Wednesday, August 31, 2016

निर्भया पथकास सर्व सुविधा पुरविणार - पालकमंत्री विजय देशमुख





पोलीस स्टेशन महिलांना माहेर घर वाटावे....... विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील

पंढरपूर दि. 31 :- सोलापूर ग्रामीण पोलीस दलामार्फत स्थापन करण्यात आलेल्या निर्भया पथकासआवश्यक असणारी वाहने उपलबध करुन देण्यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच या पथकास आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यास प्राधान्य देण्यात येईल असे प्रतिपादन पालकमंत्री विजय देशमुख यांनी  निर्भया पथक उद्घाटन समारंभाप्रसंगी आज पंढरपूर येथे बोलताना केले.
            सोलापूर ग्रामीण पोलीस दलामार्फत स्थापन करण्यात आलेल्या निर्भया पथक उद्घघाटन समाभरंभास पालकमंत्री श्री. देशमुख यांच्यासह कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, पोलीस अधीक्षक एस. विरेश प्रभू, आमदार भारत भालके, आमदार दत्तात्रय सावंत, अतीरिक्त पोलीस अधीक्षक मनिषा दुबुले, माजी आमदार सुधाकर परिचारक, पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी, मान्यवर पदाधिकारी यांच्यासह बहुसंख्य संख्येने विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होत्या.
            पालकमंत्री विजय देशमुख म्हणाले, महिलांच्या सरंक्षणाबरोबरच महिलांबाबत समाजात असणारी मानसिकता बदलण्याची गरज आहे. सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या निर्भया पथकाची सुरुवात पंढरपूर येथून होत आहे याचा आनंद आहे.  पण  संतांच्या विचारांची देणगी लाभलेल्या महाराष्ट्रात महिलांचे संरक्षण करण्यासाठी अशी पथके निर्माण करावी लागतात ही दुर्देवाची बाब असल्याची खंतही त्यांनी यावेळी बोलातांना व्यक्त केली. 
            निर्भयापथकाद्वारे महिलांचे संरक्षण करण्याचे काम पोलीस दलामार्फत तत्परतेने होणारच आहे. समाजात महिलांना सन्मान आणि प्रतिष्ठा मिळण्यासाठी तसेच महिलांच्या संरक्षणाबरोचब त्यांच्यावर अन्याय व अत्याचार होणार नाही यासाठी शिवरायांचे मावळे होऊन समाजातील प्रत्येकाने पुढे येणे गरजेचे असलल्याची अपेक्षाही  पालकमंत्री विजय देशमुख यांनी  यावेळी व्यक्त केली.
            महिलांमध्ये पोलीस स्टेशनबाबत असणारी निरर्थक भिती दूर करण्याचा प्रयत्न पोलीस दलामार्फत करण्यात येईल तसेच  पोलीस स्टेशन महिलांना आपले माहेर घर वाटावे एवढा विश्वास त्यांच्यात निर्माण करण्याचा प्रयत्न पोलीस दलाकडून केला जाईल असे  विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी यावेळी बोलतांना सांगितले.  सोलापूर ग्रामीण पोलीस दलामार्फत स्थापित करण्यात आलेल्या निर्भया पथकाद्वारे महिलांच्या सरंक्षणाबरोबरच त्यांना कायद्याची माहिती व जाणीव-जागृती करुन देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. महिलांच्या संरक्षणाबत समाजाची मानसिकता बदलण्याची खरी गरज असल्याचे सांगून श्री. नांगरे-पाटील म्हणाले, समाजात स्त्रियांचा सन्मान वाढावा, मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी ग्रामसभेद्वारे जनजागृती करण्यावर भर दिला जाईल.
            महिला व मुलींच्या संरक्षणासाठी निर्भया पथकाबरोबरच साध्या वेशातील पोलीस आवश्यक त्या ठिकाणी कार्यरत राहणार असल्याचे सांगून श्री. नांगरे-पाटील म्हणाले, या पथकाकडे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींची यादीही राहणार आहे. यामुळे एखादा गुन्हा घडल्यास त्याची  तत्परतेने उकल करण्यास याची  मदत होणार आहे. महिलांचा मानसिक, शारीरिक, बौध्दीक विकास होण्यासाठी महिलांनी शिक्षण घेणे महत्वाचे असल्याचे सांगून श्री. नांगरे-पाटील म्हणाले, शिक्षण हे वाघिणीचे दूध असून याच्या बळावरच आपण मोठे होऊन समाजात आपली वेगळी प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न करावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. तसेच  गणेशोत्सव काळात गणेश मंडळानी डॉल्बीचा वापर न करता पारंपारिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करावा असे आहवानही त्यांनी केले.
            यावेळी आमदार भारत भालके, आमदार दत्तात्रय सावंत, माजी आमदार सुधारकपंत परिचारक, पोलीस अधीक्षक एस. विरेश प्रभू यांनही मनोगत व्यक्त केले. प्रारंभी अतीरिक्त पोलीस अधीक्षक मनिषा दुबुले यांनी स्वागत केले व प्रास्ताविकास निर्भया पथकाबाबतची सविस्तर माहिती दिली. पोलीस उपअधिक्षक दिलीप चौगुलै यांनी आभार मानले.
000000

No comments:

Post a Comment