Saturday, September 29, 2018

राज्य निवडणूक आयोगाकडील इव्हिएम मशिन हॅक प्रुफ - राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया


विविध विषयांवर झाली गट चर्चा;मान्यवर, तज्ज्ञांचा समावेश
पुणे दि. 29: इव्हिएम मशिनबाबत वारंवार प्रश्न उपस्थित केले जातात, मात्र राज्य निवडणूक आयोगाकडील सर्व इव्हिएम मशिन हॅक प्रुफ असून त्यात कोणीही, कसलीही ढवळाढवळ करू शकत नाही, असे स्पष्ट मत राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी आज व्यक्त केले.
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘लोकशाही, निवडणूक व सुशासन’ या विषयावरील विभागीय कार्यशाळेत विविध विषयांवरील गट चर्चेनंतर गट प्रमुखांनी सादरीकरण केले. या सादरीकरणानंतर राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया बोलत होते.
यावेळी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर, निवृत्त प्रशासकीय अधिकारी चंद्रकांत दळवी, ज्येष्ठ विधी तज्ज्ञ ॲङ भास्करराव आव्हाड, उपायुक्त (सामान्य प्रशासनसंजयसिंह चव्हाण उपस्थित होते.
श्री. सहारिया म्हणाले, लोकशाहीत मतदाराला फार महत्व आहे. मतदाराला निर्भयपणे मतदान करता यावे, यासाठी राज्य निवडणूक आयोग प्रयत्नशील आहे. सर्व निवडणूकांचे मतदान एकाच दिवशी घेण्याविषयी अनेक सूचना आल्या. तसेच ते सुटी दिवशी घ्यावे की इतर दिवशी घ्यावे, या विषयीही मतांतरे या गट चर्चेदरम्यान पुढे आली. मात्र स्थानिक परिस्थिती लक्षात घेवूनच मतदान कधी घ्यावयाचे याचा निर्णय राज्य निवडणूक आयोग घेत असतो. मतदाना दिवशी सर्वांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी जे कारखाने बंद करता येत नाहीत तसेच अत्यावश्यक सेवेची अस्थापनांमधील कामगारांना मतदानासाठी दोन तासांची सूट देण्यात येते. उर्वरीत सर्व अस्थापनांना सुटी देण्याच्या सूचना आहेत. जर या सूचनेचा भंग करून कोणत्याही मतदाराला मतदानापासून कोणी वंचित ठेवत असेल तर त्याला कडक शिक्षा करण्याची तरतुद आहे.
इव्हिएम मशिनबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जातात. मात्र आपल्याकडील मशीन या हॅक प्रुफ आहेत, त्यात कोणीही, कसलीही ढवळाढवळ करू शकत नाही. इव्हिएम ऐवजी इव्हीपॅट मशिन बसविल्यास मतदानाचा वेळ, मतमोजणीच्या वेळात वाढ होते, तसेच यासाठी अधिक कर्मचारी, अधिक खर्च येत असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. दीपक म्हैसेकर म्हणाले, 1 जानेवारी 2018ची अंतिम मतदार यादी जाहिर करण्यात आली आहे. तसेच सध्या मतदार यादी अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. 1 जानेवारी 2019 रोजी 18 वर्ष पूर्ण होणाऱ्यांची नावे मतदार यादीत नोंदवून घेण्याचे काम सुरू आहे. ही प्रक्रीया 31 आक्टोबर 2018 पर्यंत सुरू राहणार असून मतदार यादी अधिक निर्दोष करण्याच्या सूचना सर्वांना देण्यात आल्या आहेत.
श्री. चंद्रकांत दळवी म्हणाले, लोकसभा व विधानसभेच्या निवडणूका एकत्र घेण्याबाबत मतांतरे असतीलही मात्र वेळेचा आणि मतदारांच्या सोयीचा विचार करुन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्वच निवडणूका एकाच वेळी होणे आवश्यक आहे. सामान्य घटकही निवडणूक प्रक्रीयेत सामावून घेतला जावा, याकडे सर्वांनी लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी गट क्रमांक एकमध्ये राजेंद्र निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली ‘ओनरशीप ऑफ इलेक्शन बाय पब्लिक/सिव्हिल सोसायटी ऑरगनायझेशन’या विषयावर, गट क्रमांक दोन मध्ये कैलास शिंदे यांच्या नेतृत्चाखाली ‘ युज ऑफ सोशल मिडीया, फेक न्यूज ड्युरींग इलेक्शन’ या विषयावर, गट क्रमांक तीन मध्ये डॉ. अभिजीत चौधरी यांच्या नेतृत्वाखाली ‘इनक्ल्युझिवनेस ऑफ मल्टीफेसीटेड सोसायटी ऑफ इंडीया’ या विषयावर तर गट क्रमांक चार मध्ये ॲड भास्कर आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली ‘स्ट्रॅटर्जीस फॉर कॉम्बेटींग मिस युज ऑफ मनी, मसल पॉवर इन इलेक्शन’ या विषयावर गट चर्चा करण्यात आली. या गट चर्चेत समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर, तज्ज्ञांनी भाग घेतला होता.
*****











No comments:

Post a Comment