागीय आयुक्त श्री. म्हैसेकर यांनी केली. मुळशी तालुक्यातील 1 लाख 21 हजार सात बारांपैकी 26 हजार सातबारे हे डिजीटल स्वाक्षरीचे झाले असून उर्वरीत कामकाज जून अखेरपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
तसेच ज्या गावांचे घोषणापत्र झालेले आहे, अशा गावांमध्ये खरेदी विक्रीच्या नोंदी या केवळ ऑनलाईन टाकण्याच्या सूचना विभागीय आयुक्तांनी दिल्या. महाभूमीलेख संकेत स्थळावर जावून त्यांनी आपले सरकार, ई चावडी मधील प्रत्यक्ष कामकाजाची पाहणी केली. नवीन शर्तीच्या नोंदीबाबत म्हणजे 1 क मधील नोदींची फेरतपासणी करण्याचे निर्देश दिले. 
सामान्य जनतेला डिजीटल स्वाक्षरी असणारे 7/12 कसे मिळतील याची प्रात्यक्षिकासह माहिती जमाबंदी आयुक्त कार्यालयातील उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी दिली. यावेळी विभागीय आयुक्त श्री. म्हैसेकर यांनी भरे गावातील काही 7/12 व 8 अ च्या नोंदीची, गावचा हस्तलिखीत 1 क व संगणीकृत 1 क ची तपासणी केली. डिजीटल 7/12 च्या पिरंगुट येथील कामकाजाबद्दल विभागीय आयुक्तांनी समाधान व्यक्त केले.
*****




पुणे विभागाला 1 कोटी 55 लाखाचे वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट उत्तम नियोजनाबरोबरच पारदर्शकता ठेवा - वनमंत्री सुधीर मुनगंटीवार



·         प्रत्येक विभागाच्या बजेटमधून वृक्ष लागवड-संवर्धनासाठी 0.5 टक्के निधी वापरण्याची तरतूद.
·         शेततळ्यांच्या बाजूला बांबू लागवडीवर भर.
·         पुणे, राहुरी आणि अमरावती विद्यापीठात बांबू पासून वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण देणार.
·         तूती लागवडीच्या क्षेत्रात वाढ करून रेशीम उद्योगाला चालना देणार.
·         फलोत्पादनाची मर्यादा 4 हेक्टरवरून 6 हेक्टर वाढविली.
·         वृक्ष लागवडी बरोबरच वृक्ष जगण्याच्या प्रमाण वाढविण्यावर भर.
·         केंद्र सरकारच्या पाहणीत वनेतर क्षेत्र, कांदळवन, बांबू लागवडीत महाराष्ट्र देशात अव्व्ल.
·         वनेत्तर क्षेत्रात राज्यात 273 स्क्वेअर किलोमीटर वाढ.
·         कांदळवन क्षेत्रात राज्यात 82 स्क्वेअर किलोमीटर वाढ.
·         बांबू लागवड क्षेत्रात राज्यात 4 हजार 465 स्क्वेअर किलोमीटर वाढ.
·         ‘रानमळ्या’च्या धर्तीवर राज्याभर ग्रामीण व नागरी क्षेत्रात रानमळ्याच्या धर्तीवर उपक्रम राबविणार.
·         येत्या वर्षात हरीत सैनिकांची संख्या 1 कोटींवर नेणार.
पुणे, दि. 17    पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी 2019 पर्यंत 50 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठरविण्यात आले असून यावर्षी 1 ते 31 जुलै दरम्यान 13 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट आहे. पुणे विभागासाठी 1 कोटी 55 लक्ष 90 हजाराचे उद्दिष्ट  देण्यात आले असून त्या त्या जिल्हयाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे. आजच्या विभागीय आढावा बैठकीत संबंधित यंत्रणेने आपले सादरीकरण केले, यावेळी बोलताना वित्त व नियोजन तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उत्तम नियोजनाबरोबरच पारदर्शकता ठेवा आणि विविध संस्था, संघटना व लोकप्रतिनिधींना सहभागी करुन घ्या, असे आवाहन बैठकीत केले.
विधान भवनाच्या सभागृहात पुणे विभागातील कोल्हापूर, सातारा, पुणे, सोलापूर व सांगली  जिल्हयाची आढावा बैठक सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, सांगलीचे पालकमंत्री सुभाष देशमुख, सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख, साताऱ्याचे पालकमंत्री विजय शिवतारे, खासदार सर्वश्री उदयनराजे भोसले, शिवाजीराव आढळराव-पाटील, अनिल शिरोळे, पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नानासाहेब देवकाते-पाटील, सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, आमदार सर्वश्री गणपतराव देशमुख, बबनराव शिंदे, आनंदराव पाटील, प्रशांत परिचारक, विजय काळे, जगदिश मुळीक, भीमराव तापकीर, आमदार मेधा गाडगीळ, वन विभागाचे सचिव विकास खारगे, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) व्ही. के. आगरवाल, मुख्य वनसंरक्षक (सामाजिक वनीकरण) अनुराग चौधरी, मुख्य वनसंरक्षक (उत्पादन व नियोजन) एस. एच. पाटील, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, मनपा आयुक्त, कृषी, वन, जलसंपदा व विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित  होते.
प्रारंभी विभागीय आयुक्त यांनी आपल्या प्रस्ताविकात पुणे विभागात वृक्ष लागवडीचे 1 कोटी 55 लाख 90 हजारांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून 2 कोटी 99 लक्ष रोपे उपलब्ध आहेत. 1 कोटी 17 लक्ष 72 हजार खड्‌याचे उद्दिष्ट असून आतापर्यंत 76 टक्के खड्डे खोदून झाले आहेत.  हरीत सेनांचे उद्दिष्ट 13 लाख 64 हजाराचे असून 7 लाख 10 हजाराचे उद्दिष्ट साध्य झाले आहे. उर्वरित उद्दिष्ट पूर्ण करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. वृक्ष लागवडीसाठी 2 लाख 63 हजार 748 हेक्टर क्षेत्र उपलब्ध असून त्याची लांबी 39 हजार 219 किलोमीटर एवढी आहे. वन, सामाजिक वनीकरण, ग्रामपंचायत या बरोबरच 33 विभागांना  वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.
गत दोन वर्षातही या विभागात चांगले काम झाले आहे. 2016 या वर्षात राज्यात 2 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट होते. पुणे विभागाला 21 लाख व 30 हजाराचे उद्दिष्ट देण्यात आले. यापैकी 48.4 लक्ष वृक्ष लागवड करुन 227 टक्के काम पूर्ण झाले.  त्यापैकी जिवंत वृक्षांचे प्रमाण 73 टक्के एवढे आहे.
2017 यावर्षी राज्यात 4 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट असताना पुणे विभागात 56 लाख 9 हजाराचे उद्दिष्ट दिले होते. गतवर्षी विभागाने 61 लाख 3 हजार वृक्ष लागवड करुन 108 टक्के काम पूर्ण केले. जिवंत वृक्षाचे प्रमाण 81 टक्के आहे. यावर्षी हरित सेनाचे उद्दिष्ट 13 लक्ष 64 हजार असून 7 लाख 6 हजार 989 एवढी नोंदणी पूर्ण झाली आहे. ती देखील लवकरच पूर्ण होईल.
·         वृक्ष लागवडीसाठी उपलब्ध क्षेत्र
वृक्ष लागवडीसाठी वन विभागाचे 17 हजार 745 हेक्टर, खाजगी क्षेत्र 82 हजार 12 हेक्टर, रस्ते कॅनॉल, रेल्वे 36 हजार 884 किलोमीटर, नदी किनारी क्षेत्र अंतर्गत वनविभाग 4 हजार 256 हेक्टर, शासकीय क्षेत्र 7 हजार 822 हेक्टर खाजगी क्षेत्र 2 लाख 21 हजार 470 हेक्टर, याप्रमाणे जागा वृक्ष लागवडीसाठी उपलब्ध आहे. याशिवाय वन आणि पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या 285 अशासकिय संस्थांचा सहभाग असणार आहे. 1 ते 31 जुलै  2018 दरम्यान वृक्ष लागवड करण्यासाठी वनविभागने खड्डे खोदण्याचे काम 100 टक्के पूर्ण केले आहे.
यावेळी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकरी, मनपा आयुक्त नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, कृषी विभागाचे अधिकारी यांच्याकडून माहिती  जाणून घेतल्यानंतर वनमंत्री सुधीर मुनगंटीवर पुढे म्हणाले, हे काम केवळ शासकीय स्वरुपाचे नाही. यामध्ये संस्था, संघटना  व व्यक्तींचा सहभाग असल्याशिवाय उद्दिष्ट पूर्ण होणार नाही. सार्वजनिक जागेबरोबरच, रस्त्याच्या दुतर्फा, शाळा, कॉलेज प्रत्येकाच्या घरासमोर झाडे लावली पाहिजेत. जल है तो कल हैअसे सांगून ते पुढे म्हणाले, पर्यावरणाचा दिवसेंदिवस ऱ्हास होत आहे. भविष्यकाळ चिंतेचा असणार आहे. त्यामुळे वृक्ष लागवड करणे क्रमप्राप्त आहे. आपल्या वृक्ष लागवडीच्या मोहिमेची दखल देशपातळीवर घेण्यात आली आहे. दिवसेंदिवस उत्तम प्रतिसाद मिळत आहे. तेव्हा अधिकारी व लोकप्रतिनीधींनी एकजुटीने काम करावे, आणि वृक्ष लागवडीचा उच्चांक प्रस्थापित करावा,असे आवाहन त्यांनी केले.
*****







Sunday, May 13, 2018

भूसंपादनाच्या अडचणी येणार नाही-मुख्यमंत्री फडणवीस रस्त्यांची कामे जलदगतीने पूर्ण करा-केंद्रीय मंत्री गडकरी



पुणे, दि. 12 –राष्ट्रीय महामार्गांची कामे जलदगतीने पूर्ण करण्यासाठी तात्काळ भूसंपादन प्रक्रिया राबवावी. त्या अनुशंगाने आवश्यक त्या सर्व सूचना संबंधित यंत्रणांना दिल्या असल्याने या प्रक्रियेला आता अडचणी येणार नाहीत, अशी माहिती  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. दरम्यान, राष्ट्रीय महामार्गांची पुणे विभागातील कामे जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिले.
येथील विधानभवनाच्या सभागृहात आज राष्ट्रीय महामार्गांची पुणे विभागातील विविध कामे आणि पुणे महानगर विकास प्राधीकरणाच्या अंतर्गत सुरु असणाऱ्या कामांचा आढावा केंद्रीय  रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी घेतला. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री  गिरीश बापट, राज्यमंत्री विजय शिवतारे, समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर मुक्ता टिळक, खासदार संजय काकडे, खासदार अमर साबळे, खासदार वंदना चव्हाण, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, खासदार अनिल शिरोळे, खा. श्रीरंग बारणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव आशिषकुमार सिंह, वन विभागाचे सचिव विकास खारगे, विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर,  जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, महापालिका आयुक्त सौरव राव, पीएमआरडीएचे आयुक्त किरण गीते आदींसह विधीमंडळ सदस्य, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
श्री. फडणवीस म्हणाले, राष्ट्रीय रस्ते विकास प्राधिकरणामार्फत विविध ठिकाणी महामार्गांचे काम गतीने सुरु आहे. मात्र, काही ठिकाणी अद्यापही भूसंपादनाच्या अडचणीमुळे ही प्रक्रिया संथ झाली आहे. त्यामुळे विविध यंत्रणांनी एकत्रितपणे यासंदर्भात काम करावे आणि भूसंपादनाच्या प्रक्रियेला वेग द्यावा. त्या अनुषंगाने आवश्यक ते निर्देश राज्य शासनाने यापूर्वीच जारी केले असल्याचे त्यांनी सांगितले.
श्री. गडकरी म्हणाले, सध्या पुणे विभागात निविदा प्रक्रिया तसेच विकास प्रकल्प आराखडा तयार करण्याची प्रक्रिया 25 प्रकल्पांची सुरु असून त्याचा अंदाजित खर्च हा 22 हजार 834 कोटी  इतका आहे. सध्या 4 प्रकल्पांचे काम सुरु असून 477 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची कामे सुरु आहेत तर 6 प्रकल्पांची 344 किलोमीटर रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत.  सध्या संत ज्ञानेश्वर पालखी मार्ग, संत तुकाराम पालखी मार्ग, पुणे शहरातील चांदनी चौक एकात्मिक मार्ग, खंबाटकी घाटातील सहा पदरी बोगदा,  सोलापूर शहरातील उड्डाण पूल, राष्ट्रीय महामार्ग 166 वरील रत्नागिरी- कोल्हापूर मार्गावरील काम आणि नाशिक फाटा ते खेड या राष्ट्रीय महामार्ग 60 वरील कामे सध्या निविदास्तरावर आहेत. त्यासाठीची आवश्यक कामे पूर्ण करण्याच्या सूचना श्री. गडकरी यांनी दिल्या. पालखीमार्गाची भूसंपादनाची कामे 31 मे पूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
पुणे विभागातील राष्ट्रीय महामार्गाच्या कामांसंदर्भात पालकमंत्री गिरीष बापट यांच्या अध्यक्षतेखालील समिती स्थापन करण्यात आली आहे. या विभागातील कामांसंदर्भात येणाऱ्या अडचणींसंदर्भात राष्ट्रीय रस्ते विकास प्राधीकऱण, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, पुणे महानगर विकास प्राधीकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, भूसंपादन विभाग आदी यंत्रणांनी एकत्रितपणे बैठक घेऊन प्रश्न सोडवावेत आणि तात्काळ कामाला सुरुवात करावी. जे प्रश्न स्थानिक स्तरावर सुटणार नाहीत ते राज्याच्या अखत्यारितील असतील तर राज्य शासनाकडे आणि केंद्राच्या अखत्यारित असतील तर आपल्या विभागाकडे पाठविण्याच्या सूचना श्री. गडकरी यांनी दिल्या. महामार्गावरील लष्कराच्या ताब्यात असणाऱ्या जमीनींच्या हस्तांतरणाबाबतही पाठपुरावा करावा तसेच त्यासंदर्भात आपल्या विभागाला कळविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
विविध प्रकल्पासंदर्भात भूसंपादन किती झाले, उपलब्ध जमीन किती आहे, अतिरिक्त भूसंपादन किती करावे लागणार आहे, प्रकल्पाची सद्यस्थिती काय आहे आदींचा तपशीलवार आढावा श्री. गडकरी आणि मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी घेतला.  
पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्या कामांचा आढावाही त्यांनी घेतला. रिंग रोडचे काम पूर्ण झाल्यानंतर पुणे महानगराची वाहतुकीची समस्या सुटेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. वाहतुकीची समस्या सोडवणुकीसाठी सहा वेगवेगळ्या टप्प्यात ही कामे केली जाणार आहेत. या रिंग रोडची लांबी 128 किलोमीटर असणार आहे.  रिंग रोडच्या संदर्भातील सर्व अडचणींचे तात्काळ निराकरण करण्याचे स्पष्ट निर्देश श्री. गडकरी यांनी दिले. केंद्र शासन निधी द्यायला तयार आहे, मात्र, यंत्रणांनी आता स्थानिक पातळीवरील अडचणी तात्काळ मार्गी लावाव्यात, असे त्यांनी सांगितले.
यावेळी महामार्गांच्या कामांसंदर्भात विविध लोकप्रतिनिधींनी त्यांच्या भागातील वाहतूक कोंडी, वाहतुकीच्या समस्या आदी विषय मांडले आणि त्यासंदर्भात अडचणी तात्काळ सोडवण्याची मागणी केली.



शिवसृष्टी प्रकल्पासाठी धनादेशाचे वितरण • मुख्यमंत्री फडणवीस व केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते धनादेश सुपुर्द




पुणे दि.१२- आंबेगाव बुद्रुक येथे साकारण्यात येणाऱ्या शिवसृष्टी प्रकल्पासाठी जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट तर्फे सीएसआर अंर्तगत 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते  शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला. 
           यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे, आमदार माधुरी मिसाळ, आमदार जगदीश मुळीक, महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान ट्रस्टचे  विश्वस्त जगदीश कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी नितीन गडकरी म्हणाले, शिवसृष्टीनजीक वडगाव ते कात्रज चौक या उड्डाण पुल उभारणीसाठी 135 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. तसेच कात्रज येथील शिवसृष्टी मार्गे जाणा-या राष्ट्रीय महामार्गाचे सहापदरी रुंदीकरण करण्यात येणार असून या रस्त्यासाठी 116 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. तसेच या ठिकाणी सेवारस्ते व पादचारी मार्गही बांधण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. 
           आंबेगाव बुद्रुक येथे उभारण्यात येणारा हा प्रकल्प २१ एकर जमिनीवर महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान ट्रस्ट  तर्फे साकारण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा प्रस्तावित खर्च ३०२ कोटी रुपये आहे.  प्रकल्पाचे ४० टक्के काम पूर्ण झाले असून यासाठी आतापर्यंत 42 कोटी रुपये खर्च झाले आहेत. पहिल्या टप्प्यात सरकार वाड्याचे काम पूर्ण झाले आहे. तसेच दुसऱ्या टप्प्यातील भवानी माता स्मारक, राजसभा, रंगमंडळ व तटबंदी चे काम सुरु आहे. तिसऱ्या टप्यात माची, बाजारपेठ, आकर्षण केंद्र, कोकण, प्रेक्षागृह, अश्वशाळा याचे काम करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचा शिंदेशाही पगडी, कवडयांची माळ व शाल, श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ट्रस्टचे विश्वस्त श्री. कदम यांनी केले. 
           प्रारंभी साकारण्यात येत असलेल्या शिवसृष्टीची चित्रफित दाखविण्यात आली.










Friday, May 11, 2018

पालकमंत्री देशमुख यांचे हस्ते लोकराज्यच्या विशेषांकाचे प्रकाशन


सोलापूर दि. 10 :- चार वर्षे भारताच्या नवनिर्माणाची सर्वांची साथ, सर्वांचा विकास या संकल्पनेवर आधारित लोकराज्य मासिकाचे प्रकाशन पालकमंत्री विजय देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या प्रकाशन सोहळ्यास जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, बार्शीचे नगराध्यक्ष ॲड आसिफ तांबोळी, माजी आमदार राजेंद्र राऊत, अक्कलकोटचे माजी नगराध्यक्ष बसलिंगाप्पा खेडगी, जिल्हा माहिती अधिकारी रवींद्र राऊत उपस्थित होते.
राज्य शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने लोकराज्य मासिक प्रकाशित केले जाते. मे महिन्याच्या विशेषांक चार वर्षे भारताच्या नवनिर्माणाची सर्वांची साथ, सर्वाचा विकास या संकल्पनेवर आधारित आहे. या विशेषांकात पायाभूत सुविधा विकास, उच्च शिक्षण, उद्योगांचे सक्षमीकरण, मेक इन इंडिया, महिला शक्ती, महिला व बालकांचे संरक्षण, परिवर्तन घडविणाऱ्या योजना, आपले सरकार, आपले ॲप्स अशा विविध विषयांवरील लेखांचा समावेश आहे.
यावेळी पत्रकार विठ्ठल सुतार, राकेश कदम, अविनाश गायकवाड, तात्या लांडगे, हरिशचंद्र कदम, झाकीर पिरजादे आदी उपस्थित होते.

Wednesday, May 2, 2018

पुणे विभागीय आयुक्तपदाचा कार्यभार डॉ. दीपक म्हैसेकर यांनी स्वीकारला




पुणे दि. 2: पुणे विभागीय आयुक्तपदाचा कार्यभार डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज स्वीकारला. ते यापूर्वी नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एनएमआरडीए) आयुक्त आणि नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती म्हणून कार्यरत होते.
चंद्रकांत दळवी हे विभागीय आयुक्त पदावरून निवृत्त झाल्यानंतर हे पद रिक्त होते. दरम्यानच्या काळात  पुण्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी सौरभ राव, नोंदणी महानिरिक्षक अनिल कवडे यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता.
डॉ. म्हैसेकर हे पशुवैद्यक शास्त्राचे पदव्युत्तर पदवीधारक असून या विषयात त्यांना सुवर्णपदक मिळाले आहे. तसेच त्यांनी नागपूर विद्यापीठातून कायद्याची पदवीही प्राप्त केली आहे. 2010 सालच्या तुकडीचे ते आयएएस अधिकारी आहेत. त्यांच्या नांदेड महानगरपालिकेच्या आयुक्तपदाच्या कार्यकाळात नांदेडला पाणी पुरवठा आणि घनकचरा व्यवस्थापनात देशात दुसरा क्रमांक मिळला. तसेच राज्यस्तरीय ‘गाडगे महाराज स्वच्छता अभियाना’त पहिला क्रमांक मिळाला. तसेच बेसिक सर्व्हिस टू अर्बन पुअर (बीएसयूपी) अभियानांतर्गत झोपडपट्टीमुक्तीसाठी केलेल्या कामाला  त्यांच्या कारकीर्दीतच देशपातळीवरील पहिला पुरस्कार नांदेड महानगरपालिकेला मिळाला होता.
डॉ. म्हैसेकर यांच्या कोल्हापूर मुख्य कार्यकारी अधिकारीपदाच्या कार्यकाळात कोल्हापूरला यशवंत पंचायत राजचे राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार प्राप्त झाले आहेत. तसेच त्यांनी तीन वर्षाच्या चंद्रपूर जिल्हाधिकारी पदाच्या कालावधीत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. 
उत्तम प्रशासकीय अधिकारी अशी ओळख असलेल्या डॉ. म्हैसेकर यांना वाचनाची आवड आहे. डॉ. म्हैसेकर यांचे उपायुक्त  श्री. प्रताप जाधव आणि उपसंचालक (माहिती) मोहन राठोड यांनी स्वागत केले.

*****