Saturday, September 29, 2018

सैनिकांच्या प्रत्येक समस्या सोडविणे हे कर्तव्य - पालकमंत्री गिरीश बापट


पुणे दि. 29 - देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी सैनिक नेहमीच कर्तव्यदक्ष असतात. अशा सैनिकांच्या कुटूंबास व सैनिकांना कोणतीही अडचण येणार नाही. अडचण आल्यास ती सोडविणे हे पालकमंत्री म्हणून माझे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले. 
शौर्य दिनानिमत्त जिल्हाधिकारी कार्यलयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, कर्नल सदानंद साळुंखे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर मिलिंद तुंगार, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, आदि उपस्थित होते.
पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले, शौर्यदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात देशाची सेवा करणाऱ्या सैनिकांसमोर मनोगत व्यक्त करणे हे माझे भाग्य आहे. एस.टी.पास, पेन्शन, नौकरी इत्यादी सैनिकांच्या समस्या सोडविण्यासाठी  पालकमंत्री म्हणून कटीबद्ध आहे. शब्दांचे सामर्थ्य  हे कर्तृत्वावर अवलंबून असते. सैनिक हा शब्दच देशासाठी लढणाऱ्या जवानांच्या कर्तृत्वाची ओळख करुन देतो.
जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले, पुणे जिल्हयातील सैनिकांना व त्यांच्या कुटुंबीयांना कुठल्याही पध्दतीची अडचण येणार नाही. महाराष्ट्र राज्य शूर-विरांचे राज्य आहे. म्हणूनच या राज्यातील बहुसंख्य सैनिक देशसेवेसाठी सैन्यात आहेत. यावरुनच खरे देशप्रेम दिसून येते. जिल्हाधिकारी म्हणून प्रत्येक समस्या सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमात वीर माता व वीर पत्नींचा पालकमंत्री महोदयांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमासाठी सैनिक वसतीगृह, न्यू एंजल हायस्कूलचे  विद्यार्थी, विद्यार्थिनी, माजी सैनिक व त्यांचे कुटुंबिय उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
0000








No comments:

Post a Comment