Monday, September 17, 2018

माझ्या यशात ‘लोकराज्य’चा मोठा वाटा - डॉ. विठ्ठलराव जाधव



पुणे दि. 17 : स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी लोकराज्य हे मासिक अत्यंत उपयुक्त असून माझ्या यशात ‘लोकराज्य’ मासिकाचा मोठा वाटा असल्याचे प्रतिपादन विशेष पोलीस महानिरीक्षक (कारागृह)(मु) डॉ. विठ्ठलराव जाधव यांनी आज केले.
लोकराज्य मासिकाच्या सष्टेबर महिन्याच्या ‘सामर्थ्य शिक्षणाचे, समृध्द महाराष्ट्राचे’! या विशेषांकाचे प्रकाशन डॉ. विठ्ठलराव जाधव यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे, कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई, प्राचार्य एस. व्ही. खटावकर, कारागृह अधीक्षक यु. टी. पवार, पुणे विभागीय उपसंचालक (माहिती) मोहन राठोड, तुरुंगाधिकारी एस. बी. दराडे, माहिती सहायक संग्राम इंगळे, राष्ट्रीय शांतीदूत संस्थेचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र पोलीस समन्वय समितीचे कार्याध्यक्ष डॉ. ऋतुराज काळे, राष्ट्रीय शांतीदूत संस्थेचे राज्याध्यक्ष भगवान डिखळे, संदीप राठोड, नितीन सोनावणे, अमर माने उपस्थित होते.
डॉ. विठ्ठलराव जाधव म्हणाले, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रकाशन असणारे लोकराज्य हे मासिक अत्यंत दर्जेदार आहे. महाराष्ट्र शासनाचे ते मुखपत्र आहे. गेल्या सत्तर वर्षापासून शासनाच्या विविध कल्याणकारी योजना सामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम हे मासिक करत आहे. लोकराज्य वाचक अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीपर्यंत लोकराज्य पोहोचविण्याची महासंचालनालयाची भूमीका स्तुत्य आहे.
स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी हे मासिक अत्यंत उपयुक्त आहे. या माध्यमातून अधिकृत माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होते. स्पर्धा परिक्षेची तयारी करताना मी सुध्दा याच मासिकाचे मी नियमीत वाचन करत होतो, माझ्या यशात या मासिकाचा मोठा वाटा आहे. लोकराज्य मासिक हे अत्यंत सवलतीच्या दरात शासनाच्यावतीने उपलब्ध करून देण्यात आले आहे, याचा लाभ प्रत्येकाने घेण्याचे आवाहन डॉ. जाधव यांनी केले.
*****

      

No comments:

Post a Comment