Friday, September 21, 2018

वृक्षलागवड मोहीम यशस्‍वी करा- जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम


पुणे, दिनांक 21- जिल्‍ह्यातील वनाच्‍छादीत क्षेत्राचे प्रमाण कमी असून ते वाढण्‍यासाठी वृक्षलागवडीचा महत्‍त्‍वाकांक्षी कार्यक्रम हाती घेण्‍यात आला आहे. जिल्‍ह्यातील सर्व संबंधित विभागांनी योग्‍य ते नियोजन करुन हा कार्यक्रम यशस्‍वी करावा, असे आवाहन जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले. जिल्‍हाधिकारी कार्यालयात वृक्षलागवड नियोजनाबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपवनसंरक्षक श्रीलक्ष्‍मी ए., रोजगार हमी योजनेचे उपजिल्‍हाधिकारी सुधीर जोशी  तसेच इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्‍ह्याला या वर्षी 1 कोटी 42 लक्ष 52 हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्‍ट असून प्रत्येक विभागाने उपलब्‍ध रोपे, लागवडीची जागा, वृक्षसंरक्षक जाळी याबाबतचे नियोजन तयार करावे,अशा सूचना जिल्‍हाधिकारी राम यांनी दिल्‍या. प्रत्‍येक विभागाला जिल्‍हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्‍ध करुन दिला जातो.  या निधीच्‍या 0.5 टक्‍के निधी वृक्षारोपणासाठी लागणा-या बाबींवर खर्च करता येऊ शकतो. त्‍यातून खड्डे खोदणे, वृक्षसंरक्षक जाळ्या आदींचा खर्च भागवता येईल. जिल्‍हा परिषद, कृषी विभागासह इतर सर्व विभागांनी योग्‍य ते नियोजन करुन हा कार्यक्रम यशस्‍वी करावा, असे आवाहन राम यांनी केले.
गतवर्षी लावण्‍यात आलेल्‍या रोपांच्‍या  सद्यस्थितीचाही यावेळी आढावा घेण्‍यात आला. वृक्षलागवड कार्यक्रम यशस्‍वी करण्‍यासाठी तहसिलदार, गटविकास अधिकारी,लागवड अधिकारी यांची बैठक घेण्‍यात येणार असल्‍याचेही यावेळी सांगण्‍यात आले.  आभार सहायक वनसंरक्षक वैभव भालेराव यांनी मानले.
(फोटो ओळी -  वृक्षलागवड बैठकीत डावीकडून उपजिल्‍हाधिकारी सुधीर जोशी, जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम, उपवनसंरक्षक श्रीलक्ष्‍मी ए)
******

No comments:

Post a Comment