Monday, September 17, 2018

रेशन दुकानातून आता मीठ विक्रीला सुरुवात -पालकमंत्री गिरीश बापट





            पुणे,दि.17 :- रेशन दुकानातून आता मीठ विक्री सुरु करण्यात आली आहे. मिठामुळे  शरीरातील हिमोग्लोबीन वाढण्यास मदत होऊन पुरुषाबरोबरच महिलाही अधिक सशक्त होण्यासाठी ही योजना शासनाने आणली आहे, असे  प्रतिपादन अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, अन्न  व औषध प्रशासन, संसदीय कार्य तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले. यावेळी प्राथमिक स्वरुपात काही महिलांना मीठ पिशवीचे वाटपही पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले.
            नाना पेठ, येथील क्रांती ज्योती स्वस्त धान्य दुकानात लोह आणि आयोडीन युक्त मिठाची रास्तभाव दुकानातून विक्रीचा शुभारंभ पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पुरवठा विभागाच्या उपायुक्त नीलिमा धायगुडे, अन्न धान्य वितरण अधिकारी अस्मिता मोरे, पुणे कॅन्टोनमेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष दिलीप गिरमकर,टाटा कंपनीचे श्री. अय्यर  आदी उपस्थित होते.
            पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले, राज्यात नागपूर आणि पुणे या दोन जिल्हयांत मीठ विक्रीची सुरुवात झाली आहे. त्या पाठोपाठ इतर जिल्हयांतही ती लवकरच सुरु करणार आहोत. स्वस्त धान्य दुकानदारांच्या माध्यमातून धान्य वितरणासाठी ई-पॉस मशीनचा उपयोग करण्यात येत आहे. ज्यांनी अद्यापपर्यंत आधार कार्ड काढलेले नाही त्यांनी ते लवकरात लवकर काढून घेतले पाहिजे म्हणजे त्यांना या योजनांचा लाभ मिळू शकतो. पुण्यामध्ये महिलांच्या तपासणीमधून असे लक्षात आले आहे की, 5 ते 15 वयोगटातील 98 टक्के महिलांमध्ये रक्तातील लोहाचे प्रमाण कमी आहे. मिठामध्ये हिमोग्लोबीन वाढीसाठी पोषक घटक आहेत. याचा सर्वांनी लाभ घ्यावा, असेही ते म्हणाले.
            कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुरवठा विभागाच्या उपायुक्त नीलिमा धायगुडे यांनी तर उपस्थितांचे आभार अस्मिता मोरे यांनी मानले. यावेळी पुरवठा विभागाचे अधिकारी, कर्मचारी  व परिसरातील नागरिक उपस्थित होते.
00000

No comments:

Post a Comment