Friday, September 28, 2018

जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी मुठा कालवा बाधित भागातील नागरिकांशी साधला संवाद



पुणे, दि. २८ – येथील पर्वती परिसरातून वाहणारा मुठा उजवा कालवा फुटून गुरूवारी पर्वती पायथा परिसर, दांडेकर पुल व सिंहगड रोड परिसरात पाणी शिरले होते. या भागाची पाहणी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी आज केली व येथील नागरीकांशी संवाद साधला.

 यावेळी त्यांच्यासमवेत महापौर मुक्ता टिळक, पर्वती मतदारसंघाच्या आमदार माधुरी मिसाळ, उपमहापौर सिद्धार्थ धेंडे, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, पुणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर, सहायक आयुक्त गणेश सोनुने, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता एस. डी. चोपडे, मुख्य अभियंता टी. एन. मुंडे, कार्यकारी संचालक खलील अन्सारी, प्रांताधिकारी भाऊसाहेब गलांडे, तहसीलदार गीता दळवी आदी उपस्थित होते.

जलसंपदामंत्री श्री. महाजन हे कालवा फुटलेल्या ठिकाणी दुपारी दोनच्या सुमारास दाखल झाले. त्यांनी कालवा दुरूस्ती कामाचा आढावा घेतला. कालवा बाधित परिसरात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येत असून  पंचनामे पूर्ण झाल्यानंतर तातडीने शासकीय नियमानुसार नुकसानभरपाई देण्यात येईल, असे आश्वासन श्री. महाजन यांनी यावेळी दिले.

कालवा फुटीला कोण जबाबदार आहे, याची चौकशी करण्यासाठी मुख्य अभियंत्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली असून तिच्या अहवालानंतर आवश्यक ती कारवाई केली जाईल, असेही श्री. महाजन यांनी सांगितले.

मुठा उजवा कालवा फुटल्यामुळे पर्वती भागातील सर्व्हे नंबर, १३२, १३३, १३० व सर्व्हे नंब २१४ या भागातील आंबिल ओढ्याच्या तिरावर वसलेल्या  या जुन्या वस्त्या आहेत. या ठिकाणी एकूण १५०० झोपडपट्ट्या असून त्यापैकी ६०० झोपड्या पाण्याच्या प्रवाहाने बाधित झाल्या आहेत. तर ८० ते ९० झोपड्या पूर्णपणे मोडलेल्या आहेत. तसेच दांडेकर पुल भागातील कासम प्लॉट परिसरातील ६० ते ७० झोपड्यांमध्ये पाणी शिरल्यामुळे नुकसान झाले आहे.

या भागात जाऊन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी नुकसानीचा आढावा घेतला. येथील नागरिकांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी स्थानिक नगरसेवक, विविध शासकीय विभागांतील अधिकारी व कर्मचारी तसेच नागरिक उपस्थित होते.

0000




No comments:

Post a Comment