Friday, September 28, 2018

तरुणांच्या मतदार नोंदणीसाठी पुढाकार घ्यावा विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांचे राजकीय पक्षांना आवाहन



सोलापूर, दि. 28- तरुणांच्या मतदार नोंदणीसाठी सर्व राजकीय पक्षांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज येथे केले.
एक जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार याद्यांच्या पुनरीक्षणाचा कार्यक्रम सुरू आहे. त्याबाबत  आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू सभागृहात आज राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी बैठक झाली. त्यावेळी त्यांनी वरील आवाहन केले.
यावेळी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले, उपायुक्त प्रताप जाधव, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे उपस्थित होते.
विभागीय आयुक्त म्हैसेकर यांनी सांगितले की, 'लोकशाही बळकट होण्यासाठी प्रत्येक नागरिकांने मतदान केले पाहिजे. त्यासाठी मतदार यादीत नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी राजकीय पक्षांनी पुढाकार घ्यावा. तसेच  स्वंयसेवी संघटना, सामाजिक संघटना, सहकारी संस्था यांची मदत घ्यावी.’
डॉ. म्हैसेकर म्हणाले, 'मागील वर्षापेक्षा मतदार संख्या कमी आहे. वास्तविक तरुण मतदारांच्या संख्येत वाढ झाली आहे. पण मतदार यादीत त्यांची नोंदणी झालेली नाही. यासाठी राजकीय पक्षांनी आपले बूथनिहाय एजंटची नियुक्ती करावी. हे एजंट यादीत नाव नोंदणी साठी प्रशासनाला सहकार्य करू शकतो.’
तरुण मतदारांच्या नाव नोंदणीसाठी महाविद्यालयात आणि विद्यापीठात विशेष कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. या कार्यक्रमातही राजकीय पक्षांनी योगदान द्यावे. महिलांची मतदार संख्या वाढण्यासाठीही प्रयत्न करायला हवेत, असेही डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी  दुबार मतदारांची नावे वगळण्यासाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे अर्ज भरून द्यावा, असे सांगितले.
बैठकीस शेतकरी कामगार पक्षाचे विठ्ठल शिंदे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे मनीश गडदे, प्रदीप पाटील, शिवसेनेचे प्रताप चव्हाण,  विजय पुकाळे,  भारतीय जनता पक्षाचे दत्तात्रय गणपा, चंद्रशेखर येरनाळे आदी उपस्थित होते.
तहसिलदार हनुमंत कोळेकर यांनी सादरीकरण केले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, उपजिल्हाधिकारी किशोर पवार, उपविभागीय अधिकारी मारुती बोरकर, ज्योती पाटील, प्रमोद गायकवाड, शिवाजी जगताप आदी उपस्थित होते.
000



No comments:

Post a Comment