Friday, May 18, 2018

पिरंगुटच्या तलाठी कार्यालयाला विभागीय आयुक्तांची भेट ऑनलाईन कामकाजाची केली पाहणी:जून अखेरपर्यंत काम पूर्ण करण्याच्या सूचना



पुणे दि. 18: मुळशी तालुक्यातील पिरंगुटच्या तलाठी कार्यालयाला विभागीय आयुक्त दिपक म्हैसेकर यांनी अचानक भेट देवून तेथील ऑनलाईन कामकाजाची पाहणी केली. डिजीटल 7/12च्या कामकाजाचा आढावा घेवून कामाला गती देण्याच्या सूचना केल्या.
यावेळी उपायुक्त (महसूल) प्रताप जाधव, मावळ-मुळशीचे उपविभागीय अधिकारी सुभाष भागडे, विभागीय आयुक्त कार्यालयातील महसूलचे तहसिलदार दगडू कुंभार, मुळशीचे तहसिलदार प्रमोद घाडगे, नायब तहसिलदार भगवान पाटील, मंडल अधिकारी गणेश कदम, तलाठी हनुमंत चांदेकर उपस्थित होते.
  शासनाच्या लोकाभिमूख प्रशासन कार्यक्रमातील ई चावडी अंतर्गत गाव नमुना नं. 7/12 डिजीटल स्वाक्षरी करून तो ऑनलाईन उपलब्ध करून द्यायचा आहे, या कामकाजाची पाहणी विभागीय आयुक्त श्री. म्हैसेकर यांनी केली. मुळशी तालुक्यातील 1 लाख 21 हजार सात बारांपैकी 26 हजार सातबारे हे डिजीटल स्वाक्षरीचे झाले असून उर्वरीत कामकाज जून अखेरपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
तसेच ज्या गावांचे घोषणापत्र झालेले आहे, अशा गावांमध्ये खरेदी विक्रीच्या नोंदी या केवळ ऑनलाईन टाकण्याच्या सूचना विभागीय आयुक्तांनी दिल्या. महाभूमीलेख संकेत स्थळावर जावून त्यांनी आपले सरकार, ई चावडी मधील प्रत्यक्ष कामकाजाची पाहणी केली. नवीन शर्तीच्या नोंदीबाबत म्हणजे 1 क मधील नोदींची फेरतपासणी करण्याचे निर्देश दिले. 
सामान्य जनतेला डिजीटल स्वाक्षरी असणारे 7/12 कसे मिळतील याची प्रात्यक्षिकासह माहिती जमाबंदी आयुक्त कार्यालयातील उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी दिली. यावेळी विभागीय आयुक्त श्री. म्हैसेकर यांनी भरे गावातील काही 7/12 व 8 अ च्या नोंदीची, गावचा हस्तलिखीत 1 क व संगणीकृत 1 क ची तपासणी केली. डिजीटल 7/12 च्या पिरंगुट येथील कामकाजाबद्दल विभागीय आयुक्तांनी समाधान व्यक्त केले.
*****




No comments:

Post a Comment