Saturday, September 29, 2018

कालवा बाधितांना मदत करणार - पालकमंत्री बापट


पुणे, दिनांक 29- पुणे महानगरपालिका हद्दीतील पर्वती भागातून वाहणारा मुठा उजवा कालवा फुटून नुकसान झालेल्‍या घरांच्‍या पंचनामे जिल्‍हा प्रशासनाकडून पूर्ण झाले असून त्‍यांना खास बाब म्‍हणून मदत देण्‍याबाबतचा 3 कोटी रुपयांचा प्रस्‍ताव तात्‍काळ पाठविण्‍याच्‍या सूचना जिल्‍ह्याचे पालकमंत्री श्री. गिरीश बापट यांनी आज दिल्‍या.
जिल्‍हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम, निवासी उपजिल्‍हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब गलांडे, तहसिलदार गीता दळवी, हेमंत निकम आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. बापट म्‍हणाले, कालवा फुटण्‍याची दुर्घटना ही नैसर्गिक आपत्‍ती म्‍हणून गृहीत धरण्‍याबाबत विनंती करण्‍यात यावी. शासनाच्‍या मदत व पुनर्वसन विभागाच्‍या निर्णयानुसार कालवाबाधितांना नुकसान भरपाई मिळेलच, पण हानीची तीव्रता पहाता खास बाब म्‍हणून 3 कोटी रुपयांच्‍या मदतीची विनंती करणारा प्रस्‍ताव तात्‍काळ पाठवावा. हा प्रस्‍ताव मंजूर होण्‍यासाठी पाठपुरावा करण्‍यात येईल. कालवाबाधित भागातील घरांचे  पंचनामे पूर्ण झालेल्‍या संपूर्ण कुटुंबाची यादी त्‍या भागातील स्‍वस्‍त धान्‍य दुकानदारांकडे देऊन संबंधित कुटुंबांना धान्‍य वाटप करण्‍यात यावे, यावेळी नियंत्रण व देखभालीसाठी जिल्‍हा प्रशासनाचा प्रतिनिधी असावा, असेही ते म्‍हणाले.
मुठा उजवा कालवा फुटून या भागातील घरांमध्‍ये पाणी जाऊन त्यांच्‍या घरातील चीजवस्‍तूंचे नुकसान झाले आहे. हानीची तीव्रता पहाता शासनाकडून भरीव मदतीची गरज असल्‍यामुळे 3 कोटी रुपयांचा प्रस्‍ताव पाठविण्‍यात यावा, असे  पालकमंत्री श्री. बापट यांनी सांगितले.
प्रारंभी जिल्‍हाधिकारी श्री. नवल किशोर राम यांनी घटनेची पार्श्‍वभूमी सांगितली. जिल्‍हा प्रशासनाकडून बाधितांच्‍या घरांच्‍या पंचनाम्‍याची कार्यवाही करण्‍यात आली असून  740 घरांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. त्‍यामध्‍ये सुमारे  90 घरे पूर्णत: बाधित आहेत. पूर्णत: बाधित व अंशत: बाधित घरांच्‍या मदतीचा तसेच खास बाब म्‍हणून 3 कोटी रुपयांच्‍या मदतीचा प्रस्‍ताव शासनाकडे सादर करण्‍यात येईल, असेही जिल्‍हाधिकारी  श्री. नवल किशोर राम यांनी सांगितले.  
0000


No comments:

Post a Comment