Saturday, September 22, 2018

युवा पिढीने खेळाकडे निस्वार्थी वृत्तीने बघावे - राही सरनोबत


पुणे दि. 22 : केवळ अधिकचे गुण मिळविण्यासाठी, सरकारी नोकरीसाठी किंवा इतर फायद्यासाठी खेळाकडे न येता आजच्या पिढीने खेळाकडे निस्वार्थी वृत्तीने बघावे असा सल्ला देत युवा खेळाडूंनी फक्त देशाचा ध्वज उंचाविण्यासाठी आणि पदकांसाठी खेळावे असे अवाहन आंतरराष्ट्रीय नेमबाज राही सरनोबत यांनी आज केले.
येथील बालगंधर्व सभागृहात आशियाई खेळात 25 मीटर पिस्तुल प्रकारात सुवर्णपदकाचा वेध घेतल्याबद्दल तसेच अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल राही सरनोबत यांचा जिल्हा क्रीडा कार्यालय आणि शांतीदूत संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने राही सरनोबत यांचा महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना राही सरनोबत बोलत होत्या.
यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक (कारागृह) डॉ. विठ्ठल जाधव, आंतराष्ट्रीय नेमबाज अंजली भागवत, विधान मंडळाचे सचिव उत्तमसिंग चव्हाण, उपसंचालक (माहिती) मोहन राठोड, जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान, विद्या विठ्ठल जाधव, राही सरनोबत यांचे वडील जीवनराव सरनोबत, आई प्रभा सरनोबत, समृध्दी जाधव उपस्थित होते.
राही सरनोबत म्हणाल्या, खेळ ही निस्वार्थपणे करण्याची कृती आहे. कोणत्याही स्पर्धेत खेळताना आधी मनाने जिंकण्याची आवश्यकता असते. मानसिक खंबीरपणा हा खेळात अत्यंत आवश्यक असतो. केवळ एकदा जिंकून चालत नाही तर यशाची पुनरावृत्ती करण्याची आवश्यकता असते. नेमबाजीत अजंली भागवत, तेजस्विनी सावंत यांनी खडतर कामगिरी करत खेळाला नवी ओळख दिली आहे. त्यांनी दाखविलेल्या मार्गावरच मार्गक्रमण करत असल्याचे राही सरनोबत यांनी सांगितले.
मुक्ता टिळक म्हणाल्या, राही सरनोबत यांचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे. त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर केलेली कामगिरी दमदार आहे. त्यांनी आपल्या खेळाकडे लक्ष केंद्रित करून ऑलंपिकमध्ये सुवर्णपदक मिळवावे, हीच प्रत्येक भारतीयाची अपेक्षा आहे. त्यांनी आपल्या कामगिरीने प्रत्येक भारतीयाची मान उंचावली असल्याचे त्यांनी सांगितले.  
अंजली भागवत म्हणाल्या, एकाग्रता हे राहीचे सामर्थ्य आहे, त्याच जोरावर तीने यश मिळविले आहे. आशियाई स्पर्धा या ऑलंपिकच्या तोडीच्या असतात, त्यामुळे तीचे हे यश अत्यंत महत्वाचे आहे. दुखापतीनंतर तीने अत्यंत कष्टाने स्वता:ला सिध्द केले आहे. पुण्यातील आजचा सत्कार राहीला पुढील वाटचालीसाठी बळ देणारा ठरेल.  
यावेळी विधान मंडळाचे सचिव उत्तमसिंग चव्हाण, समृध्दी जाधव यांची भाषणे झाली.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ. विठ्ठल जाधव यांनी राही सरनोबत यांच्या कारकिर्दीचा आढवा घेत, राही सरनोबत यांनी ऑलंपिकमध्ये सुवर्णपदक मिळविण्याची सर्व भारतीयांची त्यांच्याकडून अपेक्षा असल्याचे सांगितले. आभार जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान यांनी मानले.
कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*****








No comments:

Post a Comment