Tuesday, September 19, 2017

युवकांनो प्रश्न विचारायला शिका ; तुम्ही तुमचे विश्व उभे कराल - जिल्हाधिकारी श्वेता सिंघल


          सातारादि. 19  (जिमाका) : सातारा जिल्ह्यातील युवकांनो तुमच्यातील उर्जा वापरुन स्वतः व्यावसायिक बना, शासनाची मुद्रा आणि स्टार्टअप इंडिया या योजना तुमच्या पाठीशी आहेत. शुन्यातून विश्व उभी करण्याची ताकद तुमच्यात आहे, फक्त मनात येणारे प्रश्न विचारायला शिका, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी केले.
          यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स महाविद्यालयाच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आज जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जिल्हा माहिती कार्यालय व मुद्रा समिती आणि चेतन कॉम्प्युटर ॲकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने उद्योजकता कार्यशाळेचे आयोजन आज करण्यात आले होते.  यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून जिल्हाधिकारी श्रीमती सिंघल बोलत होत्या. याप्रसंगी  मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, जिल्हा नियोजन अधिकारी बी.जे. जगदाळे, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक एन.एल. थाडे, अग्रणी बँक व्यवस्थापक महादेव शिरोळकर, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक संचालक सचिन जाधव, चेतन कॉम्प्युटर ॲकॅडमीचे संजय परदेशी आदी यावेळी उपस्थित होते.
                आज बेरोजगार तरुणांसमोर शासकीय नोकरी, डॉक्टर, इंजिनियर अथवा पिढीने चालत आलेल्या पारंपारीक व्यवसाय करण्याचा पर्याय उपलब्ध असतो, असे सांगून जिल्हाधिकारी श्रीमती सिंघल पुढे म्हणाल्या, आज उद्योग व्यवसायासाठी पोषक वातावरण आहे.  उद्योगांच्या उभारणीसाठी प्रशिक्षण देणाऱ्या शासकीय व इतर संस्थाही भरपूर आहेत. तरुण-तरुणींनी नोकरीच्या मागे न लागता   मेक इन इंडिया, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, मुद्रा बँक योजनांच्या माध्यमातून  प्रशिक्षण तसेच सुविधांची  माहिती घेवून स्वत:चे उद्योग-व्यवसाय उभारावेत. उद्योग-व्यवसाय उभारणीसाठी अगदी छोट्या-छोट्या गोष्टींचे नियोजन करणे महत्वाचे आहे. आजची कार्यशाळा उद्योग व्यवसाय कसा सुरु करावा, भांडवल कसे उभे करावे, सुरु करण्यात उद्योग-व्यवसायाचा प्रोजेक्ट रिपोर्ट कसा तयार करावा, त्याची तयारी कशी करावी, सरकारी व इतर वित्त पुरवठा बँकांकडून कसा कर्ज पुरवठा मिळवावा यासाठी ही कार्यशाळा आयोजित केली आहे.
                मुलींचे उद्योग-व्यवसायातील प्रमाण फार कमी आहे. मुलींनी आपल्या व्यवसायाची सुरुवात अगरबत्ती, शिवणकाम, ब्युटीपार्लर इत्यादींसाख्या छोट्या व्यवसायापासून सुरुवात करावी. महिला ही प्रथम गृहीणी असते. तिच्याकडे असलेल्या कौशल्याचा विचार करुन उद्योग सुरु करण्याविषयी परिपूर्ण माहिती दिल्यास त्याही छोट्या-मोठ्या उद्योजक होवू शकतात.  मार्क झुकेरबर्ग यांची सुरुवात  लहान होती. पण आज त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून व्यवसायाचे मोठे जाळे तयार केले आहे. भारतात देखील नारायण मुर्ती, नंदन नीलकेणी यासारखी मार्गदर्शक उदाहरणे आहेत. उद्योग सुरु करताना अथवा वाढविताना फेसबुक, युट्युब सारख्या सोशल मीडियाचा वापर करावा. आपण कोण बनणार असा प्रश्न तुम्ही स्वत:ला विचाराल तरच तुम्हाला तुमचे उत्तर मिळेल.
पंतप्रधान मुद्रा बँक योजनेविषयी माहिती देताना श्रीमती सिंघल पुढे म्हणाल्या,  राष्ट्रीय बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, बिगर बँक वित्तीय संस्था तसेच  जिल्हा सहकारी बँकांमार्फत, शिशु गट 10 हजार ते 50 हजार, किशोर गट 50 हजार ते 5 लाख आणि तरुण गट 5 लाख ते 10 लाख अशा तीन गटात मुद्रा बँक योजनेंतर्गत कुठल्याही प्रकारची तारण किंवा जामिनदाराशिवाय कर्ज पुरवठा वितरीत केला जातो.  यासाठी आपल्या उद्योग-व्यवसायाच्या तंतोतंत नियोजनाचा प्राजेक्ट रिपोर्ट बँकेला सादर करावा लागतो. होतकरु, बेरोजगार  तरुणांनी त्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
                यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. शिंदे म्हणाले, आपला देश तरुणांचा देश आहे.   25 ते 54 वयोगटातील नागरिकांचे सर्वात जास्त प्रमाण 40 टक्के आहे.   आपल्या देशासमोर सर्वात मोठे आव्हान आहे ते या वयोगटाला नोकऱ्या उपलब्ध करुन देण्याचे. बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने प्रमोद महाजन कौशल्य विकास कार्यक्रम राबविण्यास सुरु केली आहे. या योजनेचा हेतू ओळखून तरुणांनी आपले कौशल्य विकसित करुन आपला उद्योग उभा करावे. आयडीबीआय ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेकडून 3 हजार तरुणांना विविध रोजगार निर्मितीविषयक प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये 713 तरुणांना रोजगार मिळाला असून 82 तरुणांनी स्वत:चा व्यवसाय सुरु केला आहे.
                50 टक्के नागरिक हे शेतीवर अवलंबून आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनीही आता अन्न प्रक्रीयेसारख्या उद्योगांकडे वळले पाहिजे. यातून मोठा रोजगार निर्माण होऊ शकतो. विविध आस्थापनांमध्ये 1 कोटी 20 लाख नोकऱ्या उपलब्ध आहेत. परंतु या आस्थापनांना त्यांना पात्र असलेले उमेदवार मिळत नाहीत.  रोजगार उपलब्ध असूनही आपल्या कौशल्य विकासाशिवाय ते मिळणार नाही याची प्रत्येकाने जाणीव ठेवावी. शासन कौशल्य विकासाच्या अनेक योजना राबवित आहे. या योजनांचा लाभ घ्यावा. कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राने उद्योजक आणि विद्यार्थी यांना एकत्र आणून उद्योगांसाठी आवश्यक कौशल्याचा अभ्यास करुन त्या प्रकारचे तरुणांना प्रशिक्षण द्यावे, असे आवाहनही मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. शिंदे यांनी  शेवटी केले.
                जिल्हा नियोजन अधिकारी श्री. जगदाळे म्हणाले, मुद्रा बँक योजना म्हणजे काय याची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी म्हणून विविध प्रसिद्धी विषयक उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये कलापथक, एलईडी व्हॅन व आकशवाणी, वेबसाईटवरुन प्रसिद्धी व प्रचार करण्यात आला. याचा फायदा जिल्ह्यातील 22 हजार लाभार्थ्यांनी घेवून मुद्रा योजनेंतर्गत 316 कोटींचे कर्ज वितरण करण्यात आले आहे. मुद्रा  योजनेतून कर्ज घेऊन उद्योग सुरु केलेल्या  लाभार्थ्यांवर एक पुस्तक तयार करण्याचा मानसही त्यांनी शेवटी व्यक्त केला.
                यावेळी जिल्हा माहिती अधिकारी श्री. पाटील मनोगत व्यक्त करताना म्हणाले, आपल्या देशाला कौशल्य विकासाचा मोठा इतिहास आहे. जागतिक कौशल्य दिनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कौशल्य विकास विभागाची स्थापना केली. यामधून 2022 पर्यंत 40 कोटी नागरिकांना कौशल्यभिमुख रोजगार देण्याचा उद्देश आहे. याच धर्तीवर राज्य शासनानेही रोजगार व स्वयंरोजगार कार्यालयाचे रुपांतर आता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागात करुन राज्यातील बेरोजगार तरुणांना उद्योग-व्यवसायाचे प्रशिक्षण देण्याचे कार्यक्रम राबवित आहे.
                प्रास्ताविकात कौशल्य विकास, रोजगार व उद्योजगता विभागाचे सहायक संचालक सचिन जाधव यांनी कार्यशाळेचा उद्देश विशेद केला.
                या कार्यक्रमास विविध विभागांचे अधिकारी, नागरिक, विद्यार्थी, विद्यार्थींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0000


No comments:

Post a Comment