Friday, August 26, 2016

फळपिक उत्पादक शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा ... कृषि मंत्री पांडुरंग फुंडकर

महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाचा 56 व्या वार्षिक मेळावा

            पुणे, दि. 26 – महाराष्ट्र राज्य फलोत्पादनात देशात अग्रेसर असून महाराष्ट्रातून द्राक्षाची विक्रमी निर्यात होते. जागतिक बाजारपेठेत मागणी असलेल्या जातीच्या द्राक्षाचे उत्पादन शेतकऱ्यांनी घ्यावे त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा असे आवाहन कृषि मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी केले.
            महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाच्या 56 व्या वार्षिक मेळाव्याचे आयोजन येथील बालेवाडी क्रिडा संकुलात करण्यात आले होते. या मेळाव्याचे उदघाटन कृषि मंत्री पांडुरंग फुंडकर यांच्याहस्ते दिप प्रज्वलनाने झाले त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय कृषि मंत्री खासदार शरद पवार होते. यावेळी व्यासपिठावर खासदार अनिल शिरोळे, कृषि आयुक्त विकास देशमुख, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाचे अध्यक्ष सुभाष आर्वे, उपाध्यक्ष राजेंद्र पवार, महाग्रेप्सचे अध्यक्ष सोपान कांचनउपस्थित होते.
            यावेळी बोलताना कृषि मंत्री पांडुरंग फुंडकर म्हणाले की, द्राक्ष निर्यातीमधून देशाला सुमारे 16 हजार कोटी रुपयांचे परकीय चलन प्राप्त होते. या निर्यातीमध्ये महाराष्ट्रात उत्पादित होणाऱ्या द्राक्ष उत्पादनाचा मोठा वाटा आहे. द्राक्षाच्या निर्यातीसाठी आवश्यक सर्व सोपस्कार करता यावे, यासाठी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना ग्रेपनेट प्रणाली उपलब्ध करुन देण्यात आली आहे. जागतिक बाजारपेठेत मागणी असलेल्या वाणांचा वापर करुन द्राक्ष उत्पादनात वाढ करावी, त्यासाठी आवश्यक ती सर्व मदत शासनातर्फे शेतकऱ्यांना देण्यात येईल असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.
            अध्यक्षीय भाषणात खासदार शरद पवार यांनी परदेशात द्राक्ष उत्पादनामध्ये होणाऱ्या बदलाची दखल घेऊन ते तंत्रज्ञान येथील द्राक्ष उत्पादकांनी आत्मसात करावे, त्याचे प्रभावी विपणन करण्याकडे प्राधान्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगितले.
            जागतिक स्तरावर यशस्वी होणारे तंत्रज्ञान येथे उपलब्ध व्हावे यासाठी शासनाने प्रयत्न करावे असे सांगून शरद पवार म्हणाले की, कमीत कमी पाण्यामध्ये उत्पादित होणाऱ्या पिकांचे उत्पादन घेण्यासाठी कृषि विद्यापीठांनी संशोधन करावे, यासाठी शासनाने त्यांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन केले. शेतकऱ्यांनी पाणी वाचवणाऱ्या तंत्राचा अवलंब करणे गरजेचे आहे, त्यासाठी शासनाने ठिबक सिंचन पध्दतीबाबत सर्वसमावेश धोरण राबवावे. फळपिक उत्पादकांना करण्यात येणाऱ्या कर्ज वितरण प्रणालीची नव्याने आखणी करणे आवश्यक आहे. जगामध्ये ज्या नवनवीन वाणांचा वापर करुन फळपिकांचे उत्पादन  घेण्यात येते, त्याचे उत्पादन येथील शेतकऱ्यांनी घ्यावे जेणेकरुन निर्यातीमध्ये वाढ होईल असे ते म्हणाले.  
            खासदार अनिल शिरोळे यांनी, शेतकऱ्यांनी फळपिकांचे उत्पादन घेताना बायोकंट्रोल तंत्रज्ञानाचा वापर करावा असे आवाहन केले तर कृषि आयुक्त विकास देशमुख यांनी, निर्यातीसाठी आवश्यक आंतरराष्ट्रीय मानकांचे पालन करावे शेतकऱ्यांनी ग्रेपनेट प्रणालीमध्ये नोंदणी करावी अशी सूचना केली.
            द्राक्ष बागाईतदार संघाचे अध्यक्ष सुभाष आर्वे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. द्राक्ष शेतीमधील नवे संशोधन नवीन प्रवाह शेतकऱ्यांपर्यत पोहोचण्यासाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले.
            यावेळी कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर खासदार शरद पवार यांच्याहस्ते द्राक्ष पिकावरील अभ्यासपूर्ण माहिती असलेल्या स्मरणीकेचे विमोचन करण्यात आहे.
            या कार्यक्रमास दक्षिण आफ्रीकेतील द्राक्ष सल्लागार कोबस बोथमा, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाच्या संशोधन सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. एस.डी.शिखामणी, सचिव महेंद्र शहीर, केलस भोसले, उपाध्यक्ष डॉ.जयराम खिलारी, सदस्य डॉ.जी.एस.प्रकाश, राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.
कृषि प्रदर्शनाचे उदघाटन
            इंडो इटालीयन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज आणि महाग्रेप्स यांनी आयोजित केलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानानेयुक्त शेती अवजारे, यंत्रसामुग्री शेतीसाठी उपयुक्त साहित्याच्या प्रदर्शनाचे उदघाटन कृषि मंत्री पांडुरंग फुंडकर यांच्याहस्ते झाले. प्रदर्शनातील स्टॉलला कृषि मंत्र्यांनी भेट देऊन तेथील उत्पादनांची माहिती जाणून घेतली. यावेळी द्राक्ष बागाईतदार संघाचे पदाधिकारी त्यांच्यासमवेत होते.
000000






No comments:

Post a Comment