Monday, September 24, 2018

सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करा पालकमंत्री विजय देशमुख यांच्या आढावा बैठकीत सूचना


सोलापूर, दि. २४ -  डेंग्यू, स्वाईन फ्ल्यू आदी रोगांबाबत महापालिका, जिल्हा परिषद, सार्वजनिक आरोग्य विभाग आणि खासगी  रुग्णालयांनी एकत्रित उपाय योजना कराव्यात , अशा सूचना पालकमंत्री विजय देशमुख यांनी आज येथे दिल्या.
            सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील डेंग्यू, स्वाईन फ्ल्यू, मलेरिया आणि चिकनगुनियाने उद्भवलेल्या परिस्थिती बाबतीत आढावा बैठक झाली. त्यावेळी त्यांनी सूचना दिल्या.  वैशंपायन मेडिकल कॉलेजमध्ये झालेल्या या बैठकीस महापालिकेतील विरोधी पक्षनेते संजय कोळी, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुमेध अणदूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ सुनील घाटे, अश्विनी हास्पिटलच्या डॉ. माधवी रायते, नगरसेवक शिवानंद पाटील आदी उपस्थित होते.
            पालकमंत्री देशमुख यांनी सांगितले,  'शहर आणि जिल्ह्यातील डेंग्यू आणि स्वाईन फ्ल्यू सदृश्य आजाराने उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून वाढत आहे. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. यावर महापालिका, जिल्हा परिषद आणि आरोग्य विभागाच्या वतीने उपाय योजना केल्या जात आहेत. पण त्याच बरोबर नागरिकांनीही आवश्यक काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी जनजागृती करा. डेंग्यू किंवा स्वाईन फ्ल्यू चा रुग्ण निश्र्चित झाल्यास त्याची माहिती महापालिका किंवा जिल्हा रुग्णालयाकडे कळवावी. जेणेकरून पुढील आवश्यक उपाययोजना करणे शक्य होते."
            यावेळी सोलापूर महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले आणि जिल्हा परिषदेचे डॉ. बोधले यांनी रुग्णांबाबत माहिती दिली.  डॉ. घाटे यांनी वैशंपायन मेडिकल कॉलेजमध्ये रक्ताचा पुरेसा साठा आहे. रक्ताचे घटक विलग करणारी यंत्रणा आहे, असे सांगितले.
बैठकीस यशोधरा हास्पिटलचे डॉ. देशपांडे, अश्विनी हास्पिटलचे डॉ. सत्येश्वर पाटील आदी उपस्थित होते.
0000


No comments:

Post a Comment